अंतराळ विभाग
पंधरा वर्षांनी - 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल,अशी घोषणा केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केली
Posted On:
23 AUG 2024 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024
पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त एका महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय अंतराळ विभाग मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज येथे घोषणा केली की, आतापासून पंधरा वर्षांनी म्हणजे 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये डॉ जितेंद्र सिंह यांनी भारत मंडपम येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात अंतराळ संशोधनातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा केली आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची माहिती दिली.
डॉ जितेंद्र सिंह यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे ऐतिहासिक यशस्वी लँडिंग अधोरेखित केले. जगाला चकित करणाऱ्या या घटनेने भारताला अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक नेता म्हणून स्थापित केले. भारताने हा ऐतिहासिक विक्रम गेल्यावर्षी 23 ऑगस्ट रोजी केला होता. त्यामुळे आजचा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाईल, अश घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती, असे सांगून मंत्री सिंह म्हणाले की, चांद्रयान-3 च्या लँडिंग स्थानाला 'शिवशक्ती पॉइंट' असे नाव देण्यात आले. या उदघाटन कार्यक्रमाची संकल्पना "टचिंग लाईव्हज व्हॅली टचिंग द मून: इंडियाज स्पेस सागा," यावर आधारित ठेवण्यात आली होती.
"गेल्या सहा दशकात भारताने केवळ आपल्या नागरिकांच्या जीवनालाच स्पर्श केला नाही तर भारत आता चंद्रावरही पोहोचला आहे," असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. यशस्वी ‘मंगल यान, ॲस्ट्रोसॅटचे प्रक्षेपण, चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3, आगामी आदित्य-एल1 सौर मोहीम आणि एक्सपो सॅट या एक्स-रे खगोलशास्त्र मोहिमेसह गेल्या दशकात झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर त्यांनी भर दिला.
विज्ञान मोहिमांना गती देण्याचे आणि भारताच्या वैज्ञानिक समुदायाची क्षमता ‘अनलॉक’ करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, असे अंतराळ राज्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 2014 पासून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या धोरणामुळे विज्ञान मोहिमांना पाठबळ मिळाले असेही ते म्हणाले.देशामध्ये अंतराळ क्षेत्र खाजगी सहभागासाठी मुक्त केल्यानंतर आता या क्षेत्रामधील स्टार्टअप्समध्ये लक्षणीय वाढ देखील नोंदवली असून , ही संख्या आता जवळपास 300 झाली आहे. अशी माहिती त्यांनी दिली. पुढील दशकात भारताची अंतराळ अर्थव्यवस्था 8 अब्ज डॉलर वरून $44 अब्ज इतकी होईल, असा अंदाज मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
भविष्यातील योजनांची माहिती सांगताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी ‘अंतराळ व्हिजन 2047’ ची रूपरेषा सांगितली, ज्यामध्ये 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक (बीएएस) कार्यान्वित करणे आणि 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरणे यांचा समावेश आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की; पृथ्वीच्या खालच्या कक्षेत मानवी अंतराळ उड्डाणापासून सुरू केल्यानंतर स्वदेशी अंतराळ स्थानक तयार करण्यापर्यंत भारत यशस्वी होईल. भविष्यात चंद्राविषयी अनेक शोध मोहिमा आखण्यात येतील, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
Jaydevi PS/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048382)
Visitor Counter : 69