पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अंतराळ संशोधनावरील (स्पेस एक्सप्लोरेशन) जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केलेले संबोधन

Posted On: 07 MAY 2025 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 मे 2025

 

जगभरातील प्रतिष्ठित प्रतिनिधी, मान्यवर शास्त्रज्ञ, संशोधक, अंतराळवीर आणि मित्र,

नमस्कार! 

ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स (अंतराळ संशोधन परिषद) 2025 मध्ये आपल्या सर्वांबरोबर सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. अंतराळ हा केवळ एक टप्पा नसून, जिज्ञासा, साहस आणि सामूहिक प्रगतीची घोषणा आहे. भारताचा अंतराळ प्रवास याच भावनेचे प्रतिबिंब आहे. 1963 मध्ये एक छोटे रॉकेट प्रक्षेपित करण्यापासून ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्यापर्यंतचा आमचा प्रवास उल्लेखनीय आहे. आमची रॉकेट केवळ पेलोडच नव्हे तर एक अब्ज चाळीस कोटी भारतीयांची स्वप्ने सोबत घेऊन जातात. भारताची कामगिरी हे एक महत्वाचे वैज्ञानिक यश आहे. शिवाय मानवी आकांक्षा गुरुत्वाकर्षणाचा प्रतिरोध करू शकते, याचा हा पुरावा आहे. भारताने 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचून इतिहास रचला होता. चांद्रयान-1 ने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी सहाय्य केले. चांद्रयान-2 ने आपल्याला चंद्राची सर्वाधिक रिझोल्यूशनची (स्पष्ट) छायाचित्र पाठवली. चांद्रयान -3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबाबत आपल्याला अधिक माहिती पुरवली. आम्ही विक्रमी वेळेत क्रायोजेनिक इंजिन तयार केले. आम्ही एकाच मोहिमेत 100 उपग्रह प्रक्षेपित केले. आम्ही आमच्या प्रक्षेपण वाहनां द्वारे 34 देशांचे 400 हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यावर्षी आम्ही दोन उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले, जे एक मोठे पाऊल आहे.

मित्रहो,

भारताचा अंतराळ प्रवास म्हणजे इतरांशी स्पर्धा करणे नसून, एकत्र येऊन उंची गाठणे, हा याचा अर्थ आहे. आम्ही मानवतेच्या भल्यासाठी अंतराळ संशोधन करण्यासाठी एकत्र येऊन लक्ष्य ठरवतो. आम्ही दक्षिण आशियाई देशांसाठी एक उपग्रह प्रक्षेपित केला. आता जी-20 च्या अध्यक्षपदाच्या काळात घोषित झालेले जी-20 उपग्रह मिशन हे ग्लोबल साऊथ साठीची एक भेट असेल. आम्ही वैज्ञानिक संशोधनाच्या सीमा ओलांडून नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहोत. 'गगनयान', ही आमची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आमच्या देशाच्या वाढत्या आकांक्षा प्रदर्शित करत आहे.येत्या काही आठवड्यात, एक भारतीय अंतराळवीर इस्रो-नासा यांच्या संयुक्त मोहिमेचा भाग म्हणून,आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी, अंतराळ प्रवास करेल. 2035 पर्यंत, भारत अंतराळ स्थानक संशोधन क्षेत्रात  जागतिक सहकार्याच्या नव्या सीमा खुल्या करेल. 2040 पर्यंत चंद्रावर एका भारतीयाच्या पावलांचे ठसे उमटलेले असतील. मंगळ आणि शुक्र देखील आपल्या रडारवर आहेत.

मित्रांनो,

भारतासाठी, अंतराळ संशोधन हा सक्षमीकरणाचाही  विषय आहे.यामुळे प्रशासन सक्षम होते, रोजगार वाढतात आणि अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळते. मच्छिमारांच्या इशाऱ्यांपासून ते गतिशक्ती प्लॅटफॉर्मपर्यंत, रेल्वे सुरक्षेपासून ते हवामान अंदाजापर्यंत, आमचे उपग्रह प्रत्येक भारतीयाच्या कल्याणासाठी तत्पर आहेत. आम्ही आमचे अंतराळ क्षेत्र स्टार्टअप्स, उद्योजक आणि तरुण बुध्दिवंतांसाठी खुले केले आहे. आज भारतात 250 हून अधिक अंतराळ स्टार्टअप्स आहेत. ते उपग्रह तंत्रज्ञान, प्रणोदन प्रणाली, इमेजिंग आणि इतर क्षेत्रांतील अत्याधुनिक प्रगतीमध्ये योगदान देत आहेत. तुम्हाला माहिती आहेच की आपल्या अनेक मोहिमांचे नेतृत्व महिला शास्त्रज्ञ करत आहेत, हे आणखी प्रेरणादायी आहे.

मित्रांनो,

भारताचा अंतराळ दृष्टीकोन 'वसुधैव कुटुंबकम' या प्राचीन तत्त्वज्ञानावर आधारित आहे, ज्याचा अर्थ संपूर्ण जग एक कुटुंब आहे. आम्ही केवळ स्वतःचा विकास करण्यासाठीच नाही तर जागतिक ज्ञान समृद्ध करण्यासाठी, सर्वसामान्य आव्हाने सोडवण्यासाठी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी देखील प्रयत्नशील आहोत. भारत म्हणजे एकत्रितपणे स्वप्न पाहणे, एकत्र जोडून रहाणे आणि एकत्र ताऱ्यांपर्यंत पोहोचणे. चला, विज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली आणि  उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामायिक स्वप्नांच्या आधारे आपण एकत्रितपणे अवकाश संशोधनात एक नवीन अध्याय लिहू या. तुमचे सर्वांचे भारतातील वास्तव्य खूप आनंददायी आणि फलदायी राहो, अशी मी शुभेच्छा देतो.

धन्यवाद.

 

* * *

S.Patil/Rajshree/Sampada/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127530) Visitor Counter : 15