पंतप्रधान कार्यालय
तमिळनाडूमध्ये रामेश्वरम इथे विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
06 APR 2025 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2025
वणक्कम!
एन अंबू तमिल सोंधंगले!
तमिळनाडूचे राज्यपाल एन. रवि, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, डॉ. एल. मुरुगन, तमिळनाडू सरकारचे मंत्री, खासदार, अन्य मान्यवर आणि बंधु भगिनींनो!
नमस्कार!
मित्रांनो,
आज रामनवमीचा पवित्र दिवस आहे. थोड्याच वेळापूर्वी अयोध्येतल्या भव्य राम मंदिरात सूर्यकिरणांनी रामाचा तिलक केला आहे. भगवान श्रीरामांचे जीवन, त्यांचा राज्यकारभार यातून मिळणारी सुशासनाची प्रेरणा हा राष्ट्रनिर्माणाचा मोठा पाया आहे. आज रामनवमी आहे, तुम्ही सगळेच माझ्यासोबत म्हणा जय श्री राम! जय श्री राम! जय श्री राम! तमिळनाडूच्या संगमकालिन साहित्यातदेखील श्री रामांचा उल्लेख आहे. रामेश्वरमच्या या पावन धरतीवरुन माझ्या सर्व देशवासियांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मित्रांनो,
आज रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेता आलं हे माझं सौभाग्य आहे. आजच्या या सणाच्या दिवशी आठ हजार तीनशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण करण्याची सुसंधी मला लाभली. या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांमुळे तमिळनाडूमधील दळणवळणाला चालना मिळेल. या प्रकल्पांसाठी माझ्या तमिळनाडूतल्या बंधु भगिनींचे अभिनंदन.
मित्रांनो,
ही भारतरत्न डॉ. कलामांची भूमी आहे. विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांना पूरक आहेत हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. तशाच प्रकारे रामेश्वरकडे जाणारा हा नवीन पंबन पूल तंत्रज्ञान आणि परंपरा यांना जोडण्याचे काम करत आहे. हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेले हे प्राचीन शहर 21 व्या शतकातल्या अभियांत्रिकी विज्ञानाशी जोडले जात आहे. यासाठी कठोर परिश्रम केलेल्या सर्व अभियंते आणि कामगारांना धन्यवाद. हा भारतातला पहिला समुद्रातला उभा रेल्वे पूल आहे. मोठमोठी जहाजं याच्याखालून जाऊ शकतात. रेल्वेसुद्धा या पुलावरुन अधिक वेगानं धावू शकतील. मी आत्ताच नवीन रेल्वेला निशाण दाखवून रवाना केलं आणि थोड्याच वेळापूर्वी जहाजालाही रवाना केलं. या प्रकल्पासाठी तमिळनाडूतल्या लोकांचं पुन्हा एकदा अभिनंदन.
मित्रांनो,
गेल्या अनेक दशकांपासून या पुलासाठी मागणी केली जात होती. तुमच्या आशीर्वादांमुळे आम्हाला हे काम पूर्ण करण्याचं भाग्य लाभलं. पंबन पुलामुळे व्यवसाय सुलभता येईल तसंच प्रवासही सोपा होईल. लाखो लोकांच्या जीवनावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. या नवीन रेल्वे सेवेमुळे रामेश्वरमचा चेन्नई तसंच देशाच्या इतर भागांसोबतचा संपर्क सुधारेल. याचा तमिळनाडूमधला व्यापार आणि पर्यटन दोघांनाही फायदा होईल. युवा पिढीसाठी रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतील.
मित्रांनो,
गेल्या 10 वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट वाढली आहे. आपल्याकडच्या आधुनिक पायाभूत सुविधा हेदेखील या वेगवान विकासाचं एक मोठं कारण आहे. गेल्या 10 वर्षांत आम्ही रेल्वे, रस्ते, विमानतळ, बंदरं, वीज, पाणी, गॅस पाइपलाइन अशा पायाभूत सुविधांसाठीची तरतूद 6 पट वाढवली आहे. आज देशात मोठ मोठ्या प्रकल्पांचं काम वेगानं केलं जात आहे. तुम्ही उत्तरेकडे गेलात तर जम्मू काश्मीरमध्ये चिनाब पूल हा जगातला सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आला. पश्चिमेकडे मुंबईत देशातला सर्वात लांब अटल सेतू बांधण्यात आला. पूर्वेकडे गेलात तर आसाममधला बोगीबिल पूल पाहायला मिळेल आणि जगात मोजकेच असलेल्या उभ्या रेल्वे पुलांपेकी एक असलेल्या पंबन पुलाचं काम दक्षिणेत पूर्ण करण्यात आलं आहे. अशाच प्रकारे पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका बांधल्या जात आहेत. देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचं कामही वेगानं केलं जात आहे. वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत यासारख्या आधुनिक रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेचं जाळं आणखी आधुनिक होत आहे.
मित्रांनो,
जेव्हा भारतातला प्रत्येक भाग एकमेकांशी जोडला जाईल तेव्हा विकसित राष्ट्र निर्माणाचा मार्ग भक्कम बनेल. जगातल्या प्रत्येक विकसित देशात, प्रत्येक विकसित भागात हेच घडलं आहे. आज भारतातलं प्रत्येक राज्य परस्परांशी जोडलं जात असताना संपूर्ण देशाची क्षमता जगासमोर येत आहे. याचा फायदा देशातल्या प्रत्येक भागाला, आपल्या तमिळनाडूला होत आहे.
मित्रांनो,
विकसित भारताच्या प्रवासात तमिळनाडूचं योगदान मोठं आहे. तमिळनाडूचं सामर्थ्यं जितकं वाढेल तितक्या वेगानं भारताचा विकास होईल असं मी मानतो. 2014 च्या आधीच्या काळाच्या तुलनेत गेल्या दशकात केंद्र सरकारनं तमिळनाडूच्या विकासासाठी तिपटीनं जास्त निधी दिला आहे. डीएमकेच्या सहभागासह इंडी आघाडीचं सरकार होतं त्यावेळी जितका निधी मिळाला त्याच्या तीन पट निधी मोदी सरकारनं दिला आहे. यामुळे तमिळनाडूच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी मदत झाली आहे.
मित्रांनो,
तमिळनाडूमधल्या पायाभूत सुविधांना भारत सरकारचं प्राधान्य आहे. गेल्या दशकात तमिळनाडूच्या रेल्वे अंदाजपत्रात सात पटींपेक्षा जास्त वाढ केली गेली आहे. तरीही काही लोकांना विनाकारण तक्रारी करत राहायची सवय आहे, त्यांना तक्रारी करत राहू द्या. 2014 च्या आधी रेल्वे प्रकल्पांसाठी दरवर्षी केवळ नऊशे कोटी रुपये मिळत होते. तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळी इंडी आघाडीचे प्रमुख कोण होते, सगळ्यांनाच ते माहिती आहे. यावर्षी तमिळनाडूचं रेल्वे अंदाजपत्रक सहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. भारत सरकार इथल्या 77 रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण करत आहे. यामध्ये रामेश्वरम स्थानकाचाही समावेश आहे.
मित्रांनो,
गेल्या दहा वर्षांत प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते योजनेअंतर्गत गावांमधले रस्ते आणि महामार्गांचं कामदेखील मोठ्या प्रमाणात झालं आहे. 2014 नंतर तमिळनाडूमध्ये केंद्र सरकारच्या मदतीनं 4000 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात आले. चेन्नई बंदराशी जोडला जाणारा उन्नत रस्ता, उत्तम पायाभूत सुविधेचं सुंदर उदाहरण ठरेल. आजही सुमारे 8000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमीपूजन आणि उद्घाटन झालं. हे प्रकल्प तमिळनाडूमधल्या विविध जिल्ह्यांबरोबरच आंध्र प्रदेशाबरोबरची दळणवळण यंत्रणा चांगली करतील.
मित्रांनो,
चेन्नई मेट्रोसारखा आधुनिक सार्वजनिक वाहतूक प्रकल्प तमिळनाडूमधली प्रवासाची सुलभता वाढवत आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, जेव्हा इतक्या सगळ्या पायाभूत सुविधांची निर्मिती होते तेव्हा प्रत्येक क्षेत्रात नवीन रोजगारदेखील निर्माण होतात. तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतात.
भारताने गेल्या दशकात सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये देखील विक्रमी गुंतवणूक केली आहे. तमिळनाडूमधील अनेक कोटी गरीब परिवारांना याचा लाभ होत असल्याचा मला आनंद आहे. मागच्या दहा वर्षात देशभरातील गरीब परिवारांना चार कोटीहून अधिक पक्की घरे मिळाली आहेत आणि यापैकी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 12 लाखाहून अधिक पक्की घरे येथे तमिळनाडूमधील माझ्या गरीब कुटुंबातील बंधू-भगिनींना मिळाली आहेत. गेल्या दहा वर्षात गावांमधील सुमारे 12 कोटी घरांपर्यंत पहिल्यांदाच नळाद्वारे पिण्याचे पाणी, नीर पोहोचले आहे. यापैकी 1 कोटी 11 लाख घरे माझ्या तमिळनाडूमधील आहेत. त्यांच्या घरात पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचले आहे. याचा खूप मोठा लाभ तमिळनाडूमधील माझ्या माता भगिनींना मिळाला आहे.
मित्रांनो,
देशवासीयांना गुणवत्तापूर्ण आणि माफक दरात वैद्यकीय उपचार प्रदान करणे ही आमच्या सरकारची वचनबद्धता आहे. आयुष्मान योजनेअंतर्गत तामिळनाडूमध्ये एक कोटीहून अधिक जणांवर उपचार झाले आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. ज्यामुळे तमिळनाडू मधील या कुटुंबांचे सुमारे आठ हजार कोटी रुपये, जे त्यांच्या खिशातून खर्च झाले असते, त्यांची बचत झाली आहे. माझ्या तमिळनाडूमधील बंधू-भगिनींच्या खिशातील आठ हजार कोटी रुपयांची बचत झाली, हा खूप मोठा आकडा आहे. तामिळनाडूमध्ये 14 शे हून अधिक जन औषधी केंद्र कार्यरत आहेत. तमिळनाडू बद्दल मी तुम्हाला अधिक माहिती सांगतो, येथे जन औषधी केंद्रामध्ये 80% सवलतीच्या दरात औषधे मिळतात. या स्वस्त औषधांमुळे देखील लोकांच्या खिशातील सातशे कोटी रुपये, माझ्या तमिळनाडूमधील बंधू भगिनींच्या खिशातील सातशे कोटी रुपयांची बचत झाली आहे आणि म्हणूनच मी तमिळनाडूमधील माझ्या बंधू भगिनींना सांगू इच्छितो की जर तुम्हाला औषधे विकत घ्यायची असतील तर जन औषधी केंद्रांमधूनच खरेदी करा. तुम्हाला 1 रुपयांचे औषध 20 पैसे, 25 पैसे, 30 पैशात मिळेल.
मित्रांनो,
देशातील युवकांना डॉक्टर बनण्यासाठी परदेशात जाण्याची गरज भासू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या काही वर्षात तमिळनाडूमध्ये नवीन 11 वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत.
मित्रांनो,
देशभरातील अनेक राज्यांनी मातृभाषेमध्ये वैद्यकीय शिक्षण देण्याला प्रारंभ केला आहे. आता अत्यंत गरीब मातेचा मुलगा किंवा मुलगी, ज्यांनी इंग्रजीतून अभ्यास केला नाही, ते देखील डॉक्टर बनू शकतील. मी तमिळनाडू सरकारला असा आग्रह करतो की त्यांनी तामिळ भाषेमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करावा, म्हणजे गरीब कुटुंबातील मुले मुली देखील डॉक्टर बनू शकतील.
मित्रांनो,
कर दात्याने दिलेला एक एक पैसा गरिबातील गरीबाच्या कामी यावा, हेच सुप्रशासन आहे. तमिळनाडूमधील लाखो छोट्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत सुमारे 12000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तमिळनाडू मधील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून 14,800 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
मित्रांनो,
भारताच्या वाढीत आपल्या नील अर्थव्यवस्थेची भूमिका खूप मोठी असणार आहे. यात तमिळनाडूची शक्ती जगाला दिसून येईल. तामिळनाडूतील मासेमारीशी संबंधित असलेला समाज खूपच मेहनती आहे. तमिळनाडूतील मत्स्यव्यवसाय पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आवश्यक असणारी मदत केंद्र सरकार राज्याला पुरवत आहे. गेल्या पाच वर्षात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत देखील तामिळनाडूला करोडो रुपयांचा निधी मिळाला आहे. मच्छीमारांना जास्तीत जास्त आणि आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. सिवीड पार्क असो किंवा मग फिशिंग हार्बर आणि लँडिंग सेंटर असो केंद्र सरकार येथे शेकडो करोडो रुपये गुंतवणूक करत आहे. आम्हाला तुमच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची देखील चिंता आहे. भारत सरकार मच्छीमारांच्या प्रत्येक संकटात त्यांच्यासोबत उभे आहे. भारत सरकारच्या प्रयत्नांमुळेच गेल्या दहा वर्षात 3700 हून अधिक मच्छिमार श्रीलंकेतून परत आले आहेत. यापैकी 600 हून अधिक मच्छीमार तर मागच्या एका वर्षात मुक्त झाले आहेत आणि तुम्हाला आठवतच असेल, आपल्या काही मच्छीमार बांधवांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यांना देखील आम्ही जिवंत भारतात परत आणून त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केले आहे.
मित्रांनो,
आज जगात भारताबाबतचे आकर्षण वाढत आहे. लोक भारताबाबत अधिक जाणू इच्छित आहेत, भारताला समजून घेऊ इच्छित आहेत. यात भारताची संस्कृती आणि आपल्या सॉफ्ट पॉवरची भूमिका खूप मोठी आहे. तमिळ भाषा आणि वारसा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी सरकार निरंतर प्रयत्न करत आहे. मला कधी कधी खूपच आश्चर्य वाटते कारण तमिळनाडू मधील काही नेत्यांच्या चिठ्ठ्या जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा कधीही कोणत्याही नेत्याने तमिळ भाषेत स्वाक्षरी केलेली नसते. अरे! भाषेचा गौरव व्हावा यासाठी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की किमान आपली स्वाक्षरी तरी तमिळ भाषेत करा. एकविसाव्या शतकात आपल्याला या महान परंपरेला आणखी पुढे घेऊन जायचे आहे असे मी मानतो. रामेश्वरम आणि तमिळनाडूची ही भूमी आपल्याला अशीच निरंतर नवी ऊर्जा देत राहील, नवी प्रेरणा देत राहील, असा मला विश्वास आहे. आणि आज देखील किती मोठा सुवर्ण संयोग आहे कारण आज रामनवमीचा पावन दिवस आहे, रामेश्वरमची पावन भूमी आहे आणि इथे ज्या पंबन पूलाचे आज उद्घाटन झाले, जो शंभर वर्ष जुना पूल होता त्याची निर्मिती करणारी व्यक्ती गुजरात मध्ये जन्मलेली होती आणि आज 100 वर्षानंतर येथे तयार करण्यात आलेल्या नव्या पुलाचे उद्घाटन करण्याची संधी ज्या व्यक्तीला मिळाली आहे ती देखील गुजरातमध्येच जन्मलेली आहे.
मित्रांनो,
आज रामनवमी साजरी होत आहे, रामेश्वरची पवित्र भूमी आहे, तेव्हा हे क्षण माझ्यासाठी अत्यंत भावुक क्षण आहेत. आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. सशक्त समृद्ध आणि विकसित भारत हे उद्दिष्ट घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत त्यात भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या श्रमाचे योगदान आहे. तीन तीन, चार चार पिढ्या भारत मातेच्या जयजयकारासाठी झिजल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या त्या विचारांमुळे, भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्यांच्या श्रमामुळे आज आम्हाला देशाच्या सेवेची संधी मिळाली आहे. आज देशातील लोक भाजपाच्या सरकारचे सुशासन अनुभवत आहेत, राष्ट्रहितासाठी घेतले जाणारे निर्णय पाहत आहेत, ज्यामुळे प्रत्येक भारतीयाचे उर अभिमानाने भरून येत आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्या प्रकारे भाजपाचे कार्यकर्ते मातीशी जोडले जाऊन कार्य करत आहेत, गरिबांची सेवा करत आहेत, हे पाहून मला त्यांचा अभिमान वाटतो. मी भारतीय जनता पार्टीच्या करोडो कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांना तामिळनाडूच्या या सर्व विकास प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा.
नंडरि! वणक्कम! मीनडुम संधिप्पोम!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
* * *
JPS/S.Tupe/Surekha/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2119833)
Visitor Counter : 7
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada