सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) एक नवा विक्रम केला प्रस्थापित
स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच खादी आणि ग्रामोद्योगांची उलाढाल 1 लाख 70 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त
केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठीची तात्पुरती आकडेवारी केली जाहीर
Posted On:
21 APR 2025 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2025
देशात स्वावलंबनाची भावना निर्माण करणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राने गेल्या 11 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली केवळ नवीन उंची गाठली नाही तर कोट्यवधी ग्रामस्थांच्या जीवनात आशेचा प्रकाशही आणला आहे. पूज्य बापूंचा वारसा असलेली खादी आता केवळ एक कापडाचा प्रकार राहिलेली नाही, तर 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या निर्मितीचे प्रतीक बनली आहे, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार म्हणाले. ते सोमवारी नवी दिल्लीतील राजघाट येथील कार्यालयात 2024-25 या आर्थिक वर्षासाठी खादी आणि ग्रामोद्योगांची तात्पुरती आकडेवारी जारी करताना बोलत होते. केव्हीआयसीने 2024-25 या आर्थिक वर्षात उत्पादन, विक्री आणि नवीन रोजगार निर्मितीत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे, अशी माहिती मनोज कुमार यांनी दिली. गेल्या 11 वर्षांत विक्रीत 447 टक्के, उत्पादनात 347 टक्के आणि रोजगार निर्मितीत 49.23 टक्के वाढ झाली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 2023-24 या आर्थिक वर्षात 2013-14 च्या तुलनेत विक्रीत 399.69 % आणि उत्पादनात 314.79% वाढ झाली आहे.

केव्हीआयसीचे अध्यक्ष म्हणाले की 2013-14 या आर्थिक वर्षात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांचे उत्पादन 26109.07 कोटी रुपये होते, परंतु ते जवळजवळ चार पटीने म्हणजे सुमारे 347% ने वाढ नोंदवत 2024-25 या आर्थिक वर्षात 116599.75 कोटी रुपयांवर पोहोचले. 2013-14 या आर्थिक वर्षात 31154.19 कोटी रुपये असलेली विक्री2024-25 या आर्थिक वर्षात जवळजवळ पाच पटीने वाढून 170551.37कोटी रुपयांवर पोहोचली, जी आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे.
गेल्या 11 वर्षांत खादीच्या कपड्यांच्या उत्पादनातही अभूतपूर्व वाढ दिसून आली आहे, असे माध्यमांशी बोलताना मनोज कुमार यांनी सांगितले. 2013-14 या आर्थिक वर्षात खादी कपड्यांचे उत्पादन 811.08 कोटी रुपये होते, तर 2024-25 या आर्थिक वर्षात ते 366 टक्क्यांनी म्हणजे साडेचार पटीने वाढून 3783.36 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. खादी कपड्यांच्या विक्रीतही प्रचंड वाढ झाली आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात खादी कपड्यांची विक्री केवळ 1081.04 कोटी रुपये होती, परंतु 2024-25 या आर्थिक वर्षात ती सुमारे साडेसहा पटीने वाढून 7145.61 कोटी रुपये झाली, ज्यामध्ये 561 टक्के वाढ झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या व्यासपीठावरून खादीच्या कपड्यांच्या केलेल्या जाहिरातीचा खादी कपड्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123263)
Visitor Counter : 13