पंतप्रधान कार्यालय

18 व्या लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर लोकसभेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 26 JUN 2024 3:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जून 2024

 

आदरणीय अध्यक्ष महोदय,

या सदनाचे हे सौभाग्य आहे की आपण दुसऱ्यांदा या आसनावर विराजमान होत आहात. आपले आणि या संपूर्ण सदनाचे मी खूप खूप अभिनंदन करतो. 

आदरणीय अध्यक्ष महोदय, 

माझ्याकडून तर आपल्याला शुभेच्छा आहेतच याशिवाय या संपूर्ण सदनाकडूनही आपल्याला अनेकानेक शुभेच्छा. अमृतकाळाच्या या महत्त्वपूर्ण काळात दुसऱ्यांदा या पदावर विराजमान होण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्याला लाभली आहे आणि आपला  पाच वर्षांचा अनुभव आणि आपल्यासोबत आमचाही  पाच वर्षांचा अनुभव, आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आपण येणारी पाच वर्षे आम्हा सर्वांना मार्गदर्शनही कराल आणि देशाच्या आशाअपेक्षा पूर्ण करण्याची या सदनाची जी जबाबदारी आहे ती निभावण्यात तुमची मोठी भूमिका असेल. 

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आपल्या शास्त्रात असे म्हटले आहे की नम्र आणि सुसंस्कृत  व्यक्ती सहजपणे यशस्वी होते आणि त्यासोबतच तुम्हाला स्मितहास्याचे वरदान मिळाले आहे.  तुमचे हे स्मितहास्य सदनाला नेहमी प्रसन्न ठेवते. तुम्ही प्रत्येक पावलावर यश मिळवत आला आहात, नवे विक्रम रचत आला आहात. 18 व्या लोकसभेत अध्यक्षपदाचा कार्यभार दुसऱ्यांदा स्वीकारणे, हाही एक नवा विक्रम तुम्ही रचत आहात. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची संधी बलराम जाखड यांना मिळाली होती. ही संधी मिळालेले ते पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर तुम्हाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा  अध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. गेल्या 20 वर्षांच्या कालखंडात बहुतांश अध्यक्षांनी एक तर निवडणूकच लढवली नाही किंवा ते निवडून तरी आले नाहीत. तुम्ही हे समजू शकता की, अध्यक्षाचे काम किती कठीण असते की दुसऱ्यांदा निवडून येणे त्याच्यासाठी कठीण होऊन बसते.  पण तुम्ही निवडून आला आहात, तुम्ही एक नवा इतिहास रचला आहे. 

आदरणीय अध्यक्ष महोदय,

या सदनातील आपले बहुतांश माननीय सदस्य तुम्हाला जाणतात, तुमचे जीवनही त्यांना माहीत आहे आणि गेल्या वेळेस तुमच्याविषयी मी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्याची पुनरुक्ती मी टाळतो. पण एक खासदार या रूपाने,  खासदार म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने काम करता ते देखील जाणून घेण्यासारखे आहे आणि त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. मला विश्वास आहे की खासदार म्हणून तुमची कार्यशैली पहिल्यांदाच खासदार होणाऱ्या आणि तरुण खासदारांना नक्कीच प्रेरणा देईल.  आपण आपल्या संसदीय मतदारसंघात निरोगी माता आणि निरोगी बाळ, हे अभियान ज्या वचनबद्धतेने चालवले, आणि सुपोषित माता या अभियानाला तुम्ही ज्या प्रकारे  तुमच्या क्षेत्रात प्राथमिकता दिली, स्वतः त्यात जोडले गेलात, ते खरोखरच प्रेरणादायी आहे. राजकीय कामांव्यतिरिक्त तुमचा मतदारसंघ कोटा इथल्या ग्रामीण भागात, हॉस्पिटल ऑन व्हील्स, हे मानवसेवेचे उत्तम काम आपण निवडले आहे. यातून गावागावातल्या लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यात मदत होत आहे. तुम्ही समाजातल्या शेवटच्या घटकातील लोकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत अनेक सामाजिक सुविधा पोहोचवता. आपण नियमित रूपाने गरिबांना कपडे, घोंगडी, ऋतूनुसार छत्री, पादत्राणे अशी जी काही गरज असेल ती पोहोचवता. आपल्या क्षेत्रातील युवकांसाठी खेळांना प्रोत्साहन देणे, ही आपली प्राथमिकता राहिली आहे. 

