माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एसआरएफटीआय च्या "अ डॉल मेड ऑफ क्ले" चित्रपटाची कान 2025 मधील ‘ल सिनेफ’ विभागासाठी निवड
Posted On:
26 APR 2025 6:24PM by PIB Mumbai
सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय), अर्थात सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांची निर्मिती असलेल्या 'अ डॉल मेड अप ऑफ क्ले' या चित्रपटाची 78 व्या ‘कान 2025’ चित्रपट महोत्सवाच्या प्रतिष्ठेच्या ‘ल सिनेफ’ विभागासाठी अधिकृत निवड झाली आहे. या श्रेणीत निवड झालेल्या या एकमेव भारतीय चित्रपटाने भारताच्या चित्रपट प्रशिक्षण प्रवासातील ऐतिहासिक टप्पा नोंदवला आहे.
'अ डॉल मेड अप ऑफ क्ले'
भारतात व्यावसायिक फुटबॉलपटू होण्याच्या महत्वाकांक्षेने प्रेरित झालेला एक तरुण नायजेरियन अॅथलीट आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या वडलांची जमीन विकतो. मात्र, दुखापतीमुळे त्याची कारकीर्द संपते, आणि निराश झालेला हा तरुण, एका अनोळखी देशात अडकून पडतो. शारीरिक वेदना, भावनिक आघात, आणि ओळख गमावलेल्या अवस्थेत, मुक्ती आणि जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी तो आपल्या पूर्वजांच्या आध्यात्मिक परंपरेशी पुन्हा जोडला जातो. 'अ डॉल मेड अप ऑफ क्ले', हा चित्रपट विस्थापन, नुकसान आणि सांस्कृतिक लवचिकता, याचा पट प्रभावीपणे उलगडतो.
एसआरएफटीआयच्या प्रॉडक्शन फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन (पीएफटी) विभागांतर्गत तयार करण्यात आलेल्या 23 मिनिटांच्या या प्रायोगिक चित्रपटात सीमा पार सहकार्य प्रदर्शित करण्यात आले आहे. आयसीसीआर आफ्रिकन स्कॉलरशिप अंतर्गत, साहिल मनोज इंगळे निर्मित आणि कोकोब गेब्रेहावेरिया टेस्फे या इथिओपियन विद्यार्थ्याने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एसआरएफटीआयचे जागतिक सिनेमॅटिक नवोन्मेषा प्रति असलेले समर्पण अधोरेखित करतो.
कान चित्रपट महोत्सवाच्या ‘ल सिनेफ’ विभागात स्पर्धेसाठी आमंत्रण मिळवून, या चित्रपटाने जागतिक स्तरावरील आघाडीच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेतील उदयोन्मुख प्रतिभा प्रकाशात आणली आहे. यंदाच्या मे महिन्यात फ्रान्स मध्ये हा महोत्सव होत आहे.
स्वप्ने, लवचिकता आणि जागतिक मान्यता
सुकांत मजुमदार (अधिष्ठाता, एसआरएफटीआय) म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही सिनेमॅटिक अभिव्यक्तीला, जेव्हा एखाद्या प्रतिष्ठेच्या जागतिक व्यासपीठावर ओळख मिळते, तेव्हा आम्हाला आश्वासन मिळते. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. त्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा.”
निर्माता साहिल मनोज इंगळे म्हणाला, “ हा प्रकल्प सर्व खंडांचा सामायिक दृष्टीकोन आहे- सीमा ओलांडणारी कथा. कान महोत्सवातील निवड म्हणजे स्वप्नपूर्ती आहे, आणि एसआरएफटीआयमध्ये रुजलेल्या जागतिक विचारसरणीचा दाखला आहे.”
दिग्दर्शक कोकोब गेब्रेहावेरिया टेस्फे म्हणाला, “अत्यंत व्यक्तिगत असलेली ही कथा स्वप्न पाहणाऱ्यांचा प्रवास उलगडते, जे नवीन आव्हानांचा सामना करत आपला मार्ग शोधतात, स्वतःची ओळख पुन्हा घडवतात. ‘कान’ मध्ये लवचिकता आणि कधीच न सांगितलेल्या कथांचा उत्सव साजरा होतो.”
जागतिक सहकार्य:
चित्रपटाचे कलाकार आणि चमू आगळा वेगळा आंतरराष्ट्रीय सहयोग प्रदर्शित करतो:
- निर्माता : साहिल मनोज इंगळे
- लेखक आणि दिग्दर्शक: कोकोब गेब्रेहावेरिया टेस्फे (इथिओपिया)
- डीओपी: विनोद कुमार
- संपादक : हारू – महमूद अबू नासेर (बांगलादेश)
- साउंड डिझाइन : सोहम पाल
- संगीतकार : हिमांगशु सैकी
- कार्यकारी निर्माता : उमा कुमारी आणि रोहित कोडेरे
- लाइन निर्माता : अविनाश शंकर रुर्वे
- मुख्य अभिनेता : इब्राहिम अहमद (नायजेरिया)
- कलाकार : गीता दोशी, इब्राहिम अहमद, रितबन आचार्य
एसआरएफटीआय
1995 मध्ये स्थापन झालेल्या एसआरएफटीआयला प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे नाव देण्यात आले असून, या संस्थेने चित्रपट प्रशिक्षणातील उत्कृष्टतेद्वारे कथाकारांच्या नवीन पिढ्यांना सक्षम करण्याचा आपला वारसा पुढे चालू ठेवला आहे.
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2124649)
Visitor Counter : 22