पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 29 फेब्रुवारी रोजी विकसित भारत विकसित मध्य प्रदेश कार्यक्रमाला संबोधित करणार


मध्य प्रदेशात 17,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पंतप्रधान करणार पायाभरणी आणि लोकार्पण

सिंचन,ऊर्जा, रस्ते, रेल्वे, पाणी पुरवठा, कोळसा आणि उद्योग यांच्यासह विविध क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात मिळणार चालना

जनतेला सरकारी सेवांचे वितरण करण्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान मध्य प्रदेशात करणार सायबर तहसील प्रकल्पाचा शुभारंभ

या प्रकल्पांचा शुभारंभ मध्य प्रदेशात पायाभूत सुविधा, सामाजिक-आर्थिक विकास आणि जीवनसुलभतेला मोठ्या प्रमाणात चालना देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अधोरेखित करत आहे

Posted On: 27 FEB 2024 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 27 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 फेब्रुवारी 2024 रोजी विकसित भारत, विकसित राजस्थान कार्यक्रमाला संध्याकाळी 4 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मध्य प्रदेशात 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. सिंचन,ऊर्जा, रस्ते, रेल्वे, पाणी पुरवठा, कोळसा आणि उद्योग यांच्यासह विविध महत्त्वाच्या क्षेत्रांशी हे प्रकल्प संबंधित आहेत. पंतप्रधान मध्य प्रदेशात सायबर तहसील प्रकल्पाचा देखील शुभारंभ करणार आहेत. मध्य प्रदेशात 5500 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या सिंचन प्रकल्पांची पंतप्रधान पायाभरणी करणार आहेत. यामध्ये अप्पर नर्मदा प्रकल्प, राघवपूर बहुउद्देशीय प्रकल्प, बसानिया बहुउद्देशीय प्रकल्प या प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प दिंडोरी, अनुप्पूर आणि मांडला जिल्ह्यातील 75,000 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन सिंचनाखाली आणतील आणि या प्रदेशातील वीजपुरवठा आणि पेयजलाच्या पुरवठ्यात वाढ करतील. पंतप्रधान राज्यात 800 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या दोन सूक्ष्म सिंचन प्रकल्पांचे देखील लोकार्पण करतील. यामध्ये परासडोह सूक्ष्म सिंचन प्रकल्प आणि औलिया सूक्ष्म सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. सूक्ष्म सिंचन प्रकल्पांमुळे बेतुल आणि खांडवा जिल्ह्यातील 26,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येईल.

22,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने बांधण्यात आलेल्या तीन रेल्वे प्रकल्पांचे देखील पंतप्रधान राष्ट्रार्पण करतील. यामध्ये वीरांगना लक्ष्मीबाई झांसी-जखलौन आणि धौरा-अगासोड मार्गावर तिसरी मार्गिका, न्यू सुमाओली-जोरा अलापूर रेल्वे मार्गाचे गेज रुपांतरण  आणि पॉवरखेडा- जुझारपूर रेल्वे मार्ग उड्डाणपूल या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे या भागातील रेल्वे संपर्कव्यवस्थेमध्ये सुधारणा होणार आहे आणि सामाजिक-आर्थिक विकासात योगदान मिळणार आहे.

मध्य प्रदेशातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी, पंतप्रधान सुमारे 1000 कोटी रुपयांच्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील. या प्रकल्पांमध्ये रतलाम येथील मेगा इंडस्ट्रियल पार्क; मोरेना जिल्ह्यातील सीतापूर येथे मेगा लेदर, फुटवेअर आणि ॲक्सेसरीज क्लस्टर; इंदूरमध्ये वस्त्र उद्योगासाठी प्लग आणि प्ले पार्क; मंदसौर  औद्योगिक पार्क (जग्गाखेडी फेज-2); आणि धार जिल्ह्यातील पीथमपूर औद्योगिक  पार्कचे उन्नतीकरण यांचा  समावेश आहे.

जयंत ओसीपी सीएचपी सायलो, एनसीएल सिंगरौली आणि दुधीचुआ ओसीपी सीएचपी सायलो सह 1000 कोटींहून अधिक किमतीच्या कोळसा क्षेत्रातील प्रकल्पांचे पंतप्रधान लोकार्पण  करतील.

मध्य प्रदेशातील ऊर्जा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी, पंतप्रधान पन्ना, रायसेन, छिंदवाडा आणि नर्मदापुरम जिल्ह्यात असलेल्या सहा उपकेंद्रांची पायाभरणी करतील. या उपकेंद्रांमुळे या राज्यातील भोपाळ, पन्ना, रायसेन, छिंदवाडा, नर्मदापुरम, विदिशा, सागर, दमोह, छतरपूर, हरदा आणि सीहोर या अकरा जिल्ह्यांतील तसेच मंडीदीप औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनाही याचा लाभ होईल.

अमृत 2.0 अंतर्गत सुमारे 880 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची तसेच राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थेला मजबूत करणाऱ्या  इतर योजनांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. पंतप्रधान खरगोनमधील पाणीपुरवठा प्रकल्पाचे राष्ट्रार्पण करतील.

सरकारी सेवांचे वितरण सुधारण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून, मध्य प्रदेशातील सायबर तहसील प्रकल्प कागदविरहीत, फेसलेस, संपूर्ण विक्री-खरेदी व्यवहार ऑनलाइन निकाली काढणे आणि महसूल नोंदींची दुरुस्ती करेल. राज्यातील सर्व 55 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणारा हा प्रकल्प संपूर्ण मध्य प्रदेशासाठी एकच महसूल न्यायालय उपलब्ध करून देईल. अर्जदाराला अंतिम आदेशाची प्रमाणित प्रत देण्यासाठी ईमेल/व्हॉट्सॲप वापरले जाते. .

मध्य प्रदेशातील अनेक महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची पंतप्रधान पायाभरणी करतील.

मध्य प्रदेशातील पायाभूत सुविधा, सामाजिक-आर्थिक विकास आणि राहणीमानाला मोठी चालना देण्याचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन या प्रकल्पांमधून अधोरेखित होतो.

S.Kane/S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 2009548) Visitor Counter : 57