पंतप्रधान कार्यालय
रोजगार मेळाव्याअंतर्गत 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांच्या वितरण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
26 APR 2025 11:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2025
नमस्कार !
आज 51000 हून अधिक तरुणांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये पक्क्या सरकारी नोकरीची पत्रे देण्यात आली आहेत. आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये तरुणांच्या नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात झाली आहे. तुमची जबाबदारी देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्याची आहे, तुमची जबाबदारी देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्याची आहे, देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही तुमची जबाबदारी आहे, कामगारांच्या जीवनात मूलभूत बदल घडवून आणण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही तुमची कामे जेवढ्या प्रामाणिकपणे पूर्ण कराल तेवढा त्याचा सकारात्मक परिणाम विकसित भारताच्या प्रवासावर पडलेला दिसेल. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडाल.
मित्रहो,
कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचा आणि यशाचा पाया हा तेथील युवा वर्ग असतो. जेव्हा युवक राष्ट्रउभारणीत सहभागी होतात, तेव्हा देश झपाट्याने विकासही करतो, आणि जगातही आपली ओळखही निर्माण करतो. आज भारतातील तरुण आपले परिश्रम आणि नवोन्मेषाद्वारे आपल्यात किती क्षमता आहे हे जगाला दाखवत आहेत. देशातील तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी आमचे सरकार प्रत्येक पावलावर प्रयत्न करत आहे. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे अनेक उपक्रम तरुणांसाठी या दिशेने नव्या संधी निर्माण करत आहेत. या मोहिमांच्या माध्यमातून आम्ही भारतातील तरुणांना आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत. याचाच परिणाम म्हणून या दशकात आपल्या तरुणांनी तंत्रज्ञान, डेटा आणि नवोन्मेष क्षेत्रात भारताला खूप पुढे नेले आहे. आज यूपीआय, ओएनडीसी आणि जीईएम, गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मना मिळालेले यश हे दर्शवत आहे की, आपले तरुण डिजिटल अर्थव्यवस्थेतील बदलाचे नेतृत्व कसे करत आहेत. आज भारतात सर्वात जास्त रिअल-टाइम (थेट) डिजिटल व्यवहार होत आहेत, आणि याचे बरेचसे श्रेय आपल्या युवा वर्गाला जाते.
मित्रहो,
या अर्थसंकल्पात सरकारने मॅन्युफॅक्चरिंग मिशनची घोषणा केली आहे. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणे आणि भारतातील तरुणांना जागतिक दर्जाची उत्पादने बनवण्याची संधी देणे हे याचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशातील लाखो एमएसएमईना आणि आपल्या लघु उद्योजकांना प्रोत्साहन तर मिळेलच, शिवाय देशभरात रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील. आजचा काळ हा भारतातील तरुणांसाठी अभूतपूर्व संधींचा काळ आहे. अलीकडेच आयएमएफने म्हटले आहे की, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम ठेवेल. या विश्वासाचे, या विकासाचे अनेक पैलू आहेत. आणि सगळ्यात मोठा पैलू म्हणजे आगामी काळात प्रत्येक क्षेत्रात अधिकाधिक नोकऱ्या निर्माण होतील, रोजगार वाढेल. अलीकडच्या काळात ऑटोमोबाईल आणि पादत्राणे उद्योगात आपल्या उत्पादन आणि निर्यातीने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. ही क्षेत्रे अशी आहेत की, जी मोठ्या संख्येने तरुणांना रोजगार देत आहेत. खादी आणि ग्रामोद्योगच्या उत्पादनांच्या उलाढालीने प्रथमच एक लाख 70 हजार कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. जवळजवळ पावणे दोन लाख कोटी. यामुळे विशेषत: ग्रामीण भागात लाखो नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अंतर्देशीय जलवाहतुकीच्या क्षेत्रातही देशाने नवे यश नोंदवले आहे. 2014 पूर्वी आपल्या देशात अंतर्देशीय जलवाहतुकीद्वारे वर्षभरात केवळ 18 दशलक्ष टन माल वाहतूक व्हायची, केवळ 18 दशलक्ष टन. तेच यावर्षी अंतर्देशीय जलवाहतुकीद्वारे झालेली मालवाहतूक 18 वरून 145 दशलक्ष टनच्या पुढे पोहोचली आहे. भारताने सातत्याने या दिशेने धोरणे आणि निर्णय घेतल्यामुळे भारताला हे यश मिळाले आहे. यापूर्वी देशात राष्ट्रीय जलमार्गांची संख्या केवळ 5 होती. आता भारतातील राष्ट्रीय जलमार्गांची संख्या 5 वरून 110 च्या पुढे पोहोचली आहे. यापूर्वी या जलमार्गांची परिचालन लांबी सुमारे 2700 किमी होती. म्हणजे अडीच हजार किलोमीटरपेक्षा थोडे जास्त. आता तीही वाढून सुमारे 5 हजार किलोमीटर झाली आहे. या यशामुळे देशातील तरुणांसाठी नवनवीन संधी निर्माण होत आहेत.
मित्रहो,
काही दिवसांनी मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट अर्थात WAVES 2025 चे आयोजन होत आहे. या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी देखील देशातील तरुण आहेत. देशातील युवा क्रीएटर्सना प्रथमच अशा स्वरूपाचे व्यासपीठ मिळत आहे. माध्यम, गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रातील नवोन्मेशींना आपली प्रतिभा प्रदर्शित करण्याची ही अभूतपूर्व संधी आहे. हे असे व्यासपीठ असेल जिथे मनोरंजन क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप्सना गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल. जगासमोर आपल्या कल्पना प्रदर्शित करण्यासाठी हे सर्वात मोठे व्यासपीठ असेल. तरुणांना एआय, एक्स-आर आणि इमर्सिव्ह मीडिया शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. यासाठी अनेक प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. वेव्हज द्वारे भारताच्या डिजिटल कंटेंट भविष्याला नवीन ऊर्जा मिळणार आहे.
मित्रहो,
आजच्या भारतातील तरुणांच्या यशातील सर्वात प्रशंसनीय गोष्ट म्हणजे त्यांची समावेशकता, सर्वसमावेशकतेची भावना. आज भारत प्रस्थापित करत असलेल्या विक्रमात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढत आहे! आणि आमच्या कन्या आता दोन पावले सरस ठरत आहेत. काही दिवसांपूर्वीच यूपीएससीचा निकाल लागला आहे. त्यातही, पहिले दोन क्रमांक मुलींनीच पटकावले आहेत. पहिल्या -5 मध्ये 3 मुली आहेत. आपली महिला शक्ती अधिकारीवर्ग, अंतराळ आणि विज्ञान या क्षेत्रात नवीन शिखरे पादाक्रांत करत आहे. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणावरही सरकारचे विशेष लक्ष आहे. बचत गट, विमा सखी, बँक सखी आणि कृषी सखी सारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. आज, देशातील हजारो महिला ड्रोन दीदी बनून त्यांच्या कुटुंबांची आणि गावांची समृद्धी सुनिश्चित करत आहेत. आज देशात 90 लाखांहून अधिक बचत गट तयार झाले आहेत आणि 10 कोटींहून अधिक महिला त्यांच्यासोबत काम करत आहेत. या बचत गटांची सक्षमता वाढवण्यासाठी, आमच्या सरकारने त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत 5 पट वृद्धी केली आहे. या गटांना हमीशिवाय 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मुद्रा योजनेतही बहुतेक लाभार्थी महिला आहेत. आज देशातील 50 हजारांहून अधिक स्टार्टअप्समध्ये महिला संचालक म्हणून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात अशा बदलामुळे विकसित भारताचा संकल्प बळकट होत आहे आणि रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढत आहेत.
मित्रहो,
तुम्ही सर्वांनी तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने हे स्थान मिळवले आहे. आता तुमच्या आयुष्यातील पुढील टप्पे केवळ स्वतःसाठीच नाही तर देशासाठी समर्पित करण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक सेवेची भावना सर्वोपरि असली पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमची सेवा सर्वोच्च मानून काम करता तेव्हा तुमच्या कृतींमध्ये देशाला एक नवीन दिशा देण्याची शक्ती असेल. तुमच्या कर्तव्य पालनातून, तुमच्या नाविन्यपूर्ण वृत्तीने आणि तुमच्या समर्पणानेच भारतातील प्रत्येक नागरिकाचे जीवन अधिक चांगले होईल.
मित्रहो,
जेव्हा तुम्ही एखाद्या जबाबदार पदावर पोहोचता तेव्हा नागरिक म्हणून तुमची कर्तव्ये आणि भूमिका देखील अधिक महत्त्वाची बनते. तुम्ही सर्वांनी यादृष्टीनेही जागरूक राहिले पाहिजे. आणि आपणही, एक नागरिक म्हणून, योगदान देण्यात मागे राहू नये. आता, मी तुम्हाला एक उदाहरण देतो, सध्या देशात 'एक पेड माँ के नाम' ही मोठी मोहीम सुरू आहे. आज तुम्ही जी कामगिरी केली आहे, आयुष्यात तुम्ही जी नवीन सुरुवात करत आहात, त्यात तुमच्या आईची सर्वात मोठी भूमिका असेल. तुम्हीही तुमच्या आईच्या नावाने एक झाड लावा आणि निसर्गाची सेवा करून तुमची कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही ज्या कार्यालयात काम करता तेथील जास्तीत जास्त लोकांना या मोहिमेत सामील करून घ्या. तुमच्या सेवाकाळाच्या प्रारंभी, जून महिन्यात, आंतरराष्ट्रीय योग दिन देखील येत आहे. ही एक मोठी संधी आहे. इतक्या मोठ्या प्रसंगी, यशस्वी जीवनाची सुरुवात करण्यासोबतच, योगाद्वारे निरोगी जीवनाची सुरुवात करा. तुमचे आरोग्य केवळ तुमच्यासाठी महत्त्वाचे नाही तर तुमच्या कार्यक्षमतेसाठी आणि देशाच्या उत्पादकतेसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे.
तुमच्या क्षमता वाढवण्यासाठी, मिशन कर्मयोगीकडून पूर्ण मदत घेत राहा. तुमच्या कामाचा उद्देश हा केवळ पदप्राप्ती नव्हे तर भारतातील प्रत्येक नागरिकाची सेवा करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीत योगदान देण्याकरिता तुमचे पद आहे. काही दिवसांपूर्वीच, नागरी सेवा दिनी, मी एक मंत्र दिला होता आणि मी म्हटले होते की सरकारमधील सर्व लोकांसाठी, फक्त एकच मंत्र आपल्यासाठी सर्वोपरि असला पाहिजे आणि तो मंत्र आहे - नागरिक देवो भव: नागरिक देवो भव:. नागरिकांची सेवा करणे म्हणजे तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी देवाची पूजा करण्यासारखे आहे. हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा. मला खात्री आहे की आपल्या सामर्थ्याने आणि प्रामाणिकपणाने आपण एक असा भारत घडवू जो विकसितही असेल आणि समृद्ध देखील असेल.
मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालाही शुभेच्छा देतो आणि जशी तुमची स्वप्न आहेत तशीच 140 कोटी देशवासीयांचीही स्वप्न आहेत. ज्याप्रमाणे तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे, त्याचप्रमाणे आता या संधीचा वापर 140 कोटी देशवासीयांची स्वप्ने पूर्ण करण्यात तुमच्या महत्त्वपूर्ण योगदानाशी जोडला गेला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही या पदाची शोभा वाढवाल , देशवासियांना अभिमानास्पद कामगिरी कराल आणि तुमचे जीवन कृतकृत्य करण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती सुज्ञपणे वापराल. या शुभेच्छांसह, तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
* * *
S.Kane/Rajeshree/Vasanti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2124690)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam