पंतप्रधान कार्यालय

यूएईमध्ये अबू धाबी येथे बीएपीएस हिंदू मंदिराच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 14 FEB 2024 11:48PM by PIB Mumbai

 

श्री स्वामी नारायण जय देव, महामहिम शेख नाहयान अल मुबारक, पूज्य महंत स्वामी जी महाराज, भारत, यूएई आणि जगातील विविध देशातून आलेले अतिथीगण आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्यासोबत जोडले गेलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो!

आज संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीने मानवी इतिहासाचा  एक नवा सोनेरी अध्याय लिहिला आहे. आज अबूधाबीमध्ये भव्य आणि दिव्य मंदिराचे लोकार्पण होत आहे. या क्षणामागे अनेक वर्षांचे परिश्रम आहेत. यामध्ये अनेक वर्षांपासूनची जुनी स्वप्ने जुळलेली आहेत आणि यामध्ये भगवान स्वामी नारायण यांचा आशीर्वाद जोडलेला आहे. आज प्रमुख स्वामी ज्या दिव्य लोकात असतील, त्यांचा आत्मा जिथे असेल तिथे त्यांना अतिशय आनंद होत असेल. पूज्य प्रमुख स्वामीजींच्या सोबत माझे एक प्रकारे पिता-पुत्राचे नाते होते.  एका पितृतुल्य भावनेद्वारे जीवनातील एका प्रदीर्घ काळापर्यंत त्यांचे सान्निध्य मला लाभत राहिले आणि कदाचित काही लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की मी सीएम होतो तेव्हाही आणि पीएम होतो तेव्हा देखील जर त्यांना एखादी गोष्ट आवडली नसेल तर ते मला  स्पष्ट शब्दात मार्गदर्शन करत होते.आणि ज्यावेळी दिल्लीत अक्षरधाम उभारले जात होते, त्यावेळी त्यांच्या आशीर्वादाने मी पायाभरणी कार्यक्रमात होतो. त्यावेळी तर मी राजकारणात देखील काहीच नव्हतो आणि त्या दिवशी मी सांगितले होते की आपण गुरुची खूप प्रशंसा करत राहतो, पण कधी असा विचार केला आहे का की एखाद्या गुरुंनी सांगितले की यमुनेच्या काठावर आपले देखील  एखादे स्थान असेल आणि शिष्यरुपी असेल. प्रमुख स्वामी महाराजांनी आपल्या गुरूची ती इच्छा पूर्ण केली होती. आज मी देखील त्याच एका शिष्य भावनेतून या ठिकाणी तुमच्यासमोर उपस्थित आहे की आज प्रमुख स्वामी महाराजांचे स्वप्न आपण पूर्ण करू शकलो आहोत. आज वसंत पंचमीचा पवित्र सण देखील आहे. पूज्य शास्त्री जी महाराजांची जयंती देखील आहे. ही वसंत पंचमी हे पर्व माता सरस्वतीचे पर्व आहे. माता सरस्वती म्हणजे बुद्धी आणि विवेकाच्या मानवी प्रज्ञा आणि चेतनेची देवी. ही मानवी प्रज्ञाच आहे ही है, जिने आपल्याला सहकार्य, सामंजस्य, समन्वय आणि सौहार्द यांसारख्या  आदर्शांचा अंगिकार जीवनात करण्याची शिकवण दिली आहे. मला आशा आहे की हे मंदिर देखील मानवतेसाठी चांगल्या भविष्यासाठी वसंताचे स्वागत करेल. हे मंदिर संपूर्ण जगासाठी धार्मिक सौहार्द आणि जागतिक एकतेचे प्रतीक बनेल.

बंधू आणि भगिनींनो,

यूएईचे सहिष्णुता मंत्री महामहिम शेख नाहयान अल मुबारक या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित आहेत. आणि त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, जे विचार आपल्या समोर व्यक्त केले आहे, आपल्या त्या स्वप्नांना बळकट करण्याचे त्यांच्या शब्दात वर्णन केले आहे, त्यांचा मी आभारी आहे.

मित्रहो,

या मंदिराच्या निर्मितीमध्ये यूएईच्या सरकारची जी भूमिका राहिली आहे तिची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी आहे. मात्र, या भव्य मंदिराचे स्वप्न साकार करण्यामध्ये जर सर्वात जास्त सहकार्य कोणाचे असेल तर ते आहे माझे बंधू महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद यांचे. मला माहीत आहे की यूएईच्या अध्यक्षांच्या संपूर्ण सरकार ने अतिशय मोठ्या मनाने कोट्यवधी भारतीयांची इच्छा पूर्ण केली आहे. आणि त्यांनी केवळ येथेच नव्हे तर 140 कोटी भारतीयांची मने जिंकली आहेत. मी या मंदिराच्या विचारापासून एका प्रकारे प्रमुख स्वामीजींच्या विचारानंतरच्या विचारात परिवर्तित झालो आहे. म्हणजेच विचारापासून तो साकार होण्यापर्यंतच्या प्रवासाशी जोडलेला राहिलो आहे, हे माझे सर्वात मोठे भाग्य आहे आणि म्हणूनच हे माझे सर्वात मोठे भाग्य आहे. आणि म्हणूनच मला हे माहीत आहे की महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद यांच्या औदार्यासाठी धन्यवाद हा शब्द देखील अतिशय लहान वाटेल इतके मोठे काम त्यांनी केले आहे. माझी अशी इच्छा आहे की त्यांच्या या व्यक्तिमत्वाला, भारत यूएईच्या संबंधांच्या खोलीला केवळ यूएई आणि भारताच्या लोकांनीच नव्हे तर संपूर्ण जगाने जाणून घेतले पाहिजे. मला आठवते की ज्यावेळी 2015 मध्ये यूएईमध्ये मी येथे आलो होतो आणि त्यावेळी मी महामहिम शेख मोहम्मद यांच्यासोबत या मंदिराच्या विचारावर चर्चा केली होती. मी भारताच्या लोकांची इच्छा त्यांच्यासमोर मांडली तर त्यांनी पापणी लवण्याच्या आतच त्याच क्षणी माझ्या प्रस्तावाला होकार दिला. त्यांनी मंदिरासाठी अतिशय थोड्या काळात इतकी मोठी जमीन देखील उपलब्ध करून दिली. इतकेच नाही, मंदिराशी संबंधित आणखी एका विषयाचे देखील निरसन केले. मी 2018 मध्ये ज्यावेळी दुसऱ्यांदा यूएईमध्ये आलो होतो तेव्हा येथे संतांनी मला ज्याचे ब्रह्मविहारी स्वामीजींनी आताच ज्याचे वर्णन केले, त्या मंदिराची दोन मॉडेल दाखवली. एक मॉडेल भारताच्या प्राचीन वैदिक शैलीवर आधारित भव्य मंदिराचे होते, जे आपण पाहात आहोत. दुसरे एक सामान्य मॉडेल होते, ज्यामध्ये बाहेरून कोणतेही हिंदू धार्मिक चिन्ह नव्हते. संतांनी मला सांगितले की यूएईचे सरकार जे मॉडेल स्वीकार करेल, त्यावरच पुढे काम होईल. ज्यावेळी हा प्रश्न महामहिम शेख मोहम्मद यांच्याकडे गेला तेव्हा त्यांचे विचार अगदी स्पष्ट होते. त्यांचे म्हणणे होते की अबूधाबीमध्ये जे मंदिर बनेल ते आपल्या संपूर्ण वैभवाने आणि गौरवाने तयार झाले पाहिजे. त्यांची अशी इच्छा होती की या ठिकाणी केवळ मंदिर नुसते तयार होऊ नये तर ते मंदिराप्रमाणे दिसले देखील पाहिजे.

मित्रहो,

हे लहान गोष्ट नाही आहे, ही अतिशय मोठी गोष्टी आहे. या ठिकाणी केवळ मंदिर तयार होऊ नये तर ते मंदिरासारखे दिसले देखील पाहिजे. भारतासोबत बंधुत्वाची ही भावना खरोखरच आपल्यासाठी मोठा ठेवा आहे. आपल्याला या मंदिराची जी भव्यता दिसत आहे, त्यामध्ये महामहिम शेख मोहम्मद यांच्या विशाल विचारांची देखील झलक आहे. आतापर्यंत यूएई बुर्ज खलिफा, फ्यूचर म्युझियम, शेख झायेद मशीद आणि दुसऱ्या हायटेक इमारतींसाठी ओळखले जात होते. आता त्याच्या ओळखीत आणि सांस्कृतिक अध्यायामध्ये आणखी एका सांस्कृतिक अध्यायाची भर पडली आहे. मला खात्री आहे की आगामी काळात या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येतील. यामुळे यूएईमध्ये येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल आणि लोकांमधील संपर्क देखील वाढेल. मी संपूर्ण भारत आणि जगभरात राहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांच्या वतीने अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद यांना आणि यूएई सरकारला खूप-खूप धन्यवाद देतो. मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी, यूएईच्या राष्ट्राध्यक्षांना या ठिकाणी उभे राहून अभिवादन करावे. खूप खूप आभार. मी यूएईच्या लोकांचे देखील त्यांच्या सहकार्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो.

मित्रहो,

भारत आणि यूएईच्या मैत्रीकडे आज संपूर्ण जगात परस्पर विश्वास आणि सहकार्याच्या रुपात पाहिले जाते. विशेषतः गेल्या काही वर्षात आपल्या संबंधांनी एक नवी उंची गाठली आहे. मात्रभारत आपल्या या संबंधांकडे केवळ वर्तमान संदर्भातच पाहात नाही. आपल्या या संबंधांची मुळे हजारो वर्षे जुनी आहेत. अरब विश्व शेकडो वर्षांपूर्वी भारत आणि युरोपदरम्यान व्यापाराचा एक सेतू म्हणून काम करत होते.

मी ज्या गुजरातमधून येतो  तिथल्या व्यापाऱ्यांसाठी, आमच्या पूर्वजांसाठी, अरब जग हे व्यापारी संबंधांचे मुख्य केंद्र होते. सभ्यतेच्या या समागमातूनच नवीन शक्यतांचा जन्म होतो. या संगमातून कला, साहित्य आणि संस्कृतीचे नवे प्रवाह निर्माण होतात. म्हणूनच अबुधाबीमध्ये उभारलेले हे मंदिर इतके महत्त्वाचे आहे. या मंदिराने आपल्या प्राचीन नात्यांमध्ये नवी सांस्कृतिक ऊर्जा भरली आहे.

मित्रांनो,

अबुधाबीचे हे विशाल मंदिर म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नाही.  हे मानवतेच्या सामायिक वारशाचे प्रतीक आहे.  हे भारत आणि अरब लोकांमधील परस्पर प्रेमाचे प्रतीक आहे.  यात भारत-यूएई संबंधांचे आध्यात्मिक प्रतिबिंब देखील आहे.  या अद्भुत निर्मितीबद्दल मी बीएपीएस  संस्था आणि त्यांच्या सदस्यांचे कौतुक करतो.  मी हरी भक्तांचे कौतुक करतो. बीएपीएस संस्थेच्या लोकांनी, आपल्या पूज्य संतांनी जगभरात मंदिरे बांधली आहेत.  या मंदिरांमध्ये वैदिक विधींकडे जितके बारकाईने लक्ष दिले जाते. तितकेच त्यात  आधुनिकताही  दिसून येते.  स्वामी नारायण संन्यास परंपरा हे कठोर प्राचीन नियमांचे पालन करून आधुनिक जगाशी कसे जोडले जाऊ शकते याचे उदाहरण आहे. तुमचे व्यवस्थापन कौशल्य, प्रणाली व्यवस्थापन तसेच प्रत्येक भक्ताप्रती संवेदनशीलता यातून प्रत्येकजण खूप काही शिकू शकतो.  हे सर्व भगवान स्वामीनारायणांच्या कृपेचेच फळ आहे.  या महान प्रसंगी मी भगवान स्वामीनारायणाच्या चरणी विनम्र अभिवादन करतो.  मी तुम्हा सर्वांचे आणि देशाविदेशातील सर्व भक्तांचे हार्दिक अभिनंदन करतो.

मित्रांनो,

भारतासाठी ही अमृतकाळाची वेळ आहे, हीच आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीसाठी अमृतकाळाची वेळ आहे. आणि गेल्या महिन्यातच अयोध्येत भव्य राम मंदिराचे अनेक शतकांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले आहे.  रामलला त्यांच्या भवनात विराजमान झाले आहेत. संपूर्ण भारत आणि प्रत्येक भारतीय आजही त्या प्रेमात, त्या भावनेत बुडालेला आहे.  आणि आता माझे मित्र ब्रह्मविहारी स्वामी सांगत होते की मोदीजी हे सर्वात मोठे पुजारी आहेत. मंदिराचा पुजारी होण्यासाठी माझी पात्रता आहे की नाही हे मला माहीत नाही. पण मला अभिमान वाटतो की मी भारतमातेचा उपासक आहे. परमात्म्याने मला दिलेल्या काळाचा प्रत्येक क्षण न क्षण आणि देवाने दिलेला शरीराचा प्रत्येक कण न कण फक्त भारतमातेसाठी आहे. 140 कोटी देशवासी माझे आराध्य दैवत आहेत.

मित्रांनो,

अयोध्येतील आपल्या त्या परमानंदास आज अबूधाबीतील आनंदसोहळ्याने आणखी वाढवले आहे. आणि माझे सद्भाग्य आहे की मी प्रथम अयोध्येत भव्य श्री राम मंदिर आणि नंतर आता अबुधाबीमध्ये या मंदिराचा साक्षीदार झालो आहे.

मित्रांनो,

आपल्या वेदांमधे म्हटले आहे की 'एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति', म्हणजेच विद्वानजन, एकाच ईश्वराला, एकाच सत्याला वेगवेगळ्या प्रकारे विशद करतात. हे तत्वज्ञान भारताच्या मूलभूत चेतनेचा भाग आहे. त्यामुळे आपण स्वभावानेच केवळ सर्वांना स्वीकारतो असे नाही तर, सर्वांचे स्वागतही करतो.  आम्हाला विविधतेत वैर दिसत नाही, आम्ही विविधतेला आमचे वैशिष्ट्य  मानतो. आज जागतिक संघर्ष आणि आव्हानांचा सामना करताना हा विचार आपल्याला आत्मविश्वास देतो. माणुसकीवरचा आपला विश्वास दृढ करतो. या मंदिरात तुम्हाला प्रत्येक पावलावर विविधतेतील विश्वासाची झलक पाहायला मिळेल.  मंदिराच्या भिंतींवर हिंदू धर्मासोबतच इजिप्शियन चित्रलिपी आणि बायबलमधील, कुराणातील

कथा कोरल्या आहेत. मी पाहिलं की मंदिरात प्रवेश करताच वॉल ऑफ हार्मनी दिसते. ते काम आमच्या बोहरा मुस्लिम समाजाच्या बांधवांनी करुन घेतले आहे. यानंतर या इमारतीचा एक प्रभावी थ्रीडी अनुभव येतो आहे.  पारशी समाजाने त्याची सुरुवात केली आहे. येथे आपले शीख बांधव लंगरची जबाबदारी उचलण्यासाठी पुढे आले आहेत. मंदिराच्या उभारणीत प्रत्येक धर्माच्या संप्रदायाच्या लोकांनी काम केले आहे. मला असेही सांगण्यात आले आहे की मंदिराचे सात स्तंभ किंवा मिनार यूएईच्या सात अमिरातीचे प्रतीक आहेत. भारतातील लोकांचा हा स्वभावही आहे. आपण कुठेही जातो, तिथल्या संस्कृतीचा आणि मूल्यांचा आपण आदर करतो आणि ते आत्मसात करतो तसेच सर्वांबद्दलची हीच आदराची भावना महामहीम शेख मोहम्मद यांच्या जीवनात स्पष्टपणे दिसून येते हे पाहून आनंद होतो.  माझे बंधू, माझे मित्र शेख मोहम्मद बिन झायेद यांचीही हीच ध्येयदृष्टी आहे, ‘आपण सगळे भाऊ आहोत’.  अबुधाबीमध्ये त्यांनी हाऊस ऑफ अब्राहमिक फॅमिली बांधली. या संकुलात  एक मशीदही आहे, एक चर्चही आहे आणि एक सिनेगॉगही आहे.  आणि आता अबुधाबीतील भगवान स्वामी नारायणाचे हे मंदिर विविधतेतील एकतेच्या त्या कल्पनेला नवा विस्तार देत आहे.

मित्रांनो,

आज या भव्य आणि पवित्र स्थानावरून मला आणखी एक आनंदाची बातमी द्यायची आहे.  आज सकाळी, यूएईचे उपराष्ट्रपती महामहीम शेख मोहम्मद बिन राशिद यांनी दुबईत भारतीय श्रमिकांसाठी रुग्णालय बांधण्याकरिता जमीन  देण्याची घोषणा केली.  मी त्यांचे आणि माझे बंधू महामहीम शेख मोहम्मद बिन झायेद यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

मित्रांनो,

आपले वेद आपल्याला शिकवतात की समानो मंत्र: समिति: समानी, समानम् मनः सह चित्तम् एषाम्.  म्हणजेच आपले विचार एकसंध असले पाहिजेत, आपली मने एकमेकांशी जोडली गेली पाहिजेत, आपले संकल्प एकत्र आले पाहिजेत, मानवी एकतेचे हे आवाहनच आपल्या अध्यात्माचे मूळ सार आहे.  आपली मंदिरे ही या शिकवणूकीचे आणि संकल्पांचे केंद्र राहिले आहेत.  या मंदिरांमध्ये आपण एकाच स्वरात घोष करतो की, सर्व प्राणिमात्रांमधे सद्भावना असावी, जगाचे कल्याण व्हावे, मंदिरांमध्ये वेदांच्या ऋचांचे जे पठण केले जाते. ती आपल्याला शिकवते वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण पृथ्वी हे आपले कुटुंब आहे. हाच विचार मनात घेऊन आज भारत आपल्या जागतिक शांततेसाठीच्या मोहिमेकरता प्रयत्न करत आहे. यावेळी भारताच्या अध्यक्षतेखाली, जी-20 देशांनी एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्याचा संकल्प आणखी मजबूत केला आहे आणि पुढे नेला आहे. आपले हे प्रयत्न एक सूर्य, एक जग, एक ग्रीड या मोहिमांना दिशा देत आहेत. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, हू भावना घेऊन भारत, एक पृथ्वी, एक आरोग्य  या अभियानासाठी कार्यरत आहे.  आपली संस्कृती, आपली श्रद्धा आपल्याला जगाच्या कल्याणासाठी हे संकल्प करण्यास प्रोत्साहित करते. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रावर भारत या दिशेने काम करत आहे.  मला विश्वास आहे की अबू धाबी मंदिराची मानवतावादी प्रेरणा आपल्या संकल्पांना उर्जा देईल आणि ते प्रत्यक्षात आणेल.  यासह मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो. मी हे भव्य दिव्य विशाल मंदिर संपूर्ण मानवतेला समर्पित करतो. पूज्य महंत स्वामींच्या श्रीचरणी विनम्र वंदन करतो. पूज्य प्रमुख जी स्वामींचे पुण्य स्मरण करून, मी श्रद्धापूर्वक नमन करतो. आणि सर्व हरीभक्तांना जय श्री स्वामी नारायण.

***

NM/H.Akude/S.Patil/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2006899) Visitor Counter : 45