माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाकुंभ 2025 : 233 वॉटर एटीएमद्वारे 40 लाख भाविकांना शुद्ध पेय जल पुरवठा

Posted On: 05 FEB 2025 10:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 फेब्रुवारी 2025 

 

प्रयागराज येथील महाकुंभात देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. मेळा परिसरात एकूण 233 वॉटर एटीएम बसवण्यात आले असून, ते 24 तास अखंड कार्यरत आहेत. या वॉटर एटीएमच्या माध्यमातून भाविकांना दररोज शुद्ध आरओ (रिव्हर्स ऑस्मोसिस) पाणी मिळत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 21 जानेवारी 2025 ते 1 फेब्रुवारी 2025 या कालावधीत 40 लाखांहून अधिक भाविकांनी या वॉटर एटीएमचा लाभ घेतला. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने या वॉटर एटीएमच्या माध्यमातून पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध केले. सुरुवातीला ही सेवा एक रुपया प्रति लिटर दराने उपलब्ध होती.

यात्रेकरू एटीएम मध्ये नाणी भरून अथवा यूपीआय स्कॅनिंग द्वारे आरओ पाणी विकत घेत होते. मात्र, भाविकांना पिण्यासाठी  स्वच्छ पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी आता ही सेवा पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. प्रत्येक वॉटर एटीएमवर एक ऑपरेटर तैनात आहे, जो भाविकांनी बटण दाबताच शुद्ध पाणी उपलब्ध होईल हे सुनिश्चित करतो. यामुळे भाविकांना पाणी मिळवताना कोणताही त्रास होत नाही आणि पाणीपुरवठा विनाअडथळा सुरू राहतो.

महाकुंभात बसविण्यात आलेले वॉटर एटीएम आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत, ज्यामुळे त्यांचे कामकाज पूर्णपणे स्वयंचलित आणि सुरळीत राहते. या उपकरणांमध्ये सेन्सर आधारित देखरेख प्रणाली असते, जी कोणतीही तांत्रिक त्रुटी ताबडतोब शोधून काढते. काही तांत्रिक अडचणी आल्या, तर जलमहामंडळाचे तंत्रज्ञ तातडीने त्या दूर करून भाविकांना अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करतात. महाकुंभात येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता प्रत्येक वॉटर एटीएममधून दररोज 12,000 ते 15,000 लिटर आरओ पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

सर्व वॉटर एटीएम सिम-आधारित तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, ते प्रशासनाच्या मध्यवर्ती नेटवर्कशी जोडले आहेत. या तंत्रज्ञानामुळे एकूण पाण्याचा वापर, पाण्याच्या पातळीचे व्यवस्थापन, पाण्याची गुणवत्ता आणि वितरणाचे प्रमाण यावर सातत्याने लक्ष ठेवता येते. यात्रेकरू वॉटर एटीएमचा वापर करतात, तेव्हा प्रत्येक वेळी त्यामधून एक लिटर शुद्ध पाणी दिले जाते. स्पॉटखाली ठेवलेल्या बाटलीत ते पाणी भरता येते. मागील कुंभमेळ्यात संगम आणि इतर घाटांच्या आजूबाजूला जमा झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचऱ्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली होती. यावेळी प्रशासनाने स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करताना पर्यावरण रक्षणावरही भर दिला आहे.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2100153) Visitor Counter : 13