इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नीट परीक्षेसाठी चेहरा प्रमाणीकरणाची घेतली यशस्वी चाचणी
Posted On:
05 MAY 2025 3:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2025
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (युआयडीएआय) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट युजी) 2025 दरम्यान चेहऱ्याद्वारे प्रमाणीकरणाच्या वापरासंबंधी संकल्पनेची चाचणी यशस्वी पद्धतीने घेतली आहे.
नॅशनल इन्फरमॅटिक्स सेंटर आणि राष्ट्रीय चाचणी संस्था यांच्या सहकार्याने परीक्षा सुरक्षा आणि उमेदवाराची ओळख पडताळणी प्रक्रियेत वाढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही चाचणी घेण्यात आली.
भारतातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार-आधारित चेहऱ्याद्वारे प्रमाणीकरणाची व्यवहार्यता आणि परिणामकारकता तपासणे हा या चाचणीचा उद्देश होता.
या चाचणीदरम्यान, दिल्लीतील निवडक ‘नीट’ केंद्रांवर आधार चेहऱ्याद्वारे प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आणि ते एनआयसीच्या डिजिटल पायाभूत सुविधा आणि एनटीए च्या परीक्षा नियमावलीमध्ये सुरळीतपणे समाविष्ट करण्यात आले.
आधारच्या बायोमेट्रिक डेटाबेसचा वापर करून चेहऱ्याद्वारे प्रमाणीकरणाची प्रक्रिया रियल टाईम म्हणजे तत्क्षणी स्वरुपात करण्यात आली, ज्यामुळे प्रक्रिया संपर्कविरहित आणि अधिक सुव्यवस्थित झाली. या चाचणीच्या परिणामातून उमेदवार पडताळणीमध्ये अत्यंत उच्च पातळीची अचूकता आणि कार्यक्षमता दिसून आली.
व्यापक स्वरुपात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधील ओळख पडताळणीसाठी आधार चेहऱ्याद्वारे प्रमाणीकरण एक सुरक्षित, मोठ्या स्तरावर वापरण्यायोग्य आणि विद्यार्थी-स्नेही उपाय म्हणून किती प्रभावी ठरू शकते, हे देखील या चाचणीतून दिसून आले. यासोबतच, भविष्यात याचा कसा वापर केला जाऊ शकतो आणि प्रवेश परीक्षांदरम्यान बनावट उमेदवारांकडून परीक्षा देण्यासारखे होणारे गैरप्रकार रोखण्यात ते किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, हे देखील दिसून आले
परस्पर सहकार्याने केलेला हा प्रयत्न म्हणजे सार्वजनिक सेवांमधील पारदर्शकता आणि सुरक्षा सुधारण्यासाठी डिजिटल नवोन्मेषाचा वापर करण्याच्या सरकारच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2127031)
Visitor Counter : 22