शिक्षण मंत्रालय
सातवी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धा 11 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार
Posted On:
06 DEC 2024 5:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2024
सातवी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन (SIH) स्पर्धा 11 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार असून देशभरातील 51 केंद्रांवर ती आयोजित होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. एसआयएच अर्थात स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हा देशव्यापी उपक्रम, आपल्याला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या काही समस्यांवरील तोडगे शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना एक मंच उपलब्ध करून देणारा आणि अशा प्रकारे त्यांच्यात उत्पादन नवोन्मेष आणि समस्यांचे निराकरण करण्याची मानसिकता निर्माण करणारा आहे. यापूर्वीच्या स्पर्धांप्रमाणेच विद्यार्थ्यांचे संघ मंत्रालय/विभाग/उद्योग यांनी दिलेल्या समस्यांवर उपाय शोधण्याचे काम करतील किंवा दिलेल्या 17 विषयांपैकी कोणत्याही एकावर विद्यार्थी नवोन्मेष श्रेणीत आपल्या कल्पना सादर करतील.
एसआयएच 2024 साठी 54 मंत्रालये, विभाग, राज्य सरकारे, सार्वजनिक उपक्रम आणि उद्योगांकडून 250 पेक्षा जास्त समस्या पाठवण्यात आल्या आहेत. यावर्षी संस्था स्तरावर अंतर्गत हॅकॅथॉन्समध्ये गेल्या वर्षीच्या 900 च्या तुलनेत 2247 म्हणजे तब्बल 240% उल्लेखनीय वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षीची ही स्पर्धा आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा आहे.एसआयएच 2024 मध्ये संस्था स्तरावर 86,000 पेक्षा जास्त संघ सहभागी झाले आहेत आणि सुमारे 49,000 विद्यार्थी संघांची( प्रत्येकी 6 विद्यार्थी आणि दोन मार्गदर्शकांचा समावेश असलेले) राष्ट्रीय स्तरावरील फेरीसाठी या संस्थांकडून शिफारस करण्यात आली आहे. एसआयएच ची महाअंतिम फेरी देखील विविध मंत्रालये/विभाग आणि विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी,शिक्षक यांच्यात खुला संवाद घडवून आणणारा एक मंच म्हणून काम करेल, जी गोष्ट अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी प्रोत्साहनकारक देखील आहे.
यामध्ये निर्धारित करण्यात आलेली आणि त्यावर उपाय शोधण्यात येणार असलेली आव्हाने राष्ट्रीय महत्त्वाच्या आणि प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांशी जोडलेल्या 17 प्रमुख विषय/ कल्पनांशी संबंधित आहेत. यामध्ये आरोग्यनिगा, पुरवठा साखळी आणि मालवाहतूकव्यवस्थापन, स्मार्ट तंत्रज्ञान, वारसा आणि संस्कृती, शाश्वतता, शिक्षण आणि कौशल्य व्यवस्थापन, पाणी, कृषी आणि अन्न, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
भारताच्या नवोन्मेष परिदृश्यावर एसआयएचने अतिशय व्यापक प्रभाव निर्माण करून विद्यार्थी आणि व्यावसायिकांना वास्तविक विश्वातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्षम केले आहे. हे यश सुनिश्चित करण्यामध्ये एसआयएच ऍलुम्नी नेटवर्क या अतिशय योग्य पद्धतीने रचना केलेल्या (https://alumni.mic.gov.in/) या पोर्टलची मध्यवर्ती भूमिका आहे, ज्यावर अतिशय सहजतेने माहिती देणाऱ्या यशोगाथा अपलोड करण्यात आल्या आहेत ज्यामधून परिवर्तनकारी परिणामांचे दर्शन घडते. आतापर्यंत एसआयएच ऍलुम्नीने 100 पेक्षा जास्त स्टार्ट अप्स स्थापन केले आहेत ज्यांचे अतिशय भक्कम सामाजिक पैलू आहेत.
Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2081544)
Visitor Counter : 85
Read this release in:
Odia
,
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada