राष्ट्रपती कार्यालय
रांची येथील आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेकंडरी ॲग्रिकल्चर या संस्थेच्या शताब्दी सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती
Posted On:
20 SEP 2024 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (20 सप्टेंबर 2024) झारखंडमधील रांची येथे आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेकंडरी ॲग्रिकल्चर (एनआयएसए),या संस्थेच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहिल्या.
कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, शेतीला फायदेशीर व्यवसाय बनवण्याबरोबरच, 21 व्या शतकात शेतीसमोर आणखी तीन मोठी आव्हाने आहेत. ती म्हणजे, अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे, साधनसंपत्तीचा शाश्वत वापर आणि हवामान बदल. दुय्यम शेतीशी संबंधित उपक्रम या आव्हानांचा सामना करण्यामध्ये उपयोगी ठरू शकतात असे त्या म्हणाल्या. दुय्यम शेतीमध्ये प्राथमिक कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, तसेच मधमाशीपालन, कुक्कुटपालन, कृषी पर्यटन यासारख्या इतर कृषी-संबंधित उपक्रमांचा समावेश होतो. त्या म्हणाल्या की, दुय्यम कृषी उपक्रमांच्या माध्यमातून शेतीतील कचऱ्याचा योग्य वापर करता येईल. त्याच्यावर प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त आणि मौल्यवान वस्तू बनवता येतील. अशा प्रकारे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल.
राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतात लाखेचे उत्पादन प्रामुख्याने आदिवासी समुदाय करतो. त्यांच्या उत्पन्नाचा हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. राष्ट्रीय दुय्यम शेती संस्थेने लाख, नैसर्गिक रेझिन्स आणि डिंक यावरील संशोधन, विकास आणि त्याबरोबर त्याच्या व्यावसायिक विकासासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यामध्ये लहान स्तरावरील लाख उत्पादन केंद्रे आणि एकात्मिक लाख प्रक्रिया केंद्रांची स्थापना, लाखेवर आधारित नैसर्गिक रंगांची निर्मिती, वार्निश आणि सौदर्य प्रसाधनांचे उत्पादन, फळे, भाज्या आणि मसाल्याच्या पदार्थांचे शेल्फ-लाइफ (टिकाऊपणा) वाढवण्यासाठी लाख-आधारित कोटिंग (थर) ची निर्मिती, या उपायांचा यात समावेश विकास, याचा समावेश आहे. या सर्व उपायांमुळे आदिवासी बंधू भगिनींचे जीवनमान सुधारायला मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपती म्हणाल्या की, आजचे युग हे क्रांतिकारी तंत्रज्ञानाचे युग आहे. आपण या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यायला हवा. त्याचबरोबर आपल्याला त्यांचे दुष्परिणाम टाळावे लागतील. एनआयएसएमध्ये ऑटोमेशन आणि प्लांट अभियांत्रिकी विभाग स्थापन करण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हा विभाग रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम उपकरणांच्या विकासावर लक्ष केंद्रित करतो.
राष्ट्रपती म्हणाल्या की, एनआयएसएने लाख शेतीमध्ये चांगले काम केले आहे. पण, अजूनही अशी अनेक क्षेत्रे आहेत, ज्यात आपण आणखी प्रगती करू शकतो. उदाहरणार्थ, औषध आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगांमध्ये उच्च दर्जाच्या लाखेला मागणी आहे. भारतीय लाखेचा दर्जा, पुरवठा साखळी आणि विपणन सुधारले, तर आपले शेतकरी त्याचा देश-विदेशात पुरवठा करू शकतील आणि त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळेल.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:
S.Kakade/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057079)
Visitor Counter : 51