माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेव्हज बाजार


जागतिक स्तरावर संधींचा शोध घ्या, जोडले जा आणि व्यापार करा

Posted On: 01 APR 2025 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 एप्रिल 2025

 

प्रस्तावना

वेव्हज बाजार ही जागतिक मनोरंजन उद्योगातील व्यावसायिकांना, व्यवसायांना आणि निर्मात्यांना जोडणारी एक नाविन्यपूर्ण ऑनलाइन बाजारपेठ आहे. 27 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय संस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या बाजारपेठेचे औपचारिक उद्घाटन केले.

   

वेव्हज बाजार हे वेव्हज शिखरपरिषदेचे एक महत्त्वाचे अंग आहे. वेव्हज समिटला वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट असेही म्हणतात. या समर्पित व्यासपीठावर उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक एकत्र येतात आणि व्यवसायाच्या नवीन संधी शोधतात. 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे ही शिखर परिषद होणार आहे. त्यामुळे वेव्हज बाजार जागतिक मनोरंजन देवाणघेवाणीसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनेल.

 

वेव्हज बाजार: एक जागतिक बाजारपेठ

वेव्हज बाजार  एक अद्वितीय ई-बाजारपेठ आहे.  येथे माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील भागधारक एकत्र येतात. चित्रपट, टेलिव्हिजन, अॅनिमेशन, गेमिंग, जाहिरात, XR, संगीत, ध्वनी डिझाइन, रेडिओ आणि बऱ्याच विषयांसाठी हे एक व्यासपीठ आहे.

एखादा कंटेंट क्रिएटर असो, एखादा योग्य व्यासपीठ शोधणारा व्यावसायिक असो, गुंतवणूकदारांच्या शोधात असलेला विकासक असो किंवा जागतिक पातळीवरच्या प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याच्या प्रतीक्षेत असलेला कलाकार असो या प्रत्येकाला वेव्हज बाजारमुळे एक संधी मिळणार आहे. आपल्या व्यवसायाचे जाळे सहयोगातून वाढवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. उद्घाटनापासून आत्तापर्यंत विविध  प्रकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील विविध 5500 खरेदीदार, 2000 हून अधिक विक्रेते आणि अंदाजे 1000 प्रकल्पांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे.

वेव्हज बाजाराचे पैलू

वेव्हज बाजार अनेक पैलूत संरचित आहे. प्रत्येक पैलू प्रसार माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाच्या विशिष्ट विभागासाठी तयार केला आहे. यामध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत:

  • चित्रपट आणि टीव्ही/वेब सिरीज: तुमचा आशय प्रदर्शित करण्यासाठी जागतिक वितरक, ओटीटी व्यासपीठ आणि महोत्सव आयोजकाशी संपर्कात रहा.
  • गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स: गुंतवणूकदार, खरेदीदार आणि प्रकाशन व्यासपीठांसमोर गेम संकल्पना, आयपी आणि मालमत्ता संबंधी सादरीकरण करा.
  • ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स: विविध सर्जनशील प्रकल्पांसाठी उच्च-स्तरीय ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स सेवा प्रदान करा.
  • कॉमिक्स/ई-बुक्स: जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्टोरीबोर्ड, प्रकाशन आणि आशय निर्मितीचे मार्केटिंग करा.
  • रेडिओ आणि पॉडकास्ट: स्वतंत्र ऑडिओ क्रिएटर्सना प्रायोजकत्व सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांची पोहोच वाढवण्यासाठी सक्षम करा.
  • संगीत आणि ध्वनी: परवाना संधी खुल्या करा आणि संगीत निर्मिती, ध्वनी रचना आणि इतर गोष्टींसाठी सहयोग करा.
  • लाईव्ह कार्यक्रम आणि इन्फ्लुएंसर मार्केटिंग: थेट कार्यक्रमाद्वारे प्रायोजकत्व, ब्रँड भागीदारी आणि प्रेक्षकांच्या सहभागाला चालना द्या.

वेव्हज बाजार कसे कार्य करतो

  • वेव्हज बाजारच्या संकेतस्थळाला भेट द्या: wavesbazaar.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि व्यासपीठाबद्दल जाणून घ्या.
  • साइन अप करा आणि तुमचे प्रोफाइल तयार करा : संधींच्या विविध श्रेणींचा लाभ घेण्यासाठी खरेदीदार, विक्रेता किंवा गुंतवणूकदार म्हणून नोंदणी करा.
  • तुमच्या सेवा किंवा प्रकल्पाच्या गरजा सूचीबद्ध करा : तुमचे काम प्रदर्शित करा किंवा तुमच्या व्यावसायिक आवडीनुसार तयार केलेल्या उपलब्ध सूचींवर नजर टाका.
  • संपर्क  आणि सहयोग करा : उद्योग व्यावसायिकांशी संपर्काचे जाळे तयार करा, बैठका ठरवा आणि यशस्वी सहयोगाची सुरूवात करा.
  • तुमचा व्यवसाय वाढवा : तुमची बाजारपेठ वाढवा, नवीन महसूल ओघ  शोधा आणि दीर्घकालीन भागीदारी स्थापित करा.
  • पात्रता: वेव्हज बाजार सेवा मिळवण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी तुमचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.

विविध व्यावसायिकांसाठी वेव्हज बाजार

  • विक्रेत्यांना प्रोफाइल पिक्चर, सारांश (50 शब्द), प्रोजेक्ट प्रिव्ह्यू लिंक अपलोड करणे आणि प्रोजेक्टची भाषा निर्देशित करणे आवश्यक आहे.
  • विक्रेता संकेतस्थळावर सादर करत असलेल्या आशयात कसल्याही प्रकारचा आक्षेपार्ह, बदनामीकारक किंवा बेकायदेशीर मजकूर असू नये.
  • विक्रेता जो काही आशय संकेतस्थळावर अपलोड करत असेल तो बौद्धिक संपदेचा (आयपी) भाग नसावा.

या अटींनुसार अयोग्य किंवा नियमांच्या चौकटीत न बसणारा आशय सुधारण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार वेव्हज बाजाराने राखून ठेवला आहे.

वेव्हज बाजार हा सर्जनशील उद्योगांमधील खरेदीदार आणि विक्रेते अशा दोघांसाठीही खुला आहे. नाविन्यपूर्ण सामग्री आणि सेवांच्या शोधात असलेले  व्यवसाय आणि व्यक्ती या निर्मात्यांशी संपर्क साधण्यासाठी खरेदीदार म्हणून नोंदणी करू शकतात. वेव्हज बाजारात सामील होण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही.

विक्रेत्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे

विक्रेता म्हणून नोंदणी करण्यासाठी WAVES Bazaar संकेतस्थळावरील Wave Seller Signup पेजला भेट द्या. स्वतःबद्दल आणि तुमच्या सेवांबद्दल आवश्यक माहिती देऊन नोंदणी अर्ज भरा. एकदा नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमचे प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी तसेच संभाव्य क्लायंटशी संपर्क होण्यासाठी एक प्रोफाइल तयार करू शकता.

खरेदीदार म्हणून वेव्हज बाजारमध्ये सामील व्हा

खरेदीदार म्हणून नोंदणी करण्यासाठी WAVES Bazaar संकेतस्थळावरील Wave Buyer Signup पेजवर जा. आवश्यक तपशील देऊन साइन अप करा. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे सर्जनशील प्रकल्प आणि सेवा यांमध्ये प्रवेश मिळेल, ज्यामुळे तुम्ही विक्रेत्यांशी थेट संपर्क साधू शकाल.

व्ह्यूइंग रूम आणि मार्केट स्क्रीनिंग

वेव्हज बाजार एक प्रगत व्ह्यूइंग रूम आणि मार्केट स्क्रीनिंग वैशिष्ट्य उपलब्ध करते, जे क्युरेटेड कंटेंट योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची खात्री करते.

  • व्ह्यूइंग रूम खरेदीदारांना अधिग्रहण किंवा भागीदारीचा निर्णय घेण्यापूर्वी चित्रपट, ॲनिमेशन आणि गेमिंग आयपीचे पूर्वावलोकन करण्यासाठी एक सुरक्षित डिजिटल जागा उपलब्ध करते.
  • मार्केट स्क्रीनिंगमध्ये गुंतवणूकदार आणि वितरकांना आकर्षित करणारे उच्च-संभाव्य प्रकल्प अधोरेखित  करण्यासाठी डिझाइन केलेले विशेष इन-पर्सन आणि व्हर्च्युअल स्क्रीनिंग यांचा समावेश आहे.

निष्कर्ष

वेव्हज बाजार जागतिक मीडिया आणि मनोरंजन उद्योगात क्रांती घडवत आहे. हे व्यावसायिक, व्यवसाय तसेच निर्मात्यांना जोडण्यासाठी, सहयोग करण्यासाठी आणि वाढण्यासाठी एक गतिमान डिजिटल बाजारपेठ उपलब्ध करते. चित्रपट आणि गेमिंगपासून संगीत आणि जाहिरातींपर्यंतच्या विविध क्षेत्रांमधील संधींसह  ते अखंड नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यवहार सक्षम करते. खरेदीदार आणि विक्रेते दोघांनाही सेवा देत, वेव्हज बाजार जागतिक मनोरंजन देवाणघेवाण आणि सर्जनशील सहकार्याच्या नवीन युगाची पायाभरणी करत आहे.

References

WAVES BAZAAR

 

* * *

S.Kane/Prajna/Shraddha/Nandini/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2117546) Visitor Counter : 14