माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 3

इफ्फी 2024 ने ‘भारतीय चित्रपटांमधील सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ श्रेणीसाठी अधिकृत निवड केली जाहीर


55 व्या इफ्फी मध्ये भारतीय दिग्दर्शकांच्या पदार्पणातील 5 चित्रपट स्पर्धेत उतरणार

 #IFFIWood,4 नोव्हेंबर 2024


देशातील नवीन आणि तरुण प्रतिभावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) ची 55 वी आवृत्ती तुमच्यासाठी एक नवीन पुरस्कार श्रेणी घेऊन येत आहे : 'भारतीय चित्रपटांमधील सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक' ही श्रेणी संपूर्ण भारतातील नवीन दृष्टिकोन, वैविध्यपूर्ण कथा आणि नाविन्यपूर्ण सिनेमॅटिक शैली अधोरेखित करणारे पाच उल्लेखनीय पदार्पण चित्रपट प्रदर्शित करेल. 20-28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या इफ्फी ने भारतीय फीचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाची अधिकृत निवड जाहीर केली.

भारतीय फीचर फिल्म विभागातील सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक : अधिकृत निवड

क्र./चित्रपटाचे मूळ शीर्षक/ दिग्दर्शक/ भाषा

1. बूंग / लक्ष्मीप्रिया देवी/ मणिपुरी

2. घरत गणपती/ नवज्योत बांदिवडेकर/ मराठी

3. मिक्का बन्नाडा हक्की (वेगळ्या पंखांचा पक्षी)/ मनोहर के/ कन्नड

4. रझाकार (हैदराबादचा मूक नरसंहार)/ येटा सत्यनारायण/ तेलुगु

5. थनुप (थंडी)/ रागेश नारायणन/ मल्याळम

यापैकी प्रत्येक चित्रपट भारताच्या सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेवर प्रकाश टाकणारा तसेच अनोखे कथानक आणि प्रादेशिक दृष्टिकोन घेऊन येतो.

समारोप समारंभात प्रदान करण्यात येणार पुरस्कार

गोव्यातील 55 व्या इफ्फी महोत्सवात  या अंतिम पाचमध्ये निवड झालेल्या चित्रपटांचे मूल्यांकन ज्युरी कडून केले जाईल आणि 28 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या समारोप समारंभात भारतीय फीचर फिल्म विभागातील  सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार  विजेत्याची घोषणा केली जाईल.

भारतातील चित्रपट आणि कला समुदायातील प्रख्यात व्यावसायिकांचा समावेश असलेल्या पूर्वावलोकन समितीने 117 पात्र प्रवेशिकांमधून या पाच चित्रपटांची निवड केली आहे.

उदयोन्मुख भारतीय प्रतिभेवर प्रकाश टाकणे

या वर्षी, इफ्फी, चित्रपट उद्योगात नवीन दृष्टीकोनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पारंपरिक कथाकथनाच्या सीमा ओलांडणाऱ्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकांच्या भारतीय चित्रपटांवर लक्ष केंद्रित करत आहे. या पदार्पणाच्या चित्रपटांना सन्मानित करून, भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवून देणे आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्तीत जास्त  प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणे हे इफ्फी चे उद्दिष्ट आहे.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशन (FIAPF) द्वारे स्पर्धात्मक फीचर फिल्म श्रेणीत मान्यताप्राप्त जगभरातील 14 चित्रपट महोत्सवांपैकी एक असणारा, इफ्फी म्हणजे भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी  एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया वाचा: https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2054935

55 व्या इफ्फी बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच यात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्यासाठी कृपया: www.iffigoa.org. या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.


PIB Mumbai|S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 




(Release ID: 2070637) Visitor Counter : 74