पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते ओदिशा मध्ये चांदीखोल येथे 19,600 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण


भारतीय तेल महामंडळाच्या पारादीप तेल शुद्धीकरण प्रकल्पातील मोनो इथिलीन ग्लायकॉल उत्पादन प्रकल्पाचे केले उद्घाटन

पारादीप येथील 0.6 एमएमटीपीए एलपीजी आयात सुविधा तसेच पारादीप ते हल्दिया या 344 किमी लांबीच्या उत्पादनवाहक पाईपलाईनचे केले उद्घाटन

आयआरईएल(आय) या कंपनीच्या ओदिशा सँड्स समूहातील 5 एमएलडी क्षमतेच्या सीवॉटर डीसॅलीनेशन प्रकल्पाचे केले उद्घाटन

विविध रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करून पायाभरणी केली

अनेक रेल्वे प्रकल्प देशाला अर्पण

“आजचे प्रकल्प देशातील बदलत्या कार्य संस्कृतीचे दर्शन घडवतात”

“आज देशात असलेले सरकार विकसित भारताच्या उभारणीची शपथ घेऊन भविष्य घडवण्यासाठी कार्यरत आहे आणि त्यासोबतच हे सरकार जनतेच्या सध्याच्या गरजांबद्दल देखील सजग आहे”

“केंद्र सरकार ओदिशामध्ये आधुनिक जोडणी सुविधा निर्माण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे जेणेकरून स्थानिक साधनसंपत्तीच्या वापराने राज्याची अर्थव्यवस्था सुधारेल”

Posted On: 05 MAR 2024 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मार्च 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशा मध्ये चांदीखोल येथे 19,600 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये तेल आणि वायू, रेल्वे, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग तसेच अणुऊर्जा या क्षेत्रांशी संबधित कार्यांचा यात समावेश आहे.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की भगवान जगन्नाथ आणि माता बिरजा यांच्या आशीर्वादाने, आज जयपूर तसेच ओदिशा मध्ये विकासाचा एक नवा प्रवास वाहू लागला आहे. आज बिजू पटनाईक यांची जयंती आहे याची नोंद घेत पंतप्रधानांनी देश तसेच ओदिशा यांच्याप्रति पटनाईक यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले.

पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, अणुऊर्जा, रस्ते, रेल्वे आणि जोडणी क्षेत्रांतील सुमारे 20,000 कोटी रुपये खर्चाच्या महाविकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी कार्याचा ठळक उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की या प्रकल्पांमुळे या भागातील औद्योगिक कार्यांना चालना मिळेल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. आजच्या विकास प्रकल्पांबद्दल पंतप्रधानांनी ओदिशाच्या नागरिकांचे अभिनंदन केले.

विकसित भारत च्या संकल्पासाठी काम करताना देशाच्या सध्याच्या गरजांची काळजी घेण्याचा सरकारचा दृष्टिकोन पंतप्रधानांनी मांडला. ऊर्जा क्षेत्रातील पूर्वेकडील राज्यांच्या क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. ऊर्जा गंगा योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओदिशा या पाच मोठ्या राज्यांमध्ये नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी मोठे प्रकल्प सुरू आहेत. ओदिशातील पारादीप ते पश्चिम बंगालमधील हल्दिया या 344 किमी लांबीच्या उत्पादन पाईपलाईनचे पंतप्रधान मोदींनी लोकार्पण केले. त्यांनी पारादीप रिफायनरीत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मोनो इथिलीन ग्लायकोल प्रकल्प आणि पारादीप येथे 0.6 एमएमटीपीए एलपीजी आयात सुविधेचे देखील उद्घाटन केले जे पूर्व भारतातील पॉलिएस्टर उद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणेल. यामुळे भद्रक आणि पारादीप येथील वस्त्रोद्योग पार्कलाही कच्चा माल उपलब्ध होईल.

आजचा हा प्रसंग देशातील बदलत्या कार्यसंस्कृतीचे प्रतीक असल्याचे अधोरेखित करून विकास प्रकल्प पूर्ण करण्यात कधीही रस न घेणाऱ्या मागील सरकारची तुलना पंतप्रधानांनी पायाभरणी करण्यात आलेल्या प्रकल्पांचे वेळेवर उद्घाटन करणाऱ्या विद्यमान सरकारशी केली. वर्ष 2014 नंतर पूर्ण झालेल्या विकास प्रकल्पांचा संदर्भ देताना पंतप्रधानांनी 2002 मध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या परंतु 2014 मध्ये विद्यमान सरकार सत्तेत येईपर्यंत कोणतेही काम न झालेल्या पारादीप तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उल्लेख केला. काल तेलंगणातील संगारेड्डी येथे पारादीप - हैदराबाद पाईपलाईन आणि तीन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील आरामबागमधील हल्दिया ते बरौनीपर्यंत 500 किमी लांबीच्या कच्च्या तेलाच्या पाईपलाईनच्या लोकार्पणाचा उल्लेखही त्यांनी केला.

ओदिशाच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्व भारतातील विपुल नैसर्गिक संसाधनांचा वापर करत आहे यावर प्रकाश टाकताना दररोज सुमारे 50 लाख लिटर क्षारयुक्त पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवणाऱ्या गंजम जिल्ह्यातील विक्षारीकरण (डिसॅलिनेशन) संयंत्राबाबत पंतप्रधान मोदींनी माहिती दिली.

केंद्र सरकार, ओडिशातील आधुनिक संपर्क व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करत आहे जेणेकरून स्थानिक संसाधनांमुळे राज्याची अर्थव्यवस्था वाढेल असे पंतप्रधान म्हणाले.  गेल्या 10 वर्षांत 3000 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग झाले असून, रेल्वे साठीच्या निधीत 12 पटीने वाढ केली आहे. रेल्वे-महामार्ग-बंदर संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी जाजपूर, भद्रक, जगतसिंगपूर, मयूरभंज, खोर्डा, गंजम, पुरी आणि केंदुझारमध्ये राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. नवीन अंगुल सुकिंदा रेल्वे मार्ग कलिंग नगर औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी खुला करेल असे पंतप्रधान म्हणाले.

बिजू पटनायक जी यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला आणि आजच्या विकास प्रकल्पांसाठी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आदी यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पारादीप तेल शुध्दीकरण प्रकल्पात (रिफायनरीत) इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मोनो इथिलीन ग्लायकॉल प्रकल्पाचे उद्घाटन केले. यामुळे भारताचे आयात अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल. ओडिशातील पारादीप ते पश्चिम बंगालमधील हल्दियापर्यंत जाणाऱ्या 344  किमी लांबीच्या उत्पादन वाहिनीचेही त्यांनी उद्घाटन केले. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आयातीसाठीची पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी, पंतप्रधानांनी पारादीप येथे 0.6 एमएमटीपीए एलपीजी आयात सुविधेचे उद्घाटन केले.

या प्रदेशातील रस्ते पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी सिंघारा ते राष्ट्रीय महामार्ग-49 च्या बिंजाबहल विभागाचे चौपदरीकरण;  राष्ट्रीय महामार्ग-49 च्या बिंजाबहल ते तिलेबानी विभागाचे चौपदरीकरण;  राष्ट्रीय महामार्ग-18 च्या बालासोर-झारपोखरिया विभागाचे चौपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग-16 च्या टांगी-भुवनेश्वर विभागाचे चौपदरीकरण यांचे पंतप्रधानांनी राष्ट्रार्पण केले. चंडीखोले येथील चंडीखोले - पारादीप विभागाच्या आठ पदरी कामाची पायाभरणीही त्यांनी केली.

पंतप्रधानांनी 162 किमी बनसापाणी - दैतारी - टोमका - जाखापुरा रेल्वे मार्गाचे राष्ट्रार्पण केले. यामुळे केवळ विद्यमान वाहतूक सुविधेची क्षमताच वाढणार नाही तर, लोह आणि मँगनीज धातूची केओंझार जिल्ह्यातून जवळच्या बंदरे आणि पोलाद संयंत्रांपर्यंत कार्यक्षम वाहतूक देखील सुलभ करेल तसेच प्रादेशिक आर्थिक विकासात लक्षणीय योगदान देईल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्याच्या उद्देशाने कलिंगा नगरमधील कॉनकोर कंटेनर डेपोचे उद्घाटनही करण्यात आले. नार्ला येथे इलेक्ट्रिक लोको पीरियडिकल ओव्हरहॉलिंग कार्यशाळा, कांताबंजी येथे वॅगन पीरियडिकल ओव्हरहॉलिंग कार्यशाळा आणि बघुआपाल येथील देखभाल सुविधांच्या अद्ययावतीकरणासाठी पायाभरणी करण्यात आली.  इतर रेल्वे प्रकल्पांमध्ये नवीन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखविणे समाविष्ट आहे.

आयआरईएल (आय) लिमिटेडच्या ओडिशा सँड्स संकुल येथे 5 एमएलडी क्षमतेच्या सागरी पाण्याच्या विक्षारीकरण अर्थात समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणाऱ्या प्रकल्पाचेही उद्घाटन पंतप्रधानांनी केले. भाभा अणु संशोधन केंद्राने विकसित केलेल्या स्वदेशी विक्षारीकरण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रीय उपयोगांचा एक भाग म्हणून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

 

 

 

 

* * *

S.Patil/Sanjana/Vasanti/Vinayak/D.Rane



(Release ID: 2011735) Visitor Counter : 46