पंतप्रधान कार्यालय
टाटानगर, झारखंडमधील विविध प्रकल्पांच्या पायाभरणी/उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
Posted On:
15 SEP 2024 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2024
झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार जी, माझे मंत्रिमंडळ सहकारी शिवराज सिंह चौहान जी, अन्नपूर्णा देवी जी, संजय सेठ जी, खासदार विद्युत महातो जी, राज्य सरकारचे मंत्री इरफान अन्सारी जी, झारखंड भाजपा अध्यक्ष बाबूलाल मरांडी जी, संपूर्ण झारखंड विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष सुजीतो जी, आमदार, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो.
सर्वप्रथम मी बाबा वैद्यनाथ आणि बाबा बासुकीनाथ यांच्या चरणी नतमस्तक होतो. भगवान बिरसा मुंडा यांच्या शूर भूमीलाही मी सलाम करतो. आजचा दिवस अतिशय शुभ आहे. यावेळी झारखंडमध्ये कर्म नावाच्या निसर्गपूजेच्या सणाचा उत्साह आहे. आज सकाळी मी रांची विमानतळावर पोहोचलो तेव्हा एका बहिणीने कर्म सणाचे प्रतीक असलेल्या या जावाने माझे स्वागत केले. या सणात बहिणी आपल्या भावांच्या सुखाची कामना करतात. मी झारखंडच्या जनतेला कर्मपर्व निमित्त शुभेच्छा देतो. आज या शुभदिनी झारखंडला विकासाचे नवे वरदान मिळाले आहे. 6 नवीन वंदे भारत गाड्या, 6.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रेल्वे प्रकल्प, कनेक्टिव्हिटी आणि प्रवासी सुविधांचा विस्तार आणि या सर्वांसह झारखंडमधील हजारो लोकांना पंतप्रधान-आवास योजनेअंतर्गत त्यांची कायमस्वरूपी घरे मिळतील... मी झारखंडच्या या सर्व विकास कामांसाठी जनता जनार्दनचे अभिनंदन करतो. या वंदे भारत गाड्यांशी जोडल्या जाणाऱ्या इतर राज्यांचेही मी अभिनंदन करतो.
मित्रहो,
एक काळ असा होता जेव्हा आधुनिक सुविधा आणि आधुनिक विकास देशातील काही शहरांपुरता मर्यादित होता. आधुनिक पायाभूत सुविधा आणि विकासाच्या बाबतीत झारखंडसारखे राज्य मागे राहिले. पण, ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने देशाची विचारसरणी आणि प्राधान्यक्रम बदलले आहेत. आता देशाची प्राथमिकता देशातील गरीब आहे. आता देशाची प्राथमिकता ही देशातील आदिवासी जनता आहे. आता देशाचा अग्रक्रम हा देशातील दलित, वंचित आणि मागासलेला समाज आहे. आता देशाची प्राथमिकता महिला, तरुण आणि शेतकरी आहे. त्यामुळेच आज इतर राज्यांप्रमाणे झारखंडमध्येही वंदे भारतसारख्या अद्ययावत रेल्वे आणि आधुनिक पायाभूत सुविधा मिळत आहेत.
मित्रहो,
आज वेगवान विकासासाठी प्रत्येक राज्याला, प्रत्येक शहराला वंदे भारतसारखी जलदगती रेल्वे हवी आहे. काही दिवसांपूर्वी मी उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांसाठी 3 नवीन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. आणि आज टाटानगर ते पाटणा, टाटानगर ते ब्रह्मपूर, टाटानगर ते हावडा, भागलपूर ते हावडा मार्गे दुमका, देवघर ते वाराणसी आणि गया ते हावडा मार्गे कोडरमा-पारसनाथ-धनबाद अशी वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू झाली आहे. आणि स्टेजवर हा गृहवाटपाचा कार्यक्रम चालू असतानाच मी या सर्व वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला आणि त्या त्यांच्या गंतव्यस्थानी निघाल्या. पूर्व भारतातील रेल्वे जोडणीच्या विस्तारामुळे या संपूर्ण प्रदेशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. या गाड्यांमुळे व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे येथील आर्थिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही गती मिळेल. तुम्हा सर्वांना माहिती आहे... आज देशभरातून आणि जगभरातून लाखो भाविक काशीला येतात. काशी ते देवघर या मार्गावर वंदे भारत गाड्यांची सोय होणार असल्याने बाबा वैद्यनाथ यांच्या दर्शनासाठीही मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल. टाटानगर हे देशातील इतके मोठे औद्योगिक केंद्र आहे. वाहतुकीच्या चांगल्या सुविधांमुळे येथील औद्योगिक विकासाला आणखी गती मिळेल. पर्यटन आणि उद्योगांना प्रोत्साहन दिल्याने झारखंडमधील तरुणांसाठी रोजगाराच्या संधीही वाढतील.
मित्रहो,
वेगवान विकासासाठी आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधाही तितक्याच आवश्यक आहेत. म्हणूनच आज इथे अनेक नवे प्रकल्पही सुरु करण्यात आले आहेत. मधुपूर बायपास लाईनचे भूमिपूजन करण्यात आले आहे. हा मार्ग तयार झाल्यानंतर हावडा-दिल्ली मुख्य मार्गावर रेल्वे गाड्यांचा खोळंबा होणार नाही. बायपास लाईन सुरु झाल्यानंतर गिरिडीह आणि जसीडीह यातला प्रवासाचा वेळ कमी होईल. आज हजारीबाग टाऊन कोचिंग डेपोचेही भूमिपूजन झाले आहे. यामुळे अनेक नव्या रेल्वे सेवा सुरु करणे सुलभ होईल.कुरकुरा ते कनारोआ रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाल्याने झारखंड मध्ये रेल्वे कनेक्टीव्हिटी अधिक भक्कम झाली आहे. या मार्गाचे दुपदरीकरण काम पूर्ण झाल्याने आता पोलाद उद्योगाशी संबंधित मालाची चढ-उतार आणखी सुलभ होईल.
मित्रहो,
झारखंडच्या विकासासाठी केंद्र सरकारने राज्यात गुंतवणूकही वाढवली आहे आणि कामाचा वेगही वाढवला आहे. या वर्षी झारखंडमधल्या रेल्वे पायाभूत सुविधांसाठी 7 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक बजेट देण्यात आले आहे. 10 वर्षांपूर्वीच्या बजेटशी याची तुलना केल्यास तर यात 16 पट वाढ झाली आहे. रेल्वे बजेट वाढवल्याचा परिणाम आपण पाहतच आहात, आज राज्यात नवे रेल्वे मार्ग, दुपदरीकरण आणि स्थानके आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याचे काम झपाट्याने होत आहे. रेल्वे जाळ्याचे 100 टक्के विद्युतीकरण झालेल्या राज्यांमध्ये आज झारखंडही समाविष्ट झाले आहे. अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत झारखंडच्या 50 हून अधिक रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येत आहे.
मित्रहो,
आज झारखंड मधल्या हजारो लाभार्थींना, पक्क्या घरासाठी पहिला हप्ता जारी करण्यात आला आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत हजारो लोकांना पक्की घरे देण्यात आली आहेत.घराबरोबरच शौचालय,पाणी, वीज, गॅस जोडण्याही देण्यात आल्या आहेत.जेव्हा एका कुटुंबाला आपले घर मिळते तेव्हा त्याचा आत्मसन्मान वाढतो... सद्य स्थिती सुधारण्याबरोबरच आपल्या उत्तम भविष्याचा तो विचार करू लागतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणतेही संकट आले तरी आपल्याकडे आपले एक घर तर आहे असा त्याचा विचार असतो आणि झारखंडच्या लोकांना केवळ पक्की घरे मिळत आहेत असे नव्हे तर... पीएम आवास योजनेतून गावे आणि शहरांमध्ये मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत.
मित्रहो,
2014 नंतर देशाच्या गरीब,दलित,वंचित आणि आदिवासी कुटुंबांना सक्षम करण्यासाठी अनेक मोठी पाऊले उचलण्यात आली आहेत. झारखंड सहित देशभरातल्या आदिवासी बंधू- भगिनींसाठी पीएम जनमन योजना चालवण्यात येत आहे. जे अतिशय मागास आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अशा कुटुंबांना घर,रस्ते,वीज- पाणी आणि शिक्षण देण्यासाठी आमचे अधिकारी स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत.हे प्रयत्न म्हणजे विकसित झारखंड या आमच्या संकल्पाचा भाग आहेत.आपणा सर्वांच्या आशीर्वादाने हा संकल्प नक्कीच पूर्ण होईल, याचा मला विश्वास आहे, झारखंडची स्वप्ने आम्ही साकार करू. या कार्यक्रमानंतर मी आणखी एका विशाल जनसभेत जात आहे.5-10 मिनिटात मी तिथे पोहोचेन.अतिशय मोठ्या संख्येने लोक तिथे माझी प्रतीक्षा करत आहेत.झारखंडशी संबंधित इतर विषयांवर मी तिथे सविस्तर बोलेन.मात्र मी झारखंडवासीयांची क्षमा मागू इच्छितो कारण मी रांचीला तर पोहोचलो मात्र निसर्गाने मला साथ दिली नाही म्हणून इथून हेलीकॉप्टर निघू शकत नाही.तिथे पोहोचू शकत नाही म्हणून मी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या सर्व कार्यक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण करत आहे आणि आता सार्वजनिक सभेतही मी सर्वांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मनमोकळा संवाद साधणार आहे.आपण सर्वजण इथे आलात यासाठी आपले पुन्हा एकदा खूप- खूप आभार. नमस्कार.
ST/Gajendra/Nilima/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2057109)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam