अर्थ मंत्रालय
मार्च महिन्यात आजवरचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक 1.78 लाख कोटी रुपये इतके मासिक सकल जीएसटी महसूल संकलन; गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.5% वाढ (18.4% निव्वळ आधारावर)
Posted On:
01 APR 2024 3:41PM by PIB Mumbai
मार्च 2024 महिन्यात 11.5% वार्षिक वाढीसह 1.78 लाख कोटी रुपये इतके आतापर्यंतचे दुसऱ्या सर्वोच्च क्रमांकाचे एकूण वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन म्हणजे जमा झाले आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून वस्तू आणि सेवा कर संकलनात 17.6% इतकी लक्षणीय वाढ झाल्यामुळे हे विक्रमी संकलन झाले आहे. मार्च 2024 मध्ये परतावा दिल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1.65 लाख कोटी रुपये इतका आहे जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 18.4% वाढलेला आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मजबूत सातत्यपूर्ण कामगिरी: आर्थिक वर्ष 2023-24 हा एक मैलाचा दगड ठरला असून या कालावधीतील एकूण वस्तू आणि सेवा कर संकलन वीस लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून 20.14 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 11.7% नी वाढलेले आहे. या आर्थिक वर्षातील सरासरी मासिक संकलन 1.68 लाख कोटी रुपये आहे, जे मागील वर्षाच्या 1.5 लाख कोटीच्या सरासरीला मागे टाकणारे आहे. चालू आर्थिक वर्षासाठी मार्च 2024 पर्यंत परताव्यानंतर जीएसटी महसूल 18.01 लाख कोटी रुपये आहे जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 13.4% ने वाढलेले आहे.
सर्व घटकांमधील सकारात्मक कामगिरी:
मार्च 2024 मधील संकलनाचे विभाजन :
• केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST): 34,532 कोटी रुपये;
• राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST): ₹43,746 कोटी रुपये;
• एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST): 87,947 कोटी रुपये, यामध्ये आयात केलेल्या वस्तूंवर गोळा केलेल्या 40,322 कोटी रुपये कराचा समावेश आहे;
• उपकर: 12,259 कोटी रुपये, यात आयात केलेल्या वस्तूंवर जमा केलेल्या 996 कोटी रुपये कराचा समावेश आहे.
संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 संकलनांमध्ये तत्सम सकारात्मक कल दिसून आला आहे:
• केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST): 3,75,710 कोटी रुपये;
• राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST): 4,71,195 कोटी रुपये;
• एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST): 10,26,790 कोटी रुपये, यामध्ये आयात केलेल्या वस्तूंवर गोळा केलेल्या 4,83,086 कोटी रुपये कराचा समावेश आहे;
• उपकर: 1,44,554 कोटी रुपये, यात आयात केलेल्या वस्तूंवर जमा केलेल्या 11,915 कोटी रुपये कराचा समावेश आहे.
आंतर-सरकारी निपटारा : मार्च 2024 मध्ये, केंद्र सरकारने जमा केलेल्या एकात्मिक वस्तू आणि सेवा करामधून 43,264 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि 37,704 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर स्वरूपात दिले आहेत. या नियमित निपटाऱ्यानंतर मार्च 2024 साठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या स्वरूपात 77,796 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा कराच्या स्वरूपात 81,450 कोटी रुपये एकूण कमाई झाल्याचे दिसून येते. आर्थिक वर्ष 2023-24 साठी, केंद्र सरकारने गोळा केलेल्या एकात्मिक वस्तू आणि सेवा करामधून 4,87,039 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या स्वरूपात आणि 4,12,028 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कराच्या स्वरूपात प्रदान करण्यात आले.
***
S.Kane/S.MukhedkarP.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016830)
Visitor Counter : 188