पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रात मुंबई येथे 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण


ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी  मार्ग  प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील  बोगद्याच्या कामाची केली पायाभरणी

नवी मुंबई येथील कल्याण यार्ड रीमॉडेलिंग आणि गति शक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनलची केली पायाभरणी

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन फलाट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्र. 10 आणि 11 चा विस्तार राष्ट्राला केला समर्पित

सुमारे 5600 कोटी रुपये  खर्चाची  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा केला प्रारंभ

“सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे गुंतवणूकदारांनी उत्साहात स्वागत केले”

“महाराष्ट्राच्या सामर्थ्याचा वापर करून त्याला जगातील आर्थिक विकासाचं सर्वात मोठं शक्तीकेंद्र बनवण्याचे माझे ध्येय आहे; मुंबईला जगाची 'फिनटेक' राजधानी बनवा”

"देशातील जनतेला सातत्यपूर्ण  वेगवान विकास हवा आहे आणि येत्या 25 वर्षात भारताला  विकसित राष्ट्र बनवायचे आहे"

"कौशल्य विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ही भारताची काळाची गरज आहे"

"रालोआ  सरकारचे विकास मॉडेल हे  वंचितांना प्राधा

Posted On: 13 JUL 2024 7:21PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  मुंबई  येथे 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या  रस्ते, रेल्वे आणि बंदरे क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी मुंबई आणि आसपासच्या  प्रदेशांमधील रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 29,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध  प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.  महाराष्ट्रातील तरुणांसाठी विशाल कौशल्य विकास प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला , ज्यामुळे राज्यात रोजगाराच्या संधींना आणखी चालना मिळेल. केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या वाढवण  बंदराचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. "76,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे 10 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होतील" असे ते म्हणाले.

गेल्या एका महिन्यात मुंबईत गुंतवणूकदारांच्या उत्साहाबाबत पंतप्रधान म्हणाले की, छोट्या आणि मोठ्या गुंतवणूकदारांनी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे उत्साहाने स्वागत केले आहे. स्थिर सरकार तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट गतीने काम करेल असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास, सशक्त वर्तमान आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे असे  पंतप्रधान म्हणाले.

भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महाराष्ट्र राज्याची भूमिका अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सांगितले की महाराष्ट्राकडे उद्योग, कृषी, वित्तीय क्षेत्राची ताकद आहे. त्यामुळेच महाराष्ट्र भारताचं आर्थिक केंद्र बनलं आहे. महाराष्ट्राच्या सामर्थ्याचा वापर करून त्याला जगातील आर्थिक विकासाचं सर्वात मोठं शक्तीकेंद्र बनवण्याचे माझे ध्येय आहे; मुंबईला जगाची फिनटेक राजधानी बनवायची आहे .महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे भव्य किल्ले, कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत असे सांगून  मोदी यांनी महाराष्ट्र पर्यटनात देशात पहिल्या क्रमांकांचे राज्य बनावे ही आपली इच्छा असल्याचं नमूद केलं. वैद्यकीय पर्यटन आणि परिषद पर्यटनाच्या बाबतीत राज्यात मोठ्या संधी आहेत असे ते म्हणाले. महाराष्ट्र भारतात विकासाची नवी गाथा लिहिणार आहे आणि आपण त्याचे सहप्रवासी आहोत असे सांगत  आजचा कार्यक्रम अशा संकल्पांप्रति सरकारची वचनबद्धता असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

21 व्या शतकातल्या भारतीय नागरिकांच्या उच्च आकांक्षा विषद करताना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 25 वर्षात विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. या प्रवासात मुंबई आणि महाराष्ट्राच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. मुंबई आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या जीवनमानाचा स्तर उंचावणे हे आमचे उद्दिष्ट आहे.मुंबई लगतच्या भागात कनेक्टीव्हिटी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहेअसे पंतप्रधान म्हणाले.किनारी मार्ग आणि अटल सेतू पूर्णत्वाला जात असल्याचा त्यांनी उल्लेख केला. दिवसाला सुमारे 20 हजार वाहने अटल सेतूचा उपयोग करत असल्याची माहिती देऊन सुमारे 20 ते 25 लाख रुपयांच्या इंधनाची बचत होत असल्याचे ते म्हणाले. मुंबईमध्ये मेट्रोच्या जाळ्याचा झपाट्याने विकास होत असल्याचे सांगून दशकापूर्वीच्या  8 किमी लांबीच्या मार्गाचा आता 80 किमी पर्यंत विस्तार झाला आहे आणि 200 किमी मेट्रो जाळे करण्यासाठी काम सुरु आहे.

