पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान मोदी आणि ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांची भेट

Posted On: 04 SEP 2024 2:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज बंदर सेरी बेगवान येथील इस्ताना नुरुल इमान येथे आगमन झाले. ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांनी त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधानांनी सुलतान यांचे या निमंत्रणाबद्दल आभार मानले आणि सांगितले की, भारताच्या पंतप्रधानांचा  ब्रुनेईचा हा पहिला  द्विपक्षीय दौरा असून   द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याची भारताची तीव्र इच्छा यातून दिसून येते.पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, त्यांचा हा दौरा भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’ला बळकट करण्याप्रति  वचनबद्धतेच्या अनुषंगाने होता,ज्याला आता  10 वर्षे होत आहेत.द्विपक्षीय संबंध वर्धित भागीदारीमध्ये रूपांतरित झाल्याचे  दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. उभय नेत्यांनी संरक्षण,व्यापार आणि गुंतवणूक, अन्न सुरक्षा, शिक्षण, ऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य, क्षमता निर्मिती , संस्कृती तसेच लोकांमधील देवाणघेवाण अशा विविध विषयांवर  द्विपक्षीय चर्चा केली.त्यांनी आयसीटी, फिनटेक, सायबर सुरक्षा, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संधींचा शोध आणि पाठपुरावा करण्याबाबत सहमती दर्शवली. पंतप्रधान आणि ब्रुनेईचे सुलतान  यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली.दोन्ही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि अभिव्यक्तींचा निषेध केला आणि इतर देशांनाही त्याला थारा न देण्याचे आवाहन केले. दोन्ही नेत्यांनी आसियान – भारत सर्वसमावेशक  धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी परस्पर हितांच्या  क्षेत्रात एकत्रितपणे  काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. आसियान सेंटर फॉर क्लायमेट चेंज च्या आयोजनात  ब्रुनेई दारुस्सलामच्या प्रयत्नांना भारताने दिलेल्या पाठिंब्याची सुलतान यांनी प्रशंसा केली.

उपग्रह आणि प्रक्षेपण वाहनांसाठी टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि टेलिकमांड स्टेशनच्या परिचालनात सहकार्यसंबंधी  सामंजस्य करारावर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर आणि ब्रुनेईचे परिवहन आणि माहितीसंचार मंत्री पेंगिरन दातो शामरी पेंगिरन दातो मुस्तफा यांनी स्वाक्षरी केली आणि देवाणघेवाण केली.बंदर सेरी बेगवान आणि चेन्नई दरम्यान थेट विमान सेवा लवकरच सुरु केली जाणार असल्याबद्दल उभय नेत्यांनी  स्वागत केले.चर्चेनंतर संयुक्त निवेदन जारी  करण्यात आले.

सुलतान यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन केले होते.

दोन्ही नेत्यांमध्ये आज झालेल्या चर्चेमुळे भारत-ब्रुनेई द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आणि मजबूत  होतील. पंतप्रधानांनी सुलतान यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. पंतप्रधानांच्या या ऐतिहासिक भेटीमुळे भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि हिंद-प्रशांत क्षेत्राच्या दृष्टीकोनाला आणखी बळ  मिळेल.

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2051702) Visitor Counter : 40