माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रसार भारतीचा वेव्हज हा ओटीटी प्लॅटफॉर्म कुटुंबाला एकत्रितपणे पाहता येण्याजोगे मनोरंजन उपलब्ध करेलः प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सिंग सेहगल
वेव्हजमध्ये भारतीय प्रेक्षकांसाठी आणि ज्यांना आपल्या भारतीय मूळासोंबत जोडलेलं राहायचं आहे त्यांच्यासाठी माहिती आणि आशय उपलब्ध आहेतः प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी
फौजी-2 त्या लोकांच्या जीवनाचे दर्शन घडवतो जे भारताचे प्रतिनिधित्व करतात आणि रक्षण करतात.
वेव्हज आणि डीडीची नवी भेट ‘काकभुशुण्डी रामायणा’ जगभरातील रामायणाच्या विविध आवृत्त्यांवरील संशोधनावर आधारित आहे
एखाद्याचा कार्यक्रम डीडीच्या मंचावर प्रदर्शित होणे हा एक बहुमान आहेः फौजी-2 चे निर्माते संदीप सिंग
डीडी चे सर्व शोज हे त्यांच्या स्वतःसाठी ब्रँड्स आहेतः अभिनेता व्हिकी जैन
#IFFIWood, 21 नोव्हेंबर 2024
प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सिंग सहगल यांनी आज वेव्हज या ओटीटी मंचाविषयी वार्ताहर परिषदेत माहिती दिली. प्रसार भारतीचा एक ओटीटी मंच असावा अशी गरज वाटत होती त्यामुळे वेव्हज हा ओटीटी मंच सुरू करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली.
“एक राष्ट्रीय प्रसारणकर्ते म्हणून, आमचे हे कर्तव्य आहे की कुटुंबाला एकत्र बसून पाहाता येईल, असे मनोरंजन सर्वांसाठी उपलब्ध करणे. त्याशिवाय बातम्या, गेम्स, चालू घडामोडींवरील कार्यक्रम देखील नागरिकांना उपलब्ध करून दिले पाहिजेत,” असे त्यांनी सांगितले. भारताचा समृद्ध वारसा आणि इतिहास यांचे दर्शन या मंचावर घडेल. वेव्हज ओटीटी डाऊनलोड करण्यासाठी आणि त्यावरील काही मोजके प्रिमिअर कार्यक्रम वगळता इतर कार्यक्रम पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

सध्याच्या काळात मनोरंजनपर प्रसारण होत असलेल्या सर्व व्यासपीठांवर सार्वजनिक प्रसारणकर्त्यांचेही अस्तित्व असणे गरजेचे असल्याचे ठाम मत प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी यावेळी व्यक्त केले. सार्वजनिक प्रसारणकर्ते या नात्याने असा व्यासपीठांच्या माध्यमातून आपल्या या प्रचंड मोठ्या देशातील प्रेक्षकांसाठी माहिती आणि आशय सामग्री उपलब्ध करून देणे हे आपली जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. हे माध्यम भारतातील सर्वांसाठी उपलब्ध असेल आणि, जे लोक आपल्या मुळापासून दूरावले आहेत, पण ज्यांना आपल्या संस्कृतीशी जोडून राहण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी हे माध्यम खूप उपयुक्त ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. यासोबतच फौजी 2.0 ही मालिका देखील वेव्ह या नव्या व्यासपीठावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितले.
वेव्हज वर फौजी 2.0 उपलब्ध
1980 च्या दशकात शाहरुख खान यांची भूमिका असलेली फौजी ही दूरचित्रवाणी मालिका खूप गाजली होती. फौजी 2.0 हे याच दूरचित्रवाणी मालिकेचे आधुनिक काळातील रुपांतर असणार आहे. निर्माते संदीप सिंग यांच्यासह गौहर खान, विकी जैन या प्रमुख कलाकरांसह या मालिकेतील इतर कलाकार आणि चमू देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. अभिनेत्री गौहर खान यांनीही यावेळी या नव्या मालिकेबद्दलच्या आपल्या भावना आणि मते व्यक्त केली. फौजी 2 या मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व आणि संरक्षण करणाऱ्या व्यक्तिमत्वांचे जगणे मांडले असल्याचे त्यांनी सांगितले. हे सगळ्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात काय घडते हे या मालिकेत पाहायला मिळेल असे त्या म्हणाल्या. यावेळी अभिनेता विकी जैन यांनी दूरदर्शन बद्दलच्या आपल्या भावना आणि मते व्यक्त केली. दूरदर्शनचे सर्व कार्यक्रम म्हणजे स्वत:च एक प्रकारचे ब्रँड असल्याचे म्हणत त्यांनी प्रशंसा केली. आपल्यापैकी अनेकांनी कोरोना महामारीच्या काळात आपल्या कुटुंबासोत दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत या मालिका पाहिल्याची आठवण त्यांनी करून दिली. दूरदर्शनचा प्रेक्षकवर्ग असलेल्यांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे की ज्यांच्याकडे केबल टीव्हीची सुविधाही उपलब्ध नाही ही बाब त्यांनी आवर्जून नमूद केली. मेरी कोम, अलिगढ, सरबजीत अशा प्रख्यात चित्रपटांचे निर्माते असलेले संदीप सिंग यांनीही उपस्थितांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. दूरदर्शनसारख्या व्यासपीठावर आपला एखादा कार्यक्रम प्रसारीत होणे ही सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
डीडी नॅशनल वर सुरू झालेला 'काकभुशुण्डी रामायण' हा नवीन कार्यक्रमही वेव्ह्ज वर उपलब्ध असणार
भारतातील सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते रामानंद सागर यांचे नातू शिव सागर यांनी 55 व्या इफ्फीच्या निमित्ताने वेव्ह्ज (WAVES) विषयी भरवलेल्या पत्रकार परिषदेत भाग घेतला. 'ही दीर्घ आणि अविस्मरणीय मालिका प्रेक्षकांची मने जिंकून घेईल', असा विश्वास व्यक्त करत त्यांनी या मालिकेबद्दलची भूमिका मांडली. 'काकभुशुण्डी रामायण' मालिकेच्या निर्मितीसाठी रामायणाच्या जगभरातील 350 हून अधिक आवृत्त्यांवर संशोधन करून, सर्वोत्तम कथांची निवड करून त्यांची नवीन पद्धतीने मांडणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पौराणिक व्यक्तिरेखांचे अत्यधिक आधुनिकीकरण प्रेक्षकांना पटणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. "रामायणासारख्या मालिकेत भक्तिरस असला पाहिजे हे लक्षात घेऊन त्यात भक्तिगीते आणि चौपाया अंतर्भूत केल्या आहेत", असे त्यांनी 'काकभुशुण्डी रामायण' मालिकेचे निर्माते या नात्याने सांगितले. वेव्ह्ज बद्दल बोलताना शिव सागर म्हणाले, येथे भारताच्या ऐतिहासिक वैभवाला सुयोग्य मंच मिळेल. भारतात प्रचंड प्रमाणात सकारात्मक आशयनिर्मिती होत असल्याचे दिसून येते असे त्यांना वाटते.
वेव्ह्ज ओटीटी मंच
गोव्यात 55 व्या इफ्फीच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, प्रसारभारती या सरकारी प्रसारमाध्यमाच्या वेव्ह्ज या ओटीटी (Over The Top) मंचाचा प्रारंभ केला. या मंचाच्या प्रारंभामुळे, दूरदर्शन या भारताच्या सार्वजनिक प्रसारकाने, डिजिटल स्ट्रीमिंग सेवांची वाढती गरज लक्षात घेऊन त्या अवकाशात भरारी घेतली आहे. भूतकाळातील लोकप्रिय कार्यक्रम आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रवाहात मिसळून पुढे नेण्यासाठी या मंचाच्या माध्यमातून अभिजात आशय आणि समकालीन कार्यक्रम यांचा संगम साधला आहे.
एक मोठा सर्वसमावेशक ओटीटी मंच म्हणून वेव्ह्ज पदार्पण करत आहे. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा समावेशी भारताचा आशय यात मांडला जाणार आहे. हिंदी, इंग्लिश, बंगाली, मराठी, कन्नड, मल्याळम, तेलगू, तमिळ, गुजराती, पंजाबी, असामी अशा 12 पेक्षा अधिक भाषांमध्ये यावरील कार्यक्रम प्रसारित होतील. तसेच यात व्हिडिओ ऑन डिमांड, फ्री टू प्ले गेमिंग, रेडिओ स्ट्रीमिंग, लाईव्ह टीव्ही स्ट्रीमिंग, 65 लाईव्ह वाहिन्या तसेच व्हिडिओ आणि गेमिंग कंटेंटसाठी अनेक ऍप इन ऍप इंटिग्रेशन या सुविधा यामध्ये मिळू शकतील. ओएनडीसी समर्थित इ वाणिज्य मंचाच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी देखील 'वेव्ह्ज'वर करता येईल.
वेव्ह्ज बद्दल अधिक माहितीसाठी हे वाचा: https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2075273
* * *
PIB IFFI CAST AND CREW | S.Kane/Shailesh/Tushar/Jai/Darshana | IFFI 55
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2075666)