भारतीय रेल्वेच्या कायापालटाचा मुंबई आणि महाराष्ट्राला मोठा लाभ होत आहे’, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर स्थानकांच्या पुनर्विकासाचा पंतप्रधानांनी  उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनसचे नवे फलाट आज राष्ट्राला  समर्पित करण्यात आले असून  त्यामुळे  24 डब्यांची गाडीही इथून चालवली जाऊ शकते’, असे  पंतप्रधान म्हणाले.

गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्गांची लांबी तिप्पट झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) प्रकल्प म्हणजे निसर्ग आणि प्रगती यांचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. ठाणे बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे  ठाणे बोरीवली दरम्यानचे अंतर  काही मिनिटात पार करता येईल.देशाच्या तीर्थस्थळांचा  विकास करण्यासाठीच्या सरकारच्या प्रयत्नांचा पुनरुच्चार करतानाच भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आणि सेवांमध्ये वाढ करण्याचाही सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.  पंढरपुरच्या वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होत असल्याचे सांगून भाविकांच्या सोयीसाठी सुमारे 200 किमीचा संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि सुमारे 110 किमीचा संत तुकाराम पालखी मार्ग बांधण्यात येत असल्याचा त्यांनी उल्लेख केला. हे दोन्ही मार्ग लवकरच कार्यान्वित होतील असे आश्वासन त्यांनी दिले.  

कनेक्टीव्हिटीसंदर्भातल्या पायाभूत सुविधांमुळे पर्यटन,कृषी आणि उद्योग क्षेत्राला त्याचा लाभ होत असून रोजगारात वृद्धी  होण्याबरोबरच महिलांसाठीही सोयीचे होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. रालोआसरकारची ही विकास कामे गरीब,शेतकरी,महिला शक्ती आणि युवा शक्तीचे सबलीकरण करत आहे’, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत  10 लाख युवकांना कौशल्य विकास आणि स्कॉलरशिप देण्यासारख्या उपक्रमांसाठी  त्यांनी दुहेरी इंजिन सरकारची प्रशंसा केली.

कौशल्य विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगार ही भारताची सध्याच्या काळाची गरज आहे’, असे सांगतानाच कोविड महामारीसारखा  काळ येऊनही गेल्या 4-5 वर्षात भारतातली विक्रमी रोजगार निर्मिती त्यांनी अधोरेखित केली. रिझर्व बँक ऑफ इंडियाने रोजगाराबाबत नुकताच प्रकाशित केलेल्या तपशीलवार  अहवालावर प्रकाश टाकत गेल्या 3-4 वर्षात सुमारे 8 कोटी रोजगारांची निर्मिती झाल्याची माहिती देत त्यामुळे टीकाकारांची तोंडे बंद झाली आहेत.भारताच्या विकासाबाबत गैरसमज   पसरवले जात असल्याबाबत नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहनही त्यांनी केले. पूल बांधले जातात,रेल्वे मार्ग तयार केले जातात,रस्ते बांधले जातात आणि लोकल गाड्या तयार केल्या जातात तेव्हाच रोजगार निर्मिती होते.देशातला रोजगार निर्मितीचा दर ,पायाभूत सुविधा विकासाच्या थेट प्रमाणावर  अवलंबून असतो असे ते म्हणाले.

गरिबांसाठी 3 कोटी घरे बांधण्याच्या नवीन सरकारच्या पहिल्या निर्णयाचा उल्लेख करून एनडीए सरकारचे विकास मॉडेल वंचितांना प्राधान्य देण्याचे आहेयावर पंतप्रधानांनी भर दिला. 4 कोटी कुटुंबांना यापूर्वीच घरे मिळाली आहेत. महाराष्ट्रातील लाखो दलित आणि वंचितांनाही आवास योजनेचा लाभ मिळाला आहे. "स्वतःच्या मालकीचे घर असावे हे शहरांमध्ये राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीयांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत," असेही त्यांनी उद्धृत केले.

फेरीवाल्यांनाही आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी स्वनिधी योजना बजावत असलेल्या भूमिकेविषयी त्यांनी अवगत केले. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात 13 लाख आणि एकट्या मुंबईतच दीड लाख अशी एकूण 90 लाख कर्जे मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेमुळे या विक्रेत्यांचे मासिक उत्पन्न 2 हजार रुपयांनी वाढल्याचे एका अभ्यासाचा हवाला देत त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी स्वनिधी योजनेचे एक वैशिष्ट्य अधोरेखित केले आणि गरिबांच्या विशेषतः या योजनेंतर्गत बँकेकडून कर्ज घेऊन त्याची परतफेड विहित मुदतीत केलेल्या फेरीवाल्यांच्या स्वाभिमान आणि सामर्थ्याची दखल घेतली. स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत 3.25 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार केल्याची माहिती त्यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांनी जनतेला दिलेल्या वारशाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, “महाराष्ट्राने भारतामध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जाणीवेचा प्रसार केला आहे.पंतप्रधानांनी नागरिकांना पुढाकार घेऊन सुसंवादी समाज आणि सशक्त राष्ट्राचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले. समृद्धीचा मार्ग सुसंवाद आणि सौहार्दात आहे हे नागरिकांनी ध्यानात ठेवण्याचे आवाहन करून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आदि यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी 16,600 कोटी रुपयांच्या ठाणे - बोरिवली बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केली.  ठाणे आणि बोरिवली  दरम्यानचा हा दुहेरी ट्यूब बोगदा संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून जाईल, ज्यामुळे बोरिवलीच्या दिशेने पश्चिम द्रुतगती महामार्ग  आणि ठाणे बाजूला  ठाणे घोडबंदर रोड दरम्यान थेट संपर्क व्यवस्था निर्माण होईल. या प्रकल्पाची एकूण लांबी 11.8 किमी आहे.  यामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास 12 किमीने कमी होणार असून प्रवासाच्या वेळेत सुमारे 1 तासाची बचत होईल.

पंतप्रधानांनी गोरेगाव मुलुंड लिंक रोड (जी एम एल आर ) प्रकल्पात 6300 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या बोगद्याच्या कामाची पायाभरणी केली.  गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग   ते मुलुंड येथील पूर्व  द्रुतगती महामार्गा दरम्यान  रस्ता जोडणे ही जी एम एल आर  प्रकल्पाची कल्पना   आहे. या रस्ता प्रकल्पाची एकूण लांबी अंदाजे 6.65 किलोमीटर आहे आणि पश्चिम उपनगरांना नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळाशी आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्गाशी थेट जोडण्याचे काम हा रस्ता करेल.

पंतप्रधानांनी नवी मुंबईतील तुर्भे येथे कल्याण यार्डाच्या पुनर्रचनेची आणि गतिशक्ती मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलची पायाभरणीही केली.  कल्याण यार्डामुळे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय वाहतुकीचे पृथक्करण होण्यास मदत होणार आहे . पुनर्रचनेमुळे अधिक गाड्या हाताळण्याची यार्डाची क्षमता वाढेल, गर्दी कमी होईल आणि गाड्यांची परिचालनक्षमता सुधारेल.  नवी मुंबईतील गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल 32,600 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रावर बांधले जाणार आहे.  हे स्थानिक लोकांसाठी अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल तसेच सिमेंट आणि इतर वस्तूंच्या हाताळणीसाठी अतिरिक्त टर्मिनल म्हणून काम करेल.

पंतप्रधानांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन फलाटांचे  आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील  फलाट  क्र.  10 आणि 11 यांचे लोकार्पण केले . लोकमान्य टिळक टर्मिनसवरील नवीन लांबलचक फलाटांमुळे  अधिक लांब रेल्वेगाड्या उभ्या राहू शकतात, प्रत्येक गाडीत अधिक प्रवासी सामावू  शकतात आणि वाढीव रहदारी हाताळण्यासाठी स्थानकाची  क्षमता सुधारू शकते.   छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्र.10 आणि 11 यांची लांबी 382 मीटरने वाढवण्यात आली असून या भागावर सावलीसाठी आच्छादन तसेच गाडी धुण्याच्या दृष्टीने या भागातील रेल्वे रुळांवर विशेष सोय देखील केलेली आहे. या विस्तारामुळे या फलाटाची क्षमता तब्बल  24 डब्यांपर्यंतच्या गाड्या उभ्या करण्याची होईल , त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढण्यास मदत होईल.

पंतप्रधानांनी सुमारे 5600 कोटी रुपयांच्या खर्चाची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली.  हा एक परिवर्तनशील   अंतर्वासिता कार्यक्रम असून तो तरुणांमधील बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने 18 ते 30 या वयोगटातील तरुणांना कौशल्य वाढीच्या आणि उद्योगाभिमुखतेच्या संधी देतो.

***

M.Iyengar/S.Patil/S.Kane/N.Chitale/V.Joshi/N.Mathure/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2033030) Visitor Counter : 138