माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले, वेव्हज हे मनोरंजन उद्योगासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ : शाहरुख खान
आताचा काळ द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांसाठी परवडणारे चित्रपट तयार करण्याचा : शाहरुख खान
‘वेव्हज’ सर्व माध्यमांना एकाच मंचांवर आणणारा योग्य वेळी सुरू केलेला उपक्रम : दीपिका पदुकोण
यापुढे वेव्हजच्या सोबतीने मोठी झेप घेण्यासाठी भारतातील सर्जक सर्व सामर्थ्याने सज्ज : करण जोहर
Posted On:
01 MAY 2025 7:50PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 1 मे 2025
वेव्हज या शिखर परिषदेची संकल्पना मांडल्याबद्दल आणि ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अभिनेता आणि चित्रपट निर्माते शाहरुख खान यांनी चित्रपट उद्योगाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. या परिषदेमध्ये मनोरंजन उद्योगाला अधिक मजबूत करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. हे व्यासपीठ उद्योगासाठी किती समर्पक आहे आणि ते विविध आघाड्यांवर सरकारकडून अत्यंत आवश्यक समन्वय आणि पाठबळ उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारत हे एक अमर्याद शक्यता असलेले स्थान असल्याचे सांगून, शाहरुख खान यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत 'शूट इन इंडिया' कसे बनू शकते, याकडे लक्ष वेधले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्था आणि उद्योगांशी विविध प्रकारचे करार भारताच्या मनोरंजन उद्योगाला आकार देण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी किती महत्त्वाचे ठरू शकतात यावर त्यांनी भर दिला.

शाहरूख खान यांनी द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतील प्रेक्षकांसाठी भारतीय सिनेमा अधिक परवडणारा बनवण्यावरही भर दिला. या शहरांमध्ये एकल पडदा असलेल्या चित्रपटगृहांमध्ये सिनेमा पाहण्याचा अनुभव निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी मांडली, ज्यामुळे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनीही वेव्हजचे महत्त्व आपल्या शब्दात मांडले. माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील विविध माध्यमांना एकत्र आणण्याची ही अचूक वेळ असल्याचे त्या म्हणाल्या. दीपिका पदुकोण यांनी सांगितले, की या क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आतापर्यंत माहितीचे आदान- प्रदान किंवा सहकार्य मर्यादित स्वरूपात केले जात होते, पण वेव्हजचे स्वरूप व्यापक आहे आणि त्यात चित्रपट, ओटीटी, ॲनिमेशन, कृत्रिम प्रज्ञा आणि इतर भासमान तंत्रज्ञाने एकत्र आणण्याची क्षमता आहे.
वेव्हज शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसानिमित्त आयोजित 'द जर्नी: फ्रॉम आउटसाइडर टू रुलर' या सत्रात अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपट निर्माते करण जोहर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी चित्रपट उद्योगातील त्यांच्या प्रवासावर आणि स्वतःचे वेगळे स्थान कसे निर्माण केले यावर चर्चा केली. शाहरुख खान यांनी 'आउटसाइडर-इनसाइडर' टॅग्जबद्दल आपले विचार मांडले आणि तरुणांनी इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच चित्रपट उद्योगाकडे पाहण्याचे आवाहन केले. इथेही कठोर परिश्रम आणि चिकाटीला पर्याय नाही असे त्यांनी सांगितले.

समाज माध्यमे आणि प्रतिमा व्यवस्थापनाच्या आजच्या काळात मनोरंजन उद्योगाच्या बदलत्या परिमाणांबद्दल बोलताना, खान यांनी नवीन कलाकारांना केवळ त्यांच्या विशिष्ट प्रतिमा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्यातील कौशल्यांकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्यातील अद्वितीय गूण आणि क्षमतांद्वारे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असे दीपिका पदुकोण यांनी पुढे नमूद केले.
आपल्या समारोपाच्या भाषणात, चित्रपट निर्माते करण जोहर यांनी भारताला 'सॉफ्ट पॉवर' असे संबोधित केले. आपला देश येत्या काळात 'वेव्हज'सह उत्तुंग झेप घेण्यास सर्व सामर्थ्यानिशी सज्ज आहे असे जोहर यांनी अभिमानाने सांगितले.
* * *
PIB Mumbai |S.Bedekar/Sushma/Nandini/D.Rane
Release ID:
(Release ID: 2125901)
| Visitor Counter:
30