पंतप्रधान कार्यालय
स्वामित्व योजने अंतर्गत प्रॉपर्टी कार्ड्स वितरण सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण आणि लाभार्थ्यांसोबत साधलेला संवाद
Posted On:
18 JAN 2025 6:04PM by PIB Mumbai
कार्यक्रम संयोजक- या गौरवशाली प्रसंगाच्या निमित्ताने चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या स्वामित्व योजेनेचे लाभार्थी प्रॉपर्टी कार्ड धारकांसोबत परम आदरणीय पंतप्रधान महोदयांसोबतच्या संवाद कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी सर्वप्रथम मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यातील लाभार्थी, प्रॉपर्टी कार्ड धारक, मनोहर मेवाड़ा जी यांना आमंत्रित करत आहे.
मनोहर मेवाड़ा – नमस्कार सर.
पंतप्रधान- नमस्कार मनोहर जी, नमस्कार.
मनोहर मेवाड़ा – नमस्कार सर. माझे नाव मनोहर मेवाड़ा आहे.
पंतप्रधान - तुम्ही कसे आहात?
मनोहर मेवाड़ा – मी चांगला आहे सर.
पंतप्रधान – बरं, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत?
मनोहर मेवाड़ा – माझ्या कुटुंबात मी आहे, माझी पत्नी आहे आणि दोन मुले आहेत. माझ्या एका मुलाचे लग्न झालेले आहे, त्यांची पत्नी देखील आहे आणि माझा नातू देखील आहे.
पंतप्रधान - मनोहर जी, मला असे सांगण्यात आले आहे की, तुम्ही प्रॉपर्टी च्या कागदपत्रांवर कर्ज घेतले आहे. या कर्जाची तुम्हाला किती मदत झाली आहे? यामुळे तुमच्या आयुष्यात काही बदल घडून आला आहे का? देशभरातील लोक तुम्हाला ऐकत आहेत, तर मनोहर जी तुमचा अनुभव सांगा.
मनोहर मेवाड़ा- मला स्वामित्व योजनेचा पट्टा मिळाला सर. मी देखील खूष आहे, माझे कुटुंब देखील खूष आहे, मी तुम्हाला नमस्कार करतो, धन्यवाद देतो मी तुम्हाला.
पंतप्रधान – तुम्हाला देखील खूप-खूप धन्यवाद. मला हे जाणून घ्यायचे आहे मनोहर जी, जरा सविस्तर सांगा मला काय-काय झाले?
मनोहर मेवाड़ा- सविस्तर म्हणजे सर मला पट्टा मिळाला होता, पट्ट्यावर कर्ज घेतले होते मी, सर कर्ज घेतले होते डेअरी फार्मसाठी, मी दहा लाखांचे कर्ज घेतले आहे.
पंतप्रधान – दहा लाख?!
मनोहर मेवाड़ा - हो दहा लाखांचे कर्ज घेतले आहे सर मी.
पंतप्रधान – मग त्याचे काय केले?
मनोहर मेवाड़ा - साहेब मी डेअरी फार्म उघडले आहे. मी डेअरी फार्म मध्ये, म्हणजे मी देखील काम करतो, माझी मुले देखील काम करतात आणि त्यामुळे मी शेतीभातीचे देखील काम करतो आणि डेअरी फार्म देखील पाहतो.
पंतप्रधान - किती पशु आहेत तुमच्याकडे?
मनोहर मेवाड़ा - पाच गाई आहेत साहेब आणि एक म्हैस आहे साहेब, अशी सहा गुरे आहेत, त्याचाच व्यवसाय चालतो माझा. यामध्ये खूप नफा होतो मला.
पंतप्रधान - अच्छा पूर्वी कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे काहीच नव्हते. आता घराची कागदपत्रे असल्याने तुम्हाला कर्ज मिळाले.
मनोहर मेवाड़ा - साहेब, आधी माझ्याकडे घराची कागदपत्रे नव्हती, त्यामुळे कर्ज घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते. आज माझ्याकडे घराची कागदपत्रे आहेत, त्यामुळे आज कर्ज घेणे माझ्यासाठी फायदेशीर आहे, कारण मी कोणत्याही बँकेत गेलो की मला कर्ज मिळते.
पंतप्रधान – अच्छा, असे तर होणार नाही ना की कर्ज देखील खर्च होऊन जाईल आणि मुले कर्जदार बनतील, असे काही होणार नाही ना.
मनोहर मेवाड़ा- नाहीं मुले अशी नाहीत साहेब म्हणजे जे काही चालू आहे ते माझी मुलेच चालवत आहेत.
पंतप्रधान - म्हणजे चांगली कमाई होत आहे तर.
मनोहर मेवाड़ा – साहेब चांगली कमाई होत आहे, म्हणजे.
पंतप्रधान – कर्जाची परतफेड करत आहात,
मनोहर मेवाड़ा - हो
पंतप्रधान – मग कर्ज देखील परत घेत असाल?
मनोहर मेवाड़ा - नाही साहेब, म्हणजे 16000 च्या आसपास माझा हप्ता आहे, तर मग माझे उत्पन्न 30 हजारच्या जवळपास आहे तर मी त्यामध्येच माझा हप्ता देखील भरतो आणि बाकीच्या पैशात माझ्या घराचा खर्च भागवतो.
पंतप्रधान- चला, मनोहर जी खूप चांगले वाटले, केंद्र सरकारच्या योजनेमुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी झाल्या, माझ्यासाठी हे अतिशय सुखद आहे आणि हे पाहून खूपच चांगले वाटले की स्वामित्व योजनेच्या माध्यमातून तुमच्या सारख्या लाखो कुटुंबांचे उत्पन्न देखील वाढत आहे.
मनोहर मेवाड़ा - हो सर.
पंतप्रधान - देशातील प्रत्येक नागरिकाचे शिर अभिमानाने ताठ रहावे आणि त्याचे जीवन सुकर असावे याला आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. स्वामित्व योजना ही याच विचाराचा विस्तार आहे. मनोहरजी तुमचे खूप खूप अभिनंदन, आणि गावातील सर्वांना देखील सांगा की त्यांनी त्यांची कार्डे बनवावीत आणि त्यातून कर्ज घ्यावे, काही व्यवसाय करावा, हे सर्वांना नक्की सांगा, ठीक आहे, मनोहरजी तुमचे खूप खूप आभार.
मनोहर मेवाड़ा – माझ्या वतीने साहेब माझ्या कुटुंबाच्या वतीने देखील तुमचे खूप खूप आभार, नमस्कार सर.
पंतप्रधान – थँक यू.
कार्यक्रम संयोजक - आता राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यातील स्वामित्वच्या लाभार्थी प्रॉपर्टी कार्ड धारक श्रीमती रचना जी संवादासाठी जोडल्या जात आहेत.
रचना - माननीय पंतप्रधान महोदय माझा नमस्कार.
पंतप्रधान - नमस्कार रचना जी नमस्कार. रचना जी सांगा काय काम करता तुम्ही, कुटुंबात कोण कोण आहे, या स्वामित्व योजनेच्या संपर्कात कशा आलात?
रचना - सर, माझ्या कुटुंबात माझे पती नरेश कुमार बिश्नोई आहेत आणि मला एक मुलगा आहे सर आणि एक मुलगी आहे.
पंतप्रधान – आणि या योजनेविषयी सांगा.
रचना- सर माझ्याकडे 20 वर्षांपासून राहात आहे मी माझे लहानसे घर आहे, ज्याची कोणतीही कागदपत्रे नव्हती आणि आता देखील मला स्वामित्व योजनेमध्ये हे कार्ड मिळाले तर सर मी 7 लाख 45 हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे आणि माझे दुकान देखील उघडले आहे. दुकानात सामान देखील भरले आहे आणि माझ्या मुलांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न देखील मी पूर्ण केले आहे.
पंतप्रधान- तर मग पूर्वी तुमच्याकडे कार्ड नव्हते तेव्हा तुम्हाला मालमत्तेची कोणतीही माहिती नव्हती, तुमच्याकडे काहीच नव्हते?
रचना- नाहीं सर, माझ्याकडे काहीच नव्हते.
पंतप्रधान- तर मग तेव्हा त्रास होत असेल लोक देखील त्रास देत असतील.
रचना – खूपच जास्त त्रासले होते सर, मला हे स्वामित्व योजनेचे कार्ड मिळाले सर, मी आणि माझे कुटुंब खूपच खूष आहोत.
पंतप्रधान- अच्छा, तुम्ही कधी विचार केला होता की 20 वर्षे झाली तरी तुमच्याकडे काहीच नव्हते, तर मग तुम्ही आशाच सोडली असेल, तुम्हाला कधी वाटले होते असे काही होईल?
रचना – सर मला कधीच असे वाटले नव्हते की असे काही होईल, मी 20 वर्षांपासून त्याच घरात राहात आहे.
पंतप्रधान – बरं मग तुम्हाला स्वामित्व योजनेने आणखी कोणकोणते फायदे झाले आहेत ते तुम्ही सांगू शकाल का?
रचना - हो सर सांगते, यामुळे मला एक तर एसबीएम योजना मिळाली आहे आणि सर मी मुद्रा योजनेतून देखील 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे आणि मी राजीवकासोबत संलग्न आहे आणि माझ्या कुटुंबाचे आयुष्मान कार्ड देखील बनवलेले आहे सर.
पंतप्रधान- कामकाज व्यवस्थित सुरू आहे ना?
रचना- अगदी व्यवस्थित सुरू आहे सर, मनरेगा मध्येही मी काम करत आहे.
पंतप्रधान- तर मग तुम्ही 15 लाख रुपयांचे कर्ज देखील घेतले आहे, दुकान देखील चालवता, मनरेगा देखील करता, पतीदेव देखील काही तरी करत असतील.
रचना – हो सर. वाहन चालवण्याचंच काम करतात ते.
पंतप्रधान – अच्छा. तुमच्या मुलीला परदेशात शिकायला जाण्याची इच्छा आहे असं मला कळालं. याचं श्रेय तुम्ही स्वामित्व योजनेला द्याल का?
रचना – सर तिला परदेशात पाठवायची माझी इच्छा आहे, तिलाही जायचंय.
पंतप्रधान – मला जरा मोकळेपणाने सांगा.
रचना – माझी मुलगी आत्ता माझ्यासोबत आहे. सध्या ती AILET ची तयारी करतेय.
पंतप्रधान – कुठल्या देशात जायचंय तिला शिकायला?
रचना – ऑस्ट्रेलिया
पंतप्रधान – स्वामित्व योजनेमुळे ऑस्ट्रेलियामध्ये तर जाऊ शकते ती.
रचना – हो सर.
पंतप्रधान – तुमचं आणि तुमच्या मुलीचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ दे, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. स्वामित्व योजनेमुळे लोकांच्या गरजा पूर्ण होण्याबरोबरच त्यांच्या स्वप्नांच्या पंखांनादेखील बळ मिळतंय ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं कुठलीही योजना तेव्हाच यशस्वी होते जेव्हा त्या योजनेमुळे लोकांचा फायदा होतो आणि त्यांची ताकद वाढते. रचना, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं.
रचना – सर मला म्हणायचंय की; तुमच्यासारखा नेत्याने ही जी गरीबांच्या कल्याणासाठी योजना आणली आहे, त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडूनही मनापासून धन्यवाद.
पंतप्रधान – खूप खूप धन्यवाद. इथं मला गावातले जितके लोक दिसत आहेत त्या सगळ्यांना माझा नमस्कार सांगा. चला आता आणखी कोणाला बोलायचं आहे ते पाहू.
कार्यक्रमाचे आयोजक – आता महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातले स्वामित्व योजनेचे लाभार्थी प्रॉपर्टी कार्ड धारक रोशन संभाजी पाटील बोलतील.
पंतप्रधान – रोशन नमस्कार.
रोशन – नमस्कार सर.
पंतप्रधान – बोला रोशन.
रोशन – हो सर. संतांच्या आणि महापुरुषांच्या या महाराष्ट्रातल्या पवित्र दीक्षा भूमी म्हणजेच नागपूरमधून रोशन पाटीलचा आपल्याला नमस्कार.
पंतप्रधान – नमस्कार.
रोशन – नमस्कार सर.
पंतप्रधान – तुमच्या मुलाचं नांव काय आहे?
रोशन पाटील – सर माझ्या मुलाचं नांव शर्विल. आज त्याचा वाढदिवस आहे.
पंतप्रधान – आज त्याचा वाढदिवस आहे ?
रोशन – हो सर.
पंतप्रधान – माझ्याकडून त्याला खूप आशीर्वाद.
रोशन – तुमचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहेतच सर.
पंतप्रधान – रोशन तुम्ही काय करता आणि तुमच्या घरी कोण कोण असतं?
रोशन – सर मी शेतकरी आहे. शेतीबरोबरच एक खाजगी नोकरीसुद्धा करतो. माझ्या घरी माझी बायको, आई वडील, दोन भाऊ आणि माझा छोटा मुलगा असे सगळे मिळून सहाजण आहोत.
पंतप्रधान – मला सांगा स्वामित्व योजना, मालमत्ता पत्रक या सगळ्याशी तुमचा कसा संबंध आला आणि याचा तुम्हाला काय फायदा झाला?
रोशन – सर मला स्वामित्व कार्ड मिळाल्यानंतर मी त्यावर कर्ज काढू शकलो. सर आधी कर्ज मिळत नव्हतं. सर गावाकडे माझ्या कुटुंबाचं मोठं घर आहे. त्याच्या प्रॉपर्टी कार्डमुळे मला कर्ज मिळालं सर. मी बँकेतून 9 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. त्यातल्या काही पैशांतून घर बांधलं आणि उरलेल्या पैशातून शेतात सिंचनाची व्यवस्था केली. त्यामुळे सर माझं शेतातलं पीक आणि उत्पन्न दोन्हीही वाढलं. यापूर्वी मी एकच पीक घ्यायचो आता वर्षातून दोन तीन पीकं घेऊ शकतो. यामुले आता माझं उत्पन्न वाढलं आणि नफाही बऱ्यापैकी मिळतोय सर.
पंतप्रधान – अच्छा. कर्ज घेण्यासाठी जर तुमच्याकडे इतकी सगळी कागदपत्रं होती तर बँकेतून कर्ज घेताना काही अडचणी येत होत्या का? म्हणजे हे प्रमाणपत्र द्या, अमकी कागदपत्रं जमा करा, तमका दाखला आणा वगैरे, असं होत होतं का?
रोशन – हो सर. आधी खूप अडचणी यायच्या. कागदपत्रं म्हणजे हे आणा, ते आणा. एकेका कागदपत्रासाठी बँकवाले खूप चकरा मारायला लावायचे. परंतु जेव्हापासून स्वामित्व कार्ड मिळालं आहे तेव्हापासून कुठल्याच कागदपत्रांची गरज पडत नाही. एक स्वामित्व कार्ड सगळ्या प्रक्रियेसाठी पुरेसं आहे.
पंतप्रधान – तुमचा विश्वास आहे?
रोशन – यासाठी तुमचे खूप खूप धन्यावाद सर.
पंतप्रधान – बँकवाल्यांचा पूर्ण विश्वास आहे
रोशन – हो सर. बँकवाल्यांचा पण यावर पूर्ण विश्वास आहे आणि यावर सहज कर्ज मिळतं.
पंतप्रधान – पण तुम्ही तर घर बांधलं. आता कर्जाची परतफेड कशी करणार?
रोशन – सर मी शेतात भाज्या लावल्या आहेत, त्यातूनही नफा मिळतो. शिवाय तीन पिकं घेत असल्यामुळे त्यातूनही पैसे मिळतात. सिंचनाची व्यवस्था झाल्यामुळे पीक आणखी चागंलं येऊ लागलंय सर. सर आता नफा जास्त मिळत असल्यामुळे मी कर्जाची परतफेड सहज करू शकतो.
पंतप्रधान – रोशन, तुम्हाला केंद्र सरकारच्या आणखी कोणकोणत्या योजनांचा फायदा होतोय?
रोशन – सर मला केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळतो. पीएम सन्मान निधी, पीएम पीक विमा योजना अशा काही योजनांचा लाभ मिळतो.
पंतप्रधान – स्वामित्व योजनेमुळे लोकांना इतर काही योजनांचादेखील फायदा मिळतो याचा मला आनंद आहे. जेव्हा आम्ही स्वामित्व योजना आणली... तुम्ही काहीतरी सांगत होतात रोशन
रोशन – हो सर. स्वामित्व योजनेमुळे लोकांचा खूप फायदा होतोय. आमच्या गावात तर काही दुकानदारांनी दुसरं दुकान काढण्यासाठी कर्ज घेतलंय. पूर्वी सर आम्ही काहीच करू शकत नव्हतो. शेतीवर कर्ज मिळत नव्हतं, घरावर कर्ज मिळत नव्हतं पण स्वामित्व कार्ड योजना सुरू झाल्यामुळे सगळ्यांनाच सहज कर्ज मिळतंय. त्यामुळे लोक शेतीबरोबरच छोटा मोठा व्यवसाय करायला लागले आहेत. आता लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे ते आपल्या कुटुंबाचं पालनपोषण चांगल्या प्रकारे करू शकतात. आनंदी जीवन जगतायत.
पंतप्रधान – रोशन तुम्ही तुमच्या गावातले इतरही लोक या योजनेचा कसा लाभ घेत आहेत ते सांगितलं. माझी पण इच्छा हीच आहे की गावातल्या सगळ्या लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तुम्ही तर घर बांधलं, शेतीतही सुधारणा केली. तुमचं उत्पन्न दुप्पट झालं. आता चांगलं घर झाल्यामुळे गावातही तुमची पत वाढली असेल.
रोशन - हो सर, याचे संपूर्ण श्रेय आपल्याला जाते सर. मी आपले खूप खूप आभार मानु इच्छितो, सर!
पंतप्रधान - चला, तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, सर. सर्व नागपूरकरांना देखील खूप खूप शुभेच्छा.
रोशन - पुन्हा एकदा धन्यवाद सर, धन्यवाद.
पंतप्रधान - आता कोण बोलणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक - आता आदरणीय पंतप्रधान ओदिशातील रायगढा जिल्ह्यातील आणखी एक लाभार्थी स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड धारक श्रीमती गजेंद्र संगीता जी यांच्याशी संवाद साधतील.
संगीता - माननीय पंतप्रधान जी , सादर प्रणाम.
पंतप्रधान - संगीता जी, नमस्कार.
संगीता - नमस्कार.
पंतप्रधान - संगीता जी बोला, तुम्ही काय काम करता ?
संगीता - जी, मी शिवणकाम करते, टेलरिंगचे काम करते.
पंतप्रधान - आणि तुमच्या कुटुंबातील किती लोकांची जबाबदारी तुमच्यावर आहे?
संगीता - माझ्या कुटुंबात चार जण आहेत, माझी दोन मुले आणि पति. माझी एक मुलगी एम. कॉम शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे आणि दुसरा मुलगा आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे नोकरी करत आहे, आणि माझे पती देखील एका खाजगी कंपनीत नोकरी करत आहेत.
पंतप्रधान - अच्छा, संगीता जी घराचे, मालमत्तेचे अधिकार मिळणे, हे दस्तऐवज मिळणे, असे तर नाही ना की चला अनेक सरकारी कागद येत असतात त्यात आणखी एकाची भर पडली. या दस्तऐवजामुळे तुमच्या आयुष्यात खरेच खूप मोठा बदल घडला आहे का ?
संगीता - हो सर, खूप मोठा बदल घडला आहे, पूर्वी कोणतेच कागद नव्हते, कोणतेही पक्के दस्तऐवज नव्हते, सर आता जे पक्के दस्तऐवज मिळाले आहेत त्यामुळे गावात राहत असलो तरीही आमचा आत्मविश्वास देखील दुणावला आहे आणि आम्हाला खूप आनंदही होत आहे.
पंतप्रधान - दस्तऐवज मिळाल्यानंतर तुम्ही काय काय केले?
संगीता - ही कागदपत्रे तर नुकतीच आम्हाला मिळाली आहेत. मी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता, पण काम झाले नाही. मी घरात छोटी मोठी कामे करते.
पंतप्रधान - तुम्ही आता एखाद्या बॅंकेकडून कर्ज वगैरे घेतले आहे का ?
संगीता - जी सर, अजून तरी घेतले नाही, आता घेण्याच्या विचारात आहे.
पंतप्रधान - मग, तुम्ही एखाद्या बॅंकेशी संपर्क केला आहे का? तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे का?
संगीता - हो सर, आता कर्ज घेण्याचा विचार करत आहोत.
पंतप्रधान - कर्ज घेऊन काय करणार आहात?
संगीता - कर्ज घेऊन माझा व्यवसाय आणखी वाढण्याची इच्छा आहे, माझा जो शिवणकामाचा व्यवसाय आहे तो आणखी पुढे नेण्याचा विचार करत आहे.
पंतप्रधान - म्हणजे, आपल्या व्यवसायाकडे जास्त लक्ष देण्याची तुमची इच्छा आहे.
संगीता - हो सर, यामुळे माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी हातभार लागेल आणि काही पैसे शिल्लक देखील राहतील.
पंतप्रधान - चला, संगीता जी, तुम्ही तुमच्या व्यवसायाचा, तुमच्या घराचा विस्तार करा. त्यासाठी तुम्हाला आतापासूनच खूप खूप शुभेच्छा. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून तुमची खूप मोठी चिंता समाप्त झाली आहे. तुम्हाला तुमच्या घराचे दस्तऐवज मिळाले आहेत. आणि तुम्ही महिला बचत गटाच्या सदस्य देखील आहात. तुम्ही काहीतरी म्हणत होता संगीता जी, संगीता जी तुम्ही काहीतरी म्हणत होता.
संगीता - हो सर, ६० वर्ष झाली. आमच्याकडे कोणतेही पक्के दस्तऐवज नव्हते, सर. आत्ताच स्वामित्व योजनेच्या अंतर्गत कागदपत्र मिळाले. तुमचे खूप खूप आभार सर.
पंतप्रधान - चला, तुम्हा सर्वांचे आशिर्वाद हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. बघा, तुम्ही तर महिला बचत गटात देखील काम करता आणि महिला बचत गटांना देखील आमचे सरकार निरंतर मदत करत आहे. तुम्ही पाहा, स्वामित्व योजना संपूर्ण गावाचा कायापालट करणार आहे. चला, इतर लोक देखील वाट पाहत आहेत, आता अजून कोण शिल्लक आहे भाई, कोणीकडे जायचे आहे?
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक - जम्मू आणि काश्मीर. आता जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील एक अन्य स्वामित्व लाभार्थी आणि प्रॉपर्टी कार्ड धारक श्री विरेंद्र कुमार जी यांच्या सोबत परम आदरणीय पंतप्रधान जी संवाद साधतील.
पंतप्रधान - विरेंद्र जी नमस्कार.
विरेंद्र - जी नमस्कार.
पंतप्रधान - विरेंद्र जी जरा स्वतः बद्दल माहिती द्या आम्हाला.
विरेंद्र - पंतप्रधान जी मी एक शेतकरी आहे आणि जे प्रॉपर्टी कार्ड मला मिळाले आहे त्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय खूप आनंदी आहोत. आम्ही अनेक पिढ्यांपासून याच जमिनीवर राहत आहोत, आता या जमिनीचे कागदपत्र मिळाल्यामुळे मनाला अभिमान वाटत आहे. पंतप्रधान जी, यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे.
पंतप्रधान - अच्छा, पूर्वी तुमच्याकडे कोणतेही कार्ड कागदपत्र नव्हते आणि गावातील इतर लोकांकडे देखील ते नसतीलच!
विरेंद्र - आमच्या गावातील कोणत्याही व्यक्तीकडे कसलीही कागदपत्रे नव्हती. अनेक पिढ्यांपासून, शंभर वर्षाहून अधिक काळापासून या गावात आम्ही राहत आहोत, पण कागदपत्रे मात्र कसलीच नव्हती. आता स्वामित्व योजनेअंतर्गत दस्तऐवज मिळाले आहेत, यामुळे गावातील सर्व लोक खूप आनंदी आहेत.
पंतप्रधान - अच्छा, म्हणजे प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहे, यामुळे तुमच्या आयुष्यात काय बदल घडला आहे ?
विरेंद्र - मला जे प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहे, माझा एका जमिनीबाबत विवाद चालू होता, तो प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे माझ्या ज्या जमिनीचा वाद चालू होता, तो देखील समाप्त झाला आहे. आता या प्रॉपर्टी कार्डमुळे मी आपली जमीन गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेऊ शकतो आणि माझ्या घराची करू शकतो तसेच माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आणखी मजबूत करू शकतो.
पंतप्रधान - अच्छा, तुमच्या गावात स्वामित्व योजनेअंतर्गत इतरांनी देखील कोणते लाभ मिळवले आहेत का? या योजनेमुळे त्यांच्या आयुष्यात देखील काही बदल घडले आहेत का?
विरेंद्र - हो सर, नक्कीच अनेक बदल घडले आहेत. आमच्या गावात स्वामित्व योजनेअंतर्गत ज्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळाले आहेत, आता प्रत्येक गावातील लोकांचे जे मालकी हक्क आहेत ते अगदी स्पष्ट झाले आहेत. जसे की, जमीन आणि संपत्तीबाबत जी भांडणे होती ती देखील बऱ्याच प्रमाणात मिटली आहेत. यामुळे जे ग्राम निवासी आहेत ते आपली संपत्ती बॅंकेकडे तारण ठेवून कर्ज घेऊ शकतात आणि इतर अनेक प्रकारच्या योजनांचा देखील लाभ घेऊ शकतात. माझ्या गावातील लोकांच्या वतीने देखील मी आपले मनःपूर्वक आभार मानतो.
पंतप्रधान - वीरेंद्र जी तुम्हा सर्वांबरोबर संवाद साधून खूप बरे वाटले आणि आनंदही झाला. आणि हो, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की, तुम्ही स्वामित्व योजनेमुळे मिळालेल्या कार्डाला फक्त घराचे कागदपत्रे मानून बसला नाहीत, तर झाला तुम्ही आपल्या प्रगतीचा मार्ग देखील बनवले आहे. मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. थंडीचे दिवस आहेत, जम्मू आणि काश्मीरमधील सर्व लोकांनी तब्येतीची काळजी घ्यावी. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
विरेंद्र - सर, तुमचे आभार.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक - आता मी परम आदरणीय पंतप्रधान जी यांना विनम्र विनंती करु इच्छितो की, त्यांनी उपस्थितांना संबोधित करावे.
नमस्कार !
आजचा दिवस देशातील गावांसाठी आणि देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी खूपच ऐतिहासिक दिवस आहे. अनेक राज्यांचे राज्यपाल या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले आहेत. ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातचे मुख्यमंत्रीही आपल्यासोबत जोडलेले आहेत. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल, लडाखचे नायब राज्यपाल देखील आपल्यासोबत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित आहेत . त्यात राज्य सरकारांचे मंत्री, खासदार आणि आमदार देखील आहेत, इतर सर्व लोकप्रतिनिधीही आहेत.
हजारो ग्रामपंचायतींशी निगडित सर्व सहकारी, स्वामीत्व योजनेचे लाखो लाभार्थी, हा इतका व्यापक आणि भव्य कार्यक्रम आहे आणि तुम्ही सर्व यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहात, मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.
मित्रांनो,
गावात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरांचा कायदेशीर पुरावा देता यावा, यासाठी पाच वर्षांपूर्वी स्वामित्व योजना सुरू करण्यात आली होती. कुणी याला घरौनी म्हणतात, तर कुठे अधिकार अभिलेख म्हणतात, कुठे प्रॉपर्टी कार्ड म्हणतात, कुठे मालमत्ता पत्रक म्हणतात, कुठे आवासीय भूमि पट्टा म्हणतात. विविध राज्यांमध्ये नावे वेगवेगळी आहेत, मात्र ही मालकीची प्रमाणपत्रेच आहेत. गेल्या 5 वर्षात अंदाजे 1.5 कोटी लोकांना ही स्वामित्व कार्डे देण्यात आली आहेत. आता आज या कार्यक्रमात 65 लाखांहून अधिक कुटुंबांना ही स्वामित्व कार्डे मिळाली आहेत. म्हणजेच स्वामित्व योजनेअंतर्गत गावातील सुमारे सव्वा दोन कोटी लोकांना त्यांच्या घराची कायदेशीर कागदपत्रे मिळाली आहेत. मी त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो. आणि आजच्या या कार्यक्रमामुळे ज्यांना आता जमिनीशी संबंधित सरकारी पत्रे मिळाली आहेत, त्यांना त्याचा कसा लाभ घेता येईल याची कल्पना तुम्हाला आताच मी त्यांच्याशी साधलेल्या संवादातून नक्कीच मिळेल.
मित्रांनो,
21 व्या शतकातील जगात हवामान बदल, पाणी टंचाई, आरोग्य विषयक समस्या, महामारी अशी कितीतरी आव्हाने आहेत. मात्र जगासमोर आणखी एक मोठे आव्हान राहिले आहे. हे आव्हान आहे - मालमत्ता अधिकारांचे , मालमत्तेच्या अधिकृत कागदपत्रांचे. अनेक वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांनी जगातील अनेक देशांमध्ये भूसंपत्तीबाबत एक अभ्यास केला होता. त्या अभ्यासात असे आढळले की अनेक देशांमधील लोकांकडे त्यांच्या मालमत्तांची योग्य कायदेशीर कागदपत्रेच नाहीत. संयुक्त राष्ट्रांनी स्पष्टच सांगितले की गरिबीचे उच्चाटन करायचे असेल तर लोकांकडे मालमत्तेची कागदपत्रे असणे खूप आवश्यक आहे. जगातील एका मोठ्या अर्थतज्ञाने मालमत्ता अधिकारांच्या आव्हानावर एक संपूर्ण पुस्तक लिहिले आहे. आणि या पुस्तकात ते म्हणतात की गावांमधील लोकांकडे जी काही थोडी-फार मालमत्ता असते ती मृत भांडवल आहे. म्हणजे ही मालमत्ता एक प्रकारे मृत संपत्ती आहे. कारण गावकरी, गरीब लोक त्या मालमत्तेच्या बदल्यात कोणताही व्यवहार करू शकत नाहीत. त्यामुळे कौटुंबिक उत्पन्न वाढवण्यास त्याची मदत होत नाही.
मित्रांनो,
जगासमोरील या मोठ्या आव्हानापासून भारतही सुरक्षित नव्हता. आपलीही परिस्थिती तशीच होती.तुम्हाला माहीत आहेच, भारतातील खेड्यापाड्यात लाखो-कोटी रुपयांची संपत्ती असूनही तिची तितकीशी किंमत नव्हती. याचे कारण, लोकांकडे त्यांच्या घरांची कायदेशीर कागदपत्रे नसायची, त्यामुळे घराच्या मालकीबाबत वाद होत असत. अनेक ठिकाणी तर बलाढ्य लोक घरे ताब्यात घेत असत. कायदेशीर कागदपत्रांशिवाय बँकाही अशा मालमत्तेपासून चार पावले दूर रहायच्या. अनेक दशके हे असेच चालू होते. आधीच्या सरकारांनी या दिशेने काही ठोस पावले उचलली असती तर बरे झाले असते, पण त्यांनी या दिशेने विशेष काही केले नाही. त्यामुळे 2014 मध्ये जेव्हा आमचे सरकार स्थापन झाले, तेव्हा आम्ही मालमत्ता कागदपत्रांच्या या आव्हानाला सामोरे जाण्याचे ठरवले. कोणतेही संवेदनशील सरकार आपल्या गावातील लोकांना अशा प्रकारे संकटात सोडू शकले नसते. आणि आम्हाला सर्वांचा विकास व्हायला हवा आहे, आम्हाला सर्वांचा विश्वासही हवा आहे, आताच आमचे मंत्री राजीव रंजन जी यांनी हे अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. म्हणूनच आम्ही स्वामित्व योजना सुरू केली. आम्ही ठरवले की ड्रोनच्या मदतीने देशातील प्रत्येक गावात घरांच्या जमिनींचे मॅपिंग केले जाईल आणि गावातील लोकांना त्यांच्या निवासी मालमत्तेची कागदपत्रे दिली जातील. आज आपण या योजनेचे लाभ मिळताना जेव्हा पाहत आहोत, तेव्हा मनाला एक प्रकारचे समाधान मिळते की चला, गावातील गरीबांची आपण मदत करू शकलो. मी आताच स्वामीत्व योजनेच्या लाभार्थ्यांशी बोलत होतो. या योजनेने त्यांचे जीवन कसे बदलले आहे, त्यांना आता त्यांच्या मालमत्तेवर बँकांकडून कशी मदत मिळू लागली आहे. मालमत्ता तर होतीच, तुम्ही तिथे राहत होता, कागदपत्रे नव्हती, सरकारने तो प्रश्न सोडवायला हवा होता आणि म्हणूनच आम्ही काम हाती घेतले आणि करत आहोत आणि त्यांच्या बोलण्यात त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान होते, आनंद होता, जो आत्मविश्वास होता, काहीतरी नवीन करण्याची जी स्वप्ने होती, किती आनंददायी वाटला हा संवाद मला, हा मी खूप मोठा आशीर्वाद समजतो.
बंधू आणि भगिनींनो,
आपल्या देशात 6 लाखांहून अधिक गावे आहेत. यापैकी जवळपास निम्म्या गावांमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण झाले आहे. कायदेशीर कागदपत्रे मिळाल्यानंतर लाखो लोकांनी आपले घर आणि आपल्या मालमत्तेच्या आधारे बँकांकडून कर्ज घेतले आहे. या पैशातून त्यांनी गावात स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय सुरू केला आहे. यातील अनेक छोटे आणि मध्यम शेतकरी कुटुंबे आहेत. त्यांच्यासाठी ही प्रॉपर्टी कार्ड आर्थिक सुरक्षिततेची मोठी हमी ठरली आहे. अवैध जप्ती आणि न्यायालयात दीर्घकाळ चाललेल्या वादांमुळे आपली दलित, मागास आणि आदिवासी कुटुंबेच सर्वाधिक त्रस्त होती, प्रभावित झाली होती. आता कायदेशीर मान्यता मिळाल्याने त्यांना या संकटापासून मुक्ती मिळत आहे. सर्व गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड बनल्यानंतर 100 लाख कोटी रुपयांहून अधिक आर्थिक घडामोडींचा मार्ग प्रशस्त होईल, असा एक अंदाज आहे. तुम्ही कल्पना करू शकता, देशाच्या अर्थव्यवस्थेत किती मोठे भांडवल जोडले जाणार आहे.
मित्रांनो,
आज आमचे सरकार ग्रामस्वराज्य प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. स्वामीत्व योजनेच्या माध्यमातून गावांच्या विकासाचे नियोजन आणि अंमलबजावणी आता अधिक चांगली होत आहे. आज आपल्याकडे स्पष्ट नकाशे असतील, लोकसंख्या असलेल्या भागांची माहिती असेल, तर विकासकामांचे नियोजनही अचूक होईल आणि चुकीच्या नियोजनामुळे जे नुकसान व्हायचे, जे अडथळे यायचे त्यापासून देखील मुक्ती मिळेल. कोणती जमीन पंचायतीची आहे आणि कोणती जमीन कुरण आहे, असे अनेक वाद असतात. आता मालमत्ता अधिकार मिळाल्यामुळे ग्रामपंचायतींचे प्रश्नही सुटणार असून त्या देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील. गावात आग लागल्याच्या घटना घडतात, पूर येतो, दरड कोसळतात, अशा अनेक आपत्ती येतात. प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन चांगले होईल, आपत्तीच्या वेळी योग्य नुकसान भरपाई मिळणे सोपे होईल.
मित्रहो,
आपण हे जाणतो की शेतकऱ्यांची जी जमीन असते त्या संदर्भातही किती तंटे असतात. जमिनीची कागदपत्रे मिळवण्यात अडचणी येतात. तलाठ्याकडे वारंवार जावे लागते, कचेरीमध्ये खेपा माराव्या लागतात. यातून भ्रष्टाचाराला वाव मिळतो. या समस्या दूर करण्यासाठी भू नोंदींचे डिजिटलीकरण करण्यात येत आहे. स्वामित्व आणि भू आधार या दोन व्यवस्था गावांच्या विकासाचा आधार ठरणार आहेत. भू-आधार द्वारे जमिनीला एक विशेष ओळख देण्यात आली आहे. सुमारे 23 कोटी भू-आधार क्रमांक जारी करण्यात आले आहेत. यातून आज सहजपणे जनता येऊ शकते की जमिनीचा कोणता तुकडा कोणाचा आहे. गेल्या 7-8 वर्षांमध्ये सुमारे 98 टक्के भू नोंदींचे डिजिटलीकरण करण्यात आले आहे. बहुतांश जमिनीचे नकाशे आता डिजिटली उपलब्ध आहेत.
मित्रहो,
‘भारत गावांमध्ये वसतो’ असे महात्मा गांधी म्हणत असत, भारताचा आत्मा गावांमध्ये आहे. पूज्य बापूंचा हा भाव खऱ्या अर्थाने वास्तवात साकारण्याचे काम गेल्या दशकभरात झाले आहे.गेल्या दहा वर्षात ज्या अडीच कोटीहून जास्त कुटुंबांपर्यंत वीज पोहोचली आहे ती बहुतांश कुटुंबे गावांमधलीच आहेत. गेल्या दहा वर्षात ज्या दहा कोटीहून जास्त कुटुंबांपर्यंत शौचालये पोहोचली आहेत ती बहुतांश कुटुंबेही गावांमधलीच आहेत. दहा कोटी भगिनींना उज्वला गॅस जोडणी मिळाल्या त्या बहुतांश भगिनी गावांमधेच राहतात. ज्या 12 कोटी हून जास्त कुटुंबांपर्यंत पाच वर्षात नळाचे पाणी पोहोचले आहे तीसुद्धा गावांमधलीच आहेत. ज्या 50 कोटीहून जास्त लोकांची बँक खाती उघडण्यात आली ते सुद्धा बहुतांश गावांमधलेच आहेत. गेल्या दशकात दीड लाखाहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे उभारण्यात आली ती सुद्धा बरीचशी गावांमधेच आहेत, गावांमधल्या लोकांची आरोग्य सेवा करत आहेत. स्वातंत्र्यानंतर इतकी दशके गावांमधले कोट्यवधी लोक, अशा मुलभूत सुविधांपासून वंचित होते. आपल्या दलित, मागास, आदिवासी समाजातली कुटुंबे सर्वात जास्त वंचित होती. आता या सर्व सुविधांचा सर्वात जास्त लाभ याच कुटुंबांना झाला आहे.
मित्रहो,
गावांमध्ये उत्तम रस्ते असावेत, यासाठी गेल्या दशकात अन्हुत्पूर्व प्रयत्न झाले आहेत. 2000 या वर्षामध्ये अटल बिहारी वाजपेयी जी पंतप्रधान होते, तेव्हा ग्राम सडक योजना सुरु केली होती. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे सव्वा आठ लाख किलोमीटर रस्ते गावांमध्ये बांधण्यात आले आहेत. इतक्या वर्षात सव्वा आठ.. आपण पहा 10 वर्षात आम्ही पावणेचार लाख किलोमीटर म्हणजे साधारणपणे निम्मे रस्ते दहा वर्षात बांधले. आता आम्ही सीमेवरच्या दुर्गम गावांपर्यंत कनेक्टीव्हिटी वाढवण्यासाठी व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सुरु केला आहे.
आणि मित्रहो,
रस्तेच नव्हे, गावांमध्ये इंटरनेट पोहोचवण्यालाही आमचे प्राधान्य राहिले आहे. 2014 या वर्षापूर्वी, देशात 100 पेक्षाही कमी पंचायत ब्रॉडबॅंड फायबरने जोडली गेली होती. गेल्या दहा वर्षात आम्ही 2 लाखाहून जास्त पंचायती ब्रॉडबॅंड फायबरने जोडल्या आहेत. 2014 पूर्वी देशातल्या गावांमध्ये एक लाखाहून कमी सामायिक सेवा केंद्रे होती. गेल्या दहा वर्षात आमच्या सरकारने 5 लाखाहून जास्त नवी सामायिक सेवा केंद्रे उभारली आहेत आणि ही केवळ आकडेवारी नव्हे या आकडेवारीसह गावांमध्ये सुविधा पोहोचल्या आहेत, आधुनिकता पोहोचली आहे. पूर्वी लोक ज्या सुविधा शहरांमध्ये पहात असत आता त्या गावांमध्ये मिळू लागल्या आहेत. यातून गावांमध्ये केवळ सुविधाच नव्हे तर आर्थिक सामर्थ्यही वाढू लागले आहे.
मित्रहो,
2025 या वर्षाची सुरवातही गावांसाठी, शेतकऱ्यांसाठी मोठ्या निर्णयाने झाली आहे. सरकारने पंतप्रधान पिक विमा योजना जारी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आतापर्यंत दाव्यापोटी सुमारे पावणेदोन लाख कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे, विम्याचे पैसे मिळाले आहेत. जगभरात ज्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे अशा डीएपी खतांसंदर्भात आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना स्वस्त खते मिळत रहावीत यासाठी सरकारने पुन्हा हजारो कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे. गेल्या दशकामध्ये शेतकऱ्यांना स्वस्त खते देण्यासाठी सुमारे 12 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 2014 च्या आधीच्या दशकाशी तुलना करता ही रक्कम जवळजवळ दुप्पट आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गतही आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. शेतकरी कल्याणाप्रती केंद्र सरकारची कटीबद्धता यातून दिसून येत आहे.
मित्रहो,
विकसित भारत निर्मितीत नारीशक्तीची मोठी भूमिका आहे. म्हणूनच गेल्या दशकात आम्ही प्रत्येक मोठ्या योजनेच्या केंद्र स्थानी माता-भगिनींना ठेवले आहे. बँक सखी आणि विमा सखी यासारख्या योजनांनी गावातल्या महिलांना नव्या संधी दिल्या आहेत. लखपती दीदी योजनेने देशातल्या सव्वा कोटीहून जास्त महिलांना लखपती दीदी केले आहे. स्वामित्व योजनेनेही महिलांचा मालमत्ता विषयक हक्क अधिक भक्कम केला आहे. अनेक राज्यांमध्ये मालमत्ता पत्रामध्ये पतीच्या नावासमवेत पत्नीचे नावही समाविष्ट करण्यात आले आहे. काहीजणांनी पहिले नाव पत्नीचे तर काही जणांनी दुसरे नाव पत्नीचे दिले आहे, मात्र दोघांनी भागीदारीने केले आहे. पीएम आवास योजने अंतर्गत गरिबांना जी घरे मिळतात त्यातली बहुतांश घरे महिलांच्या नावावर नोंदवण्यात आली आहेत आणि स्वामित्व योजनेचे ड्रोनही आज महिलांना मालमत्ता हक्क देण्यासाठी उपयोगी ठरत आहेत हा किती सुखद योगायोग आहे. स्वामित्व योजनेत मॅपिंगचे काम ड्रोन करत आहेत. तर नमो दीदी ड्रोन योजनेतून गावातल्या भगिनी, ड्रोन पायलट बनत आहेत. ड्रोनद्वारे त्या शेतकामामध्ये मदत करत आहेत.त्यातून त्यांना अतिरिक्त कमाई होत आहे.
मित्रहो,
स्वामित्व योजनेबरोबरच आमच्या सरकारने गावांतल्या लोकांना असे सामर्थ्य दिले आहे जे ग्रामीण जीवनाचा संपूर्ण कायापालट करू शकते. आपली गावे, आपला गरीब वर्ग सशक्त झाला तर विकसित भारताचा आपला प्रवासही सुंदर राहील. गेल्या दशकामध्ये गाव आणि गरीब कल्याणासाठी जी पाऊले उचलण्यात आली आहेत त्यामुळे 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. स्वामित्व सारख्या योजनांमधून आम्ही गावांना विकासाची भक्कम केंद्रे करू शकतो असा मला विश्वास आहे. आपणा सर्वाना पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा! धन्यवाद !
***
S.Pophale/S.Patil/S.Joshi/S.Mukhedkar/S.Kane/N.Chitale/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2094271)
Visitor Counter : 15