माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेव्हज 2025 परिषदेच्या पार्श्वभूमीवर माध्यम जगतातील संस्थांशी साधला संवाद
उद्योगजगताद्वारेच वेव्हजची वाटचाल सुरू आहे, सरकारची भूमिका प्रेरणा देण्याची आहे - अश्विनी वैष्णव
भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या प्रोत्साहनाला प्रचंड प्रतिसाद : 1 लाखापेक्षा जास्त नोंदणी, आघाडीचे 750 सर्जनशील कलाकार आपल्या कामांचे सादरीकरण करणार
वेव्हज शिखर परिषद ही सर्जनशील कलाकार, खरेदीदार आणि बाजारपेठांना मोठ्या व्याप्तीच्या सर्जनशील उपाययोजनांसोबत जोडणारा दुवा म्हणून उदयाला येत आहे - केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
Posted On:
19 APR 2025 7:03PM
|
Location: PIB Mumbai
सर्जनशील कलाकारांचे विश्व आणि त्यांची अर्थव्यवस्था मूलभूत परिवर्तनातून जात असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.मुंबईत येत्या 1 ते 4 मे दरम्यान होणार असलेल्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) पार्श्वभूमीवर, त्यांनी आज वृत्त माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. राष्ट्रीय तसेच प्रादेशिक वृत्त माध्यमांतील सुमारे 20 माध्यम समूह यात सहभागी झाले. यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या क्षेत्रासमोर असलेल्या आव्हानांवरही आपली मते व्यक्त केली. या क्षेत्रात तंत्रज्ञानाचे आगमन झाल्याने आता जुनी प्रारुपे नवीन प्रारुपांना मार्ग मोकळा करून देत आहेत, ज्यामुळे जशा संधी निर्माण होत आहेत, त्याचप्रमाणे नवी आव्हाने देखील निर्माण होत आहेत असे ते म्हणाले. सद्यस्थितीत माध्यम जगताचे स्वरूप बदलत आहे, अशा वेळी या नव्या प्रारुपाला एक देश म्हणून सामूहिकपणे प्रतिसाद देण्याची गरज आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. यासंदर्भात बोलताना त्यांनी कंटेट अर्थात आशय निर्मितीसाठी पूर्वी मोठ्या स्टुडिओंची आवश्यकता होती, मात्र आता ते दिवस भूतकाळात जमा झाले असल्याचे उदाहरण त्यांनी मांडले. आजच्या काळात झारखंड किंवा केरळमधील दुर्गम गावातूनही एखादा सर्जनशील कलाकार दर्जेदार निर्मिती करू शकतो आणि आपली कलाकृती लाखो लोकांपर्यंत पोहचवू शकतो असे त्यांनी सांगितले.

सर्जनशील निर्मितीची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. दूरदृष्टी बाळगणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्जनशील कलाकारांच्या कामाची आणि अर्थव्यवस्थेतील त्यांच्या योगदानाची कायमच दखल घेतली आहे, आणि त्यामुळेच त्यांनी भारताच्या या सॉफ्ट पॉवरचा जगभरात प्रचार प्रसार केला आहे असे ते म्हणाले. ज्याप्रमाणे आर्थिक धोरणांच्या बाबतीत दावोस हे जागतिक व्यासपीठ म्हणून प्रस्थापित झाले आहे, त्याचप्रमाणे वेव्हज (WAVES) शिखर परिषदेला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक व्यासपीठाचे स्वरुप मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
वेव्हज 2025 या शिखर परिषदेसाठी 1 लाखांपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे, यातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली असल्याचे ते म्हणाले. या परिषदेअंतर्गत आघाडीच्या नवोन्मेषकांना सध्याच्या बदलत्या जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून पुरस्कारांनी सन्मानित केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही जगाला आपल्या देशातील सर्जनशील कलाकारांसोबत जोडण्याचे माध्यम शोधत आहोत असे वैष्णव यांनी सांगितले. वेव्हज शिखर परिषद ही सर्जनशील कलाकार, खरेदीदार आणि बाजारपेठांना मोठ्या व्याप्तीच्या सर्जनशील उपाययोजनांसोबत जोडणारा दुवा म्हणून उदयाला येत असल्याची बाबही अश्विनी वैष्णव यांनी नमूद केली. सर्जनशील कलाकार व्यावसायिक प्रकल्पांसाठी आपल्याकडील आशय सामग्री मांडू शकतील तसेच या क्षेत्रातील कंपन्यासाठी दर्जेदार सर्जनशील कामांचे स्रोत उपलब्ध होऊ शकतील अशा प्रकारचे खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठीचे एक अनोखे व्यासपीठ वेव्हज परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध झाले असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
या संवादात सहभागी झालेल्या विविध माध्यम संस्थांच्या प्रमुखांनी धोरणकर्ते, सर्जनशील कलाकार, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसेच माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील स्टार्टअप्सना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी वेव्हजच्या रूपात एक नवीन संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणली जात असल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या संवादात सहभागी झालेल्या सर्वांचे तसेच उपस्थित मान्यवरांचे त्यांनी स्वागत केले. माध्यम क्षेत्राचे भविष्य घडवण्यात सामूहिक संवादाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी विविध व्यासपीठांवरील भागधारकांशी संवाद साधण्याची मंत्रालयाची वचनबद्धताही अधोरेखित केली. वेव्हज 2025 च्या तयारीत माध्यम जगतातल्या संस्था सक्रिय सहभाग देत असल्याबद्दल त्यांनी त्यांची प्रशंसाही केली.
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
Release ID:
(Release ID: 2122979)
| Visitor Counter:
Visitor Counter : 44
Read this release in:
Odia
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Assamese
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam