पंतप्रधान कार्यालय

गुजरातमधील द्वारका येथे विविध प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 25 FEB 2024 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2024

 

द्वारकाधीश की जय!

द्वारिकाधीश की जय!

द्वारकाधीश की जय!

व्यासपीठावर उपस्थित गुजरातचे  लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, संसदेतील माझे सहकारी  गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीमान सी आर पाटिल, अन्य सर्व मान्यवर, आणि गुजरातमधील माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वात आधी तर माता स्वरुप माझ्या अहीर भगिनी ज्यांनी माझे स्वागत केले, त्यांना मी श्रद्धापूर्वक प्रणाम करतो आणि आदरपूर्वक आभार व्यक्त करतो. थोड्याच दिवसापूर्वी समाज माध्यमावर एक चित्रफीत फारच गाजत होती. द्वारकेत 37000 अहीर भगिनी एकत्र गरबा खेळत होत्या. तेव्हा लोक मला खूप अभिमानाने सांगत होते की साहेब या द्वारकेत  37000 अहीर भगिनी! मी म्हटले, बंधू तुम्हाला गरबा दिसला, परंतु तिथले आणखी एक वैशिष्ट्य हे होते की 37000 अहीर बहिणी जेव्हा तिथे गरबा खेळत होत्या ना, तेव्हा तिथे कमीत कमी 25000 किलो सोने त्यांच्या अंगावर होते. ही संख्या तर मी कमीत कमी सांगतोय. जेव्हा लोकांना कळले की 25000 किलो सोने आणि गरबा, तर लोकांना खूप आश्चर्य वाटले. अशा मातृ स्वरूप तुम्ही सर्वांनी माझे स्वागत केले, तुमचे आशीर्वाद मिळाले, मी सर्व अहीर भगिनींचे नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो.

भगवान श्रीकृष्णांची कर्मभूमी, द्वारका धामला मी श्रद्धापूर्वक नमन करतो. देवभूमी द्वारकेत भगवान कृष्ण द्वारिकाधीशाच्या रूपात  विराजमान आहेत. येथे जे काही होते ते द्वारकाधीशांच्या  इच्छेनेच होते.

आज सकाळी मला मंदिराचे दर्शन घेण्याचे आणि त्याचे पूजन करण्याचे सद्भाग्य लाभले. द्वारकेबद्दल म्हटले जाते की ही चारधाम आणि सप्तपुरी या दोघांचाही भाग आहे. येथे आदी शंकराचार्यजी यांनी चार पिठांपैकी एक शारदा पिठाची स्थापना केली.

येथे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे, रुक्मिणी देवीचे मंदिर आहे श्रद्धेची अशी अनेक केंद्र आहेत. आणि गेल्या काही दिवसांमध्ये देशाचे कामकाज करता करता, देवाचे कामकाज करण्यानिमित्त, देशातील अनेक तीर्थस्थळांची यात्रा करण्याचे सद्भाग्य मला लाभले आहे. मी आज द्वारका धाम येथे त्याच दिव्यतेचा अनुभव घेत आहे. मी आज सकाळीच असा एक अनुभव घेतला, त्या क्षणांची अनुभूती घेतली, जे आयुष्यभर माझ्या सोबत राहणार आहेत. मी खोल समुद्रात जाऊन प्राचीन द्वारकाजीचे दर्शन घेतले. पुरातत्व तज्ञांनी समुद्राच्या आत सामावलेल्या त्यात द्वारकेबद्दल खूप काही लिहिलेले आहे. आपल्या शास्त्रांमध्येही द्वारकेबद्दलल म्हटले आहे-

भविष्यति पुरी रम्या सुद्वारा प्रार्ग्य-तोरणा।

चयाट्टालक केयूरा पृथिव्याम् ककुदोपमा॥

अर्थात्, सुंदर द्वारे, आणि उंच भवन असलेली ही नगरी पृथ्वीवर शिखरासारखी असेल. असे म्हणतात की भगवान विश्वकर्मा यांनी स्वतः या द्वारका नगरीचे निर्माण केले होते.

भारतातील श्रेष्ठ नगर रचना, त्याच्या विकासाचे एक उत्तम उदाहरण ही द्वारका नगरी होती. मी आज जेव्हा खोल समुद्रात द्वारकाजींचे दर्शन घेत होतो, तेव्हा मी तीच पुरातन भव्यता, तीच दिव्यता मनोमन अनुभवत होतो.

मी तेथे भगवान श्रीकृष्णांना, द्वारकाधीशांना प्रणाम केला, त्यांना नमन केले. मी सोबत मोरपंख देखील घेऊन गेलो होतो, ज्याला मी प्रभू श्रीकृष्ण यांचे स्मरण करत तेथे अर्पित केले. पुरातत्व तज्ज्ञांकडून जेव्हा याबद्दल मला माहिती मिळाली होती तेव्हापासून माझ्यासाठी याबद्दल खूपच जिज्ञासा निर्माण झाली होती. मनापासून वाटत होते, जेव्हा केव्हा समुद्रात जाईन, तेव्हा त्यात द्वारका नगरीचे जे काही अवशेष आहेत त्यांना स्पर्श करून श्रद्धाभावाने नमन करेन. अनेक वर्षांची माझी ती इच्छा आज पूर्ण झाली. मी, माझे मन भरून आले आहे. मी भावविभोर झालो आहे. अनेक दशकांपासून जे स्वप्न उराशी बाळगले होते आणि आज त्या पवित्र भूमीला स्पर्श करून ते पूर्ण झाले. आपण कल्पना करू शकता की माझ्या आत किती अद्भुत आनंद झाला असेल.

मित्रांनो,

21 व्या शतकातील भारताच्या वैभवाचे चित्रही माझ्या नजरे समोर तरळत होते आणि मी बराच काळ आतच राहिलो. आणि आज मी येथे उशीरा येण्याचे कारण म्हणजे मी समुद्रात बराच वेळ थांबलो होतो. मी समुद्र द्वारकेच्या त्या दर्शनातून विकसित भारताच्या संकल्पाला आणखी बळकट करून आलो आहे.

मित्रांनो,

आज मला सुदर्शन सेतुचे उद्घाटन करण्याचे सद्भाग्यही लाभले आहे.  सहा वर्षांपूर्वी मला या सेतुच्या पायाभरणीची संधी मिळाली.  हा पूल ओखास बेट द्वारका द्विपाशी जोडेल.  या पुलामुळे द्वारकाधीशांचे दर्शनही सुलभ होणार असून या ठिकाणचे दिव्यत्वही वाढणार आहे.  ज्याचे स्वप्न पाहिले होते, ज्याची पायाभरणी केली, ती पूर्ण केली- हीच जनता जनार्दन रूपी जनतेचे सेवक मोदींची हमी आहे. सुदर्शन सेतू ही केवळ सुविधा नाही. किंबहुना, हा अभियांत्रिकीचाही एक चमत्कार आहे आणि स्ट्रक्चरल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या सुदर्शन पुलाचा अभ्यास करावा असे मला वाटते. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात लांब केबल-स्टेड पूल आहे. या आधुनिक आणि विशाल पुलासाठी मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो.

आज एवढे मोठे काम होत असताना मला एक जुनी गोष्ट आठवली.  रशियामध्ये आस्त्राखान नावाचे एक राज्य आहे, त्याचे गुजरात आणि आस्त्राखानशी संबंध आहेत. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी मला रशियाच्या आस्त्राखान राज्यात बोलावले आणि मी गेलो. आणि तिथे गेल्यावर तिथल्या सर्वोत्तम बाजाराला, सगळ्यात मोठ्या मॉलचे नाव ओखाच्या नावावर आहे हे ऐकून मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. सगळ्यांचे नाव ओखा आहे, मी म्हणालो ओखा हे नाव का ठेवले?  तर अनेक शतकांपूर्वी पूर्वी, इथले लोक तेथे व्यापारासाठी जात असत आणि येथून जे काही पाठवले जात असे ते तेथे सर्वोत्तम मानले जात असे. त्यामुळे आज शतकांनतरही  ओखाच्या नावाने दुकान किंवा ओखाच्या नावाने मॉल असो, इथे उत्तम दर्जाच्याच वस्तू मिळतात असे इथल्या लोकांना वाटते. माझ्या ओखाला शतकानुशतके जो आदर होता, तोच आता या सुदर्शन पुलाच्या उभारणीनंतर जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा झळकणार आहे आणि ओखाचे नाव आणखी वाढणार आहे.

मित्रांनो,

आज जेव्हा मी सुदर्शन सेतू पाहतो तेव्हा अनेक जुन्या गोष्टींची मला आठवण येत आहे.  पूर्वी द्वारका आणि बेट द्वारका येथील लोकांना भाविकांची ने-आण करण्यासाठी फेरीबोटींवर अवलंबून राहावे लागत होते.  प्रथम समुद्राने आणि नंतर रस्त्याने लांबचा प्रवास करावा लागत असे.  प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असे तर कधी समुद्राच्या उंच लाटांमुळे बोटसेवा बंद पडायची. त्यामुळे भाविकांचे प्रचंड हाल होत असत. मी मुख्यमंत्री असताना माझे सहकारी जेव्हा-जेव्हा माझ्याकडे यायचे तेव्हा ते पुलाबद्दल नक्कीच बोलायचे. आणि आमचे शिव-शिव, आमच्या बाबूबांचा अजेंडा होता की हे काम मला करायचे आहे. आज बाबूबाला सगळ्यात जास्त आनंद झालेला दिसतोय.

मित्रांनो,

या गोष्टी मी तत्कालीन काँग्रेसशासित केंद्र सरकारकडे वारंवार मांडल्या, पण त्यांनी कधीच त्याकडे लक्ष दिले नाही.  या सुदर्शन पुलाचे बांधकामही माझ्या नशिबात भगवान श्रीकृष्णानेच लिहिले होते. देवाच्या आदेशाचे पालन करून मी ही जबाबदारी पार पाडू शकलो याचा मला आनंद आहे. या पुलाच्या उभारणीमुळे आता देशभरातून येथे येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. या पुलाची आणखी एक खास गोष्ट आहे. पुलावर बसवण्यात आलेल्या सौर पॅनलमधून नेत्रदीपक रोषणाईसाठी वीजनिर्मिती केली जाणार आहे. सुदर्शन सेतूमध्ये 12 पर्यटक दालने बांधण्यात आली आहेत. आज मी ही दालने पाहिली आहेत.  ही अप्रतिम, अतिशय सुंदर बनवलेली आहेत. सुदर्शनी आहे, त्यातून लोक अनंत निळासागर न्याहाळू शकतील.

मित्रांनो 

आज या पवित्र प्रसंगी, मी देवभूमी द्वारकेच्या लोकांचेही कौतुक करेन. इथल्या लोकांनी स्वच्छतेची मोहीम सुरू केली आहे आणि मला लोक समाज माध्यमांवरून ध्वनी चित्रफिती पाठवत होते की द्वारकेत किती जबरदस्त स्वच्छतेचे काम सुरू आहे! तुम्ही सर्व जण आनंदी आहात ना? तुम्हा सर्वांना आनंद झाला आहे ना,या स्वच्छतेमुळे? एकदम सर्व स्वच्छ वाटते आहे ना ?पण आता तुम्हा सर्वांची जबाबदारी काय आहे? मला परत स्वच्छता राखण्यासाठी यावे तर लागणार नाही ना? आपण सर्वजण ही स्वच्छता कायम राखाल ना?  जरा हात वर करून बोला… आता आम्ही द्वारकेत घाण होऊ देणार नाही… मान्य आहे.. मान्य आहे!असे पहा, परदेशातील लोक इथे येतील, अनेक भक्त इथे येतील. जेव्हा त्यांना इथला परिसर पूर्णपणे स्वच्छ दिसेल तेव्हा त्यांचे अर्धे मन तर तुम्ही तेव्हाच जिंकलेले असेल.

मित्रांनो,

जेव्हा मी देशवासियांना नवभारताच्या निर्मितीची हमी दिली होती, तेव्हा विरोधी पक्षांचे हे लोक जे नेहमीच मला शिव्या देण्यात समाधान मानतात, ते या हमीची टर उडवत होते. आज पहा, लोक स्वतःच्या डोळ्यांनी नवा भारत घडताना पाहत आहेत. ज्यांनी दीर्घकाळ देशाचा कारभार केला, त्यांच्याकडे इच्छाशक्तीच नव्हती, सर्वसामान्यांना सुविधा देण्याचा हेतू आणि प्रामाणिकपणा यात सच्चेपणा नव्हता. काँग्रेसची पूर्ण ताकद फक्त एका कुटुंबालाच पुढे नेण्यामध्ये लागत राहिली, जर एका कुटुंबालाच सर्व काही करायचे होते तर राष्ट्र निर्मितीची आठवण कशी आली असती? त्यांचे पूर्ण बळ फक्त याच गोष्टीवर लागत असे की पाच वर्ष सरकार चालवायचे कसे आणि केलेले घोटाळे दाबायचे कसे! तेव्हाच तर 2014 च्या आधीच्या दहा वर्षांमध्ये, ते भारताला जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत फक्त 11 व्या स्थानावर आणू शकले. अर्थव्यवस्था जेव्हा एवढी लहान होती, तर एवढ्या महाकाय देशाच्या महाकाय स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यात सामर्थ्यही तेवढंच तोकडे होते. ज्या काही थोड्याफार आर्थिक तरतुदी पायाभूत सुविधांसाठी केल्या जात होत्या, तो पैसा हे लोक घोटाळे करून लुटत होते. जेव्हा देशात दूरसंचार पायाभूत सुविधा वाढवण्याची वेळ आली, काँग्रेसने 2 जी घोटाळा केला. जेव्हा देशात क्रीडा पायाभूत सुविधा आधुनिक बनवण्याची संधी आली, काँग्रेसने राष्ट्रकुल घोटाळा केला. जेव्हा देशात संरक्षण विषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्याची वेळ आली, काँग्रेसने हेलिकॉप्टर आणि पाणबुड्यांचा घोटाळा केला. देशाच्या प्रत्येक गरजेच्या वेळी काँग्रेस फक्त आणि फक्त विश्वासघातच  करु शकते.

मित्रहो,

2014 मध्ये तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद देऊन दिल्लीला पाठवले होते, तेव्हा मी तुम्हाला वचन दिले होते की, मी देशाची लूट होऊ देणार नाही.  काँग्रेसच्या काळात जे हजारो कोटींचे घोटाळे व्हायचे ते आता थांबले आहेत.  गेल्या 10 वर्षात आपण देशाला जगातील 5 वी आर्थिक शक्ती बनवले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून अशी नवनवीन, भव्य आणि दिव्य बांधकामे देशभर होताना दिसत आहेत.  एकीकडे आपली दिव्य तीर्थक्षेत्रे आधुनिक स्वरूपात उदयास येत आहेत आणि दुसरीकडे महाप्रकल्पांच्या माध्यमातून नव्या भारताचे नवे चित्र निर्माण होत आहे.  आज तुम्ही गुजरातमध्ये हा देशातील सर्वात लांब केबलवर आधारीत पूल पाहत आहात.  काही दिवसांपूर्वीच मुंबईत देशातील सर्वात लांब सागरी सेतूचे काम पूर्ण झाले.  जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदी वर बांधलेला भव्य पूल आज जगभरात चर्चेचा विषय आहे.  तमिळनाडूमध्ये भारतातील पहिला उभा लिफ्ट ब्रिज असलेल्या, न्यू पंबन ब्रिजचे कामही वेगाने सुरू आहे.  आसाममध्ये भारतातील सर्वात लांब, नदीवरील पूलही गेल्या 10 वर्षांत बांधण्यात आला आहे.  अशी मोठमोठी बांधकामे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चहू दिशांना होत आहेत.  ही आधुनिक दळणवळण व्यवस्था, एक समृद्ध आणि मजबूत राष्ट्र निर्माण करण्याचा मार्ग आहे.

मित्रांनो,

जेव्हा दळणवळण वाढते, दळणवळणात सुधारणा होते तेव्हा त्याचा थेट परिणाम देशाच्या पर्यटनावर होतो.  गुजरातमधील वाढते दळणवळण, या राज्याला एक मोठे पर्यटन केंद्र बनवत आहे.  आज गुजरातमध्ये 22 अभयारण्ये आणि 4 राष्ट्रीय उद्याने आहेत.  हजारो वर्षे जुने बंदर शहर लोथलची जगभरात चर्चा आहे.  आज अहमदाबाद शहर, रानी की वाव, चंपानेर आणि धोलावीरा ही स्थळे, जागतिक वारसा बनले आहेत.  शिवराजपुरी हा द्वारकेतील ब्ल्यू फ्लॅग म्हणजेच स्वच्छ किनाऱ्याचा दर्जा मिळालेला किनारा आहे. अहमदाबाद, जागतिक वारसा शहर आहे.  आशियातील सर्वात लांब रोपवे (लोहरज्जू मार्ग) आपल्या गिरनार पर्वतावर आहे.  गीर वन, आशियाई सिंह, हे आपल्या गीरच्या जंगलात आढळतात.  जगातील सर्वात उंच पुतळा, सरदार साहेबांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी (एकतेचे प्रतिक असलेला पुतळा) गुजरातमधील एकता नगर इथे आहे.  रणोत्सवात आज जगभरातील पर्यटकांची जत्रा भरते.

कच्छमधील धोर्डो गावाची गणना जगातील सर्वोत्तम पर्यटन गावांमध्ये केली जाते.  नदाबेट हे देशभक्ती आणि पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे.  विकास आणि वारसा या मंत्राला अनुसरून गुजरातमधील श्रद्धास्थानांचेही सुशोभीकरण केले जात आहे.  द्वारका, सोमनाथ, पावागड, मोढेरा, अंबाजी अशा सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांमध्ये सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.  52 शक्तीपीठांचे दर्शन एकाच ठिकाणी होते, अशी व्यवस्था अंबाजीत करण्यात आली आहे.  आज भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची, गुजरात ही पसंती ठरत चालली आहे.  2022 मध्ये भारतात आलेल्या 85 लाखांहून अधिक पर्यटकांपैकी प्रत्येक पाचवा पर्यटक गुजरातमध्ये आला आहे.  गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत सुमारे 15.5 लाख पर्यटक गुजरातमध्ये आले होते.  केंद्र सरकारने परदेशी पर्यटकांना उपलब्ध करून दिलेल्या ई-व्हिसा सुविधेचा गुजरातलाही फायदा झाला आहे.  पर्यटकांच्या संख्येत झालेली ही वाढ गुजरातमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधीही निर्माण करत आहे.

मित्रहो,

मी जेव्हा जेव्हा सौराष्ट्रात येतो तेव्हा इथून एक नवी ऊर्जा घेऊन जातो. सौराष्ट्राची ही भूमी, जिद्दीने यश संपादन करण्याची मोठी प्रेरणा आहे.  सौराष्ट्राचा आजचा विकास पाहता पूर्वी इथले जीवन किती खडतर होते हे कोणालाच कळणार नाही.  सौराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक शेतकरी पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तळमळताना आपण पाहिले आहेत.  लोक इथून स्थलांतर करून लांबवर चालत जायचे.  ज्या नद्यांमध्ये वर्षभर पाणी असते ते पाणी  सौराष्ट्र आणि कच्छ कडे वळवले जाईल, असे मी म्हणायचो तेव्हा हे काँग्रेसचे लोक माझी चेष्टा करायचे.मात्र आज सौनी या योजनेने सौराष्ट्राचे नशीब पालटले आहे.  या योजने अंतर्गत 1300 किलोमीटरहून अधिक लांबीची जलवाहिनी (पाइपलाइन) टाकण्यात आली असून ही पाइपलाइन लहानसहान नाही, तर पूर्ण मारुती कार आतमधून जाऊ शकेल एवढा या वाहिनीचा घेर आहे.  या योजनेमुळे सौराष्ट्रातील शेकडो गावांमध्ये सिंचनासाठी आणि पिण्याचे पाणी पोहोचले आहे.  आता सौराष्ट्रातील शेतकरी समृद्ध होत आहेत, येथील पशुपालक समृद्ध होत आहेत, येथील मच्छीमार समृद्ध होत आहेत.  मला विश्वास आहे की येत्या काही वर्षांत संपूर्ण सौराष्ट्र, संपूर्ण गुजरात, यशाची नवीन शिखरे गाठेल.  द्वारकाधीशांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.  आपण सर्व मिळून सौराष्ट्राचा विकास करू, गुजरातचा विकास करू, गुजरातचा विकास होईल, भारताचा विकास होईल.

पुन्हा एकदा, या भव्य पुलासाठी मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन करतो! आपले अभिनंदन करतो!  आणि आता मी द्वारकेच्या जनतेला विनंती करतो की, आता जगाच्या कानाकोपऱ्यातून अधिकाधिक पर्यटक कसे येतील याचा विचार करा.  आल्यानंतर त्यांना इथेच राहावेसे वाटायला हवे.  तुमच्या या भावनेचा मी आदर करतो.  माझ्यासोबत म्हणा, द्वारकाधीशाचा विजय असो!  द्वारकाधीशाचा विजय असो!  द्वारकाधीशाचा विजय असो! भारतमातेचा जयजयकार  हो!  भारतमातेचा जयजयकार  हो!  भारतमातेचा जयजयकार  हो!

सूचना: पंतप्रधानांच्या भाषणातील काही भाग,काही ठिकाणी गुजराती भाषेतही आहे. त्याचे इथे भाषांतर करण्यात आले आहे.

खूप खूप आभार !

 

* * *

 NM/Vinayak/Ashutosh/D.Rane/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2008982) Visitor Counter : 60