पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हरियाणातल्या हिसार विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 14 APR 2025 12:58PM by PIB Mumbai

मी म्हणेन बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही सर्व जण दोनदा म्हणा, अमर रहे! अमर रहे!
बाबासाहेब आंबेडकर, अमर रहे! अमर रहे!
बाबासाहेब आंबेडकर, अमर रहे! अमर रहे!
बाबासाहेब आंबेडकर, अमर रहे! अमर रहे!

हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. नायब सिंह सैनी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री. मुरलीधर मोहोळ जी, हरियाणा सरकारचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार,  आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
माझ्या हरियाणाच्या शूर लोकांना राम राम !
ताकदीचे सैनिक, ताकदीचे खेळाडू आणि दृढ बंधुता, ही आहे हरियाणाची ओळख !
शेतीच्या कामकाजाच्या या अत्यंत व्यस्त काळात तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आला आहात. मी तुम्हा सर्व, जनताजनार्दनाचे अभिनंदन  करतो. मी गुरू जंभेश्वर, महाराजा अग्रसेन आणि अग्रोहा धाम यांनाही श्रद्धापूर्वक नमन करतो.

मित्रांनो,
हरियाणाशी,  हिसारशी माझ्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. जेव्हा भारतीय जनता पक्षाने मला हरियाणाची जबाबदारी दिली होती, तेव्हा मी येथील अनेक सहकाऱ्यांसोबत बराच काळ एकत्र काम केले. या सर्व सहकाऱ्यांच्या  कठोर परिश्रमामुळे हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा पाया मजबूत झाला आहे. आणि आज मला अभिमान वाटतो की भाजपा  विकसित हरियाणा आणि विकसित भारताच्या ध्येयासाठी मन लावून काम करत आहे.

 

मित्रांनो,
आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी, संपूर्ण देशासाठी आणि विशेषतः दलित, पीडित, वंचित आणि शोषितांसाठी अत्यंत  महत्त्वाचा आहे. त्यांच्या आयुष्यातील ही दुसरी दिवाळी आहे. आज संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांचा जीवन संदेश आमच्या सरकारच्या अकरा वर्षांच्या प्रवासात  प्रेरणास्तंभ  बनला  आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक निर्णय, प्रत्येक धोरण बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित आहे. वंचित, पीडित, शोषित, गरीब, आदिवासी आणि महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवणे  आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करणे, हे आमचे ध्येय आहे. यासाठी निरंतर विकास, जलद विकास, हा भाजपा सरकारचा मंत्र आहे.

 

मित्रांनो, 

हा मंत्र अनुसरत वाटचाल करत असताना आज हरियाणाहून अयोध्या धामसाठी विमानसेवा सुरू झाली आहे. म्हणजे आता श्रीकृष्णाची पवित्र भूमी  भगवान रामाच्या नगरीशी थेट जोडली गेली आहे. आता अग्रसेन विमानतळावरून वाल्मिकी विमानतळापर्यंत थेट विमानसेवा उपलब्ध आहे. लवकरच येथून इतर शहरांसाठीही विमानसेवा सुरू होईल. आज हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणीही करण्यात आली. हरियाणाच्या आकांक्षा नव्या  उंचीवर नेण्याची ही सुरुवात आहे. या नव्या  सुरुवातीसाठी मी हरियाणाच्या जनतेचे अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,
मी तुम्हाला वचन दिले होते  की हवाई चप्पल घालणारादेखील विमानातून प्रवास करेल  आणि हे वचन आपण देशभर पूर्ण होताना पाहत आहोत. गेल्या दहा वर्षांत, कोट्यवधी भारतीयांनी त्यांच्या आयुष्यात प्रथमच  विमानप्रवास केला आहे. जिथे कधी चांगली रेल्वे स्थानकेही नव्हती तिथेही आम्ही नवीन विमानतळ बांधले. 2014 पूर्वी देशात 74 विमानतळ होते.  विचार करा, 70 वर्षात 74 , आज देशातल्या विमानतळांची संख्या  150 च्या पलीकडे पोहोचली  आहे.  देशातील सुमारे 90 विमानतळ उडान योजनेशी जोडले गेले आहेत. उडान योजनेअंतर्गत 600 हून अधिक मार्गांवर हवाई सेवा सुरू आहेत. यामध्ये लोक अत्यंत कमी पैशात विमानाने प्रवास करत आहेत आणि म्हणूनच दरवर्षी विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येत  एक नवीन विक्रम रचला जात आहे. आमच्या विमान कंपन्यांनीही विक्रमी दोन हजार नवीन  विमानांची ऑर्डर दिली आहे. आणि जितकी जास्त नवीन विमाने येतील तितक्या जास्त नोकऱ्या निर्माण होतील, मग ते वैमानिक असोत, एअर होस्टेस असोत, शेकडो नवीन सेवादेखील आहेत,  विमानाच्या उड्डाणासाठी  ग्राउंड स्टाफ लागतो,  अशी अनेक कामे असतात. अशा अनेक सेवांमुळे तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील. शिवाय, विमान देखभालीशी संबंधित एक मोठे क्षेत्र असंख्य नोकऱ्या निर्माण करेल. हिसारचा हा  विमानतळ हरियाणाच्या तरुणांच्या स्वप्नांनाही नवी उंची देईल.

 

मित्रांनो,
एकीकडे, आमचे सरकार कनेक्टिव्हिटीवर भर देत आहे, तर दुसरीकडे, ते गरीब कल्याण आणि सामाजिक न्यायदेखील सुनिश्चित करत आहे आणि हेच तर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते.  आपल्या संविधान निर्मात्यांची हीच आकांक्षा होती. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचे हेच तर स्वप्न होते, परंतु काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांसोबत केलेली वर्तणूक आपण कधीही विसरता कामा नये. बाबासाहेब हयात असताना काँग्रेसने त्यांचा अपमान केला. निवडणुकीत त्यांचा दोनदा पराभव घडवून आणला;  काँग्रेसचे संपूर्ण  सरकार त्यांना बाजूला सारण्याचा  प्रयत्न करत होते. त्यांना  व्यवस्थेपासून दूर ठेवण्यासाठी कट रचण्यात आला.  बाबासाहेबांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांची आठवण पुसून टाकण्याचा प्रयत्नही केला. काँग्रेसला बाबासाहेबांचे विचार कायमचे पुसून टाकायचे होते. डॉ. आंबेडकर हे संविधानाचे रक्षक होते तर काँग्रेस संविधानाची  विध्वंसक बनली आहे. डॉ. आंबेडकरांना समानता आणायची होती, परंतु काँग्रेसने देशात मतपेढीचा  विषाणू पसरवला.

 

मित्रांनो,
बाबासाहेबांची इच्छा होती की प्रत्येक गरीब व्यक्तीला, प्रत्येक वंचित व्यक्तीला प्रतिष्ठेने जगता यावे,  सन्मानाने जगता यावे, त्यांनीही स्वप्ने पाहावी, त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करता यावी.  पण काँग्रेसने एससी, एसटी, ओबीसींना दुसऱ्या श्रेणीचे नागरिक बनवले. काँग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीत काँग्रेस नेत्यांच्या घरातील स्विमिंग पूलपर्यंत पाणी पोहोचले पण गावांमध्ये नळाने पाणी पोहोचू शकले नाही. 

स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांनंतरही गावांमध्ये केवळ 16 टक्के घरांनाच नळाने पाणी पुरवठा होत होता. कल्पना करा, 100 पैकी 16 घरे! याचा सर्वात जास्त परिणाम कुणावर झाला होता? याचा एससी, एसटी, ओबीसी यांच्यानर सर्वात जास्त परिणाम झाला होता. अरे त्यांची जर इतकी काळजी वाटत होती, आज जे गल्लीबोळात जाऊन भाषणे झाडत आहात, अरे निदान माझ्या एससी, एसटी, ओबीसी बांधवांच्या घरापर्यंत, अरे पाणी तरी पुरवले असतेत. आमच्या सरकारने 6-7 वर्षांत 12 कोटींपेक्षा जास्त ग्रामीण घरांमध्ये नळाचा जोडणी दिली आहे. आज गावांमधील 80 टक्के घरांमध्ये, म्हणजेच यापूर्वी 100 पैकी 16 आणि आता 100 पैकी 80 घरांमध्ये नळाद्वारे पाण्याचा पुरवठा होतो आहे. आणि बाबासाहेबांच्या आशीर्वाद आहे, आम्ही प्रत्येक घरापर्यंत घरोघरी नळाद्वारे पाणी पोहोचवू. शौचालयांच्या अभावामुळेही सर्वात वाईट परिस्थिती एससी, एसटी, ओबीसी समाजाचीच होती. आमच्या सरकारने 11 कोटींपेक्षा जास्त शौचालये बांधून वंचितांना सन्मानाचे आयुष्य दिले आहे.

 

सहकाऱ्यांनो,

काँग्रेसच्या काळात एससी, एसटी, ओबीसी यांच्यासाठी तर बँकेचे दरवाजेही उघडले जात नव्हते. विमा, कर्ज, मदत, या सर्व गोष्टी स्वप्नवत होत्या. पण आता, जनधन खात्यांचे सर्वात मोठे लाभार्थी माझे एससी, एसटी, ओबीसी मधील बंधू-भगिनी आहेत. आपले  एससी, एसटी, ओबीसी बंधू-भगिनी आज अभिमानाने खिशातून रुपे कार्ड काढून दाखवतात. जे श्रीमंतांच्या खिशात पण कधी रुपे कार्ड असायचे, तेच रुपे कार्ड आज माझा गरीब दाखवतो आहे.

 

सहकाऱ्यांनो,

काँग्रेसने आपल्या पवित्र राज्यघटनेला सत्ता मिळवण्याचे एक साधन  बनवले. जेव्हा-जेव्हा काँग्रेसला सत्तेचे संकट दिसले, त्यांनी राज्यघटनेला चिरडले. काँग्रेसने आणीबाणीच्या वेळी राज्यघटनेच्या भावनेला चिरडले, यासाठी की कसेही करून सत्ता टिकून रहावी. राज्यघटनेची भावना आहे की, सर्वांसाठी समान नागरी संहिता असावी, ज्याला मी म्हणतो धर्मनिरपेक्ष नागरी संहिता, पण काँग्रेसने ती कधीच लागू केली नाही. उत्तराखंडमध्ये भाजपाचे सरकार आल्यानंतर धर्मनिरपेक्ष नागरी संहिता, समान नागरी संहिता लागू झाली, अगदी ठाम निर्धाराने लागू झाली आणि देशाचे दुर्दैव बघा, राज्यघटनेला खिशात ठेवून बसलेले लोक, राज्यघटनेवर बसलेले लोक, हे काँग्रेसचे लोक त्याचाही विरोध करत आहेत.

 

सहकाऱ्यांनो,

आपल्या राज्यघटनेने एससी, एसटी, ओबीसी यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद केली. पण काँग्रेसने त्यांना आरक्षण मिळाले की नाही, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीच्या सुविधा मिळायला सुरुवात झाली की नाही, एससी, एसटी, ओबीसी यांच्यातील कोणी व्यक्ती अधिकारांपासून वंचित राहिले तर नसतील ना, याची कधीच काळजी केली नाही, पण राजकीय खेळी खेळण्यासाठी काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिले होते, सामाजिक न्यायासाठी राज्यघटनेत जी तरतूद केली होती, तिच्या पाठीत खंजीर खुपसून त्या राज्यघटनेतील त्या तरतुदीलाही तुष्टीकरणाचे माध्यम बनवले. आता तुम्हीही बातम्यांमध्ये ऐकले असेल, कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने निविदांमध्ये आता एससी, एसटी, ओबीसी यांचे अधिकार काढून धर्माच्या आधारावर आरक्षण दिले आहे. खरे तर राज्यघटनेत बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत चर्चेत सांगितले होते की, या राज्यघटनेत चूकनही धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद केली जाणार नाही आणि आपल्या राज्यघटनेने धर्माच्या आधारावर आरक्षणाला मनाई केलेली आहे.

 

सहकाऱ्यांनो,

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या या धोरणामुळे खूप मोठे नुकसान मुस्लिम समाजाचेही झाले आहे. काँग्रेसने फक्त काही कट्टरवाद्यांनाच खुश केले. बाकी समाज, हलाखीच्या परिस्थितीत राहिला, अशिक्षित राहिला, गरीब राहिला. काँग्रेसच्या या वाईट धोरणाचा सर्वात मोठा पुरावा, वक्फ कायदा आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर 2013 पर्यंत वक्फ कायदा चालू होता, पण निवडणूक जिंकण्यासाठी तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी, ठराविक मतदारवर्गाच्या राजकारणासाठी, 2013 च्या अखेरीला, शेवटच्या अधिवेशनात काँग्रेसने इतक्या वर्षांपासून लागू असलेल्या वक्फ कायद्यात घाईघाईने दुरुस्त्या केल्या, त्या यासाठी की निवडणुकीत ठराविक मतदारवर्गाकडून मते मिळू शकतील. ठराविक मतदार वर्गाला खुश करण्यासाठी, हा कायदा असा बनवला गेला की, बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचे तीन तेरा, राज्यघटनेपेक्षाही वरचे स्वरुप दिले. हे बाबासाहेबांचे सर्वात मोठा अपमान करणारे काम होते.

 

सहकाऱ्यांनो,

हे म्हणतात की, त्यांनी हे मुस्लिमांच्या हितासाठी केले. मी जरा अशा सर्वांना विचारू इच्छितो, ठराविक मतदारवर्गाच्या भुकेल्या या राजकारण्यांना सांगू इच्छितो, जर खऱ्या अर्थाने तुमच्या मनात मुस्लिमांबद्दल थोडी जरी सहानुभूती असेल, तर काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम व्यक्तिला बनवावे, का नाही बनवत भावांनो? संसदेत तिकीट देतात, 50 टक्के मुस्लिमांना द्या. जिंकून आले तर आपली बाजू मांडतील. पण हे करायचे नाही, काँग्रेसमध्ये तर काहीच द्यायचे नाही. देशाचे, देशातील नागरिकांचे अधिकार काढून घेणे आणि देणे, यांची नियत कोणाचेही भले करण्याची कधीच नव्हती, मुस्लिमांचे भले करण्याचीही नव्हती. हेच काँग्रेसचे खरे रूप आहे.

 

सहकाऱ्यांनो,

वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन संपूर्ण देशभरात आहे. या जमिनी, या मालमत्तेच्या माध्यमातून गरीबांचे, निराधार असलेल्यांचे महिला-मुलांचे भले व्हायला हवे होते, आणि आज प्रामाणिकपणे त्याचा उपयोग केला गेला असता, तर माझ्या मुस्लिम युवा वर्गाला सायकलचे पंक्चर बनवून आयुष्य काढावे लागले नसते. पण यामुळे मूठभर भू-माफियांचेच काहीएक भले झाले.

पस्मंदा मुस्लिम, या समाजाचा काहीच फायदा झाला नाही. आणि हे भू-माफिया कोणाची जमीन लुटत होते? हे दलितांची जमीन लुटत होते, मागासलेल्यांची जमीन लुटत होते, आदिवासींची जमीन लुटत होते, विधवा महिलांची संपत्ती जमीन लुटत होते.

शेकडो विधवा मुस्लिम महिलांनी भारत सरकारला पत्रे लिहिली, त्यानंतरच हा कायदा चर्चेसाठी आला. वक्फ कायद्यात सुधारणा झाल्यानंतर गरिबांची ही लूट थांबणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आम्ही खूप जबाबदारीने आणि महत्त्वाचे काम केले आहे. या वक्फ कायद्यात आम्ही आणखी एक तरतूद केली आहे. आता, नवीन कायद्यानुसार, वक्फ कायद्यानुसार, हे वक्फ बोर्ड भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कोणत्याही आदिवासीच्या जमिनीला, त्याच्या घराला, त्याच्या मालमत्तेला हात लावू शकणार नाही. आदिवासींच्या हिताचे रक्षण करण्याचे आणि संविधानाच्या मर्यादांचे पालन करण्याचे उत्तम काम आम्ही केले आहे. या तरतुदी वक्फच्या पवित्र भावनेचा देखील आदर करतील, याची मला खात्री वाटते. मुस्लिम समाजातील गरीब आणि पसमांदा कुटुंबे, मुस्लिम महिला, विशेषतः मुस्लिम विधवा, मुस्लिम मुलांनाही त्यांचे हक्क मिळतील आणि भविष्यात त्यांचे हक्क सुरक्षित राहतील. आणि संविधानाच्या भावनेनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे काम दिले आहे. हीच खरी चेतना आहे, हाच खरा सामाजिक न्याय आहे.

 

मित्रहो,

आमच्या सरकारने 2014 सालनंतर, बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली. बाबासाहेब देशात आणि जगात जिथे जिथे राहत होते, तिथे त्या सर्व जागा दुर्लक्षित होत्या. संविधानाच्या नावाखाली राजकीय फायदा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्यांनी बाबासाहेबांशी संबंधित प्रत्येक ठिकाणाचा अपमान केला आहे आणि ते इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. परिस्थिती अशी होती की मुंबईतील इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधण्यासाठी देशभरात लोकांना आंदोलन करावे लागले. आमचे सरकार सत्तेत येताच, इंदू मिलसह, आम्ही अशा सर्व ठिकाणांचा विकास केला, मग ते महू येथील बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान असो, लंडनमधील बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणस्थळ असो, दिल्लीतील त्यांचे महापरिनिर्वाण स्थळ असो किंवा नागपूरमधील त्यांची दीक्षाभूमी असो. हे पंचतीर्थ म्हणून विकसित केले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी मला नागपूरच्या दीक्षाभूमीला जाऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.

 

मित्रहो,

काँग्रेसचे लोक सामाजिक न्यायाबद्दल मोठ्या गप्पा मारतात, परंतु आपण लक्षात घेतले पाहिजे की काँग्रेसने या दोन महान सुपुत्रांना, बाबासाहेब आंबेडकर आणि चौधरी चरण सिंह जी यांना भारतरत्न दिले नाही. केंद्रात भाजप समर्थित सरकार स्थापन झाल्यावर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळाले. त्याचबरोबर भाजप सरकारने चौधरी चरण सिंह जी यांनासुद्धा भारतरत्न दिले, याचा आम्हाला अभिमान आहे.

 

मित्रहो,

हरियाणामधले भाजप सरकार सामाजिक न्याय आणि गरिबांच्या कल्याणाचा मार्ग सतत सक्षम करत आहे. हरियाणामध्ये सरकारी नोकऱ्यांची स्थिती काय होती हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. परिस्थिती अशी होती की तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर एखाद्या नेत्याकडे जा आणि पैसे घेऊन जा. वडिलांची जमीन आणि आईचे दागिनेही विकले जायचे. नायब सिंह सैनी जी यांच्या सरकारने काँग्रेसचा हा आजार बरा केला आहे याचा मला आनंद आहे. कोणत्याही खर्चाशिवाय आणि कोणत्याही चिठ्ठीशिवाय नोकऱ्या देण्याचा हरियाणाचा ट्रॅक रेकॉर्ड आश्चर्यकारक आहे. आणि मला अभिमान वाटतो की मला असे सोबती, असे सहकारी-सरकार मिळाले आहे. येथील पंचवीस हजार तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळू नयेत यासाठी काँग्रेसने सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पण इथे मुख्यमंत्री नायब सैनीजींनी शपथ घेतली, तिथे हजारो तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली! हे भाजप सरकारचे सुशासन आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे नायब सिंह सैनी जी यांचे सरकार येत्या काळात हजारो नवीन नोकऱ्या निर्माण करण्यासाठी एक आराखडा बनवून काम करत आहे.

 

मित्रहो,

हरियाणा हे असे राज्य आहे जिथे मोठ्या संख्येने तरुण सैन्यात भरती होतात आणि देशाची सेवा करतात. काँग्रेसने वन रँक वन पेन्शनबाबत अनेक दशके फसवणूक केली. आमच्या सरकारनेच वन रँक वन पेन्शन योजना लागू केली. आतापर्यंत, ओआरओपी आणि वन रँक वन पेन्शन अंतर्गत हरियाणाच्या माजी सैनिकांना 13 हजार 500 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तुम्हाला आठवत असेल की या योजनेबाबत खोटे बोलून काँग्रेस सरकारने संपूर्ण देशातील सैनिकांसाठी फक्त 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. आता तुम्ही विचार करा, संपूर्ण हरियाणामध्ये 13 हजार 500 कोटी कुठे आणि 500 कोटी कुठे होते, हे डोळ्यांत धूळ फेकण्याचे कसले उद्योग होते? काँग्रेस कोणाचेही नाही,  तो फक्त सत्तेशी संबंधित पक्ष आहे. तो दलितांशी संबंधित नाही, मागासवर्गीयांशी नाही, माझ्या देशातील माता, बहिणी, मुलींशी नाही, आणि तो माझ्या सैनिकांशीही संबंधित नाही.

 

मित्रहो,

हरियाणा विकसित भारताच्या संकल्पाला बळ देईल, असा विश्वास मला वाटतो. खेळ असो किंवा शेती, हरियाणाच्या मातीचा सुगंध जगभर आपला सुगंध पसरवत राहील. मला हरियाणातील मुला-मुलींवर खूप विश्वास आहे. हे नवीन विमानतळ, हे नवीन उड्डाण, हरियाणासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायी ठरले पाहिजे आणि हे माझे भाग्य आहे की तुम्ही तुमचे आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आला आहात, मी तुम्हाला वंदन करतो. आणि तुमच्या अनेक यशांसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचे अभिनंदन करतो! माझ्यासोबत म्हणा, भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय!

अनेकानेक आभार!

***

JPS/SK/MP/TP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2121749) Visitor Counter : 30