तुमचा  मागील कार्यकाळ, 17  व्या लोकसभेचा कालखंड संसदीय इतिहासातील सुवर्णकाळ राहिला आहे. आपल्या अध्यक्षतेखाली संसदेमध्ये जे ऐतिहासिक निर्णय झाले, आपल्या अध्यक्षतेत सदनाच्या माध्यमातून ज्या सुधारणा झाल्या ती या सदनाची आणि आपली मोठी ठेव आहे आणि भविष्यामध्ये 17व्या लोकसभेचे जे सिंहावलोकन होईल, तिच्याविषयी जेव्हा लिहिले जाईल तेव्हा भारताच्या भविष्याला नवी दिशा देण्यात आपल्या अध्यक्षतेखालील 17व्या लोकसभेची खूप मोठी भूमिका असेल. 

आदरणीय अध्यक्ष महोदय, 

नारी शक्ती वंदन अधिनियम 2023, जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक, ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण विधेयक, ग्राहक संरक्षण विधेयक, प्रत्यक्ष कर-विवाद से विश्वास विधेयक, अशी सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या दृष्टीने कितीतरी महत्त्वाचे ऐतिहासिक कायदे 17 व्या लोकसभेत आपल्या अध्यक्षतेखाली या सदनात मंजूर झाले आहेत आणि त्यातून देशासाठी मजबूत पाया रचला गेला आहे. जे कार्य स्वातंत्र्याच्या 70  वर्षात झाले नाही , ते आपल्या अध्यक्षतेखाली या सदनाने करून दाखवले आहे. 

आदरणीय अध्यक्ष महोदय,

लोकशाहीच्या दीर्घ प्रवासात अनेक टप्पे येतात.  काही प्रसंग असे असतात की ज्यातून आपल्याला कीर्ती प्राप्त होते.  मला विश्वास आहे की 17 व्या लोकसभेच्या कामगिरीचा आज आणि भविष्यातही देशाला अभिमान वाटेल.आज जेव्हा देशाच्या आकांक्षा पूर्ण करत  भारताला आधुनिक बनविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, तेव्हा मला असा विश्वास वाटतो आहे की हे नवीन संसद भवन अमृतकाळाचे भविष्य लिहिण्याचेही काम करेल आणि तेही आपल्याच अध्यक्षतेखाली होईल. आम्ही सर्वजणांनी आपल्या अध्यक्षतेखाली नवीन संसद भवनात प्रवेश केला आणि संसदेचे कामकाज प्रभावी आणि जबाबदारीने करण्यासाठी तुम्ही असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत आणि त्यामुळे लोकशाही मजबूत होण्यास मदत झाली आहे.  आज आम्ही लोकसभेत कागदविरहीत डिजिटल प्रणालीद्वारे कामकाज करत आहोत.आपणच प्रथमतः सर्व माननीय खासदारांना ब्रीफिंग करणारी यंत्रणा तयार केली.यामुळे सर्व सन्माननीय खासदारांना आवश्यक संदर्भ साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले.  त्यामुळे सभागृहातील चर्चेमध्ये उत्साह आला. तुमचा हा उपक्रम इतका चांगला होता,की त्यामुळे मीही काही बोलू शकतो, माझे म्हणणेही मांडू शकतो,असा आत्मविश्वास खासदारांमध्ये निर्माण झाला, आपण अशी एक चांगली प्रणाली प्रथमतः विकसित केली आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

