पंतप्रधान कार्यालय
अहमदाबाद, गुजरात येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी/उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
16 SEP 2024 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024
भारत माता चिरंजीव हो,
भारत माता चिरंजीव हो,
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सी आर पाटील, देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमाशी संबंधित सर्व राज्यपाल, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधींनो आणि इथे मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो.
कसे आहात सगळे, सर्वजण मजा करत आहेत, मला तुम्हा सर्वांची माफी मागून माझे भाषण हिंदीत करायचे आहे कारण या कार्यक्रमात इतर राज्यातील मित्रमंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.आणि आपल्या गुजरातमध्ये हिंदी बोलली जाते,खरंय ना ? ते तर चालतं नं ? बरोबर?
आज देशभरात गणेशोत्सवात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.घराघरातही गणपती विराजमान असतो.आज मिलाद-उन-नबी देखील आहे... देशाच्या विविध भागांमध्ये अनेक सण आणि कार्यक्रम साजरे केले जात आहेत.या सणासुदीच्या काळात भारताच्या विकासाचा उत्सवही सुरूच असतो. आज येथे सुमारे 8.5 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे.यामध्ये रेल्वे, रस्ते, मेट्रो… अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.गुजरातच्या अभिमानामध्ये आज आणखी एक शिरपेच जोडला गेला आहे.आज नमो भारत रॅपिड रेलही सुरू झाली आहे. भारताच्या शहरी भागातील दळणवळणासाठी हा आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे.आज गुजरातमधील हजारो कुटुंबेही त्यांच्या नवीन घरात दाखल होत आहेत.आज त्यांच्या कायमस्वरूपी घराचा पहिला हप्ताही हजारो कुटुंबांना देण्यात आला आहे. आतापासून तुम्ही नवरात्र, दसरा, दुर्गापूजा, धनत्रयोदशी, दिवाळी, सर्व सण तुमच्या नवीन घरात त्याच उत्साहाने साजरे करावे अशी माझी इच्छा आहे.तुमच्या घराचे वातावरण शुभ असू दे आणि तुमच्या स्वप्नांना नवीन उड्डाण देऊ शकेल. ज्या हजारो भगिनींच्या नावावर ही घरे नोंदणीकृत झाली आहेत त्यांचे मी विशेष अभिनंदन करतो.या सर्व विकास प्रकल्पांसाठी मी गुजरातच्या जनतेचे आणि देशवासीयांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो
उत्सवाच्या या वातावरणात एक वेदनाही आहे.यावर्षी गुजरातच्या अनेक भागात एकाच वेळी अतिवृष्टी झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर,इतक्या कमी कालावधीत एवढा मुसळधार पाऊस पडला आहे.ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रात नाही तर गुजरातच्या सुद्धा कानाकोपऱ्यात निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आपण अनेक नातेवाईक गमावले आहेत.तसेच मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे.केंद्र आणि राज्य सरकार बाधितांना शक्य ती सर्व मदत देण्याचे काम करत आहेत.ज्या सहकाऱ्यांवर उपचार सुरू आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे.
मित्रांनो,
तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मी आज पहिल्यांदाच तुमच्या सर्वांमध्ये म्हणजेच गुजरातमध्ये आलो आहे.गुजरात ही माझी जन्मभूमी आहे... गुजरातने मला जीवनातील प्रत्येक धडा शिकवला आहे. तुम्ही लोकांनी नेहमीच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे... आणि जेव्हा मुलगा आपल्या घरी येतो... जेव्हा तो त्याच्या प्रियजनांकडून आशीर्वाद घेतो... तेव्हा त्याला नवीन ऊर्जा मिळते. त्याची उमेद आणि उत्साह आणखी वाढतो.आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी आलात,हे माझे मोठे भाग्य आहे.
मित्रांनो,
तुम्हा सर्व गुजरातच्या लोकांच्या अपेक्षांचीही मला जाणीव आहे.निरनिराळ्या कोपऱ्यांतून निरोप परत परत यायचा.तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी लवकरात लवकर तुमच्यामध्ये यावे अशी तुमची इच्छा होती आणि हे अगदी स्वाभाविक होते, 60 वर्षांनंतर देशातील जनतेने नवा इतिहास रचला आहे.एका सरकारला सलग तिसऱ्यांदा देशसेवेची संधी मिळाली आहे. भारताच्या लोकशाहीसाठी ही मोठी घटना आहे आणि त्यामुळे गुजरातच्या मनात विचार यायला हवा की आपल्या नरेंद्रभाईंवर आपला हक्क आहे. त्यांनी तातडीने गुजरातला यावे. तुमची भावना बरोबर आहे.पण तुम्ही लोकांनीच मला आधी देशाची शपथ देऊन दिल्लीला पाठवले आहे.लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी तुम्हा लोकांना... देशवासियांना हमी दिली होती. मी म्हणालो होतो की, तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत देशासाठी अभूतपूर्व निर्णय घेतले जातील.गेल्या 100 दिवसात मी ना दिवस पाहिला ना रात्र, 100 दिवसांचा प्राधान्यक्रम पूर्ण करण्यासाठी मी माझी सर्व शक्ती पणाला लावली... मग तो देशात असो वा परदेशात, कुठेही, कितीही प्रयत्न करावे लागले, मी ते केले. ... कोणतीही कसूर ठेवली नाही. गेल्या 100 दिवसांत कोणत्या प्रकारची घडामोडी सुरू झाल्या हे तुम्ही पाहिले असेलच. यावेळी त्यांनी माझी चेष्टा करायला सुरुवात केली... मोदींची चेष्टा करायला सुरुवात केली... वेगवेगळे तर्क वितर्क द्यायचे... मजा घ्यायची आणि लोकांना आश्चर्य वाटायचे की मोदी काय करत आहेत? तुम्ही गप्प का आहात? खूप विनोद केले जात आहेत ... खूप अपमानास्पद आहे हे सर्व.
पण माझ्या गुजरातच्या बंधू आणि भगिनींनो,
सरदार पटेलांच्या भूमीतून जन्मलेला मुलगा.प्रत्येक चेष्टा, प्रत्येक उपहास, प्रत्येक अपमान सहन करत या मुलाने शपथ घेतली आणि 100 दिवस तुमच्या हिताचे आणि देशहिताचे धोरणे बनवण्यात आणि निर्णय घेण्यात व्यस्त होतो. आणि लोकांना हवी तितकी धमाल करू द्यायची असे ठरवले.त्यांनाही मजा येईल, घेऊ द्या मजा.आणि मी ठरवले होते की मी कोणालाच उत्तर देणार नाही.
ज्या मार्गावरून मला देश कल्याणाच्या दिशेने वाटचाल करायची आहे, कितीही प्रकारचा उपहास, कोणी कितीही हसले, कितीही चेष्टा झाली तरी मी आपल्या या मार्गावरून ढळणार नाही. आज मला आनंद आहे की हे सर्व अपमान पचवत 100 दिवसांच्या या निर्णयांमध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या, प्रत्येक वर्गाच्या कल्याणाची हमी पक्की झाली आहे.
या 100 दिवसांमध्ये 15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या योजनांवर काम सुरु झाले आहे. निवडणुकीच्या दरम्यान मी 3 कोटी नवी घरे उभारण्याची हमी देशाला दिली होती. या दिशेने झपाट्याने काम होत आहे. आज इथे या कार्यक्रमातही गुजरात मधल्या हजारो कुटुंबांना पक्के घर मिळाले आहे. काल मी झारखंड मध्ये होतो तिथेही हजारो कुटुंबांना घरे देण्यात आली.
गाव असो किंवा शहर, सर्वाना उत्तम जीवन जगता यावे यासाठी आम्ही व्यवस्था उभारणी करत आहोत. शहरी मध्यम वर्गाला घरांसाठी आर्थिक मदत देणे असो...श्रमिकांना वाजवी भावात भाड्याने चांगली घरे पुरवण्याचे अभियान असो, कारखान्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी विशेष आवास योजना आखणे असो..नोकरदार महिलांसाठी देशात नवी हॉस्टेल उभारणे असो.. सरकार यावर हजारो कोटी रुपये खर्च करत आहे.
मित्रहो,
काही दिवसांपूर्वीच गरीब आणि मध्यम वर्गाच्या आरोग्याशी निगडीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. मी आपल्याला सांगितले होते की देशात 70 वर्षांवरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या सर्वाना 5 लाख रुपयांचे उपचार मोफत मिळतील.या हमीचीही पूर्तता झाली. आता मध्यम वर्गाच्या मुला-मुलींना आपल्या आई-वडिलांच्या उपचाराची चिंता करावी लागणार नाही. आता आपला हा मुलगा याची काळजी घेईल.
मित्रहो,
या 100 दिवसात, युवकांच्या नोकऱ्या,रोजगार-स्वयं रोजगार त्यांच्या कौशल्य विकासासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. युवकांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. याचा लाभ 4 कोटीपेक्षा जास्त युवकांना होईल.कंपनी एखाद्या नव्या युवकाला पहिल्यांदा रोजगार देत असेल तर पहिल्या नोकरीच्या पहिल्या पगाराचे पैसे सरकार देईल. स्वयं रोजगार क्षेत्रात नवी क्रांती आणणारे मुद्रा कर्ज,अतिशय यशस्वी ठरले आहे. हे यश लक्षात घेऊन आधी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत होते त्यात आता वाढ करून 20 लाख रुपये करण्यात आले आहे.
मित्रहो,
देशात 3 कोटी लखपती दीदी बनवण्याचे आश्वासन मी माता-भगिनींना दिले होते. मागील वर्षांमध्ये 1 कोटी लखपती दीदी बनल्या आहेत. आपल्याला आनंद होईल की तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसात गुजरातसह संपूर्ण देशात 11 लाख नव्या लखपती दीदी बनल्या आहेत. तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातल्या शेतकऱ्यांना,आपल्या तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला, वाढलेल्या एमएसपी पेक्षाही जास्त भाव मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी विदेश तेलावरचे आयात शुल्क वाढवण्यात आले आहे.सोयाबीन आणि सुर्यफुल यासारखी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. त्याचबरोबर खाद्य तेलामध्ये देशाला आत्मनिर्भर करण्याच्या अभियानालाही बळ मिळेल. बासमती तांदूळ आणि कांदा निर्यातीवर लावलेला प्रतिबंधही सरकारने उठवला आहे. यामुळे परदेशात भारतीय तांदूळ आणि कांद्याची मागणी वाढली आहे. या निर्णयाचाही देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होईल.
मित्रहो,
गेल्या 100 दिवसात रेल्वे,रस्ते,बंदरे,विमानतळ आणि मेट्रोशी निगडीत डझनभर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याची झलक आजच्या कार्यक्रमातही दिसत आहे, व्हिडीओतही दाखवण्यात आली. गुजरात मध्ये कनेक्टीव्हिटीशी संबंधित अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण झाले आहे. थोड्या वेळापूर्वी मी मेट्रोमधून गिफ्ट सिटी स्थानकापर्यंत प्रवास केला.यादरम्यान अनेक जणांनी आपले अनुभव कथन केले. अहमदाबाद मेट्रोच्या विस्तारामुळे प्रत्येकाला आनंद झाला आहे. या 100 दिवसात देशभरातल्या अनेक शहरांमधल्या मेट्रोच्या विस्तारशी संबंधित निर्णय घेण्यात आले आहेत.
मित्रहो,
आजचा दिवस गुजरातसाठी आणखी एका कारणामुळे खास आहे. आजपासून अहमदाबाद आणि भूज दरम्यान नमो भारत रॅपिड रेल्वे धावू लागली आहे. नमो भारत रॅपिड रेल्वे देशातल्या एका शहरातून दुसऱ्या शहरात रोज प्रवास करणाऱ्या आपल्या मध्यम वर्गासाठी सोयीची ठरणार आहे. यामुळे नोकरी, व्यापार-व्यवसाय, शिक्षण क्षेत्राशी संबंधितांना मोठा लाभ होणार आहे.येत्या काळात देशातल्या अनेक शहरांना नमो भारत रॅपिड रेल्वेने जोडले जाणार आहे.
मित्रहो,
वंदे भारत रेल्वेचे जाळे या 100 दिवसात ज्या वेगाने विस्तारण्यात आले आहे ते अभूतपूर्व आहे. या काळात देशात 15 पेक्षा जास्त नव्या मार्गावर नव्या वंदे भारत रेल्वे सुरु झाल्या आहेत.याचाच अर्थ गेल्या 15 आठवड्यात दर आठवड्याला एक या हिशोबाने 15 आठवड्यात 15 नव्या गाड्या.काल झारखंडमधूनही मी काही वंदे भारत गाड्याना हिरवा झेंडा दाखवला. आजही.. नागपूर-सिकंदराबाद,कोल्हापूर- पुणे, आग्रा कॅन्ट- बनारस,दुर्ग- विशाखापट्टणम,पुणे-हुबळी वंदे भारत रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत.वाराणसी आणि नवी दिल्ली दरम्यान धावणारी गाडी आता 20 डब्यांची झाली आहे. आज देशात सव्वाशे पेक्षा जास्त वंदे भारत गाड्या दररोज हजारो लोकांना उत्तम प्रवासाचा आनंद देत आहेत.
मित्रहो,
गुजरातचे आपण लोक... वेळेचे मोल जाणतो.भारतासाठी हा काळ ... भारताचा सुवर्ण काळ आहे...भारताचा अमृत काळ आहे.येत्या 25 वर्षात आपल्याला देशाला विकसित राष्ट्र करायचे आहे... आणि यात गुजरातची अतिशय मोठी भूमिका आहे. गुजरात आज उत्पादनाचे अतिशय मोठे केंद्र बनत आहे.आज गुजरात, भारताच्या उत्तम कनेक्टीव्हिटी असलेल्या राज्यांपैकी एक आहे.हा दिवस आता दूर नाही जेव्हा गुजरात.. भारताला पहिले मेड इन इंडिया मालवाहू विमान सी-295 देईल. सेमी कंडक्टर मिशन मध्ये आज गुजरातने जी आघाडी घेतली आहे .. ती अभूतपूर्व आहे.
आज गुजरातमध्ये अनेक विद्यापीठे आहेत...मग ती पेट्रोलियम असो... न्यायवैद्यक…आरोग्य जोपासना...प्रत्येक आधुनिक विषयाचा अभ्यास करण्यासाठी गुजरातमध्ये उत्तम संधी आहेत...परदेशी विद्यापीठेही गुजरातमध्ये येऊन आपल्या शाखा उघडत आहेत. संस्कृतीपासून ते शेतीपर्यंत, गुजरातचा संपूर्ण जगात बोलबाला आहे...ज्या पिकांचा आपण विचारही करू शकत नाही….अशी पिके आणि धान्य, गुजरात परदेशात निर्यात करत आहे. आणि हे सर्व कोणी केले आहे? गुजरातमध्ये हा बदल कोणी आणला?
मित्रांनो
हे सर्व तुम्ही… गुजरातच्या कष्टकरी लोकांनी केले आहे. गुजरातच्या विकासासाठी इथे मनापासून कष्ट करणारी एक संपूर्ण पिढी खपली गेली. आता इथून गुजरातला एका नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. तुम्हाला आठवत असेल... या वेळी मी लाल किल्ल्यावरून भारतात बनवलेल्या वस्तूंच्या दर्जाविषयी बोललो होतो. जेव्हा आपण म्हणतो की ही निर्यात दर्जेदार आहे... तर कुठेतरी आपण असेही गृहीत धरतो की ज्या मालाची निर्यात होत नाही त्याची गुणवत्ता कदाचित तितकी चांगली नाही. आणि म्हणूनच तो माल निर्यातीच्या दर्जाचा असल्याचे सांगितले जाते. या मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. गुजरातने आपल्या उत्तम दर्जाच्या उत्पादनांसाठी भारतात आणि संपूर्ण जगात आपला ठसा उमटवावा अशी माझी इच्छा आहे.
मित्रांनो
भारत आज ज्या प्रकारे नवीन संकल्पना घेऊन काम करत आहे... परदेशातही भारताचे कौतुक होत आहे. अलीकडच्या काळात मला अनेक देशांमध्ये आणि अनेक मोठ्या मंचांवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. जगात भारताला किती मान मिळतो हेही तुम्ही पाहिले आहे. जगातील प्रत्येकजण भारताचे आणि भारतीयांचे खुल्या मनाने स्वागत करतो. भारताशी चांगले संबंध सर्वांनाच हवे आहेत. कुठेही संकट आले, कुठलीही अडचण आली, तर त्यावर उपाय म्हणून लोक भारताची आठवण काढतात. भारतीय जनतेने ज्या प्रकारे सलग तिसऱ्यांदा स्थिर सरकार निवडून दिले आहे… ज्या प्रकारे भारताचा विकास वेगाने होत आहे…त्यामुळे जगाच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. आणि 140 कोटी देशवासीयांचा हा अढळ विश्वास आहे... ज्याच्या बळावर.. मी माझ्या देशवासियांच्या बळावर माझी छाती रुंदावून जगाला अभिमानाने आश्वासन देतो. भारतावरील या वाढत्या विश्वासाचा थेट फायदा भारतातील शेतकरी आणि भारतातील तरुणांना होतो. जेव्हा भारतावरील विश्वास वाढतो तेव्हा आपल्या कुशल युवाबळाची मागणी वाढते. जेव्हा भारतावरील विश्वास वाढतो तेव्हा आपली निर्यात वाढते आणि अधिक गुंतवणूक देशात येते. जेव्हा भारतावरील विश्वास वाढतो तेव्हा परदेशी गुंतवणूकदार आपला पैसा भारतात गुंतवतात आणि कारखाने उभारतात.
बंधू आणि भगिनींनो,
एकीकडे प्रत्येक देशवासीयाला जगभरात भारताचा प्रसिद्धी दूत (ब्रँड ॲम्बेसेडर) व्हायचे आहे. तो आपल्या देशाची क्षमता पुढे नेण्यात व्यग्र आहे... तर देशातच काही नकारात्मकतेने भरलेले लोक उलट दिशेने काम करत आहेत. हे लोक देशाच्या एकतेवर हल्ला करत आहेत. सरदार पटेल यांनी 500 हून अधिक संस्थानांचे विलीनीकरण करून भारताचे एकीकरण केले. हे सत्तापिपासू लोभी लोक...भारताचे तुकडे करू इच्छितात. तुम्ही लोकांनी ऐकलेच असेल... आता हे लोक एकत्र म्हणताहेत की ते जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत आणतील... या लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दोन राज्य आणि दोन राज्यघटना लागू करायच्या आहेत. हे लोक अनुनयासाठी कोणतीही मर्यादा ओलांडत आहेत... द्वेषाने भरलेले हे लोक भारताची बदनामी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. हे लोक गुजरातवरही सतत नेम धरुन आहेत. त्यामुळे गुजरातला त्यांच्याबाबत सावध रहावे लागेल आणि त्यांच्यावर लक्षही ठेवावे लागेल.
मित्रांनो
विकासाच्या वाटेवर असलेला भारत अशा शक्तींचा धैर्याने मुकाबला करेल.भारताकडे आता काही गमावण्यासाठी वेळ नाही.आपल्याला भारताची विश्वासार्हता वाढवायची आहे आणि प्रत्येक भारतीयाला सन्मानाचे जीवन द्यायचे आहे. आणि मला माहीत आहे... गुजरात यातही आघाडीवर आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने आपले सर्व संकल्प पूर्ण होतील.आज ज्या उत्साहाने तुम्ही आशीर्वाद देत आहात. आता मी गुजरातमधून नव्या ऊर्जेने पुढे जाईन, आणि नव्या चैतन्याने जगेन. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी व्यतित करेन.तुमचे कल्याण, तुमच्या जीवनातील यश, तुमच्या स्वप्नांची पूर्तता, याशिवाय जीवनात मला दुसरी कोणतीही इच्छा, आकांक्षा नाही. फक्त आणि फक्त तुम्हीच..माझे देशवासीय… माझे आराध्य दैवत आहात.
मी माझ्या या दैवतेच्या पूजेमध्ये स्वत:ची आहुती देण्याचा निर्णय घेतला आहे, स्वत: ला झोकून द्यायचे ठरवले आहे.आणि म्हणून मित्रांनो, मी जगेन तर तुमच्यासाठी…झटत राहीन तर तुमच्यासाठी…. प्राणपणाने झोकून देईन तर तुमच्यासाठी!तुम्ही मला आशीर्वाद द्या. कोट्यवधी देशवासीयांच्या आशीर्वादाने, नव्या आत्मविश्वासाने, नव्या उत्साहाने आणि नव्या धैर्याने, 140 कोटी भारतीयांच्या स्वप्नांसाठी मी जगत आहे, मी जगतो, मला जगायचे आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलात. काल संध्याकाळपासून मी खूप दिवसांनी गुजरातला आलो आहे, पण तुमचे प्रेम वाढत आहे, वाढतच चालले आहे आणि माझी हिम्मतही वाढत आहे. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे नवीन सुविधा, नवीन योजना आणि नवीन संधी मिळत असल्याबद्दल अभिनंदन करतो. माझ्यासोबत म्हणा – भारत मातेचा विजय असो!दोन्ही हात वर करुन पूर्ण शक्तीनिशी म्हणा -
भारत मातेचा विजय असो!
भारत मातेचा विजय असो!
भारत मातेचा विजय असो!
खूप खूप आभार!
अस्वीकार: पंतप्रधानांच्या भाषणाचा काही भाग गुजराती भाषेतही आहे, ज्याचा इथे अनुवाद करण्यात आला आहे.
JPS/ST/Gajendra/Nilima/Ashutosh/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055578)
Visitor Counter : 45
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam