पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद
मुद्रा योजना कोणत्याही विशिष्ट गटापुरती मर्यादित नसून, युवा वर्गाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्यादृष्टीने सक्षम करणे हेच या योजनेचे ध्येय : पंतप्रधान
उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्यात मुद्रा योजनेचा परिवर्तनकारी प्रभाव : पंतप्रधान
मुद्रा योजनेने उद्योजकतेबद्दलच्या सामाजिक दृष्टिकोनात बदल घडवून आणत अत्यंत शांततेने क्रांती घडवली : पंतप्रधान
मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण महिला लाभार्थ्यांचे : पंतप्रधान
या योजनेअंतर्गत 52 कोटी कर्जे वितरित केली गेली, ही जागतिक पातळीवरची अभूतपूर्व कामगिरी : पंतप्रधान
Posted On:
08 APR 2025 3:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील 7, लोक कल्याण मार्ग इथल्या आपल्या निवासस्थानी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून आभार मानले, पाहुण्यांचे स्वागत करण्याचे सांस्कृतिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले, तसेच या सर्वांच्या उपस्थितीमुळे घरात येणाऱ्या पावित्र्यावरही त्यांनी आवर्जून भर दिला. यावेळी पंतप्रधानांनी सर्व सहभागींना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र यांनी पाळीव प्राण्यांसाठी लागणाऱ्या वस्तू, औषधे आणि सेवांचा व्यवसाय सुरुवे केलेल्या एका उद्योजक लाभार्थ्याशी संवाद साधला. यावेळी प्रधानमंत्र्यांनी या सर्व लाभार्थ्यांना ज्यांनी त्यांच्या कठीण काळात त्यांच्या क्षमतांवर विश्वास दाखवला त्या सर्वांचे आभार मानण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. त्यांनी या लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी कर्ज मंजूर केलेल्या बँक अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्याचे आणि त्यांनी मंजुर केलेल्या कर्जामुळे साधता आलेली प्रगती त्यांना दाखवण्याचा सल्ला दिला. आपल्या अशा कृतींमुळे या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाची पावती त्यांना मिळेलच, आणि सोबतच मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करणाऱ्या व्यक्तींना पाठबळ देण्याच्या त्यांच्या निर्णयावरही त्यांचा स्वतःचा विश्वास निर्माण होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या पाठबळाचे परिणाम त्यांना दाखवले तर त्यामुळे त्यांनाही तुमच्या प्रगती आणि यशात दिलेल्या योगदानाचा नक्कीच अभिमान वाटेल असे पंतप्रधान म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी केरळमधील उद्योजक गोपी कृष्ण यांच्याशी संवाद साधला. या संवादात त्यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे परिवर्तनकारी परिणाम अधोरेखित केले. यामुळेच गोपी कृष्ण यांना उद्योजक बनता आले, त्यांना घरे आणि कार्यालयांसाठी नवीकरणीय ऊर्जा उपायोजनांवर भर देता आला, आणि आणि रोजगाराच्या संधी निर्माण करत, यशस्वी उद्योजक बनण्यात मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी लाभार्थ्यांचा प्रवासही सर्वांसमोर मांडला. त्यांना मुद्रा योजनेअंतर्गतच्या कर्जाच्या सुविधेबद्दल माहिती मिळाल्यावर, त्यांनी दुबईतील कंपनीतून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान सूर्य घर उपक्रमांतर्गत सौर उर्जा सुविधा स्थापनेची प्रक्रिया केवळ दोन दिवसांतच पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी लाभार्थ्यांकडून त्यांची पंतप्रधान सूर्य घर उपक्रमाविषयीची प्रतिक्रियाही जाणून घेतली. केरळमधील घरांना मुसळधार पाऊस आणि दाट झाडीसारख्या आव्हानांचा सामना करावा लागत असतानाही, या योजनेमुळे मोफत वीज मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी विज बिलापोटी सुमारे 3,000 रुपये द्यावे लागत असत, आता मात्र या योजनेमुळे वीज बिले 240-250 रुपयांपर्यंत कमी झाली असल्याचे गोपी कृष्ण यांनी सांगितले. यामुळे त्यांचे मासिक उत्पन्नही 2.5 लाख रुपये तसेच त्यापेक्षा जास्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधानांनी छत्तीसगडमधील रायपूर इथल्या हाऊस ऑफ पुष्पाच्या महिला उद्योजक आणि संस्थापकांशी संवाद साधला. त्यांनी घरी स्वयंपाक करण्यापासून ते यशस्वी कॅफे व्यवसाय स्थापन करण्यापर्यंतची त्यांची प्रेरणादायी वाटचाल पंतप्रधानांसमोर मांडली. नफ्याचे प्रमाण आणि खाद्यपदार्थांसाठी येणाऱ्या खर्चाच्या व्यवस्थापनाविषयी त्यांनी संशोधनपूर्वक माहिती मिळवली, आणि याचा त्यांच्या उद्योजकीय यशात महत्त्वाचा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले. अजुनही युवा वर्गाच्या मनात भीती आहे, अनेकजण धोका पत्करण्याऐवजी नोकरीत स्थिर स्थावर होणे पसंत करतात हे वास्तव त्यांनी बोलून दाखवले. यावर पंतप्रधानांनीही आपले विचार व्यक्त केले. त्यांनी धोका पत्करण्याच्या क्षमतेचे महत्त्व आपल्या प्रतिसादातून अधोरेखित केले. हाऊस ऑफ पुष्पाच्या संस्थापकांनी वयाच्या 23 व्या वर्षी धोका पत्करण्याची क्षमता आणि वेळेचा प्रभावी वापर करण्याचे कसब दाखवले आणि त्यामुळेच त्या स्वतःचा व्यवसाय उभारू शकल्याची माहिती पंतप्रधानांनी सर्वांसोबत सामायिक केली. यावेळी या लाभार्थी उद्योजिकेने रायपूरमध्ये मित्र, कॉर्पोरेट जगतातील प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांसोबत झालेल्या चर्चेबद्दली सांगितेल. उद्योजकतेबद्दल त्यांची उत्सुकता आणि त्यांच्या मनातले प्रश्न त्यांनी या संवादात नमूद केले. कर्जासाठी तारणाची गरज नसलेल्या सरकारच्या योजनांविषयी युवा वर्गात जागरुकतेचा अभाव असल्याची बाब त्यांनी नमूद केली. मुद्रा योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणारे कर्ज तसेच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम कर्ज (Prime Minister’s Employment Generation Programme Loan - PMEGP Loan) योजनांमुळे ज्यांच्यात काहीएक करण्याची क्षमता आहे, अशांसाठी मोठी संधी निर्माण करून दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. युवा वर्गाने या योजनांबाबत माहिती मिळावी आणि धाडस पावले उचलावीत असे आवाहन त्यांनी केले. ज्यांना स्वतःची प्रगती साधायची आहे आणि यश मिळवायचे आहे त्यांच्यासाठी आकाश हे कायमच ठेंगणे आहे असेही त्या म्हणाल्या.
आणखी एक लाभार्थी, काश्मीरमधील बारामुल्ला येथील बेक माय केकचे मालक मुदस्सीर नक्षबंदी यांनी नोकरी शोधणारी व्यक्ती ते इतरांसाठी रोजगार निर्माण करणारी व्यक्ती बनण्यापर्यंतच्या आपल्या प्रवासाची माहिती दिली. आपण बारामुल्लाच्या दुर्गम भागातील 42 व्यक्तींना कायमचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी मुद्रा कर्ज घेण्यापूर्वी मुदस्सीर यांच्या कमाईबद्दल पंतप्रधानांनी विचारणा केली असता, कर्ज घेण्यापूर्वी हजारोंमध्ये असलेली आपली कमाई नवउद्योजकीय मार्गावरच्या प्रवासामुळे लाखो आणि करोडोंपर्यंत पोहोचली आहे असे उत्तर त्यांनी दिले. पंतप्रधानांनी मुदस्सीरच्या व्यवसायात यूपीआयचा व्यापक वापर अधोरेखित केला. 90% व्यवहार यूपीआयद्वारे केले जातात, ज्यामुळे फक्त 10% रोख रक्कम हातात राहत असल्याचे मुदस्सीर यांचे निरीक्षण पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
त्यानंतर पंतप्रधानांनी सुरेश यांच्या वापीमधील नोकरीपासून सिल्वासा येथे यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवण्याच्या प्रेरणादायी प्रवासाचे वर्णन ऐकले. सुरेश यांनी सांगितले की, आपल्यासाठी केवळ नोकरी पुरेशी नाही ही गोष्ट 2022 त्यांना जाणवली आणि त्यानंतर आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपल्या यशामुळे, आता काही मित्र देखील स्वतःचे उद्योग सुरू करण्यासाठी मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्याचा विचार करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. इतरांना उद्योजकतेच्या दिशेने धाडसी पावले उचलण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या अशा यशोगाथांच्या सकारात्मक परिणामावर पंतप्रधानांनी भर दिला.
रायबरेली येथील एका महिला नवउद्योजिकेने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना देण्यात आलेल्या सहयोगाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पूर्वी आव्हानात्मक बाब असणारी मात्र आता अतिशय सहजतेने उपलब्ध झालेल्या परवाने आणि निधी मिळवण्याच्या सोयी यावर या महिलेने भर दिला आणि विकसित भारताच्या उभारणीत योगदान देण्याचे वचन दिले. पंतप्रधानांनी या महिलेच्या भावनिक वचनाची दखल घेतली. या नवोद्योजिकेला सुमारे 2.5 ते 3 लाख रुपये मासिक उलाढाल असलेला बेकरी व्यवसाय चालवण्यात मिळालेले यश आणि सोबतच सात ते आठ व्यक्तींना रोजगार प्रदान करण्याची सक्षमता याबद्दल पंतप्रधानांनी या महिलेची प्रशंसा केली.
मध्य प्रदेशातील भोपाळ येथील लवकुश मेहरा यांनी 2021 मध्ये 5 लाख रुपयांच्या कर्जातून आपला फार्मा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला साशंक मनाने त्यांनी आपले कर्ज 9.5 लाख रुपयांपर्यंत वाढवले आणि पहिल्याच वर्षात 12 लाख रुपयांवरून 50 लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल केली. मुद्रा योजना कोणत्याही विशिष्ट गटापुरती मर्यादित नाही तर तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम बनवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधानांनी लवकुश मेहरा यांच्या अलिकडच्या उपलब्धींचा उल्लेख केला, ज्यात 34 लाख रुपयांच्या घराची खरेदी आणि दरमहा सुमारे 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करणे यांचा समावेश आहे. मेहरा यांची आताची दरमहा कमाई ही त्यांच्या पूर्वीच्या नोकरीतून मिळणाऱ्या 60 हजार ते 70 हजार रुपयांच्या तुलनेत घसघशीत वाढ असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी याबद्दल मेहरा यांचे अभिनंदनही केले आणि हे यश मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाची नोंद घेतली. या योजनेच्या लाभार्थ्यांनी मुद्रा कर्ज आणि त्याचे फायदे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावेत असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
त्यानंतर पंतप्रधानांनी गुजरातमधील भावनगर येथे वयाच्या 21व्या वर्षी आदित्य लॅब ची स्थापना करणाऱ्या एका तरुण उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास ऐकला. मेकॅट्रॉनिक्स अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या या उद्योजकाने किशोर श्रेणी अंतर्गत 2 लाख रुपयांच्या मुद्रा कर्जाचा यशस्वीपणे लाभ करून घेत 3डी प्रिंटिंग, रिव्हर्स इंजिनिअरिंग, रॅपिड प्रोटोटाइपिंग आणि रोबोटिक्स या क्षेत्रात व्यवसाय सुरू केला. पंतप्रधानांनी या नवउद्योजकाच्या समर्पणाची दखल घेऊन आठवड्यातील कामाच्या दिवशी महाविद्यालयातील हजेरी आणि शनिवार, रविवार व्यवसायाचे संतुलन साधत कुटुंबाच्या मदतीने दुरस्थ पद्धतीने काम करत दरमहा 30 ते 35 हजार रुपये तो कमावत असल्याचे सांगितले.
मनाली येथील एका महिला नवउद्योजिकेने भाजी बाजारात काम करून यशस्वी व्यवसाय चालवण्याची आपली कहाणी पंतप्रधानांसमोर उलगडली. तिने 2015-16 मध्ये 2.5 लाख रुपयांच्या मुद्रा कर्जातून व्यवसायाला सुरुवात केली होती आणि या कर्जाची तिने अडीच वर्षांत परतफेड केली होती. त्यानंतर 5 लाख, 10 लाख आणि 15 लाख रुपयांच्या कर्जातून, तिने भाजीपाल्याच्या दुकानापासून ते रेशन दुकानापर्यंत आपला व्यवसाय वाढवत वार्षिक 10 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. देशभरातील नवउद्योजकांना सक्षम बनवण्यात मुद्रा योजनेच्या दृढनिश्चयाचे आणि सकारात्मक परिणामांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील एका महिला नवउद्योजिकेचा केवळ गृहिणी असण्यापासून ज्यूट बॅगांचा यशस्वी व्यवसाय चालवण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास ऐकला. 2019 मध्ये ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतल्यानंतर, तिने कॅनरा बँकेकडून कोणत्याही तारणाशिवाय 2 लाख रुपयांचे मुद्रा कर्ज मिळवले. पंतप्रधानांनी तिच्या दृढनिश्चयाची तसेच तिच्या क्षमतेवर बँकेने दाखवलेल्या विश्वासाची दखल घेतली. ज्यूट फॅकल्टी सदस्य आणि नवउद्योजक अशा तिच्या दुहेरी भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. रोजगार आणि कौशल्य विकासाद्वारे ग्रामीण महिलांना सक्षम बनवण्याच्या या महिन्याच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. उद्योजकता आणि स्वावलंबनाला चालना देण्यात मुद्रा योजनेच्या परिवर्तनकारी परिणामांबाबत पंतप्रधानांनी अधिक माहिती दिली.
पंतप्रधानांनी नागरिकांचे विशेषतः महिलांचे सक्षमीकरण करण्यामध्ये आणि भारतभरात उद्यमशीलतेला चालना देण्यामध्ये मुद्रा योजनेचा परिवर्तनकारी प्रभाव अधोरेखित केला. उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील व्यक्तींना या योजनेने कशा प्रकारे आर्थिक पाठबळ दिले आहे, कोणत्याही प्रकारचे गुंतागुंतीचे कागदोपत्रावरील व्यवहार न करता, तारणाविना कर्ज उपलब्ध करून त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुविधा दिली आहे, यावर त्यांनी भर दिला.
मुद्रा योजनेमुळे समाजाचा कल उद्यमशीलतेच्या वृत्तीकडे वळला असल्याचे नमूद करून मोदी यांनी या योजनेमुळे होत असलेल्या शांत क्रांतीचा उल्लेख केला. या योजनेमुळे महिलांना केवळ आर्थिक सहाय्यच उपलब्ध झाले नसून त्यांच्यासाठी नेतृत्व करण्याच्या आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची देखील संधी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये, मंजुरी मिळवण्यात आणि कर्जाची वेळेवर परतफेड करण्यामध्ये आघाडी घेत, या योजनेच्या सर्वाधिक लाभार्थी महिला असल्याकडे त्यांनी निर्देश केला.
मुद्रा कर्जाचा जबाबदारीने वापर करण्याबाबत संबंधित व्यक्तींमध्ये निर्माण झालेल्या शिस्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. या योजनेमुळे निधीच्या गैरवापराला किंवा अनुत्पादक प्रयत्नांना प्रतिबंध होत असून ही योजना लोकांचे आयुष्य आणि करियर घडवण्यासाठी संधी उपलब्ध करत आहे. मुद्रा योजने अंतर्गत कोणत्याही तारणाविना भारताच्या नागरिकांना 33 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही रक्कम अभूतपूर्व असून, श्रीमंत व्यक्तींना एकत्रितपणे दिलेल्या आर्थिक सहाय्यापेक्षा खूपच जास्त आहे यावर त्यांनी भर दिला. ज्यांनी या निधीचा रोजगार निर्माण करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रभावी पद्धतीने वापर केला त्या युवा प्रतिभावंतांवर आपला पूर्ण विश्वास आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
मुद्रा योजनेद्वारे झालेल्या रोजगारनिर्मितीने आर्थिक वृद्धीमध्ये लक्षणीय योगदान दिले आहे, असे मोदी यांनी नमूद केले. सामान्य नागरिकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले आहे आणि त्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये गुंतवणूक करणे शक्य झाले आहे, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. या योजनेमुळे होणाऱ्या सामाजिक लाभांची त्यांनी दखल घेतली. सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी असे नमूद केले की पारंपरिक दृष्टीकोनाला बाजूला ठेवून आपले प्रशासन अतिशय सक्रीय पद्धतीने या योजनेच्या अंमलबजावणीच्या 10 वर्षांचा आढावा घेत आहे. देशभरात या योजनेच्या लाभार्थ्यांकडून आणि गटांकडून या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्याच्या, सुधारणेसाठी वाव असलेल्या संधींचा शोध घेण्याच्या आणि अधिक जास्त यश मिळवण्यासाठी आवश्यक सुधारणांची अंमलबजावणी करण्याच्या आवश्यकतेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
सुरुवातीला केवळ 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत असलेली आणि आता 20 लाख रुपयांपर्यंत पोहोचलेल्या मुद्रा योजनेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यामध्ये सरकारच्या आत्मविश्वासाला अधोरेखित करत मोदी यांनी असे नमूद केले की हा विस्तार म्हणजे भारतीय नागरिकांची उद्यमशील वृत्ती आणि क्षमता यावर सरकारने दाखवलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे, ज्यामुळे या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीला बळकटी मिळाली आहे.
मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इतरांना प्रेरणा देण्याच्या महत्त्वावर भर देत मोदी यांनी आणखी किमान पाच ते दहा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करण्याचे, त्यांच्यात आत्मविश्वासाची आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करण्याचे आवाहन नागरिकांना केले. या योजने अंतर्गत 52 कोटी कर्जांचे वितरण झाले असून, जागतिक स्तरावर ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गुजरातमधील आपल्या कार्यकाळाचे स्मरण करत मोदी यांनी “गरीब कल्याण मेळा” या उपक्रमाची माहिती सांगितली, ज्यामध्ये गरिबीवर मात करण्यासाठी लोकांना पथनाट्याद्वारे प्रेरित केले जात असायचे. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर सरकारी लाभांचा त्याग करणाऱ्या आणि आपल्यामधील परिवर्तनाचे दर्शन घडवणाऱ्या व्यक्तींच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यांनी गुजरातमधील एका आदिवासी समुदायाची प्रेरणादायी गाथा सांगितली, ज्या समुदायाने एक लहानसे कर्ज घेऊन पारंपरिक वादनाचे कार्यक्रम सादर करणाऱ्या पथकाचे रुपांतर एका व्यावसायिक बँड पथकात केले. या उपक्रमामुळे केवळ त्यांच्या आर्थिक स्थितीतच सुधारणा झाली नाही तर लहानसे प्रयत्न सुद्धा कशा प्रकारे लक्षणीय बदल घडवू शकतात हे अधोरेखित झाले. परिवर्तनाच्या अशा गाथा आपल्याला प्रेरित करतात आणि राष्ट्रउभारणीच्या एकत्रित प्रयत्नांमध्ये प्रतिबिंबित होतात, असे त्यांनी सांगितले. मोदी यांनी मुद्रा योजना म्हणजे लोकांच्या आकांक्षांचा आणि परिस्थितीचा अभ्यास करण्याचे आणि त्यांचे निवारण करण्याचे एक साधन असल्याचा पुनरुच्चार केला. या योजनेच्या यशाबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि लाभार्थ्यांनी त्याची परतफेड समाजाला करावी असे आवाहन केले आणि समुदायासाठी योगदान दिल्यामुळे मिळत असलेल्या समाधानाची भावना अधोरेखित केली.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी या संवादाच्या वेळी उपस्थित होते.
* * *
JPS/Tupe/Tushar/Shraddha/Shailesh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2120029)
Visitor Counter : 45
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam