पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमध्ये 'हाला मोदी' या कार्यक्रमात भारतीय समुदायाला केले संबोधित
कुवेतमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाने दाखवलेला सौहार्द आणि जिव्हाळा विलक्षण : पंतप्रधान नरेंद्र मोदी
43 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांची कुवेतला भेट : पंतप्रधान
भारत आणि कुवेत यांच्यातील संबंध हे नागरी संस्कृती, सागरी संबंध आणि व्यापाराचे : पंतप्रधान
भारत आणि कुवेत हे कायम एकमेकांच्या पाठीशी: पंतप्रधान
कौशल्यप्रधान प्रतिभेची जगाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सुसज्ज : पंतप्रधान
भारतात आता स्मार्ट डिजिटल व्यवस्था ही चैनीची गोष्ट उरली नसून ती सर्वसामान्यांच्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहे : पंतप्रधान
भविष्यातील भारत हा जागतिक विकासाचे केंद्र आणि जगाच्या विकासाचे इंजिन असेल : पंतप्रधान
विश्वमित्र या नात्याने भारत जगाच्या व्यापक कल्याणाचा दृष्टीकोन बाळगून पुढे वाटचाल करत आहे : पंतप्रधान
Posted On:
21 DEC 2024 8:09PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतमधील शेख साद अल - अब्दुल्ला या क्रीडा संकुलात आयोजित 'हाला मोदी' या विशेष कार्यक्रमात मोठ्या संख्येने आलेल्या, कुवेतमध्ये स्थायिक भारतीय समुदायाला संबोधित केले. कुवेतमधील तिथल्या समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कुवेतमधील भारतीय समुदायाने अनपेक्षित अशा आपुलकीने आणि उत्साहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. जमलेल्या या जन समुदायाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. भारत आणि कुवेत या दोन्ही देशांमधले संबंध इथल्या भारतीय समुदायाने अधिक गहीरेपणाने समृद्ध केले आहेत, आणि इथे स्थायिक असलेले भारतीय नागरिक दोन्ही देशांमधील संबंधांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात अधोरेखीत केली. कुवेतचे महामहिम अमीर यांनी दिलेल्या आमंत्रणाबद्दलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनातून आभार मानले. या दोन्ही देशांमध्ये जुन्या काळापासून असलेली मैत्री अधिक दृढ आणि मजबूत करण्यासाठी तब्बल 43 वर्षांनंतर एक भारतीय पंतप्रधान कुवेतला भेट देत असल्याची बाबही त्यांनी आपल्या संबोधनातून नमूद केली.
कुवेतमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाने कुवेतच्या विकासासाठी घेतलेली मेहनत, बजावलेले कर्तृत्व आणि दिलेल्या योगदानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. या गोष्टीची दखल इथल्या स्थानिक सरकारांनी आणि समाजानेही घेतली आहे, याचाही त्यांनी आपल्या संबोधनात आवर्जून उल्लेख केला. इथे स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतच्या नेतृत्वाचे आभार मानले. कुवेत आणि आखाती प्रदेशातील इतर देशांमध्ये काम करत असलेल्या भारतीय कामगारांना मदत करण्याबात भारत सरकारची दृढ वचनबद्धताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनातून ठळकपणे अधोरेखीत केली. या मुद्यावर बोलताना त्यांनी ई - मायग्रेट पोर्टल सारख्या सरकारने हाती घेतलेल्या तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
पंतप्रधानांनी भारताचा ‘विश्वबंधुत्वाचा’ म्हणजेच जगाशी मित्रत्वाचा दृष्टीकोन विशद केला. त्यांनी भारताची वेगाने झालेली प्रगती व बदल; विशेषत्वाने तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि शाश्वतता या क्षेत्रात झालेल्या प्रगतीबद्दल सविस्तर सांगितले. जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासह भारत वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात जगाचे नेतृत्व करत आहे. स्टार्ट अप उद्योगांच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि जगभरातला सर्वाधिक डिजिटली कनेक्टेड देश बनला आहे. वित्तीय समावेशन, महिला केंद्रित विकास व सर्वसमावेशक विकास यामधील यशाचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. विकसित भारत आणि नवा कुवेत या दोन्ही देशांच्या समान आकांक्षांविषयी बोलताना, भारत आणि कुवेत यांच्याकडे एकत्र काम करण्यासाठीच्या असंख्य संधी असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. भारताची कौशल्य क्षमता व नाविन्यपूर्ण कल्पना दोन्ही देशांमधील भागीदारीला वृद्धींगत करतील असे पंतप्रधान म्हणाले.
भारतात जानेवारी 2025 मध्ये होणारा कुंभमेळा आणि प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण पंतप्रधानांनी शिष्टमंडळाच्या सदस्यांना दिले.
***
M.Pange/T.Pawar/S.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2086922)
Visitor Counter : 25