पंतप्रधान कार्यालय

मलेशियाच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन

Posted On: 20 AUG 2024 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2024

पंतप्रधान दातो सेरी अन्वर इब्राहिम,

दोन्ही शिष्टमंडळाचे सदस्य,

माध्यमांमधील आमचे मित्र,

नमस्कार!

पंतप्रधान बनल्यानंतर अन्वर इब्राहिम जी यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला भारतात तुमचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे.

मित्रहो,

भारत आणि मलेशिया दरम्यान वर्धित धोरणात्मक भागीदारीला एक दशक पूर्ण होत आहे. आणि गेल्या दोन वर्षांत, पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या पाठिंब्याने आमच्या भागीदारीला एक नवीन गती आणि ऊर्जा मिळाली आहे. आज आम्ही परस्पर सहकार्याच्या सर्व क्षेत्रांवर व्यापक  चर्चा केली.आमच्या द्विपक्षीय व्यापारात सातत्याने प्रगती होत असल्याचे आम्हाला आढळून आले.  भारत आणि मलेशियामधील व्यापार आता भारतीय रुपया (INR) आणि मलेशियन रिंगिट (MYR) मध्ये देखील होत आहे.  गेल्या वर्षी मलेशियाकडून भारतात 5 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीवर काम झाले आहे. आज आम्ही आमची भागीदारी "सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी" मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला विश्वास आहे की आर्थिक सहकार्यामध्ये अजूनही भरपूर क्षमता आहे. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचा विस्तार व्हायला हवा.नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उदा. सेमीकंडक्टर, फिनटेक, संरक्षण उद्योग,एआय आणि क्वांटम मध्ये आम्ही आमचे परस्पर सहकार्य वाढवले पाहिजे. भारत आणि मलेशिया यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराचा जलदतेने आढावा घेण्यावर आम्ही भर दिला आहे.डिजिटल तंत्रज्ञानातील सहकार्यासाठी डिजिटल कौन्सिलची स्थापना करण्याचा आणि स्टार्ट-अप आघाडी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचे युपीआय आणि मलेशियाचे पेनेट  यांना जोडण्याचे कामही केले जाईल. सीईओ फोरमच्या आजच्या बैठकीत नव्या संधी समोर आल्या आहेत. संरक्षण क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या नवीन संधींबाबत आम्ही चर्चा केली आहे. दहशतवाद आणि अतिरेकीपणा यांच्या  विरुद्ध लढाईबाबातही आमचे एकमत आहे.

मित्रहो,

भारत आणि मलेशिया शतकानुशतकांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत.मलेशियामध्ये राहणारे सुमारे 3 दशलक्ष अनिवासी भारतीय, हे दोन्ही देशांना जोडणारा दुवा आहेत.

भारतीय संगीतापासून ते खाद्य संस्कृती पर्यंत, सणांपासून ते मलेशिया मधील ‘तोरण गेट’ पर्यंत, आमच्या लोकांनी ही मैत्री जपली आहे. गेल्या वर्षी मलेशियामध्ये साजरा करण्यात आलेला ‘पी.आय.ओ. डे’, हा अतिशय यशस्वी आणि लोकप्रिय कार्यक्रम होता. आमच्या नवीन संसद भवनात जेव्हा सेंगोल ची स्थापना करण्यात आली, तेव्हा त्या ऐतिहासिक क्षणाचा उत्साह मलेशियामध्येही दिसून आला. आज झालेला कामगारांच्या रोजगाराबाबतचा करार, भारतामधून मलेशियात येणाऱ्या कामगारांच्या रोजगाराला चालना देईल, तसेच त्यांच्या हिताचे रक्षण करेल. आम्ही व्हिसाची प्रक्रिया सुलभ केली आहे, जेणे करून दोन्ही देशांमधील नागरिकांना परस्पर देशांमध्ये सुलभ प्रवेश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण यावर भर दिला जात आहे. सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, यासारख्या अत्याधुनिक अभ्यासक्रमांसाठी ITEC शिष्यवृत्ती अंतर्गत 100 जागा केवळ मलेशियासाठी राखीव ठेवल्या जातील. "युनिव्हर्सिटी टुंकू अब्दुल रहमान" मलेशियामध्ये आयुर्वेद ‘चेअर’ची स्थापना करण्यात येत आहे. याशिवाय मलाया विद्यापीठात तिरुवल्लुवर ‘चेअर’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष पावले उचलण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मी पंतप्रधान अन्वर आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानतो.

मित्रहो,

मलेशिया हा आसियान आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे. भारत आसियानच्या केंद्रस्थानाला प्राधान्य देतो. भारत आणि आसियान यांच्यातील एफटीएचा आढावा वेळेत पूर्ण व्हायला हवा, या गोष्टीला आमचे अनुमोदन आहे. 2025 मध्ये मलेशियाच्या यशस्वी आसियान अध्यक्षपदासाठी भारताचा पूर्ण पाठींबा आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार ‘नेव्हिगेशन’ आणि ‘ओव्हरफ्लाइट’ च्या स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध आहोत, आणि, सर्व विवादांवर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याचे समर्थन करतो.

महोदय,

तुमची मैत्री आणि भारताबरोबरचे संबंध दृढ ठेवण्याच्या वचनबद्धतेबद्दल आम्ही ऋणी आहोत. तुमच्या भेटीने आगामी दशकातील आपल्या संबंधांना नवी दिशा दिली आहे. पुन्हा एकदा, सर्वांचे मनःपूर्वक आभार.

S.Bedekar/S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2047015) Visitor Counter : 34