पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तामिळनाडूत मदुराई येथे “ क्रिएटिंग द फ्युचर-डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई एन्त्रप्रेन्युअर्स” या कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी


भारतीय वाहन निर्मिती उद्योगातील एमएसएमईंना पाठबळ देण्यासाठी आणि त्यांच्या पुनरुत्थानासाठी तयार केलेल्या दोन प्रमुख उपक्रमांचा केला शुभारंभ

“एमएसएमई उद्योग हे वाहन उद्योगाला पुढे नेण्यासाठी प्रमुख घटक आहेत आणि देशाच्या आर्थिक विकासात अतिशय महत्त्वाचे आहेत”

“वाहन निर्मिती उद्योग हे अर्थव्यवस्थेचे ऊर्जा केंद्र आहे”

“आज जागतिक पुरवठा साखळीचा एक भक्कम भाग बनण्याची आपल्या एमएसएमईंना मोठी संधी आहे”

“देशाचे एमएसएमई म्हणून एमएसएमईंच्या भविष्याकडे देश पाहात आहे”

“भारत सरकार उद्योगांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे”

“नवोन्मेष आणि स्पर्धात्मकतेला पुढे न्या. सरकार पूर्णपणे तुमच्यासोबत आहे”

Posted On: 27 FEB 2024 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 27 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमध्ये मदुराई येथे क्रिएटिंग द फ्युचर-डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई एन्त्रप्रेन्युअर्स या कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी वाहन निर्मिती उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या(MSMEs) उद्योजकांना मार्गदर्शन केले. पंतप्रधानांनी यावेळी गांधीग्राम-प्रशिक्षित महिला उद्योजक आणि शालेय बालकांसोबतही संवाद साधला.

या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील विद्वानांमध्ये उपस्थित राहताना अतिशय आनंद होत आहे आणि हा अनुभव भविष्याला आकार देणाऱ्या एखाद्या प्रयोगशाळेला भेट देण्यासारखाच आहे असे नमूद केले. तंत्रज्ञानाचा विचार केला तर  जागतिक स्तरावर विशेषतः  वाहन उद्योग क्षेत्रात तामिळनाडूने आपली क्षमता सिद्ध केली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. क्रिएटिंग द फ्युचर-डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई एन्त्रप्रेन्युअर्स ही या कार्यक्रमाची संकल्पना ठेवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि सर्व एमएसएमई आणि आकांक्षी युवा वर्गाला एकाच व्यासपीठावर एकत्र आणल्याबद्दल टीव्हीएस कंपनीचे अभिनंदन केले. वाहन निर्मिती  उद्योगासोबत विकसित भारताच्या विकासाला आवश्यक तो रेटा मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. वाहन निर्मिती क्षेत्राचा देशाच्या जीडीपीमध्ये 7 टक्के वाटा असल्याने देशाच्या वाहन अर्थव्यवस्थेचा तो एक प्रमुख भाग आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी उत्पादन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यामध्ये वाहन उद्योगाच्या भूमिकेची देखील दखल घेतली.  भारतामध्ये वाहन निंर्मिती उद्योगाचे योगदान हे वाहन उद्योग क्षेत्रात एमएसएमईंनी दिलेल्या योगदानाप्रमाणेच असल्याचे त्यांनी नमूद केले.  पंतप्रधानांनी माहिती दिली की भारतात दरवर्षी 45 लाखांपेक्षा जास्त कार्स, दोन कोटींपेक्षा जास्त दुचाकी, 10 लाख व्यावसायिक वाहने आणि 8.5 लाख तिचाकींचे उत्पादन होते. यावेळी त्यांनी प्रत्येक प्रवासी वाहनांमध्ये 3000 ते 4000 वेगवेगळ्या सुट्या भागांच्या वापराचे महत्त्व देखील विचारात घेतले. उत्पादनाच्या प्रक्रियेत अशा प्रकारच्या लाखो सुट्या भागांचा वापर केला जातो असे त्यांनी सांगितले. भारताच्या एमएसएमईंकडून या भागांचे उत्पादन केले जातेभारताच्या द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये हे उद्योग असल्याचे नमूद करत पंतप्रधान म्हणाले. भारतीय एमएसएमईंनी उत्पादित केलेल्या सुट्या भागांचा वापर जगातील अनेक कार्समध्ये केला जातो, असे सांगत जागतिक संधी आपले दरवाजे ठोकत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. .   

आज जागतिक पुरवठा साखळीचा एक भक्कम भाग बनण्यासाठी आपल्या एमएसएमईंना मोठी संधी आहे, दर्जा आणि टिकाऊपणा यावर यावर काम करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी भर दिला  आणि दर्जा आणि पर्यावरणीय शाश्वतता यांच्याशी संबंधित असलेल्या झिरो डिफेक्ट- झिरो इफेक्ट या आपल्या तत्वज्ञानाचा पुनरुच्चार केला.

महामारीच्या काळात भारतीय एमएसएमईंनी दाखवलेल्या क्षमतेकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.   देशाचे एमएसएमई म्हणून एमएसएमईंच्या भविष्याकडे देश पाहात आहे, ते म्हणाले. सरकारकडून एमएसएमईंना दिल्या जाणाऱ्या बहुआयामी पाठबळाविषयी स्पष्ट करताना पंतप्रधानांनी पीएम मुद्रा योजना आणि पीएम विश्वकर्मा योजनांचा उल्लेख केला.  त्याशिवाय एमएसएमई पत हमी योजनेमुळे महामारीच्या काळात एमएसएमई क्षेत्रातील लाखो रोजगारांचे रक्षण केल्याची माहिती दिली. एमएसएमईंना प्रत्येक क्षेत्रात आज अल्प दराची कर्जे आणि खेळत्या भांडवलाच्या सुविधा सुनिश्चित केल्या जात आहेत, ज्यायोगे त्यांना असलेला वाव वाढत आहे याची पंतप्रधान मोदी यांनी पुष्टी केली. देशाच्या लहान उद्योगांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी सरकार देत असलेला भर हा देखील एक बळकटी देणारा घटक असल्याचे त्यांनी नमूद केले. नवे तंत्रज्ञान आणि कौशल्य याबाबतच्या एमएसएमईंच्या गरजांकडे विद्यमान सरकार लक्ष देत आहे, असे  देशात सुरु असलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांना अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले. भविष्याला आकार देण्यात कौशल्य विकासाची भूमिका अधोरेखित करत पंतप्रधानांनी कौशल्य विकासावर सरकारने कशा प्रकारे विशेष भर दिला आहे याची माहिती देत विद्यमान सरकार सत्तेत आल्यावर एका नव्या मंत्रालयाची स्थापन केली असल्याचे सांगितले. 

सुधारणेला वाव असलेली प्रगत कौशल्य विद्यापीठे  ही सध्याच्या काळाची भारताची गरज असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले . इलेक्ट्रिक (इव्ही) वाहनांना वाढती मागणी असून त्यादृष्टीने व्यावसायिकांनी त्यांची क्षमता वाढवावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. अलीकडेच छतावरील सौरऊर्जा प्रकल्प राबवणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे उद्घाटन झाले. त्यामुळे लाभार्थ्याना मोफत वीज आणि अधिक उत्पन्न मिळते. सुरुवातीचे उद्दिष्ट 1 कोटी कुटुंबांचे असून इलेक्ट्रिक वाहनांसाठी घरांमध्ये अधिक सुगम्य  चार्जिंग स्टेशन्स मिळतील  असे पंतप्रधान म्हणाले. 

वाहने आणि त्यांच्या सुट्या भागांसाठी 26,000 कोटी रुपयांच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. जी  हायड्रोजन वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देते .  याद्वारे 100 हून अधिक प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जात आहे, असे ते म्हणाले.

"जेव्हा देशात नवीन तंत्रज्ञान विकसित होईल, तेव्हा त्या तंत्रज्ञानातील जागतिक गुंतवणूक भारतातही येईल", असे त्यांनी सांगितले. उद्योजकांनी त्यांची क्षमता वाढवावी आणि नवीन क्षेत्रांचा शोध घ्यावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

जशा संधी आहेत तशी आव्हानेही आहेत असे सांगत  डिजिटलायझेशन, विद्युतीकरण, पर्यायी इंधन वाहने आणि बाजारातील मागणीतील चढउतार या प्रमुख समस्यांचा उल्लेखही त्यांनी केला. समस्यांचे रूपांतर संधीत करण्यासाठी योग्य धोरण आखून काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) व्याख्येत सुधारणा करण्याबरोबर एमएसएमईची व्याप्ती वाढवण्याचा मार्ग मोकळा करण्यासारख्या औपचारिक प्रयत्नांच्या दिशेनेही पावले उचलण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

केंद्र सरकार आज प्रत्येक उद्योगाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याची टिप्पणी त्यांनी केली. पूर्वी लहानसहान गोष्टींसाठी, मग ते उद्योगाशी संबंधित काम असो नाही तर वैयक्तिक, सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागायचे मात्र सध्याचे सरकार प्रत्येक क्षेत्राला भेडसावत असलेल्या समस्या सोडवण्यावर काम करत आहे, असे ते म्हणाले.

गेल्या काही वर्षांत 40,000 हून अधिक अनुपालने रद्द केली आणि व्यवसायाशी संबंधित अनेक किरकोळ चुका सुधारल्याचा उल्लेख त्यांनी केला.

नवीन लॉजिस्टिक धोरण असो किंवा जीएसटी, या सर्वांमुळे वाहन निर्मिती  क्षेत्रातील लघुउद्योगांना मदत झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सरकारने पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजना आखून भारतातील पायाभूत सुविधांच्या विकासाला दिशा दिली आहे. या योजनेअंतर्गत बहुविध कनेक्टिव्हिटीला बळ देऊन दीड हजार पेक्षा जास्त स्तरांवर माहितीची प्रक्रिया करून भविष्यातील पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी प्रत्येक उद्योगासाठी सहाय्यक यंत्रणा विकसित करण्यावर भर दिला आणि ऑटोमोबाईल एमएसएमई क्षेत्रातील भागधारकांना या यंत्रणेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नवोन्मेष आणि स्पर्धात्मकतेला पुढे न्या असे त्यांनी सांगितले.सरकार  तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मला खात्री आहे की, टीव्हीएसचा हा प्रयत्न तुम्हाला या दिशेने मदत करेल, असे पंतप्रधान म्हणाले.

जुनी वाहने भंगारात काढण्याच्या स्क्रॅपिंग धोरणाविषयीही त्यांनी मते मांडली. सर्व जुन्या वाहनांच्या जागी नवीन आधुनिक वाहने आणण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि या धोरणाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जहाजबांधणीसाठी नाविन्यपूर्ण आणि नियोजित मार्ग आणि त्यातील भागांच्या पुनर्वापरासाठी बाजारपेठ याविषयीही त्यांनी सांगितले. वाहनचालकांसमोरील आव्हानांचाही त्यांनी उल्लेख केला. चालकांसाठी महामार्गावर सुविधांसाठी 1,000 केंद्रे निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आणि देशाला नवीन उंचीवर नेण्याच्या योजनांमध्ये सरकार पाठीशी उभे असल्याचे सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडचे अध्यक्ष आर दिनेश यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

उज्ज्वल भविष्यासाठी वाहन क्षेत्रातील सूक्ष्म, लघु मध्यम उद्योजकांसाठी डिजिटल मोबिलिटी या विषयावरच्या मदुराईमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले. वाहन निर्मिती  क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना त्यांनी संबोधित केले. या उद्योगाला पाठबळ देण्यासाठी टीव्हीएस ओपन मोबिलिटी प्लॅटफॉर्म आणि टीव्हीएस मोबिलिटी-CII सेंटर ऑफ एक्सलन्स हे दोन मोठे उपक्रमही त्यांनी सुरू केले. देशातील एमएसएमईच्या विकासाला हातभार लावत पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करणे, जागतिक मूल्य साखळ्यांशी एकरूप होतानाच स्वयंपूर्ण  होण्यासाठी मदत करणे या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.

 

 

 

S.Kane/S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2009604) Visitor Counter : 84