पंतप्रधान कार्यालय
महान अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कपूर कुटुंबाशी साधला संवाद
राज कपूर यांनी त्याकाळी भारताची सॉफ्ट पॉवर प्रस्थापित केली होती जेव्हा हा शब्द प्रचलित देखील नव्हता: पंतप्रधान
मध्य आशियामध्ये भारतीय चित्रपटांसाठी प्रचंड संधी आहेत , त्यांचा योग्य वापर करण्याच्या दिशेने काम करण्याची गरज आहे, मध्य आशियातील नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जायला हवेत : पंतप्रधान
Posted On:
11 DEC 2024 8:47PM by PIB Mumbai
महान अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने कपूर कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हृदयस्पर्शी संवाद साधला. या विशेष मुलाखतीत राज कपूर यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदान आणि त्यांच्या चिरस्थायी वारशाचा गौरव करण्यात आला. कपूर कुटुंबीयांशी पंतप्रधानांनी दिलखुलास संवाद साधला.
राज कपूर यांच्या कन्या रीमा कपूर यांनी राज कपूर यांच्या आगामी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने कपूर कुटुंबाला भेटण्यासाठी आपला बहुमोल वेळ दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. रीमा कपूर यांनी राज कपूर यांच्या चित्रपटातील एका गीताच्या काही ओळी ऐकवल्या आणि सांगितले की मोदी यांनी या भेटीदरम्यान कपूर कुटुंबियांना दिलेले प्रेम, जिव्हाळा आणि आदर संपूर्ण भारत पाहील. राज कपूर यांच्या महत्वपूर्ण योगदानाची प्रशंसा करून, पंतप्रधानांनी कपूर कुटुंबाचे स्वागत केले.
राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा उत्सव भारतीय चित्रपट उद्योगाच्या सुवर्ण प्रवासाची गाथा असल्याचे मोदी यांनी नमूद केले. 'नील कमल' हा चित्रपट 1947 मध्ये बनला होता आणि आता आपण 2047 च्य दिशेने आगेकूच करत आहोत आणि या 100 वर्षांतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे ते म्हणाले. मुत्सद्देगिरीच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या ‘सॉफ्ट पॉवर’ या शब्दाचा उल्लेख करून, मोदी यांनी अधोरेखित केले की राज कपूर यांनी त्याकाळी भारताची सॉफ्ट पॉवर प्रस्थापित केली होती जेव्हा हा शब्द प्रचलित देखील नव्हता. भारताच्या सेवेत राज कपूर यांचे हे मोठे योगदान आहे असे ते म्हणाले.
इतक्या वर्षांनंतरही मध्य आशियातील लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या राज कपूर यांच्यावर विशेषत: मध्य आशियावर केंद्रित एक चित्रपट बनवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी कपूर कुटुंबीयांना केले. ते पुढे म्हणाले की त्यांच्या जीवनावर राज कपूर यांचा प्रभाव होता. मध्य आशियामध्ये भारतीय चित्रपटांसाठी प्रचंड संधी आहेत , त्यांचा योग्य वापर करण्याच्या दिशेने काम करण्याची गरज आहे. मध्य आशियातील नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जायला हवेत असे मोदी यांनी कपूर कुटुंबासमोर अधोरेखित केले. आणि असा चित्रपट तयार करण्याचे आवाहन त्यांनी कुटुंबाला केले जो एक दुवा म्हणून काम करेल .
संपूर्ण जगभरातून राज कपूर यांना मिळालेले प्रेम आणि लोकप्रियतेबद्दल रीमा कपूर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राज कपूर यांना सांस्कृतिक राजदूत म्हणता येईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक राजदूत असल्याचे त्या म्हणाल्या. संपूर्ण कपूर परिवाराला पंतप्रधानांबद्दल अभिमानाची भावना असल्याचे त्यांनी सांगितले. आज जगभरात देशाची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढली असून संपूर्ण विश्वात योगाभ्यासाबद्दल होणारे विचारविनिमय हे त्याचे एक उदाहरण आहे, असे पंतप्रधान म्हणाले. इतर देशांच्या प्रमुखांबरोबर होत असलेल्या बैठकांमध्ये आपण योगाभ्यासाविषयी आणि त्याच्या महत्वाविषयी चर्चा करतो असे त्यांनी सांगितले.
संशोधन ही एक अशी मनोरंजक क्रिया आहे जे करताना शिकता शिकता आनंद मिळू शकतो असे पंतप्रधानांनी सांगितले. राज कपूर यांचे नातू अरमान जैन यांनी राज कपूर यांच्याविषयी संशोधन करून चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले, या संशोधनामुळे जैन यांना त्यांच्या आजोबांचा जीवन प्रवास जगण्याची संधी मिळाली, असे ते म्हणाले.
चित्रपटांच्या सामर्थ्याची आठवण करून देताना पंतप्रधानांनी एक घटना सांगितली. तत्कालीन जनसंघ पक्षाला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता, त्यावेळी या पक्षाचे नेते नवी दिल्लीत राज कपूर यांचा फिर सुबह होगी हा चित्रपट बघायला गेले होते. या पक्षाने आज खरोखर नवीन पहाट पहिली आहे, अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली. चीनमध्ये वाजवल्या जाणाऱ्या एका गाण्याचे रेकॉर्डिंग ऋषी कपूर यांना पाठवल्याचा एक प्रसंग पंतप्रधानांनी सांगितला ज्यामुळे ऋषी कपूर यांना खूप आनंद झाला होता, असे ते म्हणाले.
राज कपूर यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान आणि वारसा साजरा करण्यासाठी कपूर कुटुंब येत्या 13, 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी एक सोहळा आयोजित करणार असल्याचे रणबीर कपूर यांनी पंतप्रधानांना सांगितले. या सोहळ्यासाठी केंद्र सरकार, एन एफ डी सी आणि एन एफ ए आय यांनी केलेल्या सहकार्याबद्दल रणबीर कपूर यांनी आभार मानले. आपल्या कुटुंबाने राज कपूर यांचे 10 चित्रपट दिले असून त्यांचे दृकश्राव्य आणि दृश्य पुनर्संचयित केले आहेत. हे चित्रपट संपूर्ण भारतातील सुमारे 40 शहरांमधील 160 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केले जातील. या महोत्सवातील प्रीमियर शो 13 डिसेंबर रोजी मुंबईत होणार असून त्यासाठी संपूर्ण चित्रपट उद्योगाला आमंत्रित केल्याचे रणबीर यांनी सांगितले.
***
SonalT/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2083632)
Visitor Counter : 12