अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लघु आणि सूक्ष्म नवउद्योजकांना सक्षम बनवणाऱ्या ‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेची (PMMY)’ गौरवशाली दशकपूर्ती


"निधी नसलेल्यांना निधी देणे" या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार सुरू झालेली पीएम मुद्रा योजना, औपचारिक संस्थात्मक कर्ज मिळविण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड देणाऱ्या लघु उद्योगांना तारणमुक्त कर्ज देते : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

‘पीएम मुद्रा योजना’ केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांपैकी एक आहे : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

Posted On: 08 APR 2025 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 एप्रिल 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेली ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ (पीएमएमवाय) देशभरातील लघु आणि सूक्ष्म नवउद्योजकांना सक्षम बनवण्याची आपली गौरवशाली दशकपूर्ती साजरी करत आहे. इच्छुक नवउद्योजकांना सहयोग करण्यासाठी, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 23 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये या योजनेची कर्ज मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. ही नवीन मर्यादा 24 ऑक्टोबर 2024 रोजी लागू झाली. ही कर्जे बँका, एनबीएफसी, एमएफआय आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे दिली जातात.

‘तरुण प्लस’ ही नवीन कर्ज श्रेणी विशेषतः तरुण श्रेणी अंतर्गत कर्ज घेतलेल्या आणि कर्जाची यशस्वीरित्या परतफेड केलेल्या लाभार्थ्यांसाठी आरेखित केलेली आहे. या श्रेणीतून पात्र लाभार्थ्यांना 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. याव्यतिरिक्त, मायक्रो युनिट्ससाठी क्रेडिट गॅरंटी फंड (CGFMU) आता या वाढीव कर्जांसाठी हमी प्रदान करणार आहे, ज्यामुळे भारतात एक मजबूत उद्योजकीय परिसंस्था विकसित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला आणखी बळकटी मिळेल.

“कष्टाळू सूक्ष्म-उद्योगांना आणि पहिल्या पिढीतील नवउद्योजकांना सक्षम बनवण्याच्या ध्येयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली, असे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण ‘पीएम मुद्रा योजना’ च्या यशस्वी दशकपूर्तीच्या प्रसंगी बोलताना म्हणाल्या. पंतप्रधानांच्या "निधी नसलेल्यांना निधी देणे" या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेने औपचारिक संस्थात्मक कर्ज मिळविण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड देणाऱ्या लघु उद्योगांना, वेळेवर आणि परवडणाऱ्या व्याजदरात वित्तपुरवठा मिळण्यातील तफावत दूर भरून काढत तारणमुक्त कर्जे दिली,” असेही त्या म्हणाल्या.

लाखो लोकांना सक्षम बनवण्यात आणि समावेशक विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यात पीएम मुद्रा योजनेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी प्रकाश टाकला. “52 कोटींहून अधिक मुद्रा कर्ज खात्यांसाठी 33.65 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. ही योजना कोट्यवधी नवउद्योजकांच्या, विशेषतः समाजातील उपेक्षित घटकांच्या आकांक्षांना पंख देण्यात एक महत्त्वाचा घटक ठरली आहे, असे त्या म्हणाल्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘मुद्रा: महिला उद्योजकता आणि आर्थिक विकासाला चालना देणारी योजना’ असा परिणाम दाखवणाऱ्या योजनेची प्रशंसा केली. “मुद्रा कर्जांच्या एकूण खात्यांपैकी जवळजवळ 68% खाती महिलांसाठी मंजूर करण्यात आली आहेत, त्याचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला. ही योजना महिला सक्षमीकरणाचे तसेच राष्ट्रीय आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी महिलांना सक्षम करण्याचे साधन बनली असून महिला उद्योजकांच्या पुढील पिढीला प्रेरणा देणारी आहे हे आनंददायी आहे, असेही त्या म्हणाल्या. 

"प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या सर्वात महत्वाच्या उपक्रमांपैकी एक आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याप्रसंगी काढले. सर्व समावेशक वाढ साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आर्थिक समावेशन हे सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे, असेही ते म्हणाले. “प्रधानमंत्री मुद्रा योजना छोट्या नवउद्योजकांना बँका, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स (MFI) कडून कर्ज मिळविण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.” हे त्यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या 10 वर्षांच्या यशस्वी वाटचालीची आणि या योजनेच्या आधारभूत तत्वांच्या माध्यमातून देशात वित्तीय समावेशन घडून आल्याचा सोहळा आपण साजरा करत आहोत. अशावेळी  या योजनेचे ठळक यश आणि या योजनेच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांवरच चर्चा करणे तितकेच महत्वाचे आहे. :

देशातील वित्तीय समावेशीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी तीन प्रमुख स्तंभांवर आधारलेली आहे, ते म्हणजे,

1) बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्यांना बँकिंग सेवा पुरवणे

2) असुरक्षित असलेल्यांना सुरक्षितता देणे, आणि

3) ज्यांना निधी सहाय्य उपलब्ध झाले नाही त्यांना ते पुरवणे

ही तीनही उद्दिष्ट्ये तंत्रज्ञानाच्या उपयोगाने आणि बहु भागधारकांच्या सहकार्यात्मक दृष्टिकोनाचा अवलंब करून साध्य केली जात आहेत, त्याचबरोबर ज्यांना अद्याप सेवा पुरवल्या गेल्या नाहीत, किंवा ज्यांना कमी प्रमाणात सेवांचा लाभ मिळाला आहे, अशांना सेवांचा लाभही दिला जात आहे.

वित्तीय समावेशीकरणाच्या तीन प्रमुख स्तंभांपैकी एक म्हणजे ज्यांना निधी सहाय्य उपलब्ध झाले नाही त्यांना ते पुरवणे, आणि याचेच प्रतिबिंब आपल्याला प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या (PMMY) माध्यमातून उभ्या केलेल्या वित्तीय समावेशीकरण परिसंस्थेत दिसून येते. याअंतर्गत लहान/सूक्ष्म उद्योजकांना तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्याचा उद्देश बाळगत, ज्यांना निधी सहाय्य उपलब्ध झाले नाही त्यांना ते पुरवण्याच्या तत्वाची अंमलबजावणी केली जात आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेची (PMMY) प्रमुख वैशिष्ट्ये:

  1. आता मुद्रा कर्जे ही शिशु, किशोर, तरुण आणि नव्याने समाविष्ट केलेल्या तरुण प्लस या चार श्रेणींमध्ये दिली जाणार आहेत. यातून कर्जदारांनी साधलेल्या वाढ वा प्रगतीची तसेच कर्जदारांच्या निधीच्या गरजेला महत्व दिले गेले आहे.
    • शिशु: 50,000/- रुपयांपर्यंतची कर्जे
    • किशोर: 50,000/- रुपयांपेक्षा जास्त आणि 5 लाख रुपयांपर्यंतची कर्जे
    • तरुण: 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 10 लाख रुपयांपर्यंतची कर्जे
    • तरुण प्लस: 10 लाख रुपये आणि 20 लाख रुपयांपर्यंतची कर्जे
  2. या कर्जांच्या श्रेणींमध्ये कालमर्यादित वित्तपुरवठा अर्थात term financing तसेच उत्पादन, व्यापार आणि सेवा क्षेत्रासह कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय आणि मधमाशी पालन इत्यादी कृषी संलग्न क्रिया प्रक्रियांसह सर्व क्रिया प्रक्रियांकरता आवश्यक खेळत्या भांडवलाच्या गरजांचा विचार केला गेला आहे.
  3. या कर्जांसाठीच्या व्याज दराचे नियमन हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केले जाते, याबरोबरीनेच खेळत्या भांडवलाच्या सुविधांसाठी परतफेडीच्या पर्यायांअंतर्गत लवचिक कालावधीचे पर्यायही उपलब्ध करून दिले जातात.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे 21.03.2025 पर्यंतचे यश:

  • महिला कर्जदार: या योजनेअंतर्गत महिला कर्जदारांना शिशु श्रेणी अंतर्गत एकूण 8.49 लाख कोटी रुपये, किशोर श्रेणी अंतर्गत 4.90 लाख कोटी रुपये आणि तरुण श्रेणी अंतर्गत 0.85 लाख कोटी रुपयांच्या कर्जांचे वितरण केले गेले आहे.

