सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

"निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर" या संकल्पनेसह 18 वा "सांख्यिकी दिन" आज साजरा


यानिमित्ताने ई-सांख्यिकी पोर्टलचे करण्यात आले उदघाटन

Posted On: 29 JUN 2024 2:48PM by PIB Mumbai

 

प्राध्यापक (दिवंगत) प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या सन्मानार्थ, केंद्र सरकारने त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 जून हा दिवस राष्ट्रीय स्तरावर साजरा केल्या जाणाऱ्या विशेष श्रेणीतील दिवस म्हणून मान्यता देत "सांख्यिकी दिन" म्हणून म्हणून निश्चित केला आहे. देशाच्या विकासासाठी सामाजिक-आर्थिक नियोजन, आणि धोरण आखणीत सांख्यिकीची भूमिका आणि महत्त्व याविषयी विशेषत: युवा पिढीमध्ये जनजागृती करणे, हा सांख्यिकी दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.

2007 पासून, समकालीन राष्ट्रीय महत्वाच्या संकल्पनेसह दरवर्षी सांख्यिकी दिन साजरा केला जातो. सांख्यिकी दिन, 2024 ची संकल्पना "निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर" अशी आहे.  डेटा आधारित निर्णय घेण्याची संकल्पना कोणत्याही क्षेत्रात योग्य निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची आहे, आणि अधिकृत आकडेवारीतून समोर येणारी सांख्यिकीय माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, आणि पुरावा आधारित निर्णय घेणे सुलभ करण्यासाठी पूर्व-अटींपैकी एक आहे.

सांख्यिकी दिन, 2024 चा मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीतील दिल्ली कँटोन्मेंट स्थित माणेकशॉ सेंटर येथे आयोजित करण्यात आला. 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगरिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी, भारतीय सांख्यिकी प्रणालीला आकार देण्यात प्रा. पी. सी. महालनोबिस यांनी बजावलेली भूमिका विशद केली. भारताने विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी डेटा आधारित धोरण आखणी  सुरूच ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष प्रा. राजीव लक्ष्मण करंदीकर तसेच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव सौरभ गर्ग यांनीही  उपस्थितांना संबोधित केले. करंदीकर यांनी डेटा सहज उपलब्ध आणि वापरण्यायोग्य बनवण्याच्या गरजेवर भर दिला. डेटा तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे  मंत्रालयाचे प्रयत्न यापुढेही सुरु  ठेवावेत, अशी सूचना त्यांनी केली.  हितधारकांमध्ये समन्वय साधत विविध संस्थांनी  तयार केलेल्या डाटाबेसचे आदानप्रदान आणि वापर क्षमता तसेच त्याची जोडणी या गरजेवरही त्यांनी भर दिला. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या सचिवांनी उपस्थितांना संबोधित करताना, संगणकाच्या मदतीने झालेल्या वैयक्तिक मुलाखत (CAPI), नवीन सर्वेक्षणे, वापरकर्ता प्रतिबद्धता सराव आणि नव्याने सुरू केलेले ई-सांख्यिकी पोर्टल यांसारख्या सर्वेक्षण डेटामधील विलंब कमी करण्यासाठी मंत्रालयाने सुरू केलेल्या अलीकडील उपक्रमांवर प्रकाश टाकला. सांख्यिकी दिनाची संकल्पना, सांख्यिकी कर्मचाऱ्यांना आणि नियोजकांना डेटा आधारित निर्णय घेण्यासाठी प्रेरणा देत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्रालये आणि विभाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारचे वरिष्ठ अधिकारी; संयुक्त राष्ट्रे, जागतिक बँक आणि अशा विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर हितसंबंधी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले. हा कार्यक्रम मंत्रालयाच्या सोशल मीडिया हँडलद्वारे वेब-कास्ट आणि लाइव्ह स्ट्रीम देखील प्रसारित करण्यात आला. याप्रसंगी पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑन द स्पॉट निबंध लेखन स्पर्धा, 2024’ च्या विजेत्यांनाही गौरवण्यात आले.

तांत्रिक सत्रादरम्यान, संरक्षण मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. अजय कुमार यांनी प्रशासनामध्ये डेटाचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी वेगाने बदलत्या डिजिटल युगात डेटाचे महत्त्व तसेच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाची वाढती भूमिका आणि व्याप्ती यावर प्रकाश टाकला.  यानंतर जागतिक बँक समूहाच्या गरिबी आणि समता जागतिक सरावाचे जागतिक संचालक लुईस फेलिप लोपेझ-कॅल्व्हा यांनी, निर्णय घेण्यासाठी डेटा वापरण्याच्या जागतिक अनुभवावर सादरीकरण केले.  प्रचलित जागतिक पद्धती सामायिक करताना प्रभावी धोरण तयार करण्यासाठी डेटा ही एक आवश्यक पायाभूत सुविधा आहे यावर त्यांनी भर दिला.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, दरवर्षी सांख्यिकी दिनी (म्हणजे, 29 जून रोजी) अद्ययावत शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये - राष्ट्रीय निर्देशक आराखडा (SDGs- NIF) वर आधारित प्रगती अहवाल प्रसिद्ध करते. यासोबतच प्रगती अहवालाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या दोन हस्तपुस्तिका सुद्धा प्रकाशित केल्या जातात. त्यानुसार, या कार्यक्रमात खालील तीन अहवाल प्रसिद्ध करण्यात आले:

शाश्वत विकासाची उद्दिष्टे - राष्ट्रीय निर्देशक आराखडा प्रगती अहवाल, 2024’

शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवरील डेटा स्नॅपशॉट- राष्ट्रीय निर्देशक आराखडा, 2024’

शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये- राष्ट्रीय निर्देशक आराखडा, 2024’

हे अहवाल  सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय ( एमओएसपीआय ) च्या वेबसाइटवर (www.mospi.gov.in) पाहता येतील. अहवालातून एसडीजी निर्देशकांवरील टाइम सीरीज डेटा एमएस एक्सेल फॉरमॅटमध्ये डाउनलोड करण्यायोग्य आहे.

देशातील अधिकृत आकडेवारीचा प्रसार सुरळीत करण्यासाठी सर्वसमावेशक डेटा व्यवस्थापन आणि सामायिकरण प्रणाली स्थापन करण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने eSankhyiki पोर्टल (https://esankhyiki.mospi.gov.in) सुरू केले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या   (https://mospi.gov.in/). संकेतस्थळावरूनसुद्धा या पोर्टलला भेट देता येईल. याद्वारे नियोजकांना, धोरणकर्त्यांना, संशोधकांना  आणि जनतेला सुद्धा मोठ्या प्रमाणावर माहिती प्राप्त होईल. ई सांख्यिकी (eSankhyiki)  पोर्टलमध्ये डेटाचा सुरळीत वापर आणि पुनर्वापर सुलभ करण्यासाठी दोन विभाग आहेत, ते म्हणजे:

डेटा कॅटलॉग: कॅटलॉग हे मंत्रालयाच्या प्रमुख डेटा मालमत्तेची यादी करते, उदा. राष्ट्रीय लेखा सांख्यिकी, ग्राहक किंमत निर्देशांक, औद्योगिक उत्पादन निर्देशांक, उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण, नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण आणि घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षण.

मॅक्रो इंडिकेटर:  फिल्टरिंग आणि व्हिज्युअलायझेशनसाठीच्या वैशिष्ट्यांसोबत मुख्य मॅक्रो इंडिकेटरचा टाइम सिरीज डेटा प्रदान करते. हे वापरकर्त्यांना अनुकूल डेटासेट, व्हिज्युअलायझेशन डाउनलोड करण्यास आणि एपीआयद्वारे प्रवेश करण्याची परवानगी देते, ज्यामुळे डेटाची फेरउपयोगिता वाढते. सध्या या विभागात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाची राष्ट्रीय लेखा सांख्यिकी, ग्राहक किंमत निर्देशांक, औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण ही चार प्रमुख उत्पादने समाविष्ट आहेत. ज्यामध्ये गेल्या दहा वर्षांच्या डेटाचा समावेश आहे.

***

M.Pange/S.Kane/S.Mukhedkar/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029501) Visitor Counter : 47