माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आयआयएमसी आयझॉल येथे भारताच्या 500 व्या सामुदायिक रेडिओ स्टेशन- अपना रेडिओ 90.0 एफएम चे केले उद्घाटन


वैष्णव यांनी 10 व्या राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ पुरस्कार विजेत्यांची केली घोषणा

सर्वाधिक नवोन्मेषी सामुदायिक सहभाग पुरस्कार श्रेणीत महाराष्ट्रातील सांगलीच्या येरलावाणी वरील कहाणी सुनंदाची कार्यक्रमाला प्रथम पुरस्कार

आयआयएमसीचे अपना रेडिओ स्टेशन हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातील एक महत्वपूर्ण टप्पा: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

Posted On: 25 JUL 2024 4:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2024

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज 10 व्या राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांच्या उपस्थितीत वैष्णव यांनी भारताच्या 500 व्या सामुदायिक रेडिओ स्टेशन चे उद्घाटन केले. 'अपना रेडिओ 90.0 एफएम' हे स्टेशन आयझॉल येथील भारतीय जनसंवाद संस्था (IIMC) द्वारे चालवले जाणारे स्टेशन आहे.

भारताच्या सामुदायिक रेडिओ प्रवासातील हा मैलाचा दगड आहे असे सांगत वैष्णव म्हणाले की, हा उपक्रम अपना रेडिओ स्टेशनच्या कव्हरेज क्षेत्रातील लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल. याची सुरुवात हा सरकारच्या ऍक्ट ईस्टच्या धोरणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे असे ते  म्हणाले.

वैष्णव यांनी मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले की केंद्रीय अर्थसंकल्पात ईशान्य क्षेत्रासाठी रेल्वे अर्थसंकल्प अंतर्गत विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे  चांगली रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळण्याचे मिझोरमचे दीर्घकाळचे स्वप्न साकार होईल.

मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की आयआयएमसी आयझॉल येथील अपना रेडिओ स्टेशन राज्यासाठी संवादाचा नवा अध्याय लिहील. मिझोरम हे त्याच्या लक्षणीय कृषी क्षमतेमुळे प्रामुख्याने कृषीप्रधान राज्य आहे. शेतकरी समुदायासाठी सामुदायिक रेडिओ स्टेशनची स्थापना करणे अत्यंत लाभदायक ठरेल, त्यांना हवामानाची ताजी माहिती, सरकारी योजना आणि शेतीशी संबंधित माहिती मिळेल. हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारल्याबद्दल त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि इतर सर्व संबंधितांचा अतूट पाठिंबा आणि समर्पणाची प्रशंसा केली.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी अशा स्टेशन्सच्या सामाजिक दृष्ट्या लाभदायक स्वरूपाचा उल्लेख केला आणि सांगितले की, खाजगी रेडिओ चॅनेलच्या व्यावसायिक स्वरूपाच्या उलट सामुदायिक रेडिओ स्टेशन्स शेवटच्या गावापर्यंत माहितीचा प्रसार करण्याच्या वचनबद्धतेतून स्थापन केली जातात. ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात या स्टेशन्सची  भूमिका लक्षणीय ठरते.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे देखील यावेळी उपस्थित होते, ते म्हणाले की, कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स कृषी, शेतकरी कल्याणासाठीच्या सरकारी योजना, हवामान याबाबत माहिती प्रसारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून देते जिथे अनेकांचे आवाज ऐकले जातात आणि स्थानिक बोली आणि प्रादेशिक भाषांमध्ये आशय प्रसारित केला जातो. हे सामुदायिक रेडिओ समाजातील गरीब आणि उपेक्षित वर्गासाठी विशेष महत्वाचे आहेत, जे मुख्य प्रवाहातील माध्यमांपर्यंत पोहचू शकत नाहीत.

देशभरात सामुदायिक रेडिओ स्टेशन्सच्या विकासाला चालना देण्याप्रति आपल्या वचनबद्धतेवर मंत्रालय ठाम असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

आयआयएमसीच्या कुलगुरू डॉ. अनुपमा भटनागर म्हणाल्या की, 'अपना रेडिओ 90.0 एफएम'चे उद्घाटन हा मिझोरमच्या इतिहासातील एक नवा अध्याय आहे, जो संवादाद्वारे, समुदायांना एकत्र आणेल, स्थानिक संस्कृतीचे प्रदर्शन घडवेल, नागरिकांना प्रोत्साहन देईल आणि त्यांना सक्षम बनवेल.

10 व्या राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ पुरस्कारांचे विजेते

श्रेणी: संकल्पना आधारित  पुरस्कार

  • प्रथम पुरस्कार: रेडिओ मयूर, जिल्हा सारण, बिहारचा कार्यक्रम: टेक सखी
  • द्वितीय पुरस्कार: रेडिओ कोची, केरळचा कार्यक्रम: निरंगल
  • तृतीय पुरस्कार: हॅलो दून, डेहराडून, उत्तराखंडचा कार्यक्रम : मेरी बात

श्रेणी: सर्वाधिक नवोन्मेषी सामुदायिक सहभाग पुरस्कार

  • प्रथम पुरस्कार: यरलावाणी  सांगली, महाराष्ट्र चा कार्यक्रम: कहाणी  सुनंदाची
  • द्वितीय पुरस्कार: वायलागा वनोली, मदुराई, तामिळनाडूचा कार्यक्रम: लेट्स बिल्ड अ न्यू नॉर्म
  • तृतीय पुरस्कार : सलाम नमस्ते नोएडा, उत्तर प्रदेशचा  कार्यक्रम: मेड दीदी

श्रेणी : स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याबद्दल पुरस्कार

  • प्रथम पुरस्कार: रेडिओ ब्रह्मपुत्रा, दिब्रुगड, आसामचा कार्यक्रम: इगारेकुन
  • द्वितीय पुरस्कार: रेडिओ कोटागिरी, निलगिरी, तामिळनाडूचा  कार्यक्रम: एन मक्कलुदन ओरु पायनम
  • तृतीय पुरस्कार: रेडिओ ॲक्टिव्ह, भागलपूर बिहारचा  कार्यक्रम: अंग प्रदेश की अद्भुत धरोहर

श्रेणी: शाश्वतता आदर्श  पुरस्कार

  • प्रथम पुरस्कार: बिशप बेंझिगर हॉस्पिटल सोसायटी, कोल्लम, केरळ द्वारा संचालित रेडिओ बेंझिगर
  • द्वितीय पुरस्कार: यंग इंडिया द्वारा संचालित रेडिओ नमस्कार, कोणार्क, ओडिशा
  • तृतीय पुरस्कार: शरणबसबेश्वरा विद्या वर्धक संघ द्वारा संचालित रेडिओ अंतरवाणी, गुलबर्गा, कर्नाटक

मंत्रालयाने कम्युनिटी रेडिओ स्टेशन्समध्ये अभिनव कल्पना आणि निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी 2011-12 मध्ये राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ पुरस्कारांची स्थापना केली होती.

राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ पुरस्कार साधारणपणे दरवर्षी प्रदान केले जातात. याच अनुषंगाने, मंत्रालयाने आज खालील 4 श्रेणींमध्ये 10 व्या राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे.

1. संकल्पना आधारित पुरस्कार

2. सर्वाधिक नवोन्मेषी सामुदायिक सहभाग पुरस्कार

3. स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याबद्दल पुरस्कार

4. शाश्वतता आदर्श  पुरस्कार

प्रत्येक श्रेणीमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार  अनुक्रमे 1.0 लाख रुपये, 75,000 रुपये आणि  50,000 रुपये अशा स्वरूपाचे आहेत.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2036971) Visitor Counter : 76