पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते विविध राज्यांतील सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
द्वारका द्रुतगती मार्गाच्या 19 किमी लांबीच्या हरयाणा विभागाचे उद्घाटन
"2024 वर्षातील तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पाचे राष्ट्रार्पण किंवा पायाभरणी "
“समस्येचे संधीत रूपांतर करणे ही मोदींची हमी आहे”
"21व्या शतकातील भारत हा मोठे दृष्टिकोन असलेला आणि मोठ्या ध्येयांचा भारत आहे"
“पूर्वी, विलंब होत होते ,आता वितरण होत आहे. पूर्वी विलंब होत होता, आता विकास होत आहे''
Posted On:
11 MAR 2024 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरयाणातील गुरुग्राम येथे देशभरातील सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या 112 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरातून लाखो लोक या कार्यक्रमाशी जोडले गेले.
केवळ दिल्लीत कार्यक्रम आयोजित संस्कृतीपासून आता देशाच्या इतर भागांमध्ये हे मोठे कार्यक्रम आयोजित करण्याच्या संस्कृतीचा उल्लेख यावेळी बोलताना पंतप्रधानांनी केला. आज देशाने आधुनिक संपर्क सुविधांच्या दिशेने आणखी एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल टाकले आहे, असे ते म्हणाले. ऐतिहासिक द्वारका द्रुतगती मार्गाच्या हरियाणा विभागाचे लोकार्पण केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, यामुळे दिल्ली आणि हरयाणा दरम्यानचा प्रवासाचा अनुभव कायमचा बदलेल आणि "केवळ वाहनांचाच नाही तर प्रदेशातील लोकांच्या जीवनाचाही गियर बदलेल".
2024 या वर्षाच्या तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पाचे एकतर राष्ट्रार्पण करण्यात आले आहे किंवा त्यांची पायाभरणी करण्यात आली आहे, असे पंतप्रधानांनी प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या गतीमध्ये झालेल्या बदलावर भर देताना सांगितले. आजच्या एक लाख कोटींहून अधिक खर्चाच्या 100 हून अधिक प्रकल्पांमध्ये दक्षिणेकडील कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशातील विकास प्रकल्पांचा समावेश आहे, उत्तरेकडील उत्तर प्रदेश आणि हरयाणाशी संबंधित विकास कामे आहेत, पूर्वेकडे बंगाल आणि बिहारचे प्रकल्प आहेत तर, पश्चिमेकडे , महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमधील मोठे प्रकल्प आहेत. आजच्या प्रकल्पांमध्ये अमृतसर भटिंडा जामनगर मार्गिकेचा 540 किलोमीटरचा विस्तार आणि बंगळुरू रिंग रोडचा विकास यांचा समावेश आहे, असे पंतप्रधान म्हणाले. समस्यांकडून शक्यतांच्या दिशेने झालेल्या स्थित्यंतराचा ठळकपणे उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभूत सुविधा विकासाच्या परिवर्तनकारी प्रभावावर अधिक भर दिला. आव्हानांना संधींमध्ये रुपांतरित करण्याचा त्यांच्या प्रशासनाचा गुरुमंत्र त्यांनी अधोरेखित केला.
अडथळ्यांना विकासाच्या मार्गामध्ये रुपांतरित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा दाखला म्हणून त्यांनी द्वारका द्रुतगती महामार्गाचे उदाहरण दिले. ज्या भागात आता या द्रुतगती महामार्गाची उभारणी झाली आहे तो भाग पूर्वी असुरक्षित समजला जायचा आणि सूर्यास्तानंतर तेथे कोणीही फिरकत नसे याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. मात्र, आज हा भाग राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या (एनसीआर) जलद विकासामध्ये योगदान देणाऱ्या अनेक प्रमुख महामंडळांचे केंद्र झाला आहे असे ते म्हणाले.
या भागाला दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणाऱ्या या द्वारका द्रुतगती महामार्गाला असलेले धोरणात्मक महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. अशा प्रकारचे पायाभूत सुविधा विकास प्रकल्प दळणवळण सुधारतात आणि यातून एनसीआरच्या आर्थिक व्यवहारांना वेग येऊन या भागाची समावेशकता सुधारेल यावर त्यांनी अधिक भर दिला.
तसेच पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील याची सुनिश्चिती करून घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी हरियाणा सरकारचे, विशेषतः मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे कौतुक केले.राज्याच्या पायाभूत सुविधांना आधुनिक रूप देण्याप्रति त्यांचे समर्पण प्रशंसनीय असून ते विकसित हरियाणा, विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततेसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.
दिल्ली-एनसीआर प्रदेशातील पायाभूत सुविधा विकासासाठी सरकारने स्वीकारलेल्या समग्र दृष्टिकोनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.द्वारका द्रुतगती महामार्ग, परिघीय द्रुतगती महामार्ग तसेच दिल्ली-मीरत द्रुतगती महामार्ग यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण झाले पाहिजेत यावर त्यांनी अधिक भर दिला. हे प्रकल्प, मेट्रो मार्गांचा विस्तार आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी अशी सर्व कार्ये वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे तसेच या भागातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आली आहेत असे त्यांनी सांगितले. “21 व्या शतकातील भारत हा भव्य संकल्पनांचा आणि मोठ्या ध्येयांचा भारत आहे,” पंतप्रधान म्हणाले.
पायाभूत सुविधा विकास आणि गरिबी निर्मूलन यांच्यातील परस्पर संबंधांवर अधिक भर देत पंतप्रधानांनी ग्रामीण भागातील सुधारलेले रस्ते आणि डिजिटल संपर्क सुविधा यांनी गावातील लोकांसाठी नव्या संधी कशा प्रकारे निर्माण केल्या आहेत हे ठळकपणे मांडले. डिजिटल पायाभूत सुविधांमुळे तसेच आरोग्य सेवा आणि शिक्षण यांसारख्या अत्यावश्यक सेवांची उपलब्धता होऊ लागल्यामुळे भारताच्या ग्रामीण भागात उदयाला येऊ लागलेल्या नव्या संधींचा त्यांनी उल्लेख केला. “अशा प्रकारच्या उपक्रमांनी गेल्या 10 वर्षांत 25 कोटी भारतीयांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर पडण्यासाठी मदत झाली आणि आता भारत जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे,” पंतप्रधान म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले, “देशात सुरु असलेले हे वेगवान पायाभूत सुविधा विकास कार्य भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यास मदत करेल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याच्या सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. अशा उपक्रमांमुळे केवळ देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत नाही तर विशेषत: तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात यावर त्यांनी भर दिला.
ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे (2008 मध्ये घोषणा आणि 2018 मध्ये पूर्ण झालेला) अर्थात पूर्व परिघीय द्रुतगती मार्ग तसेच गेल्या वीस वर्षांपासून रखडलेला द्वारका द्रुतगती मार्ग या सध्याच्या सरकारने पूर्ण केलेल्या प्रलंबित प्रकल्पांचा उलेख करत पंतप्रधान म्हणाले, “आज आपले सरकार ज्या प्रकल्पांची पायाभरणी करते, ते वेळेत पूर्ण करण्यासाठी तितकेच कष्ट करते. आणि मग निवडणुका होतात की नाही हे आम्ही पाहात नाही.” खेड्यापाड्यात लाखो किलोमीटरचे ऑप्टिक फायबर, छोट्या शहरांतील विमानतळ, रुलर रोड यासारखे प्रकल्प निवडणुकीच्या वेळेची पर्वा न करता पूर्ण होतात, असे त्यांनी उद्धृत केले.
पंतप्रधान म्हणाले, “पूर्वी विलंब होत होता, आता वितरण होत आहे. पूर्वी विलंब होत होता, आता विकास होत आहे. ते म्हणाले की 9 हजार किमीचा जलदगती कॉरिडॉर तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जात असून त्यापैकी 4 हजार किमी आधीच बांधण्यात आले आहे. वर्ष 2014 मध्ये 5 शहरांपूर्ती मर्यादित असलेली मेट्रो आता 21 शहरांपर्यंत पोहोचली आहे. “हे काम विकासाच्या दृष्टीकोनातून केले जात आहे. हेतू योग्य असताना या गोष्टी घडतात. आगामी 5 वर्षांत विकासाचा हा वेग अनेक पटींनी वाढेल,” असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.
यावेळी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, मुख्यमंत्री मनोहर लाल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राव इंद्रजित सिंह, कृष्ण पाल, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला उपस्थित होते.
पार्श्वभूमी
वाहतुकीचा ओघ सुधारण्यासाठी आणि NH-48 वर दिल्ली आणि गुरुग्राम दरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी ऐतिहासिक द्वारका द्रुतगती मार्गाच्या हरियाणा विभागाचे उद्घाटन केले. 8 पदरी द्वारका द्रुतगती मार्गाचा 19 किमी लांबीचा हरियाणा विभाग सुमारे 4,100 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला असून त्यात 10.2 किमी लांबीच्या दिल्ली-हरियाणा बॉर्डर ते बसई रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि 8.7 किमी लांबीच्या बसई रेल्वे उड्डाणपूल ते खेरकी दौला अशा दोन पॅकेजेसचा समावेश आहे. हा मार्ग दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुरुग्राम बायपासला थेट कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल.
पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या इतर प्रकल्पांमध्ये दिल्लीतील नानगलोई - नजाफगढ रोड ते सेक्टर 24 द्वारका सेक्शन या मधील 9.6 कि.मी. चा सहापदरी अर्बन एक्स्टेंशन रोड (UER-II) पॅकेज थ्री, उत्तरप्रदेशातील लखनौ रिंग रोडवरील 4,600 कोटी रुपये खर्चून विकसित केलेली तीन पॅकेजेस, आंध्र प्रदेशातील NH16 वरील आनंदपुरम- पेंडुर्थी- अनकापल्ली हे 2,950 कोटी रुपये खर्चून बांधलेला विभाग, हिमाचल प्रदेशातील NH-21 वरील 3,400 कोटीं रुपये खर्चाचे किरातपूर ते नेरचौक सेक्शन (2 पॅकेजेस), कर्नाटकातील 2,750 कोटी रुपये खर्चाचा दोबासपेठ- हेस्कोट सेक्शन, याशिवाय देशभरात विविध राज्यांमध्ये 25,500 कोटी रुपयांचे 42 इतर प्रकल्पांचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी देशभरातील विविध ठिकाणच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी सुद्धा केली. पायाभरणी केलेल्यापैकी महत्वाच्या प्रकल्पांमध्ये आंध्र प्रदेशातील बेंगळुरु कडप्पा - विजयवाडा एक्स्प्रेस वे वरील 14,000 कोटी खर्च असणारी 14 पॅकेजेस, कर्नाटकातील NH-748A वरील बेळगाव - हुंगुंड - रायचूर विभागामधील रु. 8,000 कोटी खर्चाची 6 पॅकेजेस, हरयाणातील 4,900 कोटी रुपये खर्चाची शामली - अंबाला महामार्गावरील 3 पॅकेजेस, पंजाबातील अमृतसर भटींडा कॉरिडॉरमधील 3,800 रुपये खर्चाची 2 पॅकेजेस, . याशिवाय देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये 32,700 कोटी रुपये खर्चाचे 39 इतर प्रकल्प यांचा समावेश आहे.
हे प्रकल्प राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याच्या विकासात महत्वाचे योगदान देतील, तसेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती उंचावत, रोजगाराच्या संधी आणि देशभरात वेगवेगळ्या भागांमधील व्यापार उदीम आणि व्यवसाय यांना चालना देतील.
* * *
S.Patil/SonalC/Sanjana/Vasanti/Vijaya/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2013538)
Visitor Counter : 130
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam