माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 4

प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्या हीच माझी ऊर्जा आहे: 55 व्या इफ्फी महोत्सवातील संवाद सत्रात तामिळ अभिनेता शिवकार्तिकेयन


इफ्फी महोत्सवात तामिळ अभिनेत्याने उलगडला आपला जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाचा प्रवास

मुक्त पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या, पण घरट्याकडे माघारी या: शिवकार्तिकेयन याचे तरुणांना आवाहन

#IFFIWood, 23 नोव्‍हेंबर 2024

 

स्वागतानंतर त्याने प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहात प्रवेश केला, आणि गोव्यामधील कला अकादमीचे सभागृह प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात दुमदुमले. तामिळ सुपरस्टार शिवकार्तिकेयन याची पडद्यावरील आणि पडद्या बाहेरील एन्ट्री ही अशीच साजरी होते.

सर्वसामान्य पार्श्वभूमीमधून आलेल्या शिवकार्तिकेयन याचा तामिळ सिनेमाचा सुपरस्टार बनण्या पर्यंतचा प्रवास हा जिद्द, ध्यास आणि चिकाटीची कथा आहे.

55 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर हिच्या बरोबर आयोजित संवाद सत्रात या कलाकाराने आपली  कारकीर्द, प्रेरणा, आणि जीवनाचा प्रवास उलगडला.

"सुरुवातीपासूनच, सिनेमा हाच माझा ध्यास होता, आणि मला नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे होते", शिवकार्तिकेयन म्हणाला. “म्हणून, मी टेलिव्हिजन अँकरिंगपासून सुरुवात केली, ज्या बाबींनी  मला मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्याची संधी दिली आणि त्यांचा मी अत्यंत उत्कटतेने पाठपुरावा केला.”

मिमिक्री आर्टिस्ट म्हणून आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना शिवकार्तिकेयन म्हणाला, “मी अभियांत्रिकी महाविद्यालयातील माझ्या प्राध्यापकांची नक्कल करायचो. नंतर, जेव्हा मी त्यांची माफी मागितली, तेव्हा त्यांनी मला प्रोत्साहन दिले आणि सांगितले की मी या प्रतिभेला योग्य दिशेने वळवायला हवे.”

वडिलांचे अकाली निधन ही आयुष्याला वळण देणारी घटना ठरली, असं त्या अभिनेत्यानं उघड केलं. “माझ्या वडिलांच्या निधनानंतर, मी जवळजवळ नैराश्यात गेलो होतो. त्यातून बाहेर काढले ते माझ्या कामाने आणि माझ्या प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या टाळ्या आणि शिट्ट्या हे माझ्यासाठी उपचार आणि ऊर्जा ठरले,”  असे सांगून त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय चाहत्यांच्या प्रेम आणि समर्थनाला दिले.

खुशबू सुंदर यांनी त्याच्या दृढनिश्चयाचे आणि प्रामाणिकपणाचे कौतुक करून, तेच त्याच्या आयुष्याचा मोठा आधारस्तंभ असल्याचे म्हटले. त्याला दुजोरा देत शिवकार्तिकेयन पुढे म्हणाला, “ लाखों लोकांमध्ये वेगळे उठून दिसण्याची माझी इच्छा राहीली असली तरीही सामान्य माणसाशी निगडीत राहिल्याची भावना असते. आयुष्यात खूप अडथळे आले, पण एखाद्याने आपल्या आवडीचे अनुसरण केल्यास त्यावर मात करण्यास मदत होते. एक वेळ अशीही आली जेव्हा मला सगळं सोडून द्यावे वाटत होते, पण माझ्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे माझी वाटचाल सुरू राहिली.”

मिमिक्री कलाकार ते दूरचित्रवाणीचा समालोचक आणि आता तामिळ चित्रपटांतील सर्वात प्रसिद्ध अभिनेता, शिवकार्तिकेयन अनेक भूमिका निभावतो. त्याने पार्श्वगायक, गीतकार आणि निर्माता म्हणून प्रसिद्धी, प्रशंसा मिळवली आहे. त्याच्या कारकीर्दीच्या निवडीबद्दल बोलताना, त्याने सांगितले, “कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात, माझ्याकडे येणारे प्रत्येक काम स्वीकारले. पण आता, मला असं वाटतं की कथा मला निवडतात.” त्याने आता तो अर्थपूर्ण भूमिका कशा निवडतो यासाठी डॉक्टर, डॉन आणि अगदी अलीकडचा अमरान सारख्या चित्रपटांचा उल्लेख केला. ज्यामध्ये त्याने वास्तव आयुष्यातले युद्ध नायक मुकुंद वरदराजन यांची भूमिका साकारली होती.

विनोद हा साधन म्हणून वापर करण्याविषयी बोलताना, शिवकार्तिकेयन याने "दूरचित्रवाणी ते चित्रपट हे संक्रमण करणे कठीण होते. छोटा पडता असो किंवा मोठा पडदा, प्रेक्षकांना आनंद मिळतोय हे लक्षात आल्यावर विनोदाला माझे कवच बनवले.” अशी टिप्पणी केली.  

तरूण पिढीसाठी बोलताना त्याने सहजपणे सांगितले, “मुक्त पक्ष्याप्रमाणे विहार करा मात्र फिरून नेहमी आपल्या घरट्याकडे परत या. माझ्यासाठी माझे कुटुंबच माझे घरटे आहे आणि तेच आपल्याला पाय जमिनीवर राहण्यासाठी आवश्यक आहे हा मला विश्वास वाटतो. आपल्या पालकांना आपल्यासाठी सर्वोत्तम गोष्टी हव्या असतात.” 

हे सत्र म्हणजे लाखों लोकांच्या मनात घर करून राहिल अशी कथा असलेल्या विलक्षण प्रतिभेचा उत्सव ठरले. मध्यमवर्गीय घरात संगोपनापासून तामिळ चित्रपटांच्या शिखरापर्यंतचा शिवकार्तिकेयनचा हा प्रवास जिगीषा, लवचिकता आणि स्वप्नांच्या सामर्थ्याची प्रेरक कहाणी ठरली आहे.   

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Rajshree/Vijayalaxmi/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076388) Visitor Counter : 12