पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांचे केले स्वागत
पंतप्रधानांनी जानेवारीमध्ये वॉशिंग्टन डी.सी.ला दिलेल्या यशस्वी भेटीची आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेचे केले स्मरण
या वर्षी फेब्रुवारीमध्ये पॅरिस येथे झालेल्या भेटीनंतर, पंतप्रधान आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स यांनी द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा घेतला आढावा
भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील प्रगती तसेच ऊर्जा, संरक्षण, धोरणात्मक तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविण्याच्या प्रयत्नांचे दोन्ही नेत्यांनी केले स्वागत
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची केली देवाणघेवाण
पंतप्रधानांनी उपाध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाला भारतातील आनंददायी वास्तव्यासाठी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दिल्या शुभेच्छा, या वर्षाच्या अखेरीस ट्रंप यांच्या भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचे केले नमूद
Posted On:
21 APR 2025 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सेकंड लेडी उषा व्हान्स, त्यांची मुले आणि अमेरिकन प्रशासनाचे वरिष्ठ सदस्य देखील होते.
पंतप्रधानांनी जानेवारीमध्ये वॉशिंग्टन डीसीला दिलेल्या आपल्या भेटीची आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या फलदायी चर्चेची आठवण करून दिली, ज्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील घनिष्ठ सहकार्याचा मार्ग सुकर झाला होता, तसेच मेक अमेरिका ग्रेट अगेन (MAGA) आणि विकसित भारत 2047 या दोन्ही मोहीमांचा लाभ घेण्याबाबत चर्चा झाली होती.
पंतप्रधान आणि उपाध्यक्ष व्हान्स यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला आणि सकारात्मकपणे मूल्यांकन केले.
दोन्ही देशांच्या लोकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या परस्पर हिताच्या भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठी झालेल्या वाटाघाटीतल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे त्यांनी स्वागत केले. त्याचप्रमाणे ऊर्जा, संरक्षण, धोरणात्मक तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची त्यांनी नोंद घेतली.
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली आणि सहकार्य वृद्धिंगत करण्याचा मार्ग म्हणून संवाद आणि मुत्सद्देगिरीसाठी आवाहन केले.
पंतप्रधानांनी उपाध्यक्ष, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलांना भारतात आनंददायी वास्तव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या भारत भेटीबाबत आपण उत्सुक असल्याचे सांगितले.
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123330)
Visitor Counter : 13