पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम, गुवाहाटी मध्ये झुमोईर बिनंदिनी कार्यक्रमात केलेले भाषण

Posted On: 24 FEB 2025 10:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 फेब्रुवारी 2025

 

भारत माता की जय !

भारत माता की जय !

आसामचे राज्यपाल श्री लक्ष्मण प्रसाद आचार्यजी ऊर्जावान मुख्यमंत्री हेमंत बिस्वा जी, केंद्र सरकारातील माझे साथीदार डॉ. एस जयशंकर, सर्बानंद सोनोवाल, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, इतर मंत्री, खासदार, आमदार, सर्व कलाकार साथी आणि आसामच्या माझ्या बंधु भगिनींनो ..

सोबइके हमार जोहार, मोर भाई बोहिन सब, तहनिकेर की खोबोर?

अपोनालोक अटाइके मुर आंतोरिक उलोग जोनाइसु।

आजी इयात उपोस्थित होई, मोई बोर आनंदिता होइसु।

बंधू-भगिनींनो,

आज आसाममध्ये इथे अद्भुत वातावरण आहे. ऊर्जेने भरलेले वातावरण आहे, उत्साह, उल्हास आणि उमंग यांचे गुंजन संपूर्ण स्टेडियममध्ये ऐकू येत आहे. झुमर नृत्याच्या आपणा सर्व कलाकारांची तयारी जिथे नजर टाकावी तिथे दिसते आहे. एवढ्या जबरदस्त तयारीला चहाच्या बागांचा सुगंध आहे आणि सौंदर्यसुद्धा. आणि आपल्याला तर ठाऊक आहेच, चहाचा सुवास आणि चहाचा रंग याबद्दल चहावाल्यापेक्षा जास्त चांगली माहिती कोणाला असेल? म्हणून झुमर आणि बागांच्या संस्कृतीशी जेवढं नातं आपलं आहे तेवढंच नातं माझंही आहे.

मित्रहो,

तुम्ही सर्व कलाकार जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने झुमर नृत्य करणार आहात हा आधीच विक्रम होणार आहे. याआधी जेव्हा 2023 ला मी आसाममध्ये आलो होतो तेव्हा 11 हजारांहून जास्त लोकांनी एकसाथ बिहु डान्स करून विक्रम केला होता. हे दृश्य मी कधीच विसरू शकत नाही, पण ज्यांनी ते टीव्हीवर पाहिले होते ते सुद्धा मला पुन्हा पुन्हा आठवण करून देतात. आज पुन्हा एकदा मी तसेच दृश्य दिसेल अशा अद्भुत सादरीकरणाची वाट बघत आहे. या सांस्कृतिक आयोजनासाठी आसाम सरकारला आणि उत्साही मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमाजी यांना शुभेच्छा देतो.

आइज असमकेर चाह जोनोगोष्ठी, आरो आदिबाशी मानुषेर शोंगे, असमकेर एकटा गर्बोर दिन लागे। एइ दिनटे शोबाइके सुभेच्छा जनाच्छी।

मित्रहो,

अशा तऱ्हेच्या भव्य आयोजनाशी आसामचा गौरव जोडलेला आहेच, पण त्यात भारताची विविधता सुद्धा दिसते. आत्ताच मला सांगितले गेले की जगातल्या साठ हून अधिक देशांचे राष्ट्रदूत सुद्धा आसामचा अनुभव घेण्यासाठी इथे आज उपस्थित आहेत. एक काळ होता जेव्हा देशात आसाम आणि ईशान्य भागाच्या विकासाची उपेक्षा झाली आणि इथली संस्कृती नजरेआड केली गेली. परंतु आता ईशान्येच्या संस्कृतीचे ब्रँड अँबेसिडर स्वतः मोदी झाले आहेत. आमच्या काझीरंगामध्ये वास केलेला जगाला त्याच्या जैव-वैविध्याबद्दल सांगणारा मी पहिला पंतप्रधान आहे. आता हेमंतदांनी पण याचे वर्णन केले आणि आपण सर्वांनी उभे राहून धन्यवाद प्रस्ताव दिला. काही महिन्यापूर्वीच आम्ही असमिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आसामचे लोक कितीतरी वर्षांपासून भाषेच्या सन्मानाची वाट बघत होते. चराइदेव मोईदाम याच प्रकारे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले. यामध्ये भाजपा सरकारने केलेल्या प्रयत्नांचा मोठा वाटा आहे.

मित्रहो,

आसामचा गौरववीर सुपुत्र लसित बोरफुकन, ज्याने मुघलांबरोबर झुंज घेत आसामची संस्कृती आणि ओळख यांचे संरक्षण केले. आम्ही त्यांची 400 वी जयंती अगदी व्यापक स्तरावर साजरी केली, प्रजासत्ताक दिनाला लसित बोरफुकन यांच्यावरील चित्ररथ सहभागी झाला होता. देशभरातील लोकांनी त्यांना नमन केले. इथे आसाममध्ये त्यांची सव्वाशे फुटाची कांस्य प्रतिमा सुद्धा बनवली आहे. याच प्रकारे आदिवासी समाजाची परंपरा साजरी करण्यासाठी आम्ही जनजातीय गौरव दिवस साजरा करायची सुरुवात केली. आणि आसामचे राज्यपाल आमचेच लक्ष्मण प्रसाद जी स्वतः आदिवासी समाजातील वंशज आहेत आणि आज आपल्या कर्तुत्वाने येथे पोहोचले आहेत. देशात आदिवासी समाजाचे जे नायक नायिका आहेत, त्यांचे योगदान अमर करण्यासाठी आदिवासी वस्तू संग्रहालयसुद्धा तयार होत आहेत.

मित्रहो,

भाजपा सरकार असाच विकास सुद्धा करत आहे आणि इथल्या ‘टी ट्राइब’ ची सेवासुद्धा करत आहे. बागेतल्या कामगारांचे उत्पन्न वाढावे म्हणून आसाम टी कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा सुद्धा केली आहे. विशेषतः बागांमध्ये काम करणाऱ्या आमच्या भगिनी, लेकी यांच्यासमोर गरोदरपणाच्या काळातील उत्पन्नाची समस्या असे. आज अशा जवळपास दीड लाख महिलांना गरोदरपणाच्या काळात पंधरा हजार रुपयांचे सहाय्य दिले जात आहे , जेणेकरून त्यांना खर्चाची चिंता भासू नये. आमच्या या परिवाराचे आरोग्य चांगले रहावे म्हणून आसाम सरकार चार भागांमध्ये 350 हून जास्त आयुष्यमान आरोग्य मंदिरे सुद्धा उघडत आहे. ‘टी ट्राइब’ मुलांसाठी आदर्श टी गार्डन शाळा उघडल्या आहेत. जवळपास 100 शाळा अजूनही उघडल्या जात आहेत.

‘टी ट्राइब’ च्या युवकांसाठी ओबीसी कोट्यामध्ये तीन टक्के आरक्षणाची व्यवस्था सुद्धा आम्ही केली आहे. आसाम सरकार सुद्धा या युवकांना स्वयंरोजगारासाठी 25 हजार रुपयांचे सहाय्य देत आहे. चहा उद्योग आणि त्यांच्या कामगारांचा हा विकास येणाऱ्या वर्षांमध्ये संपूर्ण असामाच्या विकासाला गती देईल . आमच्या ईशान्येचा विकास नवीन उंचीवर जाईल. आता आपण सर्व आपली शानदार प्रस्तुती सुरू करणार आहात. मी आपणा सर्वांना आधी धन्यवाद देतो आणि मला पूर्ण खात्री आहे की संपूर्ण हिंदुस्थानात आज आपली, आपल्या या नृत्याची वाहवा होणार आहे. सर्व टीव्ही चॅनलवाले केव्हा सुरू होईल याची वाट बघत आहेत. आज संपूर्ण देश आणि जग हे भव्य नृत्य पाहणार आहे.

सुन्दोर झुमोइर प्रदोर्शन कोरर खातिर सोबाइके हामी धोन्याबाद जनाच्छी। अपोनलोक भाले थाकीबो, अकोउ लोग पाम बोहुत बोहुत धन्यबाद!

भारत माता की जय !

 

* * *

S.Tupe/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2106068) Visitor Counter : 16