भारतीय निवडणूक आयोग

निवडणूकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ निवडणुक प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सोबतीला नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी

Posted On: 18 MAY 2024 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मे 2024

 

2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत, निवडणूक संहितेच्या उल्लंघनाच्या घटनांबाबत तक्रार दाखल करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचे सी-व्हिजील  (cVIGIL) हे ॲप जनतेच्या हाती एक अत्यंत प्रभावी साधन म्हणून काम करत आहे.  या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून, 15 मे 2024 पर्यंत या ॲपद्वारे 4.24 लाखांपेक्षा जास्त तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. यापैकी 4,23,908 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे तर उर्वरित 409 प्रकरणांवर प्रक्रिया सुरू आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आपण दिलेले वचन दृढतेने पाळत सुमारे 89% तक्रारींचे निराकरण तक्रार नोंदवल्यापासून 100 मिनिटांच्या आत केले आहे.

विहित वेळेपेक्षा जास्त काळासाठी लाऊडस्पीकरचा वापर किंवा आवाज मर्यादेचे उल्लंघन, बंदी कालावधीत प्रचार करणे, परवानगीशिवाय बॅनर किंवा पोस्टर लावणे, परवानगीपेक्षा जास्त वाहने लावणे, मालमत्तेचे विद्रुपीकरण, बंदुक दाखवणे किंवा धमकावणे आणि प्रलोभन दाखवणे यासारख्या घटनांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांनी या ॲपचा वापर केला आहे.

तक्रारींची श्रेणीनिहाय आकडेवारी खाली दिली आहे:

सी-व्हिजील हे वापरकर्ता-अनुकूल आणि वापरण्यास सुलभ असे ॲप्लिकेशन आहे. हे ॲप दक्ष नागरिकांना जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकांशी संपर्क साधण्यास मदत करते. या ॲपचा वापर करून नागरिकांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात न जाता राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार काही मिनिटांत करता येते आणि सी-विजिल ॲपवर तक्रार पाठवताच तक्रारदाराला एक युनिक आयडी मिळतो, ज्याद्वारे ती व्यक्ती त्यांच्या मोबाईलवर तक्रारीचा पाठपुरावा करू शकते.

एकाच वेळी कार्य करणाऱ्या घटकांची त्रिसूत्री सी-व्हिजील ॲप ला यशस्वी बनवते. याचा वापर करून वापरकर्ते रिअल-टाइम पद्धतीने ध्वनी, छायाचित्र किंवा चित्रफीत तयार करू शकतात. अशा तक्रारींना वेळेनुसार प्रतिसाद देण्यासाठी "100-मिनिटांची" कालमर्यादा सुनिश्चित केली आहे. वापरकर्त्याने नियमांच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी सी-व्हिजील ॲप मधील कॅमेरा सुरू केल्यानंतर हे ॲप स्वयंचलितपणे जिओ-टॅगिंग वैशिष्ट्य सक्षम करते. यामुळे  भरारी पथकाला तक्रारीत नोंदवण्यात आलेल्या उल्लंघन झाल्याच्या घटनेचे अचूक स्थान कळू शकते आणि नागरिकांनी घेतलेले छायाचित्र कायद्याच्या न्यायालयात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते. नागरिक निनावी तक्रारी देखील नोंदवू शकतात. या ॲपचा  गैरवापर टाळण्यासाठी, सी-व्हिजील ॲपमध्ये भौगोलिक निर्बंध, अहवाल देण्यासाठी वेळेची मर्यादा आणि डुप्लिकेट किंवा बनावट तक्रारींची छाननी करण्यासाठी यंत्रणा अशा अनेक सुरक्षा उपायांचा समावेश आहे. तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन मतदार आणि राजकीय पक्षांना सुविधा देण्यासाठी आयोगाने तयार केलेल्या ॲप्सपैकी हे एक ॲप आहे.

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021007) Visitor Counter : 62