पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी राजस्थानला भेट देणार


बिकानेरमधील पलाना इथे पंतप्रधानाच्या हस्ते 26,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची होणार पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

रेल्वे, रस्ते, ऊर्जा, जल, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांतील विविध प्रकल्पांचा अंतर्भाव

पंतप्रधानांच्या हस्ते देशभरातील 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 86 जिल्ह्यांमधील 103 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचे उद्घाटन होणार

Posted On: 20 MAY 2025 2:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी राजस्थानला भेट देणार आहेत. आपल्या राजस्थान भेटीत ते सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला बिकानेर इथे पोहोचतील आणि देशनोक इथल्या करणी माता मंदिरात  दर्शन घेतील.

त्यानंतर, सकाळी  11:30 वाजण्याच्या सुमाराला पंतप्रधानाच्या हस्ते अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या देशनोक रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान  बिकानेर - मुंबई एक्सप्रेस रेल्वेगाडीला हिरवा झेंडाही दाखवतील. त्यानंतर, ते 26,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करणार आहेत . यानिमित्ताने पंतप्रधान पलाना इथे एका जाहीर  कार्यक्रमाला संबोधितही करतील.

देशातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करत, रेल्वे सेवाचा विस्तार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधान भारताच्या 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 86 जिल्ह्यांमधील 103 पुनर्विकसित अमृत स्थानकांचे उद्घाटनही करणार आहेत. या रेल्वे स्थानकांसाठी 1,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला गेला आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत 1,300 पेक्षा जास्त स्थानकांचा आधुनिक सेवा सुविधांसह पुनर्विकास केला जात आहे. याअंतर्गत रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधांचा विस्तार केला जात असून, या रेल्वे स्थानकांच्या उभारणीत  प्रादेशिक वास्तुकलेचे प्रतिबिंब उमटेल अशा दृष्टीने त्यांची रचना केली गेली आहे. या योजनेअंतर्गतच पुनर्विकसित केले गेलेले देशनोक रेल्वे स्थानक हे करणी माता मंदिराला भेट देणारे भाविक आणि पर्यटकांसाठी महत्वाचे स्थानक आहे. त्या अनुषंगाने या स्थानकाची  बांधणी ही करणी माता मंदिराची स्थापत्यकला, तसेच मंदिराच्या  कमानी आणि स्तंभांवरून प्रेरित आहे. याचप्रमाणे तेलंगणामधील बेगमपेट रेल्वे स्थानक देखील काकतीय साम्राज्याच्या स्थापत्यकलेपासून प्रेरणा घेत उभारले गेले आहे. तर बिहारमधील थावे रेल्वे स्थानकात 52 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माता थावेवालीची प्रचिती देणारी विविध भित्तिचित्रे, कलाकृती  आणि  मधुबनी चित्रकला शैलीत साकारलेल्या चित्रांचा अंतर्भाव केला आहे. अशाच प्रकारे गुजरातमधील डाकोर रेल्वे स्थानक देखील रणछोडरायजी महाराजांपासून प्रेरणा घेत उभारले गेले आहे. अशापद्धतीने देशभरातली पुनर्विकसित केलेली अमृत स्थानकांच्या उभारणीत आधुनिक पायाभूत सुविधांना सांस्कृतिक वारसा, दिव्यांगजन अनुकुल सोयी सुविधांसह जनसामान्यांसाठीच्या सुविधा आणि प्रवासाचा समृद्ध अनुभव घेता येईल अशा प्रकारच्या शाश्वत पद्धतींचे अनोखे एकात्मिकरण घडवून आणले आहे.

देशभर विस्तारलेल्या रेल्वे सेवा जाळ्याचे 100% विद्युतीकरण करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेची वाटचाल सुरू आहे. यामुळे रेल्वेचे कार्यान्वयन अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक होऊ शकणार आहे. याच अनुषंगाने पंतप्रधान चुरू - सादुलपूर या  रेल्वे मार्गाची (58 किमी) पायाभरणीही करतील, तसेच ते सूरतगड-फलोदी (336 किमी), फुलेरा-डेगाना (109 किमी), उदयपूर-हिम्मतनगर (210 किमी), फलोदी-जैसलमेर (157 किमी) आणि समदारी-बाडमेर (129 किमी) या रेल्वे विद्युतीकरण पूर्ण झालेल्या रेल्वे मार्गांचे राष्ट्रार्पण करतील.

राज्यातील रस्तेविषयक पायाभूत सुविधांना मोठी चालना देत पंतप्रधान या प्रसंगी 3 वाहनोपयोगी भुयारी मार्गांचे बांधकाम तसेच राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण आणि बळकटीकरण या कामांची पायाभरणी करतील. त्यांच्या हस्ते राजस्थानातील 7 रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण देखील होईल.सुमारे 4,850 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे हे रस्ते प्रकल्प त्या भागांतील वस्तू आणि माणसे यांच्या अधिक सुलभ गतिशीलतेला चालना देतील. हे महामार्ग भारत-पाकिस्तान सीमेपर्यंत विस्तारण्यात येणार असून त्याद्वारे संरक्षण दलांची त्या भागापर्यंत पोहोच सुधारून, भारताच्या संरक्षण पायाभूत सुविधा अधिक बळकट होतील.

सर्वांसाठी विजेची उपलब्धता तसेच हरित आणि स्वच्छ उर्जा मिळण्याच्या संकल्पनेला पुढे नेत पंतप्रधानांच्या हस्ते बिकानेर तसेच दिडवाना कूचमन मधील नवा येथील सौर उर्जा प्रकल्पांच्या उभारणीसह विविध उर्जा प्रकल्पांचा कोनशीला समारंभ होईल. तसेच यावेळी सिरोही ट्रान्समिशन लिमिटेडच्या भाग ब पॉवर ग्रीडच्या आणि मेवाड ट्रान्समिशन लिमिटेडच्या भाग ई पॉवर ग्रीडच्या इव्हॅक्युएशनसाठी संप्रेषण यंत्रणांची देखील कोनशीला ठेवण्यात येईल. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी, बिकानेर येथील सौर उर्जा प्रकल्प, पॉवर गिड नीमच  तसेच बिकानेर संकुलातून इव्हॅक्युएशनसाठी संप्रेषण यंत्रणा आणि स्वच्छ उर्जा पुरवून कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने फतेहगड – 2 उर्जा केंद्राच्या निर्मिती क्षमतेत वाढ यांसह विविध उर्जा प्रकल्पांचे उद्घाटन होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी राजस्थानातील पायाभूत सुविधा, जोडणी, वीज पुरवठा, आरोग्य सेवा आणि पाण्याची उपलब्धता यांच्यात सुधारणा करण्यासाठी राज्यात उभारल्या जाणाऱ्या 25 महत्त्वपूर्ण राज्य सरकारी प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण देखील करतील. यामध्ये 3,240 कोटी रुपये खर्चून साडेसातशे किमीहून अधिक लांबीच्या 12 राज्य महामार्गांचे अद्यायावतीकरण तसेच देखभाल यासाठीचे प्रकल्प, तसेच 900 किमी लांबीच्या नव्या महामार्गांच्या विस्तारासाठीचे प्रकल्प यांची पायाभरणी आणि लोकार्पण यांचा देखील समावेश आहे. बिकानेर आणि उदयपूर येथील वीजनिर्मिती प्रकल्पांचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल. ते यावेळी राज्यातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधा सुधारण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या, राजसमंद, प्रतापगड,भिलवाडा,धोलपपूर येथील नर्सिंग महाविद्यालयांचे उद्घाटन देखील करतील. अनेक इतर प्रकल्पांसह, झुंझुनू  जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा आणि फ्ल्यूरॉसिस उपशमन प्रकल्प, अमृत 2.0 योजनेंतर्गत पाली जिल्ह्यातील 7 नगरांसाठी शहरी पाणीपुरवठा योजनेची पुनर्बांधणी यांच्यासमवेत विविध पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल.

 

* * *

S.Kane/S.Kakade/Tushar/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2129836)