पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवकार महामंत्र दिवसाचे उद्घाटन
नवकार महामंत्र हा केवळ एक मंत्र नाही, तर तो आपल्या श्रद्धेचे केंद्र आहे: पंतप्रधान
नवकार महामंत्र विनम्रता, शांतता आणि वैश्विक सौहार्द यांचे प्रतीक आहे: पंतप्रधान
नवकार महामंत्र पंच परमेष्ठीच्या आराधनेबरोबरच योग्य ज्ञान, समज आणि वर्तणूक यांचे प्रतीक आहे आणि मोक्षाकडे नेणारा मार्ग आहे: पंतप्रधान
जैन साहित्य हे भारताच्या बौद्धिक वैभवाचा कणा आहे: पंतप्रधान
हवामान बदल हे आजचे सर्वात मोठे संकट आहे आणि त्यावरील उपाय आहे शाश्वत जीवनशैली, जी जैन समुदाय अनेक शतकांपासून आचरणात आणत आहे आणि भारताच्या मिशन लाईफशी अगदी सुसंगत आहे: पंतप्रधान
नवकार महामंत्र दिवसानिमित्त पंतप्रधानांनी मांडले 9 संकल्प
प्रविष्टि तिथि:
09 APR 2025 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नवकार महामंत्र दिवसाचे उद्घाटन केले आणि त्यात सहभागी झाले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नवकार मंत्राचा गूढ आध्यात्मिक अनुभव अधोरेखित केला तसेच मनामध्ये शांती आणि स्थैर्य आणण्याच्या त्याच्या क्षमतेवर भर दिला. शब्द आणि विचारांच्या पलीकडे जाणारी, मन आणि चेतनेत खोलवर प्रतिध्वनित होणारी शांतीची असाधारण भावना त्यांनी विशद केली. नवकार मंत्राचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी यांनी त्यातील काही पवित्र श्लोक ऐकवले आणि हा मंत्र उर्जेचा एकीकृत प्रवाह असल्याचे सांगितले , जो स्थैर्य , समता आणि चेतना आणि आंतरिक प्रकाशाच्या सामंजस्यपूर्ण लयीचे प्रतीक आहे. आपले वैयक्तिक अनुभव कथन करताना , त्यांनी आपल्या अंतर्मनात नवकार मंत्राची आध्यात्मिक शक्ती कशी जाणवत आहे याबद्दल सांगितले. काही वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये अशाच एका सामूहिक जप कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची आठवण त्यांनी सांगितली जिने त्यांच्यावर कायमस्वरूपी ठसा उमटवला. पंतप्रधानांनी देशभरातील आणि परदेशातील लाखो सद्गुणी आत्म्यांचे एकात्मिक चेतनेत एकत्र येणे हा अतुलनीय अनुभव असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सामूहिक ऊर्जा आणि समन्वित शब्दांबाबत बोलताना ते खरोखरच असाधारण आणि अभूतपूर्व असल्याचे नमूद केले.
जिथे प्रत्येक रस्त्यावर जैन धर्माचा प्रभाव स्पष्ट जाणवतो अशा गुजरातशी असलेल्या आपल्या घनिष्ठ संबंधांवर बोलताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की त्यांना लहानपणापासूनच जैन आचार्यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य लाभले. "नवकार मंत्र हा केवळ एक मंत्र नाही तर श्रद्धेचे मूळ आणि जीवनाचे सार आहे", यावर त्यांनी भर दिला. त्यांनी त्याचे महत्त्व अधोरेखित केले, जे अध्यात्माच्या पलीकडे आहे आणि व्यक्ती आणि समाजाला समान प्रकारे मार्गदर्शन करते. त्यांनी अधोरेखित केले की नवकार मंत्राच्या प्रत्येक श्लोकाचा आणि अगदी प्रत्येक अक्षरात गहिरा अर्थ दडला आहे. ते म्हणाले की मंत्र पठण करताना, पंच परमेष्ठीला वंदन केले जाते आणि त्याबाबत विस्ताराने माहिती दिली. मोदी म्हणाले की, "केवळ ज्ञान" प्राप्त करणारे आणि "भव्य जीवांना" मार्गदर्शन करणारे अरिहंत हे 12 दैवी गुणांचे मूर्त स्वरूप आहे तर सिद्ध, ज्यांनी आठ कर्मांचे निर्मूलन केले आहे, मोक्ष प्राप्त केला आहे आणि त्यांच्याकडे आठ शुद्ध गुण आहेत. त्यांनी पुढे सांगितले की आचार्य महाव्रताचे पालन करतात आणि पथदर्शक म्हणून काम करतात, 36 गुणांनी युक्त असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे तर उपाध्याय ज्यांच्याकडे 25 गुण आहेत ते मोक्ष मार्गाचे ज्ञान देतात. त्यांनी सांगितले की साधू प्रायश्चित घेऊन स्वतःला शुद्ध करतात आणि मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतात, त्यांच्यात 27 महान गुण असतात. त्यांनी या प्रत्येक पूजनीय व्यक्तीशी संबंधित आध्यात्मिक खोली आणि सद्गुणांचा उल्लेख केला.
"नवकार मंत्र पठण करताना 108 दैवी गुणांपुढे आपण नतमस्तक होतो आणि मानवतेच्या कल्याणाचे स्मरण करतो ", असे सांगून मोदी म्हणाले की, हा मंत्र आपल्याला आठवण करून देतो की ज्ञान आणि कर्म हेच जीवनाची दिशा आहेत, गुरु हे मार्गदर्शक प्रकाश आहेत आणि मार्ग तोच आहे जो आतून निघतो. त्यांनी नवकार मंत्राच्या शिकवणींबाबत अधिक माहिती दिली जी स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःचा प्रवास सुरु करण्यास प्रेरणा देतात. त्यांनी सांगितले की खरा शत्रू आपल्या आतच आहे - नकारात्मक विचार, अविश्वास, शत्रुत्व आणि स्वार्थ - आणि त्यांच्यावर विजय मिळवणे हाच खरा विजय आहे. त्यांनी अधोरेखित केले की जैन धर्म, व्यक्तींना बाह्य जगापेक्षा स्वतःवर विजय मिळविण्यासाठी प्रेरित करतो. "स्वतःवर मिळवलेला विजय आपल्यला अरिहंत बनवतो ", असे सांगून ते पुढे म्हणाले की नवकार मंत्र ही मागणी नसून एक मार्ग आहे - असा मार्ग जो व्यक्तींना आतून शुद्ध करतो आणि त्यांना सौहार्द आणि सद्भावनेचा मार्ग दाखवतो.
"नवकार मंत्र हा खऱ्या अर्थाने मानव ध्यान, साधना आणि आत्मशुद्धीचा मंत्र आहे", असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. त्यांनी त्याचा जागतिक दृष्टिकोन आणि त्याचे कालातीत स्वरूप अधोरेखित केले, जो इतर भारतीय श्रुति–स्मृति परंपरांप्रमाणेच पिढ्यानपिढ्या चालत आला आहे - आधी मौखिक, नंतर शिलालेखांद्वारे आणि शेवटी प्राकृत हस्तलिखितांद्वारे - आजही मानवतेला मार्गदर्शन करत आहे. "पंच परमेष्ठींच्या आराधनेसह , नवकार मंत्र योग्य ज्ञान, योग्य समज आणि योग्य आचरणाचे प्रतीक आहे, जो मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग आहे ", असे त्यांनी अधोरेखित केले.
पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या जीवनातील नऊ तत्वांचे महत्त्व अधोरेखित करताना, मोदी यांनी भारतीय संस्कृतीत नऊ क्रमांकाचे विशेष महत्त्व नमूद केले. त्यांनी जैन धर्मातील नऊ क्रमांकाच्या महत्त्वाबद्दल सविस्तर माहिती देताना नवकार मंत्र, नऊ तत्वे आणि नऊ गुणांचा उल्लेख केला, तसेच नऊ निधी , नवद्वार, नवग्रह , दुर्गेची नऊ रूपे आणि नवधा भक्ती यासारख्या इतर परंपरांमध्ये त्याचे अस्तित्व स्पष्ट केले. त्यांनी अधोरेखित केले की मंत्रांची पुनरावृत्ती - मग ती नऊ वेळा असो किंवा नऊच्या पटीत असो जसे की 27, 54, 108 - ही संख्या नऊ द्वारे दर्शविल्या जाणाऱ्या पूर्णतेचे प्रतीक आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की नऊ ही संख्या केवळ गणित नाही तर एक तत्वज्ञान आहे, कारण ती पूर्णतेचे प्रतिनिधित्व करते. पूर्णत्व प्राप्त केल्यानंतर, मन आणि बुद्धी स्थिर होते आणि नवीन गोष्टींच्या इच्छेपासून मुक्त होते. प्रगतीनंतरही, व्यक्ती त्यांच्या मुळापासून दूर जात नाही आणि हेच नवकार मंत्राचे सार आहे, असे त्यांनी सांगितले.
नवकार मंत्राचे तत्वज्ञान विकसित भारताच्या दृष्टिकोनाला अनुरूप आहे हे अधोरेखित करून, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला. विकसित भारत म्हणजे विकास ही आणि वारसा ही - एक असा देश जो थांबणार नाही किंवा डगमगणार नाही, नवीन उंची गाठेल, तरीही आपल्या परंपरांमध्ये रुजलेला राहील असे ते म्हणले. विकसित भारताला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल यावर त्यांनी भर दिला. तीर्थंकरांच्या शिकवणींचे जतन करण्यावर त्यांनी भर दिला. भगवान महावीरांचा 2550 वा निर्वाण महोत्सव देशभरात साजरा करण्यात आला यांची आठवण सांगताना मोदींनी परदेशातून प्राचीन मूर्ती परत आणल्याचा उल्लेख केला ज्यामध्ये तीर्थंकरांचाही समावेश आहे. मागील काही वर्षांत 20 हून अधिक तीर्थंकर मूर्ती भारतात परत आणल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. भारताची ओळख निर्माण करण्यात जैन धर्माची अतुलनीय भूमिका राहिली आहे असे त्यांनी अधोरेखित केले आणि हा वारसा जपण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. नवी दिल्लीतील नवीन संसद भवनाचा संदर्भ देताना ते लोकशाहीचे मंदिर आहे असे वर्णन करत, त्यांनी जैन धर्माच्या दृश्यमान प्रभावाकडे लक्ष वेधले. त्यांनी शार्दुल गेट प्रवेशद्वारावरील स्थापत्य गॅलरीमध्ये समेद शिखरचे चित्रण, लोकसभेच्या प्रवेशद्वारावरील तीर्थंकर मूर्ती जी ऑस्ट्रेलियाहून परत आणण्यात आली आहे , संविधान गॅलरीच्या छतावर भगवान महावीर यांचे भव्य चित्र आणि दक्षिण इमारतीच्या भिंतीवर सर्व 24 तीर्थंकरांचे एकत्रित चित्रण यांचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी नमूद केले की हे तत्वज्ञान भारताच्या लोकशाहीला दिशा दाखवते , योग्य मार्ग दाखवते. "वत्थु सहावो धम्मो," "चरितम खलु धम्मो," आणि "जीवन रखणम धम्मो" यांसारख्या प्राचीन आगम धर्मग्रंथांमध्ये समाविष्ट असलेल्या जैन धर्माच्या सखोल परिभाषांचा त्यांनी उल्लेख केला. या मूल्यांनी प्रेरित "सबका साथ, सबका विकास" या मंत्रासह सरकार पुढे मार्गक्रमण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
"जैन साहित्य हा भारताच्या बौद्धिक वारशाचा कणा आहे आणि या ज्ञानाचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे", असे मोदी म्हणाले. प्राकृत आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन साहित्यावर आणखी संशोधन करणे शक्य झाले आहे असे ते म्हणाले. भाषेचे जतन केल्याने ज्ञानाचे अस्तित्व सुनिश्चित होते आणि भाषेचा विस्तार झाला तर ज्ञानाचा विस्तार होईल यावर त्यांनी भर दिला. भारतात अनेक शतके जुनी जैन हस्तलिखिते आहेत असे नमूद करत यातील प्रत्येक पान इतिहासाचा आरसा आणि ज्ञानाचा महासागर असल्याचे वर्णन करताना त्यांनी जैन शिकवणी उद्धृत केल्या.
अनेक महत्त्वाचे ग्रंथ हळूहळू नामशेष होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या "ज्ञान भारतम् मिशनचा देखील त्यांनी उल्लेख केला. प्राचीनतेला आधुनिकतेशी जोडण्यासाठी देशभरातील लाखो हस्तलिखितांचे सर्वेक्षण करण्याची आणि प्राचीन वारशाचे डिजिटलायझेशन करण्याची योजना त्यांनी सांगितली. 'अमृत संकल्प' असे त्यांनी या उपक्रमाचे वर्णन केले. जगाला अध्यात्मासंदर्भात मार्गदर्शन करतांना नवा भारत कृत्रिम तंत्रज्ञानाच्या शक्यतांचा शोध घेईल", यावर त्यांनी भर दिला.
युद्ध, दहशतवाद आणि पर्यावरणीय समस्यांसारख्या जागतिक आव्हानांवर त्याच्या मुख्य तत्त्वांद्वारे उपाय देतो, म्हणून जैन धर्म वैज्ञानिक आणि संवेदनशील आहे, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. "परस्परोपग्रहो जीवनम्" हे सर्व सजीवांच्या परस्परावलंबनावर भर देणारे जैन परंपरेचे प्रतीक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. जैन धर्माची अहिंसेप्रती वचनबद्धता, अगदी सूक्ष्म पातळीवरही पर्यावरण संवर्धन, परस्पर सौहार्द आणि शांतीचा एक सखोल संदेश म्हणून त्यांनी अधोरेखित केले. जैन धर्माच्या पाच प्रमुख तत्त्वांना कृतज्ञता देत त्यांनी आजच्या युगात अनेकांतवादाच्या तत्वज्ञानाच्या प्रासंगिकतेवर भर दिला. अनेकांतवादावरील विश्वास युद्ध आणि संघर्षाच्या परिस्थितींना प्रतिबंधित करतो, ज्यामुळे इतरांच्या भावना आणि दृष्टिकोन समजून घेण्यास प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी सांगितले. जगाने अनेकांतवादाचे तत्वज्ञान स्वीकारण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला.
भारताचे प्रयत्न आणि त्याचे परिणाम प्रेरणास्थान बनत असल्याने जगाचा भारतावरील विश्वास वाढत असून जागतिक संस्था आता भारताकडे पाहत आहेत, भारताची प्रगती इतरांसाठी मार्गदर्शक होत आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले. "परस्परोपग्रहो जीवनम्" या जैन तत्वज्ञानावर भर देऊन जीवन परस्पर सहकार्यावर भरभराटीला येते, असे त्यांनी नमूद केले. याच दृष्टिकोनामुळे भारताकडून जागतिक अपेक्षाही वाढल्या असून देशाने आपले प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत, असे त्यांनी नमुद केले. हवामान बदलाच्या महत्त्वाच्या मुद्द्याला संबोधित करताना, त्यांनी शाश्वत जीवनशैली हा उपाय ठरवून भारताच्या मिशन लाईफच्या प्रारंभावर प्रकाश टाकला. जैन समुदाय शतकानुशतके साधेपणा, संयम आणि शाश्वततेच्या तत्त्वांचे पालन करत आहे. अपरिग्रह या जैन तत्वाचा संदर्भ देत, त्यांनी या मूल्यांचा व्यापक प्रसार करण्याची गरज आहे, यावर भर दिला. प्रत्येकाने मिशन लाईफचे ध्वजवाहक बनण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
आजच्या माहितीच्या जगात ज्ञान मुबलक आहे, परंतु विवेकाशिवाय त्यात गंभीरता नाही. जैन धर्म योग्य मार्ग शोधण्यासाठी ज्ञान आणि ज्ञानाचे संतुलन शिकवतो यावर त्यांनी भर दिला. तरुणांसाठी त्यांनी या संतुलनाचे महत्त्व अधोरेखित केले, मानवी स्पर्श हा तंत्रज्ञानाला पूरक असला पाहिजे आणि कौशल्यांना मनाची साथ असली पाहिजे यावर भर देत नवकार महामंत्र नवीन पिढीसाठी ज्ञान आणि दिशानिर्देशाचा स्रोत म्हणून काम करू शकतो, असे नमुद केले.
नवकार मंत्राच्या सामूहिक जपानंतर मोदींनी सर्वांना नऊ संकल्प करण्याचे आवाहन केले. पहिला संकल्प 'जलसंवर्धनाचा. पाणी दुकानांमध्ये विकले जाईल या १०० वर्षांपूर्वी बुद्धी सागर महाराज यांनी केलेल्या भाकिताची आणि यांच्या शब्दांची मोदी यांनी आठवण काढत, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मूल्य आणि जतन करण्याची गरज यावर भर दिला. दुसरा संकल्प म्हणजे 'आईच्या नावाने एक झाड लावा'. त्यांनी अलिकडच्या काही महिन्यांत १०० कोटींहून अधिक झाडे लावल्याचे अधोरेखित केले आणि सर्वांना त्यांच्या आईच्या नावाने एक झाड लावण्याचे आणि तिच्या आशीर्वादांसारखे त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. गुजरातमध्ये 24 तीर्थंकरांशी संबंधित 24 झाडे लावण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची आठवण करत झाडांच्या अभावामुळे ते पुर्ण होऊ शकले नाही, ही अठवणही यावेळी त्यांनी काढली. 'स्वच्छता अभियान' हा तिसरा संकल्प असून प्रत्येक रस्त्यावर, परिसरात आणि शहरात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांना या मोहिमेत योगदान देण्याचे आवाहन मोदी यांनी केले.
'व्होकल फॉर लोकल' हा चौथा संकल्प म्हणत त्यांनी स्थानिक पातळीवर बनवलेल्या उत्पादनांचा प्रचार, त्यांना जागतिक दर्जाचे बनवणे आणि भारतीय भुमीचे सार आणि भारतीय कामगारांच्या कष्टाचे वाहक असलेल्या वस्तूंना पाठिंबा देण्यास प्रोत्साहन दिले. पाचवा संकल्प 'भारताचा शोध' हा असून त्यांनी लोकांना परदेशात प्रवास करण्यापूर्वी भारतातील विविध राज्ये, संस्कृती आणि प्रदेशांचा शोध घेण्याचे आवाहन केले. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातील वेगळेपणा आणि मूल्य यावर त्यांनी भर दिला. 'नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे' हा सहावा संकल्प असून, एका जीवाने दुसऱ्या जीवाला इजा करू नये, या जैन तत्वाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. पृथ्वी मातेला रसायनांपासून मुक्त करण्याचे, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचे आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहनही केले. त्यांनी सातवा संकल्प हा 'निरोगी जीवनशैली' असे सांगत भारताच्या पारंपारिक आहाराचे महत्व अधोरेकीत केले. अहारात बाजरीचा समावेश, तेलाचा 10 टक्के वापर कमी करणे आणि संयमाने आरोग्य राखणे. 'योग आणि खेळांचा समावेश करणे' हा आठवा संकल्प त्यांनी प्रस्तावित केला. शारीरिक आरोग्य आणि मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी घरी, कामावर, शाळेत किंवा उद्यानात योग आणि खेळांना दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्यावर त्यांन भर दिला. 'गरिबांना मदत करणे' हा शेवटचा संकल्प सांगत वंचितांना ओंजळभऱ किंवा वाटीभऱ मदत करण्याचे अवाहन करत मोदी यांनी हेच सेवेचे खरे सार होय, असे अधोरेखित केले.
हे संकल्प जैन धर्माच्या तत्त्वांशी आणि शाश्वत आणि सुसंवादी भविष्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत, यावर त्यांनी भर दिला. हे 9 संकल्प मनुष्यामध्ये नव ऊर्जा भरतील आणि तरुण पिढीला एक नवी दिशा देतील, त्यांच्या अंमलबजावणीमुळे समाजात शांतता, सौहार्द आणि करुणा निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. रत्नत्रय, दशलक्षण, सोलाह करण आणि पर्युषण सारखे सण जैन धर्माची तत्त्वे आत्मकल्याणाचा मार्ग मोकळा करतात. जागतिक नवकार मंत्र दिन जागतिक स्तरावर आनंद, शांतता आणि समृद्धी सतत वाढवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी चारही पंथांनी एकत्र येऊन दाखवलेल्या एकतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत हे एकतेचे प्रतीक आहे, असे नमुद केले. देशभरात एकतेचा संदेश पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित करतांना जो कोणी "भारत माता की जय" म्हणतो त्याला आलिंगन दिले पाहिजे आणि जोडले पाहिजे, कारण ही ऊर्जा विकसित भारताचा पाया मजबूत करते. असे त्यांनी सांगितले.
देशभरातील विविध ठिकाणच्या गुरु भगवंतांच्या आशीर्वादाबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. या जागतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण जैन समुदायाचे कौतुक केले. त्यांनी आचार्य भगवंत, मुनी महाराज, श्रावक-श्राविक आणि देश आणि विदेशातील या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांना अभिवादन केले. त्यांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनाझेशन JITO चे कौतुक केले. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी, JITO चे मुख्य संचालक पृथ्वीराज कोठारी, अध्यक्ष विजय भंडारी, JITO अधिकारी आणि जगभरातील मान्यवरांच्या उपस्थितीचे कौतुक केले. या उल्लेखनीय कार्यक्रमाच्या यशासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
नवकार महामंत्र दिवस हा आध्यात्मिक सुसंवाद आणि नैतिक चेतनेचा एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे, जो जैन धर्मातील सर्वात आदरणीय आणि सार्वत्रिक जप असलेल्या नवकार महामंत्राच्या सामूहिक जपाद्वारे लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. अहिंसा, नम्रता आणि आध्यात्मिक प्रगतिच्या तत्त्वांमध्ये रुजलेला हा मंत्र ज्ञानी व्यक्तींच्या सद्गुणांना आदरांजली वाहतो आणि आत्मिक परिवर्तनाला प्रेरणा देतो. हा दिवस सर्व व्यक्तींना आत्मशुद्धी, सहिष्णुता आणि सामूहिक कल्याणाच्या मूल्यांवर चिंतन करण्यास प्रोत्साहित करतो. शांती आणि एकतेसाठी जागतिक नामजप मधे 108 हून अधिक देशांतील लोक सामील असून पवित्र जैन मंत्राच्या माध्यमातून शांतता आध्यात्मिक जागृती आणि वैश्विक सुसंवाद वाढवण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला.
* * *
Tupe/JPS/Sushma/Raj/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2120460)
आगंतुक पटल : 77
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam