पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान स्टार्मर यांनी केले परस्परांना फायदेशीर असलेल्या भारत-यूके मुक्त व्यापार करार आणि दुहेरी योगदान कराराच्या पूर्णत्वाचे स्वागत
द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीत हा एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे दोन्ही नेत्यांनी केले नमूद
या करारामुळे व्यापार आणि आर्थिक सहकार्याला चालना आणि नवोन्मेष, रोजगार निर्मिती, परिवहनाला प्रोत्साहन मिळेल
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान स्टार्मर यांना केले भारतभेटीसाठी आमंत्रित
Posted On:
06 MAY 2025 6:28PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंगडमचे पंतप्रधान सर किर स्टार्मर यांच्यात आज दूरध्वनीवरून संभाषण झाले. दोन्ही नेत्यांनी महत्त्वाकांक्षी आणि परस्पर फायदेशीर दुहेरी योगदान करारासह भारत-युके मुक्त व्यापार कराराच्या यशस्वी पूर्ततेचे स्वागत केले.
दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये या करारामुळे व्यापार, गुंतवणूक, नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याने द्विपक्षीय सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीतील हा एक ऐतिहासिक महत्त्वाचा टप्पा असल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. जगातील दोन मोठ्या आणि खुल्या बाजारपेठांच्या अर्थव्यवस्थांमधील हे महत्त्वाचे करार व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण करतील, आर्थिक संबंध अधिक दृढ करतील आणि दोन्ही देशांच्या जनतेचे आपसातील संबंध अधिक दृढ करतील यावर दोघांनीही सहमती व्यक्त केली.
जगभरातील अर्थव्यवस्थांसोबत आघाड्या बळकट करणे आणि व्यापारी तफावत कमी करणे हा भक्कम आणि अधिक सुरक्षित अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या योजनेचा एक भाग असल्याचे पंतप्रधान स्टार्मर यांनी सांगितले.
भारत आणि युके दरम्यान आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांचा विस्तार हा वाढत्या मजबूत आणि बहुआयामी भागीदारीचा पाया असल्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. वस्तू आणि सेवांमधील व्यापाराचा समावेश असलेल्या संतुलित, न्याय्य आणि महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार कराराच्या (FTA) पूर्ततेमुळे द्विपक्षीय व्यापार लक्षणीयरीत्या वृद्धिंगत होईल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, जीवनमान सुधारेल आणि दोन्ही देशांतील नागरिकांचे कल्याण होईल अशी अपेक्षा आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रांना जागतिक बाजारपेठेसाठी संयुक्तपणे उत्पादने आणि सेवा विकसित करण्याची नवीन क्षमता मिळेल. हा करार भारत-युके सर्वंकष धोरणात्मक भागीदारीच्या मजबूत पायाला अधिक बळकट करणारा आणि सहकार्य आणि समृद्धीच्या एका नवीन युगाचा मार्ग प्रशस्त करणारा आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान स्टार्मर यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती व्यक्त केली.
***
S.Kakade/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2127334)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam