रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वे विशेष व्यवस्थेसह महाशिवरात्रीसाठी सज्ज


प्रयागराजसाठी 350 हुन जास्त विशेष रेल्वेगाड्या, महत्वाच्या स्थानकांवर वाढीव सुरक्षा व्यवस्था

महाकुंभ यात्रेकरूंसाठी 42 दिवसात 15000 हुन जास्त रेल्वेगाड्या चालवून भारतीय रेल्वेनं केला विक्रम

Posted On: 25 FEB 2025 10:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2025

 

महाकुंभ 2025 मधील शेवटचे अमृत स्नान 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. गंगा , यमुना व सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हे स्नान करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, बंगाल व इतर अनेक राज्यांमधील यात्रेकरू प्रयागराज इथे जमले आहेत. 

या अमृतस्नानानंतर हे यात्रेकरू आपापल्या घरी परतणार असून रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उत्तर मध्य  रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे व उत्तर रेल्वेने मोठ्या प्रमाणात तयारी केली असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपापल्या कामाच्या ठिकाणी दक्षता व जागरूकतेने काम करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. महाशिवरात्रीच्या स्नानानंतर अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवण्याची व्यवस्था केली गेली असून प्रयागराज स्थानकाजवळ गरज पडल्यास त्वरित वापरण्यासाठी अतिरिक्त बोग्या उभ्या ठेवल्या आहेत. सुरुवातीला रेल्वेने महाकुंभदरम्यान सुमारे 13500 रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली होती. परंतु आजच्या 42 व्या दिवसापर्यंत अनेक विशेष गाड्यांसहित 15000 हुन अधिक रेल्वेगाड्या चालवल्या गेल्या आहेत. 

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सर्व रेल्वे यंत्रणेवर देखरेख करत आहेत. रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष व मुख्य  कार्यकारी अधिकारी सतीश कुमार देखील लक्ष ठेवून आहेत. तिन्ही रेल्वे मंडळाचे  महाव्यवस्थापक आपापल्या पथकासह रेल्वे यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.  महाकुंभ साठी येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचे तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवण्याचे निर्देश रेल्वेमंत्र्यांनी सर्व महाव्यवस्थापकांना दिले आहेत. 

महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने सुरक्षितता , सुलभ तिकीट व्यवस्था तसेच निवाऱ्याची योजना केली आहे.

प्रयागराज,  तसेच आसपासच्या सर्व रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी  व्यवस्था  करण्यात आली असून  विशेष रेल्वेगाड्यांमधून प्रवाशांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी नेले जात आहे. प्रयागराज जंक्शन स्थानकावर प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानकानुसार निरनिराळ्या निवाऱ्यांमध्ये नेले जात असून विशेष रेल्वेगाड्यांमधून गंतव्य स्थानी सोडले जात आहे. 

विविध रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून निरीक्षण कक्षात गंभीर आजारी यात्रेकरुंची देखभाल केली जात आहे. 

 

* * *

N.Chitale/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2106290) Visitor Counter : 9