गृह मंत्रालय
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने मुंबईमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचे जाळे उध्वस्त करत भारतातील ड्रग्ज सिंडिकेटविरुद्ध मिळवले मोठे यश - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा
एनसीबीच्या मुंबई कार्यालयाने 11.54 किलो कोकेन तर 4.9 किलो हायड्रोपोनिक गांजा केला जप्त
ही कारवाई म्हणजे एक महत्त्वपूर्ण कामगिरी असून भारताने अंमली पदार्थ विरोधात शून्य सहिष्णुतेचे धोरण राबवत तस्करांच्या टोळीचा केला नि:पात" - शहा यांचा ‘एक्स’वरील संदेश.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनसीबीच्या या मोठ्या यशाबद्दल चमूचे केले अभिनंदन
Posted On:
07 FEB 2025 5:59PM by PIB Mumbai
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करत भारतातील ड्रग्ज सिंडिकेटविरुद्ध मोठे यश मिळवले आहे, असे यासंदर्भात एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज म्हटले आहे. अंमली पदार्थ मुक्त भारत (नशा मुक्त भारत) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या तपासाच्या ‘टॉप टू बॉटम’ दृष्टिकोनाच्या यशाचा हा भक्कम पुरावा आहे, असेही त्यांनी या संदेशात म्हटले आहे.
"भारत अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा झिरो टॉलरन्स अर्थात शून्य सहिष्णुतेने नि:पात करत आहे. मुंबईत उच्च दर्जाचे कोकेन, गांजा आणि चरस गमीज जप्त करणे आणि सोबतच चार जणांना अटक करणे ही एक मोठी कामगिरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे नशा मुक्त भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या तपासाच्या ‘टॉप टू बॉटम’ दृष्टिकोनाच्या यशाचा हा भक्कम पुरावा आहे. या मोठ्या यशाबद्दल अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन", असा संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिला आहे.
जानेवारी 2025 मध्ये 200 ग्रॅम कोकेन जप्त करण्याच्या प्रकरणात मिळालेल्या माहितीवरून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई कार्यालयाच्या चमूने केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही कारवाई यशस्वी झाली. याच प्रकरणाच्या तपासात मिळालेल्या माहितीवर तसेच तांत्रिक आणि मानवी गुप्तचर यंत्रणेद्वारे, अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई विभागीय युनिट (एमझेडयू) अखेर या तस्करीच्या उगमापर्यंत पोहोचू शकले आणि 31.01.2025 रोजी महाराष्ट्रातील नवी मुंबई येथून 11.540 किलो अतिशय उच्च दर्जाचे कोकेन, 4.9 किलो हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक वीड/गांजा आणि 200 पॅकेट (5.5 किलो) चरस गमीज तसेच 1,60,000 रुपये रोकड जप्त करण्यात आले.
या प्रकरणात, पहिली जप्ती मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय कुरिअर एजन्सीकडून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या पार्सलमधून झाली होती. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई झोनल युनिट, (एमझेडयू) महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे लपवून ठेवलेला अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात यशस्वी झाले.
आतापर्यंत केलेल्या तपासात असे दिसून आले आहे की ही टोळी परदेशात राहणाऱ्या लोकांच्या गटाद्वारे चालवली जात असून जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा काही भाग अमेरिकेतून मुंबईत आणला जात होता आणि मग तो कुरिअर किंवा लहान मालवाहू सेवा अथवा मानवी वाहकांद्वारे भारतातील आणि परदेशातील अनेक मागणीकर्त्यांना पाठवला जात होता. या प्रकरणात सहभागी असलेले लोक एकमेकांसाठी अपरिचित असून अंमली पदार्थांच्या व्यवहाराबद्दल दैनंदिन संभाषणासाठी ते खोटी नावे वापरत असत.
या प्रकरणात, आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, या टोळीचे इतरांशी असणारे संबंध शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
***
N.Chitale/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2100843)
Visitor Counter : 37