पंतप्रधान कार्यालय
हरयाणातील यमुनानगर येथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटन/शिलान्यासप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
14 APR 2025 4:17PM by PIB Mumbai
हरयाणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री नायब सिंग सैनी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल जी, राव इंद्रजीत सिंग जी, कृष्णपाल जी, हरयाणा सरकारचे मंत्रीमंडळ, खासदार आणि आमदारगण आणि माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, हरयाणातील माझ्या भावंडांना मोदींचा राम-राम!
मित्रहो,
आज मी त्या पवित्र भूमीला वंदन करतो, जिथे माँ सरस्वतीचा उगम झाला आहे. जिथे मंत्रा देवी विराजमान आहेत, जिथे पंचमुखी हनुमान जी आहेत, जिथे कपालमोचन साहेबांचे आशीर्वाद लाभले आहेत, आणि जिथे संस्कृती, श्रद्धा आणि समर्पणाची त्रिवेणी वाहते.
आज बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंतीही आहे. मी सर्व देशवासीयांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. बाबासाहेबांचे विचार, त्यांची प्रेरणा, सतत विकसित होणाऱ्या भारताच्या प्रवासात आपल्याला दिशा दाखवत आहेत.
मित्रहो,
यमुनानगर हा फक्त एक शहर नाही, तर भारताच्या औद्योगिक नकाशावरचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्लायवुडपासून ते पितळ आणि स्टीलपर्यंत, हा संपूर्ण परिसर भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देतो. कपाल मोचन मेला, ऋषी वेदव्यासांची तपोभूमी आणि गुरु गोविंद सिंगजींची एक प्रकारची शस्त्रभूमी आहे.
मित्रहो,
ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि यमुनानगरबद्दल, जसे मनोहरलाल जी आणि सैनी जी बोलत होते, माझ्याही अनेक जुन्या आठवणी इथे जोडल्या गेल्या आहेत. जेव्हा मी हरियाणाचा प्रभारी होतो, तेव्हा पंचकुलाहून इथे सतत येणं-जाणं व्हायचं. इथल्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. ही निष्ठावान कार्यकर्त्यांची परंपरा आजही सुरू आहे.
मित्रहो,
हरियाणा सलग तिसऱ्यांदा डबल इंजिन सरकारच्या विकासाच्या दुहेरी वेगाचा साक्षीदार ठरतो आहे. आणि आता सैनी जी म्हणतात ट्रिपल सरकार. विकसित भारतासाठी विकसित हरियाणा हे आपलं संकल्प आहे. या संकल्पाच्या पूर्ततेसाठी, हरियाणाच्या जनतेच्या सेवेसाठी, इथल्या तरुणांच्या स्वप्नांना पूर्तता देण्यासाठी आम्ही अधिक वेगाने आणि अधिक मोठ्या प्रमाणावर काम करत आहोत.
आज इथे सुरू झालेल्या विकास प्रकल्पांनी याचा प्रत्यय येतो. मी हरियाणाच्या जनतेला या प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रहो,
मला अभिमान आहे की आपली सरकार बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्याचे कार्य करत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्योगांच्या विकासाला सामाजिक न्यायाचा मार्ग मानले होते. त्यांनी भारतातील लहान जोतांच्या समस्येची जाणीव करून दिली होती. बाबासाहेब म्हणायचे की, दलितांकडे शेतीसाठी पुरेशी जमीन नाही, त्यामुळे त्यांना उद्योगधंद्यांमधून सर्वाधिक फायदा होईल.
त्यांचा दृष्टिकोन असा होता की उद्योगांमुळे दलितांना अधिक रोजगार मिळतील आणि त्यांचा जीवनमान उंचावेल. भारतात औद्योगिकीकरणाच्या दिशेने त्यांनी देशाचे पहिले उद्योग मंत्री डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काम केले होते.
मित्रहो,
औद्योगिकीकरण आणि निर्मिती यांच्या या सुंदर संयोगाला दीनबंधू चौधरी छोटूराम यांनीही ग्रामीण समृद्धीचे आधार मानले होते. ते म्हणायचे – गावांमध्ये खरी समृद्धी तेव्हाच येईल, जेव्हा शेतकरी शेतीसोबत लहान उद्योग करुन आपली कमाई वाढवेल.
