पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे विझिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 02 MAY 2025 11:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2025

केरळचे राज्यपाल  राजेंद्र आर्लेकर जी , केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, मंचावर उपस्थित अन्य सर्व मान्यवर माझ्या बंधू आणि भगिनींनो,

एल्लावर्क्कुम एन्डे नमस्कारम्। ओरिक्कल कूडि श्री अनन्तपद्मनाभंडे मण्णिलेक्क वरान् साद्धिच्चदिल् एनिक्क अतियाय सन्तोषमुण्ड।

मित्रहो,

आज भगवान आदि शंकराचार्य जी यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात आदि शंकराचार्य यांच्या जन्मभूमीला भेट देण्याचे सद्भाग्य मला लाभले होते. काशी या माझ्या लोकसभा मतदारसंघात विश्वनाथ धाम परिसरात आदि शंकराचार्य जी यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे याचा मला आनंद आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे आदि शंकराचार्य यांच्या दिव्य पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य देखील मला लाभले आहे. आणि आजच देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे द्वार दर्शनासाठी उघडले आहे, केरळमधून बाहेर पडून  देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठांची स्थापना करून आदि शंकराचार्य जी यांनी राष्‍ट्रीय  चैतन्‍याची  जाणीव जागृत केली. या पवित्र प्रसंगी मी त्यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो.

मित्रहो,

इथे एका बाजूला अफाट संधींनी संपन्न हा  विशाल समुद्र आहे तर दुसरीकडे निसर्गाचे अद्भुत  सौंदर्य आहे. आणि  या सर्व गोष्टींमध्ये विझिंजम हे खोल-पाण्यातील सागरी बंदर आता नव्या युगाच्या विकासाचे प्रतीक म्हणून उदयास आले आहे. मी केरळच्या जनतेचे आणि संपूर्ण देशाचे खूप-खूप अभिनंदन करतो.

मित्रहो,

हे सागरी बंदर  8,800 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहे.  आता या आंतरराष्ट्रीय सागरी मालवाहतूक केंद्राची जी क्षमता आहे ती आगामी काळात तिप्पट होईल. जगातील मोठी मालवाहू जहाजेही इथे  सहज येऊ  शकतील.  आतापर्यन्त भारताची 75% आंतरराष्ट्रीय सागरी मालवाहतूक भारताबाहेरील बंदरांतून होत होती. त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात महसूल गमवावा लागला आहे.  ही परिस्थिती आता लवकरच पालटणार आहे. देशाचा पैसा आता देशाच्या उपयोगी पडेल. जो पैसा देशाबाहेर जात होता तो आता केरळ आणि विझिंजमच्या लोकांसाठी नवीन आर्थिक संधी निर्माण करेल.

मित्रहो,

गुलामीपूर्वी आपल्या भारताने हजारो वर्षे समृद्धी अनुभवली आहे. एकेकाळी जागतिक जीडीपीमध्ये भारताचा मोठा वाटा असायचा. त्या काळात आपली सागरी क्षमता, आपल्या बंदर शहरांमधील आर्थिक उलाढाल यामुळे इतर देशांपेक्षा भारताचे वेगळेपण उठून दिसत  होते.  केरळचे  यात मोठे योगदान होते.  केरळमधून अरबी समुद्राद्वारे भारताचा विविध देशांसोबत व्यापार सुरु होता. इथून जहाजे व्यापारासाठी जगातील अनेक देशांमध्ये जात होती. आज भारत सरकार देशाच्या आर्थिक सामर्थ्याचा हा मार्ग आणखी बळकट करण्याचा संकल्प घेऊन काम करत आहे. भारतातील किनारी राज्ये , आपली बंदर शहरे विकसित भारताच्या वाढीची प्रमुख केंद्रे बनतील. आताच मी या बंदराला भेट देऊन आलो आहे. गुजरातच्या लोकांना जेव्हा समजेल की, एवढे सुंदर बंदर अदानी समूहाने  इथे केरळमध्ये बांधले आहे, ते गुजरातमध्ये गेली  30 वर्षांहून अधिक काळ बंदरावर काम करत आहेत मात्र अजूनपर्यंत त्यांनी तिथे असे बंदर बांधलेले नाही ,तेव्हा त्यांना गुजरातच्या जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे लागेल. आपल्या मुख्यमंत्र्यांना  मी सांगू इच्छितो की, तुम्ही तर ‘इंडि’ आघाडीचे खूप मोठे मजबूत आधारस्तंभ आहात, येथे शशी थरूर देखील  बसले  आहेत आणि आजचा हा कार्यक्रम अनेकांची झोप उडवणार आहे. हा  संदेश जिथे पोहोचायला हवा होता, तिथे पोहचला.

मित्रहो,

बंदर अर्थव्यवस्थेच्या पूर्ण क्षमतेचा वापर तेव्हा होतो जेव्हा पायाभूत सुविधांच्या जोडीने व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन दिले जाते.  गेल्या 10 वर्षांमध्ये भारत सरकारच्या बंदर आणि जलमार्ग धोरणाचा हाच कृती आराखडा राहिला आहे. आम्ही औद्योगिक उपक्रम आणि राज्यांच्या सर्वांगीण विकासाच्या प्रयत्नांना  गती दिली आहे.  भारत सरकारने राज्य सरकारांच्या सहकार्याने सागरमाला प्रकल्पांतर्गत  बंदराच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली आहे तसेच बंदराला जोडणाऱ्या वाहतुकीच्या सुविधा बळकट केल्या आहेत.  पीएम गति शक्ती अंतर्गत  जलमार्ग, रेल्वे, महामार्ग आणि हवाई मार्गांची आंतरजोडणी वेगाने सुधारण्यात येत आहे. व्यापार सुलभतेसाठी करण्यात आलेल्या सुधारणांमुळे बंदरे आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीत वाढ झाली आहे. भारतीय खलाशांसाठीही नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत, त्याचे लक्षणीय परिणाम देश पाहत आहे. 2014 मध्ये भारतीय खलाशांची संख्या सव्वा लाखांपेक्षा कमी होती, आज त्यांची संख्या सव्वा तीन लाखांहून अधिक झाली  आहे. खलाशांच्या संख्येच्या बाबतीत भारताने  आज जगात आघाडीच्या  तीन देशांमध्ये स्थान मिळवले आहे.

मित्रहो,

नौवहन उद्योगाशी संबंधित लोकांना माहित आहे की 10 वर्षांपूर्वी आपल्या जहाजांना बंदरावर किती वेळ प्रतीक्षा करावी लागत होती. जहाजावरचा माल उतरवण्यासाठी  खूप वेळ लागत होता.  यामुळे व्यवसाय, उद्योग आणि अर्थव्यवस्था, या सगळ्यांच्या गतीवर परिणाम होत होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये भारतातील प्रमुख बंदरातून जहाजांच्या माल उतरवून परत फिरण्याच्या (टर्न-अराउंड) वेळेत 30% घट झाली आहे. आपल्या बंदरांची कार्यक्षमता सुधारली आहे,  यामुळे आपण कमीत कमी कालावधीत जास्त मालाची हाताळणी  करत आहोत.

मित्रहो,

भारताच्या या यशामागे मागील एका दशकांतील मेहनत आणि दूरदृष्टी आहे.  मागील 10 वर्षांमध्ये आपण आपल्या बंदरांची क्षमता दुपटीने वाढवली आहे.

आपल्या राष्ट्रीय जलमार्गांचाही  आठपट विस्तार झाला आहे. आज जागतिक स्तरावर आघाडीच्या 30 बंदरांमध्ये आपली दोन भारतीय बंदरे आहेत.

लॉजिस्टिक्स – वाहतूक, दळणवळण  कामगिरी निर्देशांकातही आपली क्रमवारी सुधारली आहे. जागतिक जहाजबांधणीमध्ये आपण अव्वल-20 देशांमध्ये स्थान मिळवले आहे. आपल्या मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्यानंतर, आता आपण जागतिक व्यापारात भारताच्या  धोरणात्मक स्थानावर लक्ष केंद्रित करत आहोत. या दिशेने आपण 'Maritime Amrit Kaal Vision' सुरू केले आहे. विकसित भारताच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपली सागरी रणनीती काय असेल, याचा आराखडा आपण तयार केला आहे. तुम्हाला आठवत असेल, जी-20 शिखर परिषदेत आपण अनेक मोठ्या देशांसोबत मिळून इंडिया-मिडल ईस्ट-युरोप कॉरिडॉरबाबत सहमती निर्माण केली आहे. या मार्गावर केरळचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. केरळला याचा खूप फायदा होणार आहे.

मित्रांनो,

देशाच्या सागरी क्षेत्राला नवीन उंचीवर नेण्यात खाजगी क्षेत्राचेही महत्त्वाचे योगदान आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत गेल्या 10 वर्षांत हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या भागीदारीमुळे केवळ आपली बंदरे जागतिक मानकांनुसार अद्ययावतच झाली नाहीत, तर ती भविष्यासाठीही सज्ज झाली आहेत. खाजगी क्षेत्राच्या सहभागामुळे नवोन्मेष आणि कार्यक्षमतेला प्रोत्साहन मिळाले आहे. आणि कदाचित माध्यमातील लोकांनी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केले असेल, ज्यावेळी आपले बंदर मंत्री भाषण देत होते, तेव्हा त्यांनी अदानींचा उल्लेख करत सांगितले की, 'आमच्या सरकारचे भागीदार', एका कम्युनिस्ट सरकारचे मंत्री खाजगी क्षेत्रासाठी बोलत होते की, 'आमच्या सरकारचा भागीदार', हा बदलता भारत आहे.

मित्रांनो,

आम्ही कोच्चीमध्ये जहाजबांधणी आणि दुरुस्ती क्लस्टर उभारण्याच्या दिशेनेही पुढे जात आहोत. हे क्लस्टर तयार झाल्यावर येथे रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील. केरळमधील स्थानिक प्रतिभांना, केरळमधील तरुणांना पुढे जाण्याची संधी मिळेल.

मित्रांनो,

भारताच्या जहाजबांधणीच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी देश आता मोठे लक्ष्य घेऊन वाटचाल करत आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात भारतात मोठ्या जहाजांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आपल्या उत्पादन क्षेत्रालाही चालना मिळेल. याचा थेट फायदा आपल्या एमएसएमईंना होईल आणि त्यातून मोठ्या संख्येने रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील.

मित्रांनो,

खऱ्या अर्थाने विकास तेव्हा होतो, जेव्हा पायाभूत सुविधा देखील उभारल्या जातात, व्यापारातही वाढ होते आणि सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात. केरळच्या लोकांना माहीत आहे की आपल्या प्रयत्नांमुळे गेल्या 10 वर्षांत केरळमध्ये बंदर पायाभूत सुविधांसोबतच किती वेगाने महामार्ग, रेल्वे आणि विमानतळांशी संबंधित विकास झाला आहे. कोल्लम बायपास आणि अलाप्पुझा बायपाससारखे अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प भारत सरकारने पुढे नेले आहेत. आम्ही केरळला आधुनिक वंदे भारत ट्रेन्सही दिल्या आहेत.

मित्रांनो,

केरळच्या विकासातून देशाचा विकास या मंत्रावर भारत सरकारचा विश्वास आहे. आम्ही सहकारी संघवादाच्या भावनेतून काम करत आहोत. गेल्या दशकात आम्ही केरळला विकासाच्या सामाजिक मापदंडांवरही पुढे नेण्याचे काम केले आहे. जलजीवन मिशन, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, अशा अनेक योजनांचा केरळमधील लोकांना खूप फायदा होत आहे

मित्रांनो,

आपल्या मच्छीमारांना फायदे मिळवून देण्यालाही आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. नील क्रांती आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत केरळसाठी शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. आम्ही पोन्नानी आणि पुथियाप्पा यांसारख्या मासेमारी बंदरांचे आधुनिकीकरणही केले आहे. केरळमध्ये हजारो मच्छीमार बंधू-भगिनींना किसान क्रेडिट कार्ड्सही देण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांना शेकडो कोटी रुपयांची मदत मिळाली आहे.

मित्रांनो,

आपले केरळ सौहार्द आणि सहिष्णुतेची भूमी राहिली आहे. येथे शेकडो वर्षांपूर्वी देशातील पहिले आणि जगातील सर्वात प्राचीन चर्चपैकी एक सेंट थॉमस चर्च बांधण्यात आले. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की, काही दिवसांपूर्वी आपल्या सर्वांसाठी अतिशय दुःखद वेळ आली होती. काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी पोप फ्रान्सिस यांना गमावले. भारताकडून त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी आपल्या राष्ट्रपती-  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी तिथे गेल्या होत्या. त्यांच्यासोबत आपले केरळमधीलच सहकारी, आपले मंत्री जॉर्ज कुरियनही  गेले होते. मीसुद्धा, केरळच्या भूमीवरून पुन्हा एकदा, या दुःखात सहभागी झालेल्या सर्वांविषयी  आपली संवेदना व्यक्त करतो.

मित्रांनो,

पोप फ्रान्सिस यांची सेवाभावी वृत्ती, ख्रिश्चन परंपरांमध्ये सर्वांना स्थान देण्याचे त्यांचे प्रयत्न, यासाठी जग त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल. मी हे माझे भाग्य मानतो की, मला ज्या ज्या वेळी त्यांना भेटण्याची संधी मिळाली, अनेक विषयांवर  त्यांच्याशी सविस्तर संवाद साधण्याची संधी मला मिळाली. आणि मी पाहिले आहे की, नेहमीच मला त्यांचे विशेष प्रेम मिळत राहिले. मानवता, सेवा आणि शांती यांसारख्या विषयांवर त्यांच्यासोबत झालेली चर्चा, त्यांचे शब्द मला नेहमीच प्रेरणा देत राहतील.

मित्रांनो,

मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आजच्या या आयोजनासाठी शुभेच्छा देतो. केरळ जागतिक सागरी व्यापाराचे मोठे केंद्र बनेल आणि हजारो नवीन नोकऱ्या निर्माण होतील, या दिशेने भारत सरकार राज्य सरकारसोबत मिळून काम करत राहील. मला पूर्ण विश्वास आहे की केरळमधील लोकांच्या सामर्थ्याने भारताचे सागरी क्षेत्र नवीन उंची गाठेल.

नमुक्क ओरुमिच्च् ओरु विकसित केरलम पडत्तुयर्ताम्, जइ केरलम् जइ भारत l

 

* * *

S.Bedekar/Suvarna/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2126423) Visitor Counter : 9