जी -20 हा भारताच्या यशातील महत्वपूर्ण पान आहे. पण आपल्या नेतृत्वाखाली जी-20 देशांच्या पीठासीन अधिकारी आणि वक्त्यांची जी, P-20 परिषद झाली, त्याविषयी फारच कमी चर्चा झाली आहे,आणि  ही P-20 आतापर्यंत झालेल्या सर्व परिषदांमध्ये अशी एक वैशिष्ट्यपूर्ण परिषद होती ज्यात तुमच्या निमंत्रणावरून जगातील बहुतेक देश भारतात आले आणि त्या शिखर परिषदेत खूप उत्तम निर्णय घेण्यात आले; भारताच्या लोकशाहीचा जगात गौरव करण्यात यांचा फार मोठा वाटा आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

हे आमचे भवन म्हणजे, फक्त चार भिंती नाहीत. आपली ही संसद 140 कोटी देशवासीयांच्या आकांक्षांचे केंद्र आहे. संसदेचे कामकाज, उत्तरदायित्व आणि आचरण यामुळे आपल्या देशवासीयांची लोकशाहीप्रती असलेली निष्ठा अधिक दृढ होते.  तुमच्या मार्गदर्शनाखाली 17 व्या लोकसभेची उत्पादकता 97% होती, जी 25 वर्षातील सर्वोच्च पातळी आहे आणि त्यासाठी सर्व सन्माननीय सदस्य अभिनंदनास पात्र आहेत पण तुम्ही विशेष अभिनंदनास पात्र आहात. कोविडसारख्या महामारीच्या कठीण काळात तुम्ही प्रत्येक खासदाराशी फोनवर बोललात आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलीत.  जेव्हा जेव्हा एखाद्या खासदाराच्या आजारपणाची बातमी यायची तेव्हा तुम्ही सभागृहाचे अध्यक्ष या नात्याने त्यांची वैयक्तिक काळजी घेतलीत आणि जेव्हा मी या सर्व गोष्टी पक्षांच्या खासदारांकडून ऐकायचो तेव्हा मला खूप अभिमान वाटायचा, जणू तुम्ही आमच्या या कुटुंबाचे प्रमुख आहात. त्या कोरोनाच्या काळात आम्हालाही वैयक्तिक चिंता होत्या.  कोरोनाच्या काळातही तुम्ही सभागृहाचे कामकाज थांबू दिले नाही. खासदारांनीही तुमच्या प्रत्येक सूचना ऐकल्या, कुणाला वरच्या मजल्यावर बसायला सांगितले तर तो तिथे जाऊन बसला, कुणाला दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसायला सांगितले तर तोही बसला, पण देशाचे काम कुणीही थांबू दिले नाही.पण तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे आम्ही त्या कठीण काळातही काम करू शकलो आणि ही आनंदाची बाब आहे की, कोरोनाच्या काळात सभागृहाने 170% उत्पादकता गाठली, ही जगातील सर्व लोकांसाठी एक उल्लेखनीय बाब  आहे. 

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आम्हा सर्वांना सभागृहात आदर्श आचरण करायचे आहे, आम्हा सर्वांना सभागृहाचे नियम पाळायचे आहेत आणि यासाठी आपण अत्यंत काटेकोरपणे, सुयोग्य पद्धतीने आणि कधी कधी कठोरपणे निर्णय घेतले आहेत.मला माहित आहे, की अशा निर्णयांमुळे आपल्याला त्रास होतो.  परंतु वैयक्तिक वेदना आणि सदनाच्या प्रतिष्ठेच्या वेळी तुम्ही सभागृहाची प्रतिष्ठा याची निवड करता  आणि सदनाची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करता, या धैर्यशाली कार्यासाठी आदरणीय अध्यक्ष महोदय, आपण अभिनंदनास पात्र आहात.मला खात्री आहे की आदरणीय अध्यक्ष, आपण  यशस्वी व्हालच.तसेच तुमच्या अध्यक्षतेखाली ही 18वी लोकसभा देशातील नागरिकांची स्वप्नेही  यशस्वीपणे पूर्ण करेल.

या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी आणि देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेणाऱ्या या सभागृहाचे अध्यक्षपद भूषवल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो !

मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो !

 

* * *

NM/SonaliK/Sampada/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2028787) Visitor Counter : 41