पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन


आज रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना करायला मिळाल्याबद्दल आपण स्वतःला भाग्यवान समजतो  – पंतप्रधान

रामेश्वरमकडे जाणारा हा नवीन पंबन पूल तंत्रज्ञान आणि परंपरेच्या संगमाचे प्रतीक – पंतप्रधान

आज देशभरात मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प जलदगतीने पूर्ण केले जात आहेत – पंतप्रधान

भारताच्या प्रगतीत नील अर्थव्यवस्था महत्वाची कारक घटक ठरेल आणि या क्षेत्रातल्या तामिळनाडूच्या क्षमतेचे संपूर्ण जगाला दर्शन घडेल  – पंतप्रधान

तामिळ भाषा आणि वारसा संपूर्ण जगभर पोहोचावा यासाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे  – पंतप्रधान

Posted On: 06 APR 2025 4:44PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच ते राष्ट्राला समर्पित केले. त्याआधी त्यांनी नवीन पंबन या रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. हा भारतातील पहिला उभा उघडता येणारा  सागरी पूल (vertical lift sea bridge) आहे. यावेळी पंतप्रधानांनी रस्ता पुलावरून एक रेल्वे गाडी आणि एका जहाजालाही हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी त्यांनी या सागरी पुलाच्या कार्यान्वयाचीही पाहणी केली. त्यांनी रामेश्वरम इथल्या रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजाही केली.

यानिमित्ताने आयोजित जनसभेत पंतप्रधानांनी उपस्थित जनसमुदायालाही संबोधित केले. आज श्रीराम नवमीचा पावन दिवस असून, आज सकाळी अयोध्येतील भव्य राम मंदिरात सूर्याच्या दिव्य किरणांनी रामलल्लाचा भव्य अभिषेक झाल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. भगवान श्रीरामांचे जीवन आणि त्यांच्या राज्यातील सुशासनाची प्रेरणा राष्ट्र निर्माणाच्या कार्याचा भक्कम पाया ठरली असल्याचे त्यांनी सांगितले. तामिळनाडूच्या संगम युगातील साहित्यामध्ये देखील भगवान श्रीरामांचा उल्लेख असल्याचे त्यांनी नमूद केले, आणि पवित्र रामेश्वरम भूमीतून सर्व नागरिकांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या.

आज रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना करायला मिळाल्याबद्दल आपण स्वतःला भाग्यवान समजतो आणि ही घटना आपल्यासाठी आशीर्वादासारखी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या खास दिवशी 8,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची संधी आपल्याला मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. आज सुरु केलेले रेल्वे आणि रस्ते प्रकल्प तामिळनाडूमधील दळणवळणीय जोडणी व्यवस्थेत  लक्षणीय वाढ घडवून आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिवर्तनात्मक उपक्रमाबद्दल त्यांनी तामिळनाडूतील जनतेचेही अभिनंदन केले.

रामेश्वरम ही भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जन्मभूमी असून, त्यांच्या आयुष्यातून विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांना कशारितीने पूरक ठरतात हे दाखवून दिले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. रामेश्वरमकडे जाणारा हा नवीन पंबन पूल तंत्रज्ञान आणि परंपरेच्या संगमाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. हजारो वर्षांपूर्वीचे हे एक प्राचीन शहर आता 21व्या शतकातील अभियांत्रिकी चमत्कार असलेल्या पूलाद्वारे जोडले गेले असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली. यावेळी पंतप्रधानांनी अभियंते आणि कामगारांच्या समर्पणाबद्दल आणि त्यांच्या कष्टाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. हा भारतातील पहिला उभा उघडता येणारा सागरी पूल (vertical lift sea bridge) , असून या  पुलाखालून मोठी जहाजे सहतेने जाऊ शकतात, यामुळे जलदगतीने रेल्वे प्रवासही शक्य झाला असल्याची बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. आज सकाळीच आपण एका नवीन रेल्वे गाडीला आणि जहाजाला ध्वज दाखवून रवाना केल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले, आणि या अद्भूत प्रकल्पासाठी तामिळनाडूतील जनतेचे पुन्हा एकदा अभिनंदन केले.

या पुलासाठीची मागणी गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित होती, जनतेच्या आशीर्वादामुळे आपल्याला हे काम पूर्णत्वाला नेण्याचा सन्मान मिळाला ही बाबही त्यांनी अधोरेखीत केली. या पुलामुळे व्यवसाय सुलभता आणि प्रवास सुलभता या दोन्हींना पाठबळ मिळणार आहे, त्याचा लाखो लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे असे पंतप्रधान म्हणाले. नवीन रेल्वे सेवेमुळे रामेश्वरमची चेन्नईसोबतची आणि देशाच्या इतर भागांसोबतची दळणवळणीय जोडणी वाढेल, यामुळे तामिळनाडूमधील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल तसेच इथल्या युवा वर्गासाठीही  रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन  संधी निर्माण होतील ही बाबही पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

गेल्या 10 वर्षांत भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पटीने वाढवला आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. या वेगवान प्रगतीमागे भारतातील आधुनिक पायाभूत सुविधांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या दशकभराच्या काळात रेल्वे, रस्ते, विमानतळ, बंदरे, वीज, पाणी आणि गॅस पाईपलाईन सारख्या  पायाभूत सुविधांसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत जवळपास 6 पटीने वाढ झाली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. आज देशभरात मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प जलदगतीने पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले आणि यासंदर्भातली उदाहरणे उपस्थितांसमोर मांडली. देशाच्या उत्तर भागात जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब हा जगातील एक सर्वात उंच रेल्वे पूलांपैकी असलेला पूल बांधला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम भारतात मुंबईतील अटल सेतू हा देशातील सर्वात लांब सागरी पूल बांधला गेल्याची माहिती त्यांनी दिली. देशाच्या पूर्वेकडे साममधील बोगिबील पूल हा भारताच्या प्रगतीचे प्रतिक असल्याचे ते म्हणाले, तर दक्षिण भारतात आज उद्घाटन केलेला पंबन पूल हा जगातील काही मोजक्या उभा उघडता येणाऱ्या (vertical lift पूलांपैकी एक पूल पूर्णत्वाला गेला असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. पूर्व आणि पश्चिम भागांना समर्पित विशेष मालवाहतूक मार्गांचे (Dedicated Freight Corridors) कामही पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले. देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनचे कामही वेगाने प्रगतीपथावर आहे, तसेच वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत या आधुनिक रेल्वेगाड्यांमुळे भारताले रेल्वे सेवेचे जाळे अधिक प्रगत बनत असल्याची बाब त्यांनी नमूद केली.

जेव्हा भारतातील प्रत्येक प्रदेश परस्परांशी जोडला जातो, तेव्हा विकसित राष्ट्र बनण्याचा मार्ग अधिक बळकट होत जातो, जगभरातील प्रत्येक विकसित राष्ट्र आणि प्रदेशातही असेच घडले आहे ही बाबही पंतप्रधानांनी अधोरेखित केली. आता जसजसे भारतातील प्रत्येक राज्य परस्परांशी जोडले जात आहे, तस तसे देशाची संपूर्ण क्षमताही प्रत्यक्षात उपयोगात येऊ लागली आहे असे ते म्हणाले. आज तामिळनाडूसह देशातल्या प्रत्येक भागाला आज दळणवळणीय जोडणीचा लाभ मिळू लागला असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

" विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या प्रवासात तामिळनाडूची महत्त्वपूर्ण भूमिका आहे," असे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले. त्यांनी अधोरेखित केले की, तामिळनाडूच्या क्षमतेत वाढ होत असताना, भारताचा विकासही अधिक गतीने होईल.

गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने तामिळनाडूच्या विकासासाठी 2014 पूर्वीच्या तुलनेत तीन पट अधिक निधी दिला आहे. या वाढीव निधीमुळे तामिळनाडूच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठा हातभार लागला आहे यावर पंतप्रधानांनी  भर दिला .

केंद्र सरकारसाठी तामिळनाडूमधील पायाभूत सुविधांचा विकास हा प्राधान्यक्रम असल्याचे नमूद करताना  मोदी यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत तामिळनाडूची रेल्वे अर्थसंकल्पीय तरतूद सातपट वाढलेली आहे. 2014पूर्वी तामिळनाडूमधील रेल्वे प्रकल्पांना दरवर्षी फक्त ₹900 कोटी मिळायचे, तर या वर्षी रेल्वेसाठी ₹6,000 कोटींहून अधिक निधी मंजूर झाला आहे. तसेच त्यांनी नमूद केले की, रामेश्वरम स्थानकासह राज्यातील 77 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण सुरू आहे.

गेल्या दहा वर्षांत ग्रामीण रस्ते आणि महामार्गांच्या विकासात झालेली लक्षणीय प्रगती अधोरेखित करताना, पंतप्रधान म्हणाले की, 2014 पासून केंद्र सरकारच्या मदतीने  तामिळनाडूत 4,000 किलोमीटर रस्ते बांधण्यात आले आहेत. चेन्नई बंदराशी जोडणारी उन्नत मार्गिका ही आणखी एक उल्लेखनीय पायाभूत सुविधा ठरणार आहे.

आज ₹8,000 कोटींच्या रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले, असे त्यांनी सांगितले. हे प्रकल्प तामिळनाडूच्या विविध जिल्ह्यांतील संपर्क सुधारतील आणि आंध्र प्रदेशशी कनेक्टिव्हीटी  मजबूत करतील.

पंतप्रधानांनी नमूद केले की, चेन्नई मेट्रोसारखी आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तामिळनाडूमध्ये प्रवास सुलभ करत आहे. त्यांनी सांगितले की, पायाभूत सुविधांच्या व्यापक विकासामुळे विविध क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण होत आहे .

गेल्या दशकात सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली असल्याचे अधोरेखित करत, मोदी यांनी समाधान व्यक्त केले की, तामिळनाडूतील कोट्यवधी कुटुंबांना याचा लाभ झाला आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या 10वर्षांत देशभरात 4 कोटींहून अधिक पक्की घरे गरीब कुटुंबांना देण्यात आली, त्यातील 12 लाख पक्की घरे तामिळनाडूत `पीएम आवास` योजनेंतर्गत बांधण्यात आली आहेत.

ते पुढे म्हणाले की, गेल्या दशकात सुमारे 12 कोटी ग्रामीण कुटुंबांना प्रथमच नळाद्वारे पाणी मिळाले आहे, त्यात तामिळनाडूतील 1 कोटी 11 लाख कुटुंबांचा समावेश आहे, ज्यांना आता घरी नळाद्वारे पाणी उपलब्ध झाले आहे.

"नागरिकांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा पुरवण्यासाठी   आमचे सरकार वचनबद्ध  आहे," असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तामिळनाडूत 1 कोटींहून अधिक उपचार झाले आहेत, ज्यामुळे राज्यातील कुटुंबांचे ₹8,000 कोटी वाचले आहेत.

तामिळनाडूत 1,400 हून अधिक जनऔषधी केंद्रे आहेत, जिथे औषधे 80% पर्यंत सवलतीत मिळतात. या सवलतीमुळे लोकांची  700 कोटी रुपये बचत झाली आहे.

"भारतीय तरुणांना वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी जावे लागणार नाही, हे सुनिश्चित करणे सरकारचे उद्दिष्ट आहे," असे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की, तामिळनाडूला गेल्या काही वर्षांत 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये मिळाली आहेत. त्यांनी तामिळनाडू सरकारला गरीब कुटुंबांतील मुलांसाठी उपयुक्त ठरेल असे तामिळ भाषेतील वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याचे आवाहन केले.

"सुशासन सुनिश्चित करते की करदात्यांनी दिलेला प्रत्येक रुपया गरिबांपर्यंत पोहोचतो," असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, `पीएम किसान सन्मान` निधी अंतर्गत तामिळनाडूतील छोट्या  शेतकऱ्यांना जवळपास ₹ 12,000 कोटींचा लाभ मिळाला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, `पीएम फसल` विमा योजनेंतर्गत तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी ₹14,800 कोटींच्या विमा दाव्यांचा लाभ घेतला आहे.

भारताच्या आर्थिक विकासात ‘नील अर्थव्यवस्था’ महत्त्वाची भूमिका बजावणार असून, या क्षेत्रातील तमिळनाडूची ताकद संपूर्ण जगात ओळखली जाईल,” असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. त्यांनी तमिळनाडूतील मच्छीमार  समुदायाच्या परिश्रमांचे कौतुक केले आणि राज्यातील मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक असलेला आधार केंद्र सरकारकडून पुरवला जात असल्याचे सांगितले.

पाच वर्षांमध्ये पीएम मत्स्य संपदा योजनेअंतर्गत तमिळनाडूला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक समुद्री शैवाल उद्याने, मच्छीमारी बंदरे आणि लँडिंग सेंटर्समध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मच्छिमारांच्या सुरक्षेप्रति  सरकारच्या कटिबद्धतेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, गेल्या दशकात 3700 पेक्षा अधिक मच्छिमारांना श्रीलंकेतून परत आणण्यात आले असून, गेल्या वर्षातच 600 पेक्षा अधिक मच्छिमारांना परत आणण्यात आले आहे.

भारताविषयी वाढत्या जागतिक उत्सुकतेचा उल्लेख करताना  मोदींनी भारताची संस्कृती आणि ‘सॉफ्ट पॉवर’ हे आकर्षणाचे प्रमुख घटक असल्याचे सांगितले. “तमिळ भाषा आणि वारसा जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचावा यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे,” असे सांगून त्यांनी विश्वास व्यक्त केला की 21व्या शतकात या महान परंपरेला अधिक बळकटी मिळाली पाहिजे. त्यांनी  सांगितले कीरामेश्वरम आणि तमिळनाडूची पवित्र भूमी देशाला यापुढेही प्रेरणा आणि ऊर्जा देत राहील.

आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस असल्याचे नमूद करत मोदींनी बलशाली, समृद्ध आणि विकसित भारत घडवण्याचा उद्देश हा प्रत्येक भाजप कार्यकर्त्याच्या अथक  प्रयत्नांचा परिणाम असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की देशातील नागरिक भाजप सरकारांच्या चांगल्या प्रशासनाचा आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा साक्षीदार आहे. त्यांनी प्रत्येक राज्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील भाजप कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे तळागाळातील लोकांशी नातं जोडून गरीब जनतेची सेवा केली आहे, त्याबद्दल  अभिमान व्यक्त केला आणि लाखो भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात तमिळनाडूचे राज्यपाल  आर. एन. रवी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी नवीन पंबन रेल्वे पूलाचे उद्घाटन केले आणि रामेश्वरम-तांबरम (चेन्नई) नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला.  या पुलाला सांस्कृतिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. रामायणानुसार, राम सेतूचे बांधकाम रामेश्वरमजवळील धनुष्कोडी येथून सुरू झाले होते.

या पुलामुळे रामेश्वरम हे मुख्य भूमीशी जोडले गेले आहे आणि तो जागतिक स्तरावरील भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक आहे. 700 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून उभारलेला हा पूल 2.08 किलोमीटर लांब आहे, ज्यात 99 स्पॅन आणि एक 72.05 मीटर लांबीचा व्हर्टिकल लिफ्ट  आहे जो 17 मीटर उंचीपर्यंत वर उठतो, ज्यामुळे जहाजांना मुक्तपणे वाहतूक करता येते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत राहते. पोलादी सुदृढीकरण, उच्च दर्जाचे संरक्षक रंग आणि संपूर्ण वेल्डेड जॉइंट्सने तयार केलेला हा पूल अधिक टिकाऊ आणि कमी देखभाल आवश्यक असलेला आहे. भविष्यातील गरजा ध्यानात घेऊन याची रचना दुहेरी मार्ग अशी करण्यात आली आहे. समुद्री वातावरणात टिकून राहण्यासाठी त्यावर खास ‘पॉलीसिलॉक्सेन’ कोटिंग करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी यावेळी तमिळनाडूमध्ये 8300 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध रेल्वे आणि महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी   आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग-40 वरील 28 किमी लांब वलाजापेट-राणिपेट चार पदरीकरणाचे भूमिपूजन, राष्ट्रीय महामार्ग-332 वरील 29 किमी लांब विलुप्पुरम-पुडुचेरी रस्त्याचे राष्ट्राला समर्पण, राष्ट्रीय महामार्ग-32 वरील 57 किमी लांब पूंडीअंकुप्पम-सत्तनाथपुरम रस्ता आणि राष्ट्रीय महामार्ग-36 वरील 48 किमी लांब चोलापूरम-तंजावूर रस्ता यांचा समावेश आहे. हे महामार्ग अनेक तीर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळांना जोडतील, शहरांमधील अंतर कमी करतील, वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांपर्यंत जलद प्रवेश देतील, तसेच स्थानिक शेतकऱ्यांना शेतीमाल जवळच्या बाजारात पोहोचवण्यास मदत करून आर्थिक क्रियाशीलतेला चालना देतील आणि स्थानिक चर्मोद्योग व लघुउद्योगांचे बळकटीकरण करतील.

***

S.Kane/T.Pawar/N.Gaikwad/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119588) Visitor Counter : 38