गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा दलाचा सन्मान सोहळा आणि रुस्तमजी स्मृती व्याख्यानाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले


ऑपरेशन सिंदूरमध्ये, बीएसएफ आणि सैन्याने शौर्याचे एक अतुलनीय उदाहरण जगासमोर ठेवले

आज संपूर्ण जग भारतीय लष्कराच्या जवानांचे शौर्य, मारक क्षमता आणि संयमाचे कौतुक करत आहे

जोपर्यंत सीमेवर बीएसएफ आहे, पाकिस्तानी सैन्य एक इंचही पुढे येऊ शकत नाही

1971 च्या युद्धातले बीएसएफचे शौर्य आणि योगदान भारत कधीही विसरणार नाही आणि बांगलादेशनेही ते विसरू नये

Posted On: 23 MAY 2025 8:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,23 मे 2025


केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) सन्मान सोहळा आणि रुस्तमजी स्मृती व्याख्यानाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक आणि सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, 1965 ते  2025  पर्यंत चा बीएसएफचा प्रवास हे दाखवून देतो की, आव्हानात्मक परिस्थितीत मर्यादित संसाधनांसह सुरुवात केलेली संघटना जगातील सर्वात मोठे आणि सर्वात प्रतिष्ठित सीमा सुरक्षा दल म्हणून कशी उदयास आली. ते म्हणाले की, देशभक्तीच्या आधारे  सर्व अडचणींवर मात करून जागतिक उत्कृष्टता कशी साध्य करता येऊ शकते याचे बीएसएफ हे उत्तम उदाहरण आहे. 45 अंशांपेक्षा जास्त तापमान असो किंवा अत्यंत कमी तापमान असो, घनदाट जंगले असो, खडकाळ पर्वत असो किंवा किनारी प्रदेश असो, प्रतिकूल परिस्थितीत बीएसएफच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली देशभक्ती आणि निष्ठा यामुळे बीएसएफला फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस चा सन्मान मिळाला आहे. शाह पुढे म्हणाले की, देशात प्रत्येक सीमा सुरक्षित करण्यासाठी एक दल नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि बीएसएफच्या क्षमतेच्या आधारे, बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन सर्वात आव्हानात्मक सीमा सुरक्षित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.

बीएसएफच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे के.एफ. रुस्तमजी यांच्या योगदानाचे स्मरण करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, 1965 च्या युद्धानंतर अशा एका दलाची गरज भासू लागली जे शांततेच्या काळातही सीमा सुरक्षित करू शकेल आणि यातूनच  बीएसएफची स्थापना झाली आणि रुस्तमजी त्याचे पहिले महासंचालक बनले. शाह म्हणाले की, भारतावर लादलेल्या 1971 च्या युद्धात बीएसएफ कर्मचाऱ्यांनी दाखवलेले शौर्य आणि योगदान देश कधीही विसरणार नाही आणि बांगलादेशनेही ते कधीही विसरू नये. बांगलादेशच्या निर्मितीत बीएसएफने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि अन्यायाविरुद्ध लढताना सशस्त्र दलांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहून शौर्याचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला.

अमित शाह म्हणाले की, सीमेच्या सुरक्षेबरोबरच, बीएसएफने अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये धडाडीने सहभाग घेतला आहे आणि यश देखील मिळवले आहे. निवडणुका असोत, कोविड-19  महामारी असो, क्रीडा स्पर्धा असोत किंवा दहशतवाद आणि नक्षलवादाविरोधात लढा असो, बीएसएफला जिथे जिथे तैनात केले त्या प्रत्येक आघाडीवर या दलाने आपले  कर्तव्य चोख बजावले आहे असे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, आजचा हा सन्मान सोहळा अशा वेळी होत आहे जेव्हा बीएसएफ आणि सशस्त्र दलांनी शौर्याचे एक अतुलनीय उदाहरण संपूर्ण जगासमोर ठेवले आहे. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ राजकीय इच्छाशक्तीचे, एजन्सींकडून मिळालेल्या अचूक गुप्तचर माहितीचे आणि आपल्या सैन्याच्या मारक  क्षमतेचे अद्भुत  प्रदर्शन आहे. ते पुढे म्हणाले की, अनेक दशकांपासून, आपला देश पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करत आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानने अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत, परंतु त्यांना कधीही सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले नाही.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की दहशतवादी हल्ल्यांना जगाच्या अनेक भागांमध्ये प्रतिसाद दिला गेला, मात्र भारताने दिलेला प्रतिसाद आगळा आहे. ते म्हणाले की, पहलगाम येथील हल्ल्यानंतर  आम्ही ऑपरेशन सिंदूर हाती घेतले आणि अत्यंत अल्प कालावधीत दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले, त्यापैकी दोन तळ दहशतवादी संघटनांची मुख्यालये होती. भारतीय सैन्याने सुरुवातीला पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनांवर अथवा त्यांच्या हवाई तळांवर हल्ले केले नाहीत, तर केवळ आपल्या भूमीवरील क्रूर गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी नमूद केले. आमचा हल्ला केवळ दहशतवाद्यां विरोधात असल्याने हे पुरेसे ठरेल, असा आम्हाला विश्वास होता, असे शाह म्हणाले. पाकिस्तानने दहशतवाद्यांवरील हल्ल्याला स्वत:वरील हल्ला मानून दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे सिद्ध केले, आणि आपल्या देशातील नागरिक आणि लष्करी संस्थांना लक्ष्य करण्याचे धाडस केले, असे ते म्हणाले. भारताची हवाई संरक्षण यंत्रणा अत्यंत सक्षम असून पाकिस्तानचे हल्ले आपले नुकसान करू शकत नाहीत, असे गृहमंत्री म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, पाकिस्तानने नेहमीच ज्या गोष्टीला नकार दिला होता ते आता ऑपरेशन सिंदूर नंतर जगासमोर पूर्णपणे उघड झाले आहे, आणि भारतातील दहशतवाद पाकिस्तान पुरस्कृत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमित शाह म्हणाले की, संपूर्ण देशाला आपले लष्कर आणि आपल्या सीमांचे रक्षण करणाऱ्या बीएएसएफ चा अभिमान आहे. जोपर्यंत बीएसएफ तैनात आहे, तोपर्यंत पाकिस्तानी सैन्य एक इंचही पुढे सरकू शकत नाही, हे बीएसएफने सीमेवरील गोळ्यांना गोळीबाराने प्रत्युत्तर देऊन दाखवून दिले आहे.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान बीएसएफचे जवान मोहम्मद इम्तियाज अहमद आणि दीपक चिंगखाम यांनी मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले असून, देशाच्या संरक्षणाच्या इतिहासात त्यांचे नाव कायम सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल, असे ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, बीएसएफने भारताच्या 15,000 किलोमीटर लांबीच्या आणि सर्वात आव्हानात्मक सीमेला सुरक्षित केले आहे. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत बीएसएफने अनेक तांत्रिक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. ज्या भागात कुंपण घालणे शक्य नाही, अशा ठिकाणी बीएसएफने सीमा सुरक्षेसाठी जागतिक दर्जाच्या तांत्रिक उपाय योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, बीएसएफच्या जवानांनी अनेक देशांतर्गत उपायही विकसित केले आहेत, आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक सीमा सुरक्षित करण्यासाठी केलेली ही तांत्रिक प्रगती, आगामी काळात देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान बीएसएफ आणि लष्कराने शौर्याचे असाधारण उदाहरण जगासमोर ठेवले आहे. ते म्हणाले की, बीएसएफ च्या जवानांना 1 पद्मविभूषण, 2 पद्मभूषण, 7 पद्मश्री, 1 महावीर चक्र, 6 कीर्ती चक्र, 13 शौर्य चक्र, 56 सेना पदके आणि 1,246 पोलीस शौर्य पदके प्रदान करून, देशाने बीएसएफ च्या जवानांच्या शौर्याचा नेहमीच गौरव केला आहे. असे असंख्य सन्मान मिळवणाऱ्या दलाच्या विलक्षण समर्पणाचे हे प्रतीक असल्याचे शाह म्हणाले. गेल्या पाच वर्षांत बीएसएफने सुमारे 1.1 लाख किलो अमली पदार्थ जप्त करून अमली पदार्थां विरोधातील लढा  आणखी तीव्र केला आहे, असे ते म्हणाले. गेल्या पाच वर्षांत 78 हून अधिक नक्षल्यांचा खात्मा करून बीएसएफने नक्षल विरोधी कारवायांच्या यशात महत्वाची भर घातली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार, गृह मंत्रालय आणि संपूर्ण देश बीएएसएफ च्या  जवानांच्या शौर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. देश बीएसएफ च्या जवानांवर विश्वास ठेवतो आणि त्यांचा सन्मान करतो, असे त्यांनी नमूद केले.  

S.Patil/S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2130857)