गाव आणि शेतकऱ्यांसाठी आपले जीवन अर्पण करणारे चौधरी चरणसिंग यांचे विचारही हेच होते. चौधरी साहेब म्हणायचे – औद्योगिक विकास हा शेतीला पूरक असावा, हे दोन्ही आपल्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत.
मित्रहो,
‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यामागेही हीच भावना, हीच प्रेरणा आहे. म्हणूनच आमचे सरकार भारतात निर्मितीला विशेष प्राधान्य देत आहे.
या वर्षाच्या अर्थसंकल्पात आम्ही ‘मिशन मॅन्युफॅक्चरिंग’ची घोषणा केली आहे. यामागचा उद्देश असा आहे की, दलित, मागासवर्गीय, शोषित, वंचित युवकांना अधिकाधिक रोजगार मिळावा, त्यांना आवश्यक प्रशिक्षण मिळावे, उद्योग-व्यवसायाचा खर्च कमी व्हावा, एमएसएमइ सेक्टरला बळ मिळावे, उद्योगांना तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा आणि आपल्या उत्पादनांची गुणवत्ता जागतिक दर्जाची व्हावी.
या सर्व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देशात वीजेची कमतरता नसणं अत्यावश्यक आहे. आपल्याला उर्जेतही आत्मनिर्भर व्हायलाच हवे. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
आज दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांटच्या तिसऱ्या युनिटचं काम सुरू झालं आहे. याचा लाभ यमुनानगरला आणि इथल्या उद्योगांना होणार आहे. भारतात जितकं प्लायवुड बनतं त्यातलं निम्मं उत्पादन यमुनानगरमध्ये होतं.
इथे मोठ्या प्रमाणावर अॅल्युमिनियम, तांबे आणि पितळ भांड्यांचं उत्पादन होतं. याच ठिकाणाहून पेट्रो-केमिकल प्लांटचे उपकरणं जगभर पाठवले जातात. वीज उत्पादन वाढल्याने या सर्व क्षेत्रांना फायदा होईल आणि ‘मिशन मॅन्युफॅक्चरिंग’लाही चालना मिळेल.
मित्रहो,
विकसित भारताच्या निर्मितीत वीजेची फार मोठी भूमिका असणार आहे. आणि आपले सरकार वीज उपलब्धता वाढवण्यासाठी चौफेर काम करत आहे.
‘वन नेशन – वन ग्रिड’ असो, नवीन कोळसा विद्युत प्रकल्प असोत, सौरऊर्जा, अणुऊर्जा क्षेत्राचा विस्तार – आमचा प्रयत्न आहे की देशात वीज उत्पादन वाढवावं, राष्ट्रनिर्मितीत विजेची कमतरता अडथळा ठरू नये.
परंतु मित्रहो,
आपल्याला काँग्रेसचे दिवस विसरता कामा नये. 2014 पुर्वी जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हाचे दिवस पाहिले आहे, तेव्हा संपूर्ण देशांत ब्लॅकआऊट होत असे, वीज जात असे. काँग्रेसचे सरकार कायम राहिले असते तर आजही अशाच खंडीत वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागले असते. कारखाने चालू शकते नसते, ना रेल्वे, शेतीला पाणी पोचले नसते. याचा अर्थ असाच की काँग्रेसचे सरकार कायम राहिले असते तर संकट असेच कायम राहिले असते आणि विभागले गेले असते. आता इतक्या वर्षांच्या प्रयत्नांनंतर परिस्थिती बदलते आहे. गेल्या दशकभरात, भारताची वीज निर्मिती क्षमता जवळपास दुप्पट झाली आहे.
आज भारत आपल्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच शेजारी देशांनाही वीज निर्यात करतो आहे. भाजपा सरकारने वीज निर्मितीवर लक्ष केंद्रीत केल्याचा फायदा आपल्या हरियाणालाही झाला आहे. आज हरियाणामध्ये 16 हजार मेगावॅट वीजनिर्मिती होते आहे. येत्या काही वर्षांत आम्ही ही क्षमता 24 हजार मेगावॅटपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवून काम करत आहोत.
मित्रहो,
एकीकडे आपण औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करत आहोत तर दुसरीकडे देशातले लोक पॉवर जनरेटर तयार करताहेत. आम्ही पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावून आपले वीजेचे बिल शून्य करू शकता. एवढेच नव्हे तर, निर्माण झालेली अतिरिक्त वीज इतरांना विकून उत्पन्नही मिळवू शकता. आत्तापर्यंत देशातल्या सव्वा कोटींहून अधिक लोकांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. मला आनंद वाटतो की हरियाणातील लाखो लोकांनाही यामध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज केले आहेत. आणि या योजनेचा जसजसा विस्तार होतो आहे, तिच्याशी निगडीत सेवा परिसंस्थाही मोठी होते आहे. सौर क्षेत्रात अनेक नवी कौशल्य विकसित होत आहेत. एमएसएमई साठी नवीन संधी निर्माण होत आहेत आणि तरूणांसाठीही अनेक संधी उपलब्ध होत आहेत.
मित्रहो,
आपल्याकडील लहान लहान शहरांमध्ये लहान उद्योगांना पुरेसा वीजपुरवठा करण्याबरोबरच, त्यांच्याकडे पुरेसे पैसा असावा याकडेही सरकार लक्ष देते आहे. कोरोना काळात, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना वाचवण्यासाठी सरकारने लाखो कोटी रुपयांची मदत देऊ केली. लहान उद्योगांनाही त्यांचा विस्तार करता यावा, यासाठी आम्ही एमएसएमईची व्याख्या बदलली आहे. त्यामुळे आता लहान उद्योगांना त्यांनी प्रगती केली तर सरकारी मदत काढून घेतली जाण्याची भीती वाटत नाही. सरकार आता, लहान उद्योगांसाठी विशेष क्रेडीट कार्ड सुविधा प्रदान करणार आहे. क्रेडिट गॅरंटीची कक्षाही वाढवली जाणार आहे. आत्ता काही दिवसांपुर्वीच मुद्रा योजनेची दशकपूर्ती झाली. तुम्हाला ही गोष्ट ऐकून आनंद आणि आश्चर्यही वाटेल, की मुद्रा योजनेमध्ये गेल्या 10 वर्षांत देशातल्या सामान्य लोकांना प्रथमच उद्योग क्षेत्रात पदार्पण करता आले, ते व्यवसायात उतरत आहेत, त्यांना कोणत्याही हमीशिवाय 33 लाख कोटी रुपये कर्ज म्हणून देण्यात आले. कल्पना करा, हमीशिवाय 33 लाख कोटी रुपये. या योजनेत 50 टक्क्यांहून अधिक लाभार्थी हे एससी/एसटी/ओबीसी कुटुंबातील आहेत. हे लहान उद्योग, आपल्या तरूणांची मोठी स्वप्न पूर्ण करतील हाच प्रयत्न आहे.
मित्रहो,
हरियाणातल्या आपल्या शेतकरी बांधवांचे कष्ट प्रत्येक भारतीयाच्या पानात दिसते. भाजपचे डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी आहे. हरियाणाच्या शेतकऱ्यांचे सामर्थ्य वृद्धिंगत व्हावे हाच आमचा प्रयत्न आहे. हरियाणातील भाजप सरकार राज्यातील 24 धान्यांची किमान आधारभूत किंमतीने(MSP) खरेदी करते. हरियाणातील लाखो शेतकऱ्यांना पीएम धान्य विमा योजनेचा फायदा मिळतो आहे. या योजनेअंतर्गत, सुमारे 9 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे दावे पूर्ण करण्यात आले. त्याचबरोबर पीएम किसान सन्मान निधीतून साडे सहा हजार कोटी रुपये हरियाणातल्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
मित्रहो,
ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या आबियाना पद्धती देखील हरियाणा सरकारने बंद केली आहे. आता कालव्याच्या पाण्यावर तुम्हाला कर भरावा लागणार नाही आणि आभियानाचे 130 कोटी रुपयांची देणीही माफ करण्यात आली आहेत.
