पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली चिलीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
Posted On:
20 NOV 2024 11:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी चिली प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांची ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी -20 शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. ही त्यांची पहिली भेट होती.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रम निश्चित केले. पंतप्रधानांनी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ, नवीकरणीय ऊर्जा तसेच संरक्षण क्षेत्रातील भारताच्या प्राबल्यावर प्रकाश टाकला, तसेच या क्षेत्रांमध्ये चिलीसोबत आपला अनुभव सामायिक करण्यासाठी भारताची तयारी दर्शवली.
दोन्ही बाजूंनी महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्रात सहकार्य वाढवण्याला आणि परस्पर लाभासाठी एकत्र काम करण्याला सहमती दर्शविली. भारत-चिली प्राधान्य व्यापार कराराच्या (PTA) विस्तारानंतर व्यापार संबंधांमध्ये सतत वाढ होत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केल. तसेच, प्राधान्य व्यापार कराराचा आणखी विस्तार करण्यासाठी संधी शोधण्याचे मान्य केले. चिलीच्या उद्योग जगताला मदत करण्यासाठी उच्च दर्जाची आणि परवडणारी औषधी उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, ऑटोमोबाईल्स आणि रसायने पुरवण्यात भारताला नेहमीच स्वारस्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
दोन्ही नेत्यांनी शिक्षण, संस्कृती आणि पारंपरिक ज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याच्या शक्यतांवरही चर्चा केली. यासोबतच, दोन्ही नेत्यांनी वारंवार संपर्कात राहण्याचे आणि सध्याचे द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत करण्यावर सहमती दर्शवली.
* * *
G.Chippalkatti/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2075376)
Visitor Counter : 9