  • अल्पसंख्याक कर्जदार: या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक घटकातील कर्जदारांना शिशु श्रेणी अंतर्गत 1.25 लाख कोटी रुपये, किशोर श्रेणी अंतर्गत 1.32 लाख कोटी रुपये आणि तरुण श्रेणी अंतर्गत 0.50 लाख कोटी रुपयांच्या कर्जांचे वितरण केले गेले आहे.

  • नव उद्योजक / खाती:
    • शिशु श्रेणी: शिशु श्रेणी अंतर्गत 8.21 कोटी खात्यांकरता 2.24 लाख कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी दिली असून, त्यापैकी 2.20 लाख कोटी रुपयांची कर्जे वितरित केली गेली आहेत.
    • किशोर श्रेणी: किशोर श्रेणी अंतर्गत 2.05 कोटी खात्यांकरता 4.09 लाख कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी दिली असून, त्यापैकी 3.89 लाख कोटी रुपयांची कर्जे वितरित केली गेली आहेत.
    • तरुण श्रेणी:  तरुण श्रेणी अंतर्गत 45 लाख खात्यांकरता 3.96 लाख कोटी रुपयांची कर्जे मंजूर आणि 3.83 लाख कोटी रुपयांची कर्जे वितरित केली गेली आहेत.

श्रेणीनुसार विभाजन: - (कर्जांची संख्या आणि मंजूर केलेली रक्कम)

 

Category

Percentage as per No. of Loans

Percentage as per Amount Sanctioned

Shishu

78%

35%

Kishor

20%

40%

Tarun

2%

25%

Tarun Plus

0%

0%

Total

100%

100%

   

ही योजना सुरु केल्यानंतर कोविड-19 महामारीने प्रभावित 2020-21 या आर्थिक वर्षाचा कालावधी  वगळता, या योजनेअंतर्गत निर्धारित केलेले लक्ष्य दरवेळेला गाठले गेले आहे.

वर्षागणिक मंजूर केलेली रक्कम खाली दिली:

Financial Year

No. of Loans Sanctioned

(in Crore)

Amount Sanctioned

(Rs. in Lakh Crore)

2015-16

 3.49

 1.37

2016-17

 3.97

 1.80

2017-18

 4.81

 2.54

2018-19

 5.98

 3.22

2019-20

 6.23

 3.37

2020-21

 5.07

 3.22

2021-22

 5.38

 3.39

2022-23

 6.24

 4.56

2023-24

 6.67

 5.41

2024-25

(as on 21.03.2025) *

 4.53

 4.77

Total

 52.37

 33.65

 

विशेष उपक्रम :

  • प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जे सुरक्षित करण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये सूक्ष्म युनिट्ससाठी पत हमी निधीची (Credit Guarantee Fund for Micro Units - CGFMU) स्थापना करण्यात आली.
  • आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत 2020-21 या आर्थिक वर्षात शिशु श्रेणीतील कर्जांवर 2% व्याज सवलत देण्यात आली, यामुळे पात्र कर्जदारांकरता कर्जाचा भार कमी झाला.

आज भारत प्रधानमंत्री मुद्रा योजनेला यशस्वीरित्या 10 वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा साजरा करत आहे. ही दशकपूर्ती म्हणजे बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्यांना बँकिंग सेवा पुरवणे, असुरक्षित असलेल्यांना सुरक्षितता देणे, आणि ज्यांना निधी सहाय्य उपलब्ध झाले नाही त्यांना ते पुरवणे याबद्दलची सरकारने आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केल्याचे, आणि देशात वित्तीय समावेशनाला चालना मिळत असल्याचे तसेच उद्योजकतेच्या स्वप्नांना पाठबळ मिळत असल्याचेच द्योतक आहे.

 

 

 

 

 

* * *

JPS/Tupe/Shraddha/Tushar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2120024) Visitor Counter : 46