मित्रांनो,
डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांनी शेतकऱ्यांना, पशुपालकांना उत्पन्नाची नवी साधने मिळताहेत. गोबरधन योजनेमुळे शेतकऱ्यांना कचऱ्यातून मुक्ती आणि त्यातून उत्पन्नाची संधी मिळते आहे. शेणापासून, शेती अवशेष आणि इतर सेंद्रीय कचऱ्यापासून जैविक वायू निर्मिती केली जात आहे. या वर्षी अर्थसंकल्पात, देशभरात 500 बायोगॅस संयंत्र बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. आज यमुनानगरमध्ये नवीन बायोगॅस प्रकल्पाची पायाभरणीदेखील करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेचे दरवर्षी 3 कोटी रुपयांची बचत होणार आहे. बायोगॅस प्रकल्पाची स्वच्छ भारत अभियानातही मदत होणार आहे.
मित्रहो ,
हरियाणाची गाडी आता विकासाच्या मार्गावर धावत आहे. येथे येण्यापूर्वी मला हिसारमध्ये लोकांमध्ये मिसळण्याची संधी मिळाली. तिथून अयोध्या धाम साठी थेट विमान सेवा सुरू झाली आहे. आज रेवाडीच्या लोकांना बायपासची भेट देखील मिळाली आहे. आता रेवाडीच्या बाजारपेठा, चौक आणि रेल्वे फाटकांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून लोकांना दिलासा मिळणार आहे.
या चार-लेनच्या बायपासमुळे वाहने शहरातून सहजपणे बाहेर पडू शकतील. दिल्ली ते नारनौल या प्रवासाला एक तास कमी लागेल. याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो.
मित्रहो,
आमच्यासाठी राजकारण हे सत्ता आणि सुख मिळवण्याचे नव्हे तर जनतेच्या सेवेचे देखील माध्यम आहे आणि देशाच्या सेवेचे देखील माध्यम आहे.म्हणूनच भाजपा जे काही बोलतो ते अगदी जाहीरपणे करतो. हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापनेनंतर आम्ही सातत्याने तुम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत आहोत. मात्र, काँग्रेस-शासित राज्यांमध्ये काय होत आहे? जनतेचा संपूर्ण विश्वासघात. जर शेजारी हिमाचलमध्ये पाहा, जनता किती त्रासलेली आहे, विकासाची, लोककल्याणाची सर्व कामे ठप्प झाली आहेत. कर्नाटकात विजेपासून दुधापर्यंत, बसभाड्यापासून बियाण्यांपर्यंत प्रत्येक वस्तू महाग होऊ लागली आहे. मी समाजमाध्यमांवर पाहात होतो, कर्नाटकात काँग्रेस सरकारने जी महागाई वाढवली आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कर लावले आहेत.
समाज माध्यमांमध्ये या लोकांनी खूप articulate केले आहे आणि त्यांनी सांगितले आहे आणि A टू Z, संपूर्ण ABCD, आणि प्रत्येक अक्षरासोबत कसे- कसे त्यांनी कर वाढवले, त्याची A टू Z संपूर्ण यादी बनवून या कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचे पितळ उघडे पाडले आहे. खुद्द तेथील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीयच सांगत आहेत की काँग्रेसने कर्नाटकला भ्रष्टाचारात अव्वल बनवले आहे.
मित्रहो,
तेलंगणातील काँग्रेस सरकार देखील जनतेला दिलेली आश्वासने विसरून गेले आहे. तिथे काँग्रेस, तेथील सरकार जंगलांवर बुलडोझर चालवण्यात व्यग्र आहे. निसर्गाची हानी, जनावरांना धोका, हीच आहे काँग्रेसची कार्यशैली. आम्ही एकीकडे कचऱ्यापासून गोबरधन बनवण्यासाठी कष्ट करत आहोत आणि चांगल्या प्रकारे वाढलेली वने नष्ट केली जात आहेत. म्हणजेच सरकार चालवण्याची दोन मॉडेल तुमच्या समोर आहेत. एकीकडे काँग्रेसचे मॉडेल आहे, जे संपूर्णपणे खोटे सिद्ध झाले आहे. ज्यामध्ये केवळ खुर्चीचा विचार केला जातो. दुसरे मॉडेल बीजेपीचे आहे, जे सत्याच्या आधारे चालत आहे, बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या दिशेवर चालत आहे, संविधानाच्या नियमांचे योग्य प्रकारे पालन करून चालत आहे. आणि स्वप्न आहे विकसित भारत बनवण्यासाठी प्रयत्न करणे. आज येथे यमुनानगरमध्येही आम्ही हाच प्रयत्न पुढे जाताना पाहात आहोत
मित्रहो,
मला तुमच्यासोबत आणखी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. काल देशाने बैसाखीचा सण साजरा केला. कालच जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेला देखील 106 वर्षे झाली आहेत. या हत्याकांडात आपले जीव गमावणाऱ्यांच्या स्मृती आज देखील आपल्या सोबत आहेत. जालियनवाला हत्याकांडात शहीद झालेले देशभक्त आणि इंग्रजांचे क्रौर्य या व्यतिरिक्त याची आणखी एक बाजू आहे जी पूर्णपणे अंधारात ठेवली गेली होती. ही बाजू होती मानवतेबरोबरच देशासोबत उभे राहण्याच्या खंबीर निर्धाराची. या निर्धाराचे नाव होते- शंकरन नायर.तुमच्यापैकी कोणी ऐकले नसेल. शंकरन नायर यांचे नाव ऐकले नसेल. पण सध्या याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
शंकरन नायर जी, एक प्रसिद्ध वकील होते त्या काळातील, 100 वर्षांपूर्वी इंग्रज सरकारमध्ये खूप मोठ्या पदावर विराजमान होते. ते सत्तेसोबत राहण्याबरोबरच सुख, समाधान, मौजमजा सर्व काही मिळवू शकत होते. पण त्यांनी परकीय सत्तेच्या क्रौर्याविरोधात,जालियनवाला बाग घटनेने व्यथित होऊन, मैदानात उडी घेतली, त्यांनी इंग्रजांविरोधात आवाज उठवला, त्यांनी मोठ्यात मोठ्या पदाला लाथ मारून त्याचा त्याग केला. ते केरळचे होते, घटना पंजाबमध्ये घडली होती, त्यांनी जालियनवाला बाग प्रकरणाचा खटला लढवण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या बळावर ते लढले. इंग्रजी साम्राज्याला त्यांनी हलवून सोडले. ज्या इंग्रज साम्राज्याचा सूर्य, ज्यांच्या सूर्याचा कधी अस्त होत नव्हता, त्याला शंकरन नायरजींनी न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभे केले.
मित्रहो,
हा केवळ मानवतेच्या बाजूने उभे राहण्याचा विषय नव्हता. तर एक भारत, श्रेष्ठ भारताचे देखील अतिशय उत्तम उदाहरण होते. कशा प्रकारे दूर-दूर असलेल्या केरळमधील एका व्यक्तीने पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाबद्दल इंग्रजी सत्तेला टक्कर दिली. हीच भावना आपल्या स्वातंत्र्याच्या लढाईची खरी प्रेरणा आहे. हीच प्रेरणा आजही विकसित भारताच्या प्रवासात आपले सर्वात मोठे सामर्थ्य आहे. आपण केरळच्या शंकरन नायर यांच्या योगदानाविषयी नक्कीच माहिती घेतली पाहिजे आणि पंजाब, हरियाणा, हिमाचल येथील प्रत्येक बालकाने त्यांची माहिती घेतली पाहिजे.
मित्रहो,
गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला शक्ती- या चार स्तंभांना सक्षम करण्यासाठी डबल इंजिनाचे सरकार सातत्याने काम करत आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी हरियाणाचा नक्कीच विकास होईल. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहात आहे, हरियाणाची प्रगती होईल, समृद्ध होईल, देशाचे नाव उज्ज्वल करेल. तुम्हा सर्वांना या अनेक विकास कार्यांसाठी खूप-खूप शुभेच्छा. दोन्ही हात उंचावून संपूर्ण ताकदीने माझ्या सोबत बोला -
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
खूप-खूप धन्यवाद.
***
JPS/G.Deoda/VSS/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121817)
Visitor